Tag Archives: Social

मानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा !

  •  

                                                                       विक्रम पटेल, शेखर सक्सेना / अनुवाद : डॉ. दीपक बोरगावे  

 

                     मानसिक आरोग्याचा प्रश्न हा एक गंभीर प्रश्न म्हणून सामोरे येतो आहे. लॅन्सेट या आरोग्य विषयक नियतकालिकाने भारताच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीविषयी  चिंता व्यक्त केली आहे. लॅन्सेट कमिशन ऑन  ग्लोबल मेंटल हेल्थ चे प्रमुख धर्ते  असलेले तसेच हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेले विक्रम पटेल व शेखर सक्सेना यांनी  मानसिक आरोग्याच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहिलेल्या लेखाचा (मूळ लेख)अनुवाद डॉ. दीपक बोरगावे  यांनी केला आहे. हा लेख असंतोष च्या वाचकाकरीता प्रकाशित करीत आहोत. 

मानसिक आरोग्य ही एक जागतिक आणि सार्वजनिक बाब आहे . सर्वाना बरोबर घेऊन जायचे आणि कुणालाही पाठीमागे ठेवायचे नाही हे मानसिक आरोग्याचे केंद्रीय तत्त्व आहे. हे तत्त्व मानवी क्षमता आणि मानवी संसाधने  यांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. म्हणून, प्रत्येक व्यक्तीचा मानसिक आरोग्यावर हक्क बनतो, तसा तो आपसूक असतोच आणि असायलाच हवा . मानसिक आरोग्य हे सामाजिक-आर्थिक विकासाला, संपूर्ण आरोग्यदायी वातावरणाला आणि समतेच्या जगाची निर्मिती करण्यासाठीचे एक टिकाऊ  असे साधन आहे.

मानसिक आरोग्य या संज्ञेचे थोडया सोप्या शब्दात अर्थांतरण करायचे झाल्यास, त्याचा अर्थ मानसिक आजार असाच होतो. वास्तविक पाहता  हा एक खडा विरोधाभासच म्हणावा लागेल .  मानसिक आरोग्य ही खूप महत्त्वाची बाब असायला हवी, मानवतेचे ते एक अन्वयाचे अंग आहे यामुळेच आपणा सर्वांना आरोग्याच्या अनेक गोष्टीबद्दल तुलनात्मक विचार करायला सांगितले जाते, पण मानसिक आरोग्याबद्दल जेव्हा जेव्हा काही सांगितले जाते तेव्हा आपण बहुतेकदा घाबरून जातो. ही तशी आश्चर्याची गोष्ट नाही, आपण मानसिक आरोग्यासंदर्भात विविध गोष्टींवर अवलंबून राहत आलो आहोत. काही कौशल्ये आपण शिकत आलेलो आहोत, ज्यामुळे आपले जीवन हे अर्थपूर्ण आणि जगण्यालायक झाले आहे, अशी आपली वाढती धारणा झाली आहे. म्हणून आज जगामध्ये मानसिक आरोग्य ह्या गोष्टीस  साऱ्या जगण्यातील अनेक समस्यांत सर्वात प्रथम प्राध्याण्यक्रम दिला पाहिजे, ही गोष्ट मान्य केली आहे. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही, ही निश्चितपणे खेदाची बाब म्हणायला पाहिजे.

लॅन्सेट नावाचे एक वैद्यकीय नियतकालिक जागतिक मानसिक आरोग्यावर अहवाल प्रसिद्ध करीत असते. या नियतकालिकाने अलिकडेच एक अहवाल  प्रसिध्द केला आहे. लंडनमध्ये प्रसिध्द झालेल्या या अहवालास  युकेच्या सरकारने प्रोत्साहित केले आहे. या अहवालात  जगभर मानसिक आजार वाढत चालला असल्याचे  म्हटले आहे. परिणामी, मोठया प्रमाणावर अपंगत्व, अनैसर्गिक मॄत्यू, आणि दारिद्रय वाढवणाऱ्या गोष्टीमध्ये  वाढ  होत  चालल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. मानसिक आजाराने ग्रस्त असणाऱ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही आणि यामुळे त्यांचे आजार हे कमी होण्याऐवजी वाढत जातात असे म्हटले आहे. खरे पाहता हे समाजाचे प्रचंड मोठे सामाजिक आणि आर्थिक नुकसान असते. यापेक्षाही वार्इट म्हणजे मानवी हक्काच्या नावाखाली त्यांची हेळसांड आणि भेदभाव  केला जातो. ह्या  अशा मानसिक रोग्यांची होरपळ इतर कुठल्याही रोग्या पेक्षा  तीव्र असूनसुध्दा या आजारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात, भारतातील परिस्थिती ही भयानकच म्हटली पाहिजे. या बाबतीत जगातील कुठलाच देश आपल्याशी बरोबरी करू शकणार नाही एवढी वार्इट परिस्थिती आपन निर्मान करून ठेवली आहे . आज भारतात तरूण लोकांत मॄत्यूचे प्रमाण हे आत्महत्येमुळे अभूतपूर्व असे वाढले  आहे. मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे आणि व्यावसायिक हितसंबंधामुळे याचा प्रसार अजून वाढत चालला आहे. मद्यपानाचा प्रश्न हा नैतिकतेशी जोडला गेला आहे आणि त्याचे संदर्भ आदिम समाजात शोधले जात आहेत. वास्तविक पाहता हा आरोग्याचा  एक सार्वजनिक प्रश्न आहे .   यामुळे लाखो कोटयावधी लोक हे मानसिक आजाराने ग्रस्त आहेत आणि ते भयंकर अशा परिस्थितीत मनोरूग्णालयात किंवा रस्त्यावर खितपत पडले आहेत . ते उपेक्षित आहेत ; उपरे झाले आहेत. शरीराला व्यवस्थित प्रथिने न मिळाल्यामुळे त्यांच्या मेंदूची वाढ बालपणापासूनच व्यवस्थितरित्या होत नाही आणि याबद्दलचे आपणांस काही ज्ञान नसल्याने ह्या गोष्टी वेळेवर तपासल्याही जात नाहीत. आपल्या देशात अशा प्रकारच्या आरोग्य तपासाणीच्या समाजाभिमुख संस्था किंवा सेवा ह्या अजिबातच उपलब्ध नाहीत.

oped1

(image Source : Indian Express)

मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ही जागतिक पातळीवरची एक संस्था आहे आणि तिचीच एक शाखा म्हणजे, सबस्टान्शियल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी) हि व्यापक  अशा  अजेंड्यावर काम करणारी संस्था आहे.   संस्थेंकडून जगभरातील सगळ्यांना आवश्यक असलेल्या कॄती केल्या जातात आणि साऱ्या जगाला आवशक्यतेनुसार  एकमेकांशी  जोडण्याचे काम केले जाते.  मानसिक आरोग्याचे संदर्भ आणि त्यातून जमा झालेला गाभा हा एक लक्ष्य म्हणून वापरला जातो.  ही एक मोठी गोष्ट वाटते, कारण यातून या संस्थांची मानसिक आरोग्याच्या संदर्भात एक परिवर्तनवादी दॄष्टी दिसून येते, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एसडीजी या संस्थेने एक कॄती-कार्यक्रमच आखलेला आहे. यात  तीन महत्त्वाची तत्त्वे विषद  केली आहेत :

एक –  मानसिक आरोग्याकडे आपण सर्वंकष दॄष्टीने पाहायला पाहिजे, आपल्याला कोणत्या गोष्टी सतावत असतात, कोणती परिस्थिती आपणांस अपंग बनवत असते  अशा  रोजच्या जगण्यापासून ते दीर्घ काळ  जगण्याच्या बाबतच्या  बाबींचा विचार आपन करायला हवा . आम्हाला मानसिक आरोग्य हे नीट कसे सांभाळता येते, हे चांगले माहित आहे यातून उद्भवणाऱ्या  विकारग्रस्त कोणत्या गोष्टी असू शकतात याची आम्हाला चांगली कल्पना  आहे आणि त्यांना कसे थोपवता येऊ  शकते, शिवाय  त्यातून आपण बरे कसे होऊ  शकतो, याच्या उपाययोजना काय असू शकतात, याचीही कल्पना आम्हाला आहे. हे सारे ज्ञान आज जगातल्या साऱ्या  लोकांसाठी वापरण्याची आवश्यकता  आहे|

दोन – मानसिक आरोग्य ही गोष्ट मानसिक-सामाजिक, पर्यावरणीय, जैवीक, आणि अनुवांशिक  घटकांनी बनलेली असते आणि ह्यातून  होणाऱ्या  मेंदूविकार विकासाच्या प्रक्रियांशी  यांचा संबंध असतो, ह्या  गोष्टी विशेषत: आपल्या जीवनात विशीपर्यंत घडत असतात.  कारण आपल्या बालपणातील अनुभव आणि आपल्या किशोरावस्थेत घडणाऱ्या  गोष्टी आपल्या मानसिक आरोग्याला आकार देत असतात.  मानसिक आरोग्याच्या दॄष्टीकोनातून व्यक्तीच्या आयुष्यातील हा कालखंड खूप महत्वाचा  मानला गेला आहे .या कालखंडात संचित झालेला अवकाश  महत्वाचा असतो. हा अवकाश निर्मित करताना प्रत्येक व्यक्तीने आपला भवताल, परिस्थिती आणि पर्यावरणीय अनुभव यांचा मेळ घातला पाहिजे. हे जर करता आले तर व्यक्तीला आपले मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे संतुलीत ठेवता येते आणि येऊ  घातलेले मानसिक विकार टाळता येतात.
तीन  मानसिक आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे . मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या लोकांना प्राधान्याने सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत . व्यक्तीचा सन्मान, स्वायत्तता, समाजात तिची घेतली जाणारी काळजी आणि अनेक भेदनीतीतून तिचा होणाऱ्या  छळातून तिची मुक्तता ह्या  गोष्टींचे मानसिक आरोग्याशी जवळचे नाते आहे|

हे जर आपणांस साध्य करायचे असेल तर अनेक गोष्टी कराव्या लागतील.  प्रथमत:  मानसिक आरोग्य सेवा हा एक सार्वत्रिक आरोग्याचा अत्यावश्यक  घटक मानला गेला पाहिजे आणि तसे कव्हरेज उपलब्ध करून देण्याच्या दॄष्टीने कारवार्इ झाली पाहिजे.  दुसरे म्हणजे, मानसिक आरोग्या संदर्भातला  एक प्रमुख अडथळा म्हणजे अशा  आजाराने ग्रस्त असलेल्यांना जी वार्इट वागणून दिली जाते  त्याची ठळकपणे समीक्षा झाली पाहिजे| तिसरी गोष्ट म्हणजे, मानसिक आरोग्याचे प्रश्न  हे सार्वजनिक जीवनाचेप्रश्न  म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे| देशातील जेष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांनी या संदर्भात भरीव विकासात्मक काम केले पाहिजे . हे प्रयत्न होताना देशातील मोठया संख्येस  यात लाभार्थी म्हणून  सहभागी  केले  गेले  पाहिजे. यात केवळ  आरोग्य हीच गोष्ट न राहता त्याही पलिकडे जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. चौथी बाब म्हणजे, नव्या संधी कोणत्या आहेत त्या ओळखून, त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे, विशेषतः  सामाजिक आरोग्य, कामगारांकडून मिळणाऱ्या  सेवासुविधा, डिजिटल तंत्रशास्त्र  याचा लाभ उठवता आला पाहिजे.  पाचवी गोष्ट म्हणजे, या बाबतीत ठोस अशा  स्वरूपाची गुंतवणूक करायला हवी, कारण मानसिक आरोग्याच्या संदर्भात गुंतवणूक ही मोठी लागते.  अगोदरच अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा  कार्यक्षम रितीने उपयोग करायला हवा .  उदाहरणार्थ, मोठया हॉस्पिटलसाठीच्या  बजेटचे पुर्न-वितरणीकरण झाले पाहिजे, जसे मोठया हॉस्पिटलकडून जिल्हा रूग्णालयाकडे आणि तिथून छोटया गावातील कम्यनिटी  पातळीच्या स्थानिक आरोग्य सेवा केंद्राकडे…  अखेरीस, या क्षेत्रातील संशोधन  वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजे.  इतरबहुविद्याशाखीय  क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग केला गेला पाहिजे, जेणेकरून मानसिक आरोग्याच्या समस्या काय आहेत आणि त्यासाठी परिणामकारक उपाययोजना कोणत्या असू शकतात.  याचा एक सर्वंकष विचार बहुविद्याशाखीय  ज्ञान क्षेत्रामुळे होऊ शकतो, त्याचा अधिकाधिक प्रमाणावर प्रयोग झाला पाहिजे.  या अभ्यासातून मानसिक आजाराचे प्रमाण कमी करून ते प्रसंगी थोपवताही येते .
मानसिक आरोग्य ही एक जागतिक समस्या आहे . आम्ही सुचवलेल्या शिफारसी महत्त्वाच्या आहेत, त्याची संपूर्ण अंमल बजावणी केली तर   मानसिक आरोग्याचा जटील गुंता हा सुटू शकतो. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि मानसिक आरोग्य कायदा हे आरोग्याच्या संदर्भात समस्या निवारणाचे काम करणाऱ्या आणि अधिकाधिक अडथळे  दूर कसे करता येतील याची धोरण मिमांसा करणाऱ्या  संस्था आहेत .  आपण हे पाहिले पाहिजे की, या धोरणांचा अंमल होते की नाही ते .  यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या  अनेक कार्यकर्त्याना , छोटयामोठया समुहांना यात सामावून घेतले पाहिजे.  यात मानसिक आरोग्य आणि विकास क्षेत्रात काम करणाऱ्या बरोबरच धोरणकर्ते  आणि समाजात विविध प्रकारचे  कामकरणाऱ्या  लोकांनाही यात  सामावून घेतले पाहिजे .  हे जर आपण केले तरच आपण देशाचे  मानसिक आरोग्य योग्य ठिकाणी आणू शकू वाचू असे वाटते .

……………………………………………………………………..

हे सुद्धा वाचा ….. 

भारतात मानसिक अनारोग्याची साथ – संजय सोनवणी

भांडवलशाही : निसर्गाचे विनाशकारी शोषण करणारा एकमेव गुन्हेगार- अॅलन बाडिओ

  •  

कॉ. शरद पाटील : दुःख आणि शोषणमुक्तीचा असंतोषी मार्गस्थ

  •  
मी बारावीत असतांना पहिल्यांदा कॉ. शरद पाटील नावाच्या म्हाताऱ्या माणसाचे भाषण ऐकले होते. मी आणि नितीन वाव्हळे (हल्ली, एस. एफ. आय. चे विद्यार्थी नेते) त्यावेळी औरंगाबाद शहरात सार्वजनिक कार्यक्रम असले की, आम्ही बहुतेकवेळा हजरच असायचो. मुख्य कारण म्हणजे अशा कार्यक्रमात खायला चांगले असते आणि दुय्यम कारण म्हणजे डोक्याला खूराक मिळतो. ते कॉ. आहेत तेंव्हा ऐकले होते पण जास्त कळत नव्हते. त्यामुळे हा म्हातारा जाम भारी आहेच प्रथमदर्शनी मत बनले कारण त्यांच्या वयाचे अनेक म्हातारे रिकामे असतात असाच माझा अनुभव होता. त्यांना कोणीच गंभीरपणे ऐकत नाही असेही पाहिले होते हा पाटिल बाबा थोडा वेगळाच वाटला. पदवीला असतांना त्यांचे पुस्तके वाचली. डोक्याला ताण देवून वाचली तेंव्हा कुठे काही गोष्टी समजू लागल्या. आजही त्यांच्यावर दुर्बोध लिखाण करण्याचा, त्यांना संस्कृत खरंच येत होते का? असे अनेक आरोप केले जातात पण, हे आरोप करणारे लोक एकतर शपा वाचत नाहीत किंवा सोईचे वाचतात किंवा या लोकांचा तेवढा आवाका च नसतो. असे अनेक लोक मला माहिती आहेत. शपांच्या लिखाणाच्या काही मर्यादा निश्चीतपणे आहे. त्याची कठोर चिकित्सा झाली पाहिजेच. त्यासाठी शपा माझ्याशी डिबेट करा असे नेहमी ओरडत असायचे. आरोप करणाऱ्यांनी प्राच्यविद्या पंडीत मेहंदळे आणि बौद्ध आणि पाली अभ्यासक, तत्वज्ञ प्रदीप गोखले या लोकांनी त्यांना प्रतिक्रिया आणि प्रतिसाद दिला यावरूनच शपांचे वैचारिक मोठेपण सिद्ध होते. कोणाही लिंबूटिंबूला मेहंदळे आणि गोखले प्रतिसाद देणार नाहीत. जयंत लेले यांच्यासारख्या समाजशास्त्रज्ञ आणि विद्युत भागवत यांच्यासारख्या स्त्रीवादी अभ्यासक यांची शरद पाटलांनी त्यांच्या ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ मध्ये दखल घेतली होती. त्यामुळे दोघेही ‘आमच्या पुस्तकाची आणि लेखाची दखल त्यांनी घेतली होती.’ असे माझ्याजवळ मोकळेपणाने बोलले आहेत. शरद पाटील महत्वाची मांडणी ऐतिहसिक मांडणी करत होते असे जयंत लेले म्हटले आहेत तर पाटलांना स्त्रीप्रश्नाचे गांभीर्य जास्त समजत असलामुळे त्यांचे महत्व जास्त आहे. अन्यथा बायकांचा प्रश्न म्हणून स्त्रीवादाला बाजूला टाकले जाते असेही विद्युत भागवत म्हणाल्या. सुहास पळशीकर मास्तरने त्यांच्या “सामाजिक शास्त्रातील वैचारिक गारठा” या लेखातसुद्धा शपांच्या नवीन वैचारिक मांडणीची दखल घेतली आहे आणि शपांना कसे जाणीवपूर्वक अनुल्लेखाने दुर्लक्षित केले. याविषयी खंत सुद्धा व्यक्त केली आहे. शपा जीवंत असातांना सदानंद मोरे आणि आ. ह. साळुंखे यांनी काही मतभेद व्यक्त केले होते. पण, त्याही लोकांनी म्हणावी तशी दखल घेतलेली दिसत नाही. कारण शपा हे तसे ‘वैचारिक आणि अभ्यासाकीय क्षेत्रा’च्या बाहेरचे होते. पूर्णवेळ कार्यकर्ता अनेक अभावग्रस्त जीवनात ज्ञानयज्ञ प्रज्वलित करत होता जसा कुणबी शेतीवर अनेक प्रयोग करतो तसेच शपा ज्ञान व्यवहारात अनेक नवीन प्रयोग करत होते. हे त्यांच्या अनुयायांना पटले नाही तर बाकीच्यांविषयी आपण काय बोलणार? नेहमी प्रवाहित राहण्यासाठी मोठी किंमत द्यावी लागते आणि पाटलांनी ती मोजली आहे. अनेकजण डबके बनून जगतात त्यामुळे एकाच गोष्टीला ते आयुष्यभरासाठी चिटकलेले असतात आणि त्याचेच समर्थन करत असतात. पण पाटलांच्या लिखाणात ह्याचा अर्थ लावताना मी चुकलो, हे त्यावेळी कळले नव्हते, त्यावेळी मी बरोबर नव्हतो असे अनेक वाक्य असतात. पण, लोकांना फक्त त्यांच्या लिखणा तील “मी” दिसतो आणि बाकी दिसत नाही. शपा गेल्यानंतर मार्क्सवादी, मार्क्स-फुले-आंबेडकरवादी, सौतांत्रीक मार्क्सवादी, फुले आंबेडकरवादी, ब्राह्मणेतर, बहुजनवादी अशा अनेक गटात असणारे लोक ‘आम्हीच त्यांचे खरे वारसदार आहोत’ असा दावा करत असतात. या गटांमधील नवीन मुले तर सोशल मीडियावर नुसता गलिच्छ गोंधळ आणि भाषिक व्यवहार करतात. या सगळ्या प्रक्रियेला शपांच्या विचारांचे विकृतीकरण किंवा अपहरण असेच मला म्हणावे वाटते. कॉ. शशी सोनावणे यांनी सकल मासिकामध्ये “कॉ. शरद पाटील: एक स्कूल ऑफ थॉट” नावाचा खूपच महत्त्वाचा लेख लिहिला आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मराठा क्रांती मोर्च्याच्या विरोधात लेखन करत असतांना शरद पाटील हे कसे सामंती मराठा होते असाही शोध लावला होता. पण, संबंधित व्यक्तीचा इतिहास पाहिला तर वायफळ बोलण्यात सदरील व्यक्ती प्रसिद्धच आहे. त्याच व्यक्तीने नंतरच्या काळात शरद पाटील माझे गुरु आहेत असेही म्हटल्याचे आठवते. मराठ्यांच्या सामंती व्यवहारावर हल्लाबोल करणारे शपा शेतकरी जाती जातीअंतकवादी झाल्याशिवाय जातीव्यवस्था अंताला जाणार नाही हे सुद्धा सांगायला विसरले नाहीत. त्यासाठी सातत्याने जातीच्या अर्थ-राजकारणाची मांडणी झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. एक मात्र नक्की आहे की, शपाला डिबेट करणारे लोक भेटले असते तर खूपच नवीन वैचारिक निर्मिती झाली असती. त्याला महाराष्ट्र आणि भारत आता मुकला आहे. राया दूनांशकाया, पिटर हुडीस यांचे लिखाण पाटलांनी वाचले होते की, नाही हे मला माहिती नाही. वाचले असावे. या लोकांच्याच तोडीचे काम कॉ. पाटील भारतात करत होते. शेवटी, शपा मानवाच्या दुःख आणि शोषण मुक्तीच्या लढ्यातील महत्तम सेंद्रिय बुद्धिजीवी होते. ग्रामचीने आपल्या शिक्षणावरील भाष्यात म्हटले आहे की, “पारंपरिक शिक्षण आणि ज्ञान व्यवहार करणाऱ्या समूहातील लोकांना ज्ञान निर्मिती करतांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही कारण त्यांच्याकडे ती पार्श्वभूमी, सामाजिक सवय आणि शिस्त असते पण, ज्ञानाची आणि शिक्षणाची ज्यांचा संबंध नसतो त्या समूहातील लोकांना खूपच मेहनत घ्यावी लागते. त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते.” या समूहातील लोकांना सहजासहजी विद्वान, अभ्यासक, बुद्धिजीवी म्हणून मान्यता मिळत नाही. शरद पाटलांचा हाच अनुभव आहे. हल्ली, कॉग्नेटीव (मानसिक) क्रांतीची झपाट्याने जगभर चर्चा चालू आहे. मेंदूविज्ञानात आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अनेक संशोधन होतांना दिसत. या संदर्भात सुद्धा शपा काहीतरी म्हणू इच्छित होते. मानसशास्तज्ञ यशपाल जोगदंड ( मानसशास्त्र आणि मेंदूविज्ञानात स्कॉटलंड येथे पीएचडी) म्हणतात की, ‘दिग्नागाच्या आधारे कॉ. शरद पाटील काहीतरी महत्वाचे म्हणू पाहत होते. ते मलाही अजून समजले नाही पण काहीतरी महत्वाचे त्यांना म्हणायचे होते.’ जात ही भौतिक आहे त्याचप्रमाणे मानसिकसुद्धा आहे असे आपणास जातीच्या वर्तन व्यवहारातून स्पष्ट झाले आहे त्यामुळे जातीअंताचे मानसशास्त्र गरजेचे आहे असे म्हणणारा शपांचा विचार महत्वाचा आहे. त्यामुळेच महत्तम बौद्ध दार्शनिक दिग्नाग हा त्यांचा मुकुटमणी झाला होता. समाजवादी मनाच्या अभावी विसाव्या शतकातील समाजवादी क्रांत्याचे प्रयोग ढासळले असे बुडाचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. त्यामुळे ‘समाजवादी मन’ घडवण्यासाठी त्यांचा जाणीव-नेणीवेच्या तर्कशास्त्राचा आग्रह होता. पण, प्रत्यक्षात मानसशास्त्रज्ञ याविषयी अज्ञानी आहेत पण, पाटलांचे स्वयंघोषित अनुयायी आम्हाला ‘जाणीव-नेणीवेचे तर्कशास्त्र कळल्याचा आव आणतात आणि एकमेकांच्या नेणीवेतील जात शोधतात. त्यामुळे पाटलांच्या महत्वाच्या प्रतिपादनाचा धुरळा उडतो. यशपाल जोगदंड आणि शुश्रुत जाधव या मानसशास्त्रज्ञानी ‘जातीच्या मानसशास्त्र’ संदर्भात केलेली मांडणी वाचून पाटलांच्या विवेचनाचे महत्व कळते आणि त्यासोबतच, कॉ. पाटलांच्या डोक्यात ‘समाजवादी मना’च्या निमित्ताने काहीतरी भन्नाट कल्पना होती असेच म्हणावे वाटते. ज्ञान व्यवहार लोकतांत्रिक करणे आणि दुःख आणि शोषण मुक्तीचे तत्वज्ञान विकसित करत माणसाचे मन समाजवादी करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे म्हणून आपण सगळयांनी असंतोष बाळगला पाहिजे. तो प्रयत्न सातत्याने करत राहणे हीच कॉ. शरद पाटिल नावाच्या मला पहिल्याच भेटीत प्रभावीत करणाऱ्या म्हाताऱ्याला आदरांजली असेल. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मंगलकामना टीप- कॉ. शरद पाटलाची चिरफाड झाली पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे देवकुमार अहिरे इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे  
  •