Tag Archives: Literature

कविता : पुरूष म्हणून जगताना…

  •  

पुरूष म्हणून जगताना…

मी शोधतोय तुला
ता उम्र माझी
माझ्याच स्वतःच्या शोधात

तुझे असणे
माझ्या पुर्णत्वाची साक्ष आहे
कसे कळेल तुला?

मी जन्मतःच अधूरा आहे
तुझ्यातूनच जन्मलो आहे
दिसतो जरी परिपूर्ण मी
तुझ्याविना अपुर्ण आहे.

तू प्रसवलेस मला
तू जोजवलेस मला
रक्ताने शिंपून प्राण
ममत्वे भरविलेस मला.

परिपक्व जरी जाहलो
वयानेही वाढलो
अदृश्य नात्यात तरी
तुझ्या सवेच गुंतलो.

मनास गुढ ओढ जरी
बेधुंद आज भान जरी
तरी मनात दाटतो
तुझ्याच साठी स्नेह उरी

□□

123

दत्ता चव्हाण
परभणी

आणखी काही कविता….   

कविता : नांगेली

स्वतंत्र स्त्री

कविता : वेदनेचे साहित्य – जितेंद्र अहिरे

कविता : हे रहस्यमयी ! -पवन पटेल

 

  •  

कविता : नांगेली

  •  

                 शबरीमला मंदिराच्या निमित्ताने केरळची चर्चा सुरु आहे. स्तन झाकण्याच्या अधिकारासाठी नांगेली या दलित महिलेने आपले स्तन कापून टाकले होते. नांगेली चे नाव केरळच्या बाहेर खूप लोकांनी ऐकलेले असेल. त्रावणकोर राज्यात जातीवादाची मुळे खोलवर रुजलेली होती. दलित महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. त्याकाळात नांगेलीने स्तन झाकून विद्रोह पुकारला. तसे करण्यास जेव्हा विरोध झाला तेव्हा तिने स्वतः च आपले स्तन कापून टाकले.

कवी,लेखक,अनुवादक डॉ. दीपक बोरगावे यांची कविता “असंतोषच्या” वाचकांसाठी …..

 

     नांगेली

वर्ष होतं 1803
पानथळीचा प्रदेश ; समुद्र किनाऱ्याजवळ
गाव होतं चेरथाल
राज्य केरळ

तिथं होती जळत
एक क्रांती…
तिचं नाव होतं नांगेली…
***
नांगेली, काय केलंस हे तू ?

स्तन कापलेस तू, तुझे ?
स्वत:च, स्वत:चे ?
फळ चिरावं तसं ?
आपल्याच खोपटयात !

नि काय केलंस स्तन कापून ?
तर केळीच्या पानात ठेवलंस त्यांना
जसं काही जेवायचं पान मांडावं !

रक्ताचे थेंब ठिबकायला लागले
काठांवरून पानांच्या

तरीही तू उभी राहून
चालत राहिलीस
चालत आलीस
बाहेर आलीस
तुझ्या खोपटातून

कशीबसी पोचलीस तू
कशीबसीच… माझी आर्इऽऽऽ
सैनिकांच्या सावल्यांपर्यंत

तुला तुझे स्तन अर्पण करायचे होते…
कुणासाठी ?
कशासाठी ?
कुणी सांगीतलं होतं तुला, असं करायला ?

कुणीच नाही ?
मग का केलंस हे तू नांगेली ?

थारोळा झाला रक्ताचा
जमीनीवर
कोसळ लीस जेव्हा त्या सावल्यांत
तुझ्या कापलेल्या स्तनांसह सैनिकांजवळ ..

तुझा नवरा, चिरूकंदन
तो होता बाहेर
कुठेतरी कामासाठी गेला असणार !

नि तू अशी विना स्तनाची
जमीनीवर आडवी
सैनिकांच्या पायाजवळ
डोळयांत उडाली धूळ तुझ्या
डोळे बंद झाले तुझे,
म्हणजे बंदच झाले कायमचे…
पण शेवटच्या श्वासांपर्यंत
वाट पहात…
इंतजार करत राहिलीस तू…
चिरूकंदनच नाव घेत राहिलीस
तुझ्या नवऱ्याच नाव
नि मग अखेर संपून गेलीस तू
तुझी भेट झालीच नाही
तुझ्या चिरूकंदनची
***

काय झाले होते नांगेलीला ?
आपले स्तन कापावे असे ?
वेडी होती का नांगेली ?
अशी अगोचर का वागली ती ?

तिच्या राज्यात स्तन-कर सुरू झाला होता
पुरूषांना मिश्यावरचा कर भरावा लागतच होता
पुरूषांना… त्यांच्यामिश्यावरील केसांवरचा कर !

हा आता नवा कर आला होता
स्तन – कर…
स्त्रियांसाठी…
स्तनावरचा कर
जगावेगळाच कर !
***
अहो…फासिस्ट राज्यात असेच घडते
हा कर नि तो कर
नि हजारोे कर

अगोचरी कर गोचर करत
व्यवस्था उभी होते फासिस्ट
किंवा अशीच उगवतात लाखो अगोचरी सैताने
या व्यवस्थेत…

त्यांना संपवायचेच असते सामान्यांना
किंवा त्यांचे इतके मामुलीकरण करायचे
की किडामुंगीसारखे निमूट फिरतील ते मग
त्यांच्या भवती दहशतीच्या सावलीत
म्हणून त्यांना संपवणारे हे असे कर…

कष्टकऱ्याना नागवणारे कर

राबनाऱ्याना नाडवणारे कर
नंदी-कर म्हणजे कुल्यांच्या केसांवरचे कर…
***
नांगेलीला हे कळाले तेव्हा
तिचे रक्तच उसळले
हे काय विक्षिप्त, विचित्र नि विपरित !
डोळयांत उतरले रक्त तिच्या
साफ दिला इन्कार तिने
हा कर भरायला

पण तरी काय ?
कर हा भरावाच लागतो
फासिस्ट राज्यात तर त्याला पर्यायच नसतो

माफी नसते, कर- माफीला !

सैनिक नांगेलीच्या स्तनांचे
मोजमाप घेण्यास
खोपटाबाहेर आलेसुध्दा
आता मात्र हदद् झाली…

नांगेलीने स्तन कर भरलाच नाही
मात्र, तिने स्तनच कापले आपले
केळीच्या पानात ठेवले
अर्पण करायला सैनिकांना
आणि, ह्या अघोरी व्यवस्थेला
***
काय करू शकत होती नांगेली ?
इतरांसारखे कर भरू शकत नव्हती नांगेली ?
काय करू शकत होती नांगेली ?
मान पाडून जगू शकत नव्हती नांगेली ?
काय करू शकत होती नांगेली ?
तिला काहीही करता आले असते
व्यवस्थेशी जुळवून घेता आले असते .
पण नाही,
आपले स्तन कापून
तिने घडवली एक क्रांती
व्यवस्थेसमोर उभी केली
एक लढार्इ…
व्यवस्थेलाच धक्का देणारी !

PicsArt_10-09-07.43.05.jpg

नांगेलीचे कल्पनाचित्र http://nangeli.com वरून साभार ……

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

आणखी काही कविता …..⇒ 

डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता

स्वतंत्र स्त्री

कविता : कुणीतरी भेदायला हवेत हे गोल

कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

तेव्हाही जात असतो एक बळी पुरुषसत्तेचा… – श्रद्धा देसाई

 

  •  

मार्क्स काय म्हणाला ? – दीपक बोरगावे

  •  

मार्क्स काय म्हणाला ?

(कार्ल मार्क्स यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त)

 

एकदा कविता मार्क्सच्या अभ्यास खोलीत शिरली.

मार्क्स खोलीत एकटाच होता

तो होता लिहण्यात मग्न

त्याचं लक्षचं नव्हतं कवितेकडे.

 

आपला गळा खाकरत

तिने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला

पण काही उपयोग झाला नाही.

 

मनाचा हिय्या करून

शेवटी ती अक्षरशः ओरडीलच

कार्ल …..कार्ल …

 

मार्क्सने आपल्या जाड्या भिंगातून कवितेकडे पाहिले

त्याने विचारले, काय पाहिजे ?

 

काही नाही

सहजच आले होते,

मी कविता आहे.

 

असं म्हटल्यावर, मार्क्सने आपला पेन खाली ठेवला.

 

कुठून आलीस ? मार्क्सने विचारलं.

 

इंडियातून, कविता म्हणाली.

 

मार्क्स थोडा बावचळला;

इतक्या लांबून कशी काय ?

असं वाटलं असावं त्याला कदाचित.

 

काय काय लिहतेस ?

आय मीन, कसल्या कविता लिहतेस ?

 

कविता थोडी लाजलीच

मार्क्सने आपल्याला हा प्रश्न विचारावा म्हणजे…

 

आपल्या पापण्या मिटून ती म्हणाली,

काही नाही, असंच काहीतरी !

 

म्हणजे ?

 

अहो, गाणी, निसर्ग, श्रावणातला घन निळा वगैरे…

 

श्रावण म्हणजे काय ?

 

अहो, तो एक ऋतू आहे

आय मीन, निसर्गच म्हणा की !

 

निसर्ग ? ठीकच आहे मग.

 

माणसांबद्दल लिहते की नाही ?

शेताबद्दल, कारखान्याबद्दल ?

आणि स्वयंपाक घर ?

तिथे तर असशीलच तू रोज ?

 

चर्चमध्ये जातेस ?

धर्मगुरू, धर्मग्रंथ, शाळा, फळा, खडू

हे माहित असेलच ?

 

समाज व्यवस्था, धर्मव्यवस्था, उत्पादन व्यवस्था, उत्पादन साधनांची मालकी ?

 

म्हणजे, आपल्या जगण्याच्या भौतिकतेबद्दल म्हणतोय मी.

 

आपलं जगणं हे ह्या भौतिकतेमध्ये घडत असतं

काही समजते का ?

 

कवितेचा मख्ख चेहरा पाहून

मार्क्स म्हणाला,

दे सोडून, समजत नसेल तर !

 

हे सांगताना

तो हसला स्वतःशीच

गालातल्या गालात,

त्याच्या भारदार दाढीमुळे

ते कवितेला समजलं नसावं.

 

तो पुढे म्हणाला,

बरोबर आहे तुझं…

तुला तिकडे वळूच दिलेलं नाही,

तेव्हा तुझा तरी काय दोष ?

 

तुझे आईवडील काय करतात ?

त्याने विचारले.

 

शेतात काम.

मीही करते मदत त्याना…

 

शाळेला जाते की नाही ?

 

अहो, मी महाविद्यालयात शिकते.

कविता आत्मविश्वासाने म्हणाली.

 

इतकी लहान दिसते ही हाडाची जुडी

महाविद्यालयात असेल का ही ?

मार्क्सला हे पटलेच नसावे.

 

मग मार्क्स म्हणाला,

खूपच मोठी आहेस मग तू

प्रोढ झाली आहेस, किमान वयाने तरी !

 

म्हणजे,

तुला विचार करता येतो

एवढी निश्चितच मोठी झाली आहेस तू.

 

प्रथमतः

म्हणून,

विचार कसे निर्माण होतात

याचा विचार कर !

 

ते ब-याचदा लादले जातात आपल्यावर,

कुणाच्या तरी सोयीसाठी,

कुणाच्या तरी फायद्यासाठी, स्वार्थासाठी,

दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठी,

म्हणजे वर्चस्वासाठी,

तेही दुसऱ्यांचे श्रम चोरून !

 

कवितेला फारसं समजलं नाही;

तिने मान हलवली

नि पुन्हा मार्क्सच्या डोळ्यात पाहू लागली….

 

मार्क्स पुढे म्हणाला,

तुझे प्राध्यापक काय म्हणतात,

ते ऐक,

विचार प्रश्न त्यांना

टाक भंडावून त्यांना.

 

ऐक,

रस्त्यावरील माणूस

त्याच्या बोटांमधून घरंगळणारे कौशल्याचे संगीत.

 

ऐक,

कारखान्याचे भोंगे

त्यातला आकांत आणि आक्रोश.

 

ऐक शेतातील मातीला,

ती काहीतरी म्हणत असते नेहमीच,

तिच्या आतील आकसलेले विभ्रम.

 

ऐक,

चर्चच्या घंटानादात

तुझ्या शेजारच्या मुलीचे रक्त

प्राचीन काळापासून वाहणारे.

 

विचार प्रश्न देवांना नि दगडांना

धर्मगुरूंना आणि धर्मग्रंथांना

काय म्हणणं आहे त्यांचं ?

 

तसं बघितलं तर, ते काहीच म्हणत नसतात;

त्यांच्या वतीने त्यांचे रखवालदारच बोलत असतात.

लिहित असतात पोथ्या पुराणे

नि काहीबाही

हे तुझ्या लक्षात यायला पाहिजे.

 

पाणी वाहते उताराकडे

खड्ड्याकडे

साचले तर तिचा प्रवाह बंद होतो.

 

जिथे कमतरता तिथे भरून राहते पाणी

आणि मग मुरते मातीच्या पोटात

पुन्हा उगवण्यासाठी

सर्वाच्या उत्थापनासाठी

हिरव्या आकाशाची आस घेऊन

भुकेल्या आतड्यांच्या तहानेसाठी.

पाणी हा समतेचा विचार आहे

विषमतेचा व्यवहार पाणी करत नाही.

हे निसर्गाचं म्हणतोय मी

माणसाचं नव्हे;

हे लक्षात घे तू !

याशिवाय,

ऐक,

तुझ्या आईचा गोंधळ तिच्या मनातला

तिची धुसपूस तिचं कोंडलेपण

तिचा अडकणारा श्वास.

ऐक,

तुझ्या मित्राचा आक्रोश

पहा त्याच्या दारिद्र्यातील फाटके दरवाजे

ऐक त्याचे करूण गाणे.

ऐक,

तुझ्या मैत्रिणीची कैफियत

महाविद्यालयाच्या जिन्यावरुन उतरताना.

ऐक,

तिचा पितृसत्तेचा सापळा

तिच्या कपाळावर उमटलेली हिंसा

तिच्या कातडीवरची नक्षी

खरचटलेली

तिच्यावर टेहळणारी नजरकैद नि पहारा

आणि वाच तिच्या वह्यांमधल्या कविता

पाठीमागील पानांवर गळणा-या.

ऐक,

काळजीपूर्वक तुझ्या वडलांचे डोळे

खोलवर पापण्यांच्या आंत.

ऐक,

तिथे दडलेली नि जळणारी एक आग

एक हिंसा

म्हणजे सापडेल तुला

तुझ्या आईचं दु:ख

नि तिच्या यातनेचा कल्लोळ.

ऐकू येईल मग

तुझ्या बोटांना एक वेगळेच महाकाव्य

होईल स्पर्श मग

तुला ख-या काव्याचा.

मार्क्स बोलतच राहिला-

बोलतच राहिला…

डोळे झाकून स्वतःचे

तिथं उभं राहणं देखील

कवितेला अवघडल्यासारखे वाटू लागलं

ती संपूर्णतः गोंधळून गेली.

याचा काय संबंध कवितेशी ?

ती स्वतःशीच पुटपुटली

घराकडे परतली गोंधळ घेऊन मनात.

शेतात, कारखान्यात, स्वयंपाकघरात,

महाविद्यालयात, देवळात, परसात, धर्मग्रंथात

भटकत राहिली

शोधत स्वतःला नि दुसऱ्यांना

पण तिला काहीच सापडले नाही.

तिच्या मैत्रिणीला तिने विचारलं

तुला श्रावण कसा काय आवडत नाही गं ?

 

तिचा मैत्रीण म्हणाली,

कुठला श्रावण ?

तो श्रावण बाळ?

म्हणजे शाळेत वाचलेली गोष्ट ?

अगं वेडे, तो श्रावण नव्हे

श्रावण मासी हर्ष मानसी… तो श्रावण !

कुठाय तो ?

तिच्या मैत्रिणीने विचारले.

श्रावणात,

म्हणजे किती सुंदर आणि प्रसन्न वाटते !

तुला कसं काय हे दिसत नाही ?

मला महाविद्यालयाची फी भरायला पैसे नाहीत

घरात रोज कटकटी.

शेजारचा मुलगा मला रोज त्रास देतो.

रोजचे आहेत खाण्याचे वांधे.

नोकरी कर, असं वडील म्हणताहेत.

आईवर सतत संशय

तिचा कुणाशी तरी संबंध आहे

कामाच्या ठिकाणी म्हणून.

रोजच हाणामा-या !

परवा आईने एका बाईला पकडून आणले घरात

आणि वडलांना विचारले,

हिचा तुमचा काय संबंध ?

वडील हादरलेच प्रथमतः

नंतर आईलाच बदडून काढले मरेस्तोवर.

ह्या अशा रोजच्या भानगडीत मला श्रावण कुठे दिसणार ?

कवितेने विचार केला.

विचार निर्माण होतात कसे?

याचाच प्रथमतः विचार करायला हवा.

दीपक बोरगावे

कवी,अनुवादक व समीक्षक, इंग्रजी विषयाचे निवृत्त प्राध्यापक,

भाषांतर विद्येत पीएचडी

 

  •  

तेव्हाही जात असतो एक बळी पुरुषसत्तेचा… – श्रद्धा देसाई

  •  

जेव्हा बलात्कार होतो तिच्यावर,
त्यातही दिवसाढवळ्या,
त्यातही लहानगीवर,
त्यातही वर्दळीत,
त्यातही नातलगाकडून,
आणि त्यातही क्रुर पाशवी असेल,
मग तर पेटून उठतात तुझ्या धमन्या,
बेभान होतं सणसणीत शिवी हासडतोस “भडव्या”.
तेव्हाही जन्माला येत असतो आणखी एक बलात्कारी .

जेव्हा पुरुषसत्तेचा बळी जाते ती,
त्यातही हुंड्यापायी,
त्यातही नवविवाहित, त्यातही माता,
त्यातही लहान लेकरांची,
अन त्यातही जिवंत जाळली असेल,
मग तर उसळून उठत तुझं मस्तक.
पण कधीतरी बायकोच्या चार दिवसातही,
“जगावेगळं तुलाच होतं नाही”;
म्हणत जेवणाची फर्माईश करतोस,

जेव्हा सावित्रीला नाकारलं जातं,
त्यातही स्रीवादात,
त्यातही स्त्रियांकडून,
त्यातही परजातीतल्याकडून,
त्यातही विरोधकांकडून,
मग तर खवळतोस तू संपूर्णच.
पण कधीतरी लग्न लावून दिलेल्या बहिणीने हिस्सा मागताच मात्र ,
नात्याचाच ताळेबंद लावतोस लगोलग,
तेव्हाही नाकारलं जात असतं अस्तित्व एका सावित्रीच.

जेव्हा पैशापायी विकली जाते स्त्री,
त्यातही कोवळी,
त्यातही सुंदर,
आणि त्यातही एकुलती एक,
अन त्यातही आईबापाकडून,
मग तर हडबडतोस तू पुरता.
पण कधीतरी पोटच्या पोरीने परजातीतला मुलगा आणताच,

पैशाने मढवत देतोस कुण्या दुसऱ्याच्या गळ्यात;
तेव्हाही विकली जात असते स्त्री पैशापायी.

जेव्हा सरशी करत तिचं सौंदर्य,
त्यातही तुझ्या कर्तृत्वावर,
त्यातही सिलेक्शनमध्ये,
त्यातही प्रमोशनमध्ये,
अन त्यातही लग्नाच्या बाजारातसुद्धा,
मग तर उखडतोस तू या व्यवस्थेवर .
पण कधीतरी उद्विग्न असताना मात्र,
बायकोच्या स्पर्शाऐवजी रिझवतोस मन कुणा मादक तरुणी जवळ,
तेव्हाही बोलीत वरचढ ठरत असतं स्त्रीच सौंदर्य.

सहज मारली जात असते स्त्री गर्भातच,
त्यातही बापाच्या हट्टापायी,
त्यातही चार पैशात,
त्यातही स्त्री डॉक्टर कडून,
अन त्यातही आईच्या मनाविरुद्ध,
मग तर विव्हळतोस तू आकांताने.
पण कधीतरी तुझ्याच पोटच्या लेकाला साडीच नेसावी वाटते; म्हणून त्याच्याच जीवावर उठतो तू,
तेव्हाही सहजच मारली जात असते एक स्त्री.

असाच जन्माला येत असतो बलात्कारी,
अशीच पैशापायी विकली जात असते स्त्री,
असंच नाकारलं जात असत सावित्रीला,
असंच कर्तृत्वापेक्षा वरचढ ठरत असत सौंदर्य,
असाच मारला जात असतो गर्भ स्त्रीचा,
तेव्हाही, जेव्हा कधीतरी स्त्रीच म्हणत असते,

“बाईच्या आयुष्याला भोग भोगावेच लागतात”

श्रद्धा देसाई

9607052334

टाटा सामाजिक विज्ञान संस्था,मुंबई

  •