Tag Archives: महात्मा फुले

तयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले

  •  

सावित्रीबाई फुले. जन्म – ३ जानेवारी १८३१. (मृत्यू १० मार्च १८९७)
सावित्रीबाईंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांची एक कविता-

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार काही
तयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाही
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सद्गुण नाही
तयास मानव म्हणावे का? 

ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का? 

पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?

  •  

राजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू

  •  

डॉ. सोपान शेंडे, 

Image Courtesy: Pinterest

जातिविरहीत समाजनिर्मितीच्या प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्विकारलेल्या सामाजिक ऐक्याच्या धोरणाचा ऐतिहासिक मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे.

भारत हा प्राचीन संस्कृती असलेला एक महत्वपूर्ण असा पौर्वात्य देश आहे. या देशाची प्राचीन संस्कृती जशी देशाचे भूषण आहे. तसेच  निरनिराळया कालखंडात या संस्कृतीला विविध कारणांनी विकृत स्वरूप  प्राप्त  झाले होते,  हे ऐतिहासिक सत्य नजरेआड करता येत नाही. त्यामध्ये हिंसेचे वाढते प्रमाण, धर्म, पंथ, व्यवसाय इत्यादींमधून निर्माण झालेली सामाजिक विषमता, जातियता, लिंगभेद व स्वार्थावर आधारलेली पुरुषप्रधान संस्कृती. त्याचे फलीत म्हणून समाजात उदयाला आलेला आणि धर्म व संस्कृती यांच्या नावाखाली दृढ केलेला स्त्री- पुरूष भेद, इत्यादींचा समावेश करता येतो. त्याचे दुष्परिणाम सामाजिक ऐक्य, सौहार्द, परस्परातील प्रेमभाव इत्यादींवर होऊन समाजात विविध वैगुण्ये निर्माण झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी व संस्कृतीच्या शुद्धीसाठी अनेक महामानवांनी निरनिराळया मार्गांनी प्रयत्न केले. मानवता व विश्वव्यापकत्व यांसारख्या संकल्पनांच्या रक्षण व संवर्धनासाठी निरनिराळया कालखंडात ज्यांनी प्रयत्न केले,  त्यामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमबुद्ध, वर्धमान महावीर, उत्तरेतील संत रामानंद आणि त्यांचा शिष्यसंप्रदाय, महात्मा बसवेष्वर आणि त्यांचा वीरषैव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि त्यातील स्त्री- पुरूष संत; (संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत तुकाराम, श्रीगोंदयाचे संत शेख महंमद,) इत्यादींसारख्या संत-महात्म्यांचा समावेश करता येतो. एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,  महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींसारख्या समाजसुधारकांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी आपल्या विचारांच्या, साहित्याच्या व आचरणाच्या माध्यमातून मानवताधर्माचा जागर केला. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामाजिक ऐक्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील (मराठी भाषिक  प्रदेशातील) माणूस उभा करण्याचे महत्वपूर्ण कार्य करून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रांती केली.

प्रस्तुत विषयाची मांडणी करताना शिवकालीन समाज व संस्कृतीवर भाष्य करणारे अभ्यासक डॉ. शं. दा. पेंडसे यांनी केलेल्या चिंतनाचा आढावा घेणे विषय मांडणीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. शिवाजी निबंधावली मध्ये डॉ. शं. दा. पेंडसे यांनी  ‘शिवकालीन संस्कृती आणि धर्म’ असा मथळा असलेला लेख लिहिला. त्यामध्ये , एखादया राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास शोधावयाचा असेल तर त्या राष्ट्राच्या भौतिक इतिहासाबरोबरच आत्मिक किंवा मानसिक इतिहासाचा छडा लावला पाहिजे. राष्ट्राच्या कर्त्या पुरुषांच्या  कृत्यांनी राष्ट्राचा भौतिक इतिहास बनतो व त्या कृत्यामागे जे प्रेरक हेतू असतात त्या हेतूंच्या योगाने राष्ट्राचा आत्मिक अथवा मानसिक इतिहास तयार होत असतो. ज्या हेतूंनी आणि भावनांनी प्रेरित होऊन राष्ट्रातील कर्ते पुरुष आपले व्यवहार करीत असतात, त्या हेतूंच्या आणि भावनांच्या श्रेष्ठ कनिशष्ठतेवरून त्या राष्ट्राची संस्कृति श्रेष्ठ की कनिष्ठ ठरत असते. नुसत्या भौतिक इतिहासाने राष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. नुसत्या भौतिक इतिहासावरून काढलेली अनुमाने पुष्कळ वेळा चुकीची असतात.  कारण राष्ट्रीय कृत्याचा बरेवाइर्टपणा त्यांच्या केवळ बाहय स्वरूपावरून ठरत नसून त्याच्या मागे असलेल्या हेतूवरून ठरत असतो. हे हेतू कितपत सुसंस्कृत होते हे जोपर्यंत पाहीले जात नाही तोपर्यंत भौतिक इतिहासाची विचिकित्सा नीट करिता येत नाही. (शिवाजी निबंधावली-१, शिवचरित्र कार्यालय पुणे, १९३०, पृ. २५ – २६) प्रो. पेंडसे यांनी या लेखात संस्कृतीचा अर्थ स्पष्ट करताना असे लिहिले आहे की, ‘… मनुष्याच्या अंतःकरणावर सुसंस्कार करून, त्याला हळूहळू देवत्वाकडे नेणारे जे आचारविचार (असतात), त्यांना संस्कृती असे म्हणता येईल…’ एखादा मनुष्य कितपत सुसंस्कृत किंवा सभ्य आहे हे जसे त्याच्या आचारविचारांवरून समजते, त्याप्रमाणे राष्ट्रीय आचारविचारांवरून राष्ट्रीय संस्कृति कळून येते. शिवकालीन संस्कृतीचे स्वरूप पाहण्यासाठी शिवकालीन महाराष्ट्रातील पुढा-यांनी जनतेसमोर ठेविलेली अधिभौतिक व आध्यात्मिक ध्येये काय होती व त्यांना अनुसरून त्यांचे व जनतेचे आचरण होते किंवा नाही या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. शिवकाली उदात्त ध्येये, उच्च भावना, स्वार्थत्याग वगैरे शब्दावडंबर नसेल पण त्या शब्दांनी व्यक्त होणा-या भावना जागृत झाल्या होत्या. आज आमच्यात हे शब्द मात्र आहेत व भावनांचा पूर्ण अभाव आहे. तेजस्वी कृतीत पर्यवसित होणा-या जाज्वल्य भावनांचा पूर्ण अभाव झाला असून आम्ही सर्व पोटाळ बनलो आहे. शिवकालीन महाराष्ट्रापुढे काही उच्च ध्येये होती. मराठयांच्या पोटाची भूक त्याकाळी चांगल्या रितीने शमत होती. मराठयांना शिवकाली जी भूक, जी तळमळ लागली होती ती पोटाची नव्हती, मनाची होती आणि ही भूक, ही तळमळ शमविण्याकरिताच हजारो तरूणांनी, सुखाचे जीव दुखाःत घातले. शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी हे सर्व सुखवस्तु लोक होते. त्यांच्या समोर श्रेष्ठ ध्येय होते. स्वधर्माचा राजा सिंहासनावार पाहण्याची त्यांच्या मनाला भूक लागली होती. स्वधर्माच्या दैन्यावस्थेमुळे त्यांची मने तळमळत होती आणि स्वधर्मस्थापनेचे ध्येय त्यांच्या समोर होते. याबाबत सप्तप्रकरणात्मक चरित्रात महाराजांचा हेतू पुढील प्रमाणे दिला आहे.-, ‘‘वडिलांनी मिळविले ते खाऊन राहणे योग्य नाही. आपण हिंदु, दक्षिणदेश म्लेच्छांनी ग्रासिला. देव, क्षेत्रे, गाई यांस बहुत पिडा झाली. धर्म अगदी बुडाला. तेंव्हा धर्मरक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षावा..’’ हा उल्लेख मोठा बोलका व शिवाजीराजांचा हेतू स्पष्ट करणारा आहे.’(पेंडसे पृ.२६-२७) याच लेखात प्रो.पेंडसे यांनी शिवकालीन समाजाचे धुरीन म्हणून क्षत्रिय मराठे, विद्वान ब्राह्मण, संत व सत्पुरूष यांचे विचार, कार्य व कर्तृत्व यांचा मागोवा घेतला आहे. त्यातून त्यांची भूमिका व हेतू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्व बाबी छत्रपती शिवाजी महाराज व तत्कालीन समाजधुरीण यांची भूमिका व कार्य स्पष्ट करण्यास उपयुक्त ठरू शकतील.

शिवकालीन सामाजिक स्थिती:-

छत्रपतींच्या काळातील समाज हा वतनदार, मिरासदार, बलुतेदार आणि उपरी यांचा मिळून बनलेला होता. सतराव्या शतकात आणि तत्पूर्वी खेडे हे सामाजिक व अर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू होते. गावात चार प्रकारच्या सत्ता रूढ होत्या. गावच्या लोकसंखेत प्रामुख्याने मिरासदारांचा भरणा होता. तसेच गावाचा विकास आणि स्थैर्यात बलुतेदारांची भूमीका महत्वाची होती. त्यात प्रामुख्याने कारागिर, सेवकवर्ग व धार्मिक सेवा करणारे- जोशी, गुरव, ठाकूर, मुलाणा, जंगम, यांचा समावेश होता. गावात बलुतेदारांखेरीज इतरही व्यावसायिक राहात असत. त्यांना अलुतेदार म्हणत. त्यात – घडशी, डवर गोसावी, गोंधळी, शिंपी, माळी, तेली, तांबोळी इत्यादिंचा समावेश होता. कवी परमानंदाच्या ‘शिवभारत’ या ग्रंथात, सतराव्या शतकातील व्यवसाय व व्यवसायीकांचे नामोल्लेख येतात. समाजात ब्राह्मणाला विशेष महत्व होते. धार्मिक व सामाजिक जीवनात त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते, असे दासबोधातील उल्लेखांवरून दिसते. इटालियन प्रवासी पीटर डेला व्हेला याने आपल्या प्रवासवर्णनात, ‘ ब्राह्मण हे दुस-या कोणत्याही जातीच्या घरी जेवत नाहीत.’ असा उल्लेख केलेला आहे, असे असले तरी मुस्लीम राजवटीत ब्राह्मणांनी आपले आचार विचार, स्नान – संध्यादि कर्मे सोडून मुस्लीमांची सेवा करण्यात धन्यता मानल्यामुळे अधर्म होऊन पाप वाढले, असे संत रामदास व संत तुकाराम यांनी तत्कालीन समाजस्थितीच्या केलेल्या वर्णनात म्हटले आहे. ‘शिवाजीवर ब्राह्मणांचा प्रभाव आहे.’ असे जॉन फ्रायरने प्रवास वर्णनात नमूद केले आहे. तसेच शिवाजीच्या सामान्य प्रजेविषयी तो असे लिहितो की, ‘ प्रजाजनांचा धर्म हिंदू असून, त्यांच्यात थोडे मुसलमानही आहेत.’  समाजात विटाळाची कल्पना प्रभावी होती. कनिष्ठ जातीचा स्पर्श होणे, त्यांचे अन्न खाणे, दुस-या जातिधर्माच्या व्यक्तिच्या घरी राहिल्यास किंवा त्याला घरी ठेवल्यास ती व्यक्ति व कुटुंब भ्रष्ट झाले, असे मानीत असत. संत रामदासांनी आपल्या वाङमयातून समाजातील विटाळवेडाच्या कल्पनेवर आघात केलेला आढळतो. ब्राह्मणांव्यतिरीक्त इतर समाजातील लोकांनी अध्ययन, अध्यापन करावे व ब्राह्मण वर्गातील लोकांनी त्यांना गुरू मानावे हे ब्राह्मणांना मान्य नव्हते. तत्कालीन समाजात धर्माच्या व देवाच्या नावाने भिक्षा मागणारे, तसेच अध्यात्मापेक्षा लोकांना फसवून स्वतःचे पोट भरण्याकडे कल असलेले, बाह्यांगी टिळे, माळा, मुद्रादि वेष  धारण करणा-या सौरी, वाघ्या-मुरळी, वासुदेव, बाळसंतोष, पांगूळ, दिवटा, डवरी, कानफाटया, बैरागी, पिंगळा, बहुरूपी, सरवदे, कैकई, मुंडा, डोइफोडा, मैंद इत्यादी लाकांचे उल्लेख येतात. त्यांच्या ढोंगीपणावर संत रामदास व संत तुकाराम यांनी टिका केल्याचे आढळून येते. लोक आपल्या जातीतच लग्न करीत असत. तत्कालीन समाजात कन्या विक्रय केला जात असावा. समाजात एकच लग्न करण्याची प्रथा होती. परंतु बायको मेल्यावर दुसरी बायको करीत असत. राजे, सरदार, जहागिरदार व वतनदार लोक मात्र अनेक बायका करीत असत. पुरूष दुसरे लग्न करीत परंतु स्त्रियांना तशी परवानगी नव्हती. अर्थात याला समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांचा अपवाद होता. पतीच्या निधनानंतर स्त्रिया दुसरा विवाह करू शकत असत. त्यास पाट लावणे, गंधर्व लावणे असे म्हणत असत. समाजात सतीची प्रथा रूढ होती. प्रामुख्याने वरिष्ठ वर्गातील, राजा व सरदारयांच्या स्त्रिया सती जात असत. पीटर डेला व्हॅला याच्या प्रवास वर्णनात, जयकामा नावाची स्त्री सती जाताना त्याने पाहिली. तसेच सतीचे पावि़त्र्य सर्व जातीत सारखेच होते,  असा उल्लेख येतो. धार्मिक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग होता. समाजात वेठबिगारीची पद्धती होती. धार्मिक स्थळे व वतनदार, यांच्या घरी गावातील सेवकांना वेठबिगारी करावी लागे.

शिवकालीन समाजजीवनाचा ऐतिहासिक मागोवा घेताना  प्रो. शं. दा. पेंडसे यांनी आपल्या ‘शिवकालीन संसकृती आणि धर्म’ या लेखात वि. का. राजवाडे यांनी सतांच्या कार्याविषयी मांडलेल्या व काळाच्या ओघात बदलत गेलेल्या मतांचा मागोवा घेतला आहे. त्याबाबत पेंडसे असे लिहितात की, ‘…ग्यानबा-तुकारामांनी महाराष्ट्राला पंगू बनविले असा अक्षेप संतांचे वाड;मय वाचून राजवाडयांनी संतावर घेतला होता व नुसते वाड;मय वाचून तसाच ग्रह पुष्कळांचा होईल असे वाटते. पण एकांगी ज्ञान हे पुष्कळ वेळा सदोष असते. संतांनी जो उपदेश केला तो देशाच्या कोणत्या परिस्थितीत केला? यापेक्षा निराळा उपदेश त्यावेळेस करणे शक्य होते की नाही, लोकांची त्यावेळची मनःस्थिती कशी होती? याचा संपूर्ण इतिहास ज्या वेळेस राजवाडयांनी पाहिला तेंव्हा संतांनी केले हेच पुष्कळ केले असे त्यांना वाटले व त्यांनी आपले मत बदलले. १९०० साली लिहिलेल्या चौथ्या खंडाच्या प्रस्तावनेत, संताळयावर त्यांनी प्रखर टिका केली होती; पुढे १९०३ साली प्रसिद्ध झालेल्या सहाव्या खंडाच्या प्रस्तावनेत त्यांचे मतांतर होत आहे असे दिसले. व १९१० साली पुण्याच्या शिवराज्याभिषेकोत्सवांत वाचलेल्या ‘शिवकालीन समाजरचना’ या निबंधात त्यांचे पूर्ण मतांतर झाल्याचे आढळून आले. राजवाडयांनी उत्पन्न केलेल्या पूर्वपक्षाचा उत्तरपक्षही त्यांनीच केलेला असल्यामुळे त्यांच्या निबंधातील उताराच येथे देतो. ‘‘अठरापगड जातीचे ब्राम्हण, क्षत्रिय वैश्य व शूद्र स्वधर्मभ्रष्ट झाले असता ते बहुतेक मुसलमान बनल्याससारखे झाले. इतकेच की, त्यांनी सुंतेची दीक्षा मात्र घेतली नाही, तीहि त्या काळी घेतली असती. परंतु त्यांच्या आड एक मोठी धोंड आली. ती धोंड म्हणजे राष्ट्रातील साधुसंत होत. भांडणे, तंटे, अपेयपान, अभक्षाभक्षण यांचे साम्राज्य सर्वत्र मातलेले पाहून ही बजबजपुरी ताळयावर यावी या श्रद्धेतून, साधूसंतांनी सर्वांना सहजगम्य व सुलभ असा भक्तिमार्ग सुरू केला. अशा सद्हेतूने की, कसेही करून हे लोक हिंदुत्वात रहावे आणि अशा सदाशेने की, पुढेमागे लोकोत्तर अवतारी पुरूष निपजलाच तर त्याच्या द्वारा हे लोक पुनः धर्म व कर्मनिष्ठ बनण्याचा संभवा रहावा. असा प्रकार साधूसंतांनी केला. स्नान, संध्या, जपजाप्य, प्रायश्चित, धर्माधर्म यांच द्वेष अज्ञ लोकांच्या ठायी होता. त्या द्वेषाला साधूसंतांनी गुणांचे स्वरूप दिले. ‘स्नानसंध्या टिळेमाळा’ या ढोंगांची आमच्या या भक्तिमार्गात जरूरी नाही असा पुकारा त्यांनी केला आणि भगवत नामस्मरणाचा साधा मंत्र जो भेटेल त्याला देण्याचा सपाटा चालविला. मुमुक्षु, नामस्मरणाने आकृष्ट झाला म्हणजे, त्याला नवविधा भक्तिची माहिती देत. त्यात शुचिीर्भूतपणे कसे रहावे, सत्य, अहिंसा इत्यादी धर्म कसे पाळावे वगैरे हिंदुधर्मातील विधिनिषेधाची ओळख करून दिली जाई. वर्णाश्रमधर्माचे  फारसे नाव काढीत नसत. फक्त कुलधर्म, जातिधर्म, पितृधर्म पाळण्यात पुण्य आहे एवढेच सांगितले जाई. अशारीतीने, साधूसंतांनी, या भक्तीमार्गाद्वारा, वर्णाश्रमधर्मलोपप्रधान अशी ही महाराष्ट्रातील दुर्दैवी प्रजा, दोन अडीचषे वर्षे आर्यसमाजात मोठया शिताफीने थोपवून धरिली आणि आर्यसंसकृतीचे संरक्षण केले. तेंव्हा आपल्या देशावर त्यांचे उपकार बिनमोल झाले हयात काडीचाही संशय नाही. जर भारतखंडांत व महाराष्ट्रात त्या काली भक्तिमार्ग नसता तर अफगाणिस्थान, इराण वगैरे झाल्याप्रमाणे हया देशातील सर्व प्रजा एकवर्णी मुसलमान झाली असती; आणि आर्यसंस्क्रुती , आर्यसारस्वत, आर्यसमाज, आर्यांचातुर्वर्ण्य , आर्यशील हया जगातून समुळ उच्छिन्न झाले असते.’’  साधूसंतांच्या कामगिरीचे राजवाडयांनी केलेले हे वर्णन, यापेक्षा सुंदर रीतीने क्वचितच करिता येईल.’ (पेंडसे,पृ.४८-४९)राजवाडे यांनी संतांच्या कार्याचे केलेले हे वर्णन शिवकालीन समाजाचे धुरीन या नात्याने संतांनी केलेल्या कार्याची महती स्पष्ठ करणारे आहे.

छत्रपतीकालीन धार्मिक जीवन:-

छत्रपतीकालीन महाराष्ट्रातील धार्मिक जीवनात, छत्रपतीपूर्व काळातील हिंदुधर्म व त्याचे विविध पंथ – उपपंथ, तसेच जैन, इस्लाम, ख्रिश्चन,सुफी इत्यादी धर्म- संप्रदाय या काळात अस्तित्वात होते. या सर्व धर्म – संप्रदायांचे स्वरूप, त्यांचा राज्यकर्ते व समाजावरील प्रभाव इत्यादिंबाबत तत्कालीन साधनांतून उल्लेख येतात.

शिवकालीन धार्मिक जीवनात धार्मिक स्थळे, तिर्थस्थाने, साधू – संत, पिर-फकीर, विद्वान इत्यादींना महत्व दिले जात असे. त्यांचे  महत्व विचारात घेऊन शिवाजीराजाने धार्मिक स्थळांना इनाम, वर्षासने व देणगीच्या स्वरूपात मदत केल्याचे उल्लेख तत्कालीन साधनांमधून येतात. त्यामध्ये हिंदूंची देव-देवळे, साधू-संत, तसेच मुस्लीमांची दर्गे, मशिदी, पीर – फकीर यांचाही समावेश होता. अशा साधू संत व फकीरांमध्ये केळशीचे बाबा याकुत, देहूचे संत तुकाराम, पाटगावचे मौनीबाबा, रामदास स्वामी व रामदासी संप्रदाईक  इत्यादींचा समावेश होता. तसेच स्वतः शिवाजी महाराजांनी साधूसंत, फकीर यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले होते. साधू-संतांचा आदर करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केल्याचे आढळत नाही. शिवजीराजांच्या या धार्मिकवृत्ती व कृतिचा सकारात्मक परिणाम राज्यातील प्रजेवर झाला असावा. साधू-संतांचा आदर करणारा, देव-देवळे यांची दखल घेणारा शिवाजीराजा निश्चितपणे आपले जीवीत व मालमत्तेचे व देव धर्माचे रक्षण करील हा सामान्यांचा विश्वास वाढीस लागून शिवाजी लोकराजा झाला.

www.aasantosh.com

शिवाजीराजांनी आपल्या राज्यातील लोकांच्या श्रद्धेनुसार आपल्या प्रत्येक किल्ल्यावर देव – देवतांची मंदिरे उभारली व त्याची व्यवस्था  लाऊन दिली होती. त्यापैकी महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवरील मंदिरांमध्ये ३२ देवीची, १३ महादेवाची, ६ हनुमानाची, तर इतर देवतांची २६ मंदिरे होती. ही उदाहरणे  शिवाजीराजांच्या प्रजेविषयीच्या प्रेमाची, त्यांच्या धार्मिक भावनांची जोपासना करण्याच्या वृत्तीचे साक्षीदार मानावे लागतील.

मराठा राज्याची उभारणी करीत असताना शिवाजी महाराजांनी तत्कालीन सामाजिक व धार्मिक जीवनात मोठी क्रांती केली होती. वैदिक काळातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेला काळाच्या ओघात विकृत स्वरूप   प्राप्त होऊन  गुणाऐवजी जन्मावरून, वर्ण व कर्मावरून जात ठरविली जात होती. त्यामुळे चवथा व पाचवा वर्ण  गुण व पराक्रम अंगी असूनही त्रैवर्णिकांची सेवा करण्यासाठी बंदिस्त केला गेला. त्यात परशुरामाच्या निःक्षत्रियत्वाच्या कथेच्या प्रभावामुळे पृथ्वीवर क्षत्रिय अस्तित्वात नसून फक्त ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक राहिले आहेत.  अशी भावना समाजात रूढ झाली होती. त्यामुळेच अंगी पराक्रम असूनही स्वतःचे (मराठयांचे) राज्य स्थापन करावे असे महाराष्ट्रातील कर्तबगार मराठे सरदारांना वाटले नाही. मुस्लीम राज्यकर्त्यांची सेवा चाकरी करण्यातच त्यांनी धन्यता मानली होती. अशा परिस्थितीत शिवाजीराजांनी शूद्र , अस्पृष्य, समजल्या जाणा-या मावळे, मराठे, रामोशी, बेरड , कोळी, भंडारी, ठाकर,  दलदी, गावीत, इत्यादी जातींच्या लोकांच्या हाती शस्त्र देऊन, त्यांच्या अंगी असणारा पराक्रम व विविध कौशल्ये यांचा उपयोग करून त्यांना गुण व कर्माने क्षत्रिय बनविले आणि त्यांची मदत व पराक्रमाच्या सहाय्याने मराठा राज्य उभे केले. तत्कालीन समाजात राजकीय क्षेत्रात जातपात विरहीत ऐक्य करण्याचे काम शिवाजीराजांनी केले. ही बाब विशेषत्वाने लक्षात घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासातील स्थान किती वरच्या पातळीचे होते हे स्पष्टपणे जाणवते. राज्याभिषेकाची कल्पना पुढे योताच ज्या अडचणी शिवाजीराजांच्या समोर उभ्या राहिल्या त्या अडचणीं महाराजांनी गागाभट्टाच्या मदतीने मोठया कौशल्याने सोडविल्या आणि ज्याच्या हाती शस्त्र तो क्षत्रिय हे गुण कर्माचे सूत्र शिवाजीराजाने कृतीने सिद्ध केले. जून १६७४ मध्ये मराठयांच्या राजास राज्याभिषेक होऊन तो सिंहासनावर विराजमान झाला. 

बहूजन समाजाच्या कर्तृत्वाचे इतिहासातील स्थान व त्याचे महत्व :- ‘‘ … मानवी जीवनाच्या वाटचालीत राजकरणा खेरीज आचार , विद्या, व्यापार इतर अनेक प्रकारच्या व्यवहारांचा समावेश होत असतो. अनेक व्यावहारिक   घडामोडी समाजात होत असतात; आणि त्यांचा समावे समाजपुरुषाच्या चरित्रात करणे अत्यावश्यक असते. केवळ राजकारणाचाच तेवढा विचार करून इतिहासाला थांबता येत नाही. … सबब इतिहास म्हणजे राष्ट्राचे सर्व त-हेचे व सर्व प्रकारचे गतकालीन चरित्र. सर्व प्रकारचे वर्तमान चरित्र म्हणजे वर्तमान इतिहास, असे लक्षण स्वीकारणे अपरिहार्य आहे.  ……” असा उल्लेख वि. का. राजवाडे ऐतिहासिक प्रस्तावना खंडात येतो. बदलत्या काळानुसार इतिहास लेखनाचे संदर्भ बदलत असल्याचे आपणास दिसून येते. त्यातून इतिहास लेखनात अनेक नवीन प्रवाह पुढे आले आहेत. त्यात ‘पददलितांचा किंवा अंकित, वंचित व शोषितांचा इतिहास’ (सबाल्टर्न स्टडीज) या इतिहास लेखन विषयक विचारसरणीत समाजाच्या सर्वागिण जडणघडणीत शोषिता – वंचित समाजाचे स्थान कोणते होते? त्यांचे कार्य व कर्तृत्वाचे त्यात  काय महत्व  होते ? त्यांचे जीवन कसे होते ? इत्यादी प्रश्नांची उकल करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. इतिहास लेखनाचा हा दृष्टीकोन विचारात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य उभारणीत, त्याच्या दृढीकरणाच्या व विस्ताराच्या प्रक्रियेत समाजाच्या विविध स्तरातील लोकांचा कोणता सहभाग होता?  हे तत्कालीन व उपलब्ध साधनांच्या आधारे जाणून घेणे आवश्यक आहे.   महात्मा ज्योतिबा फुले आपल्या शिवाजीराजे भोसले यांच्यावरील पोवाडयात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘ कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती ’ असा करतात, या बाबीचा अवर्जून उल्लेख करावा लागतो.

मुसलमानी राजसत्ता महाराष्ट्रात स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रातील मानवी समाजाचे नियंत्रण मनु, याज्ञवल्क्य,पराषर, इत्यादी स्मृतीग्रंथात  सांगितलेल्या धर्मास अनुसरून होत असे, ही गोष्ट निर्विवादपणे सिद्ध होते. छत्रपतींच्या काळातील समाजात मुस्लीमांच्या पदरी लष्करी चाकरी करणारे सरदार, जमिन महसुलाशी संबंधित असलेले निरनिराळया पातळीवरील वतनदार आणि शेतकरी, कुणबी, बलुतेदार व धार्मिक क्षेत्राशी संबंधित असलेले विविध व्यवसाईक , अलुतेदार – बलुतेदार  इत्यादींचा समावेश होता.   सरदार, जहागिरदार व वतनदारांचा वर्ग मुस्लीम राज्यकर्त्यांशी इमान राखून त्यांच्यासाठी लढाया करीत असे , तर कधी स्वार्थासाठी आपसात लढात असे. महसूलवसूलाच्या व आपल्या ‘हकलाजिम्यां’ च्या वसुलासाठी सामान्य जनतेवर अन्याय – अत्याचार करीत असत. गढया – वाडे बांधून, सैन्य व शस्त्र बाळगून आपल्या वतन – जहागिरीत राजाप्रमाणे वागत  असत. त्यात मुस्लीम राज्यकर्त्यांनीही काही मराठे सरदारांना ‘राजे ’, चंद्रराव, सर्जेराव, इत्यादींसारखे  निरनिराळे किताब दिल्याने त्यांचा अहंकार आणखीच बळावला होता.

स्वराज्य स्थापनेच्या प्रक्रियेत छत्रपती शिवाजीराजांनी, या जुलमी वतनदारांच्या शोषणाच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले. ज्यांनी शिवाजीराजांच्या राज्यउभारणीच्या कार्याला योग्य प्रतिसाद दिला नाही , त्यांना बळाच्या व शस्त्राच्या जोरावर नमविले. त्यांचे वाडे, गढया उध्वस्त करून त्यांच्या छोटया साम्राज्याला सुरूंग लावला; आणि सामान्य जणांची शोषणातून मुक्तता  करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे समाजातील विविध स्तरातील लोक शिवाजीराजाच्या भोवती गोळा झाले होते. शिवाजीराजाने राज्य उभारणीच्या कामात व राज्य उभारणीनंतरही सर्वांना गुणानुरूप आपल्या राज्यकारभारात संधी देऊन सहभागी करून घेतले होते. त्यामुळे ब्राह्यण, मराठे, कुणबी, मावळे, रामोशी, धनगर, न्हावी, महार, चांभार, मांग, गारूडी, कोळी, गावीत, भिल्ल, रामोशी, ठाकर,प्रभू इत्यादी गरीब व मध्यम वर्गातील लोक शिवाजी भोवती गोळा झाले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभात एका धार्मिक विधीच्या प्रसंगी प्रत्येक जातीला महाराजांना अभिषेक करण्याची  घालण्याची संधी देण्यात आली होती. सामाजिक स्तरानुसार वेगळया धातूंची भांडी असतील किंवा त्यातील द्रव पदार्थ वेगळा असेल परंतु प्रत्येकाला प्रातिनिधिक स्वरूपात महाराजांना अभिषेक घालण्याची संधी देण्यात आली होती. राज्याभिषेकातील हा विधी एका विशिष्ट विचाराचा प्रतीक होता. तो विचार म्हणजे, राजापुढे चारही वर्ण न्यायाच्या दृष्टीने सारखे असून राजाने प्रत्येक जातीला तत्कालीन सामाजिक संकेतानुसार तिच्या व्यवसायीक क्षेत्रात स्वतःची उन्नती साधण्याची संधी दिली पाहिजे. महाराजांनी प्रत्येक जातीला तिच्या विशिष्ट व्यवसाय क्षेत्रात कर्तृत्व गाजऊन पुढे येण्यास पुरेपुर संधी दिली. त्यामुळे सर्वच जाती- जमातींना स्वराज्याबद्दल प्रेम निर्माण होऊन त्यांनी महाराजांना मनापासून सहकार्य केले.

शिवकालीन समाज हा मुस्लीम राजवटीच्या प्रभावाखली होता. मुस्लीम राज्यकर्त्यांचा धर्म व संस्कार यांचा प्रभाव संपूर्ण समाजावर पडलेला होता. त्यामुळे हिंदु समाजात पारंपारिक पद्धतीने ब्राह्यण वर्गास महत्व असले तरी या काळात तो वर्गहि कर्म भ्रष्ट झाला होता आणि मुस्लीम राज्यकर्त्यांची  चाकरी करू लागला होता. त्यामुळे समाजातील इतर वर्गही इस्लामी राज्यव्यवस्थेचे बळी ठरले होते. त्यांचकडून निरनिराळया मार्गांनी समाजाचे शोषण होत असे.

शिवकालात संस्कृत भाषेतून दिले जाणारे उच्च शिक्षण व मराठीतून दिले जाणारे कारकूनी कामाचे, हिशेबाचे व धार्मिक वाड;मयाचे शिक्षण, अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाची परंपरा फक्त ब्राह्मण वर्गातच होती. साहजिकच तत्कालीन मुलकी राज्यकारभारात खालपासून वरपर्यंतच्या पदासाठी लागणारे अधिकारी व कारकून बनविण्याची क्षमता त्याच जातीत होती. याशिवाय धार्मिक कार्यासाठी लागणारे भट- पुरोहित, अध्यापनासाठी लागणारे पंतोजी व ज्ञानप्रसार करणारे लेखक या विशिष्ट जातीतूनच पुढे येत असत. ब्राह्यण वर्गाला दक्षिणेतील मुसलमानी शाहयांच्या राज्यकारभारात मुलकी कारभाराचा व युद्धशास्त्राचा अनुभव मिळाला होता. त्याचा उपयोग शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीच्या कामी झाला. ब्राह्यण वर्गाखालोखाल शिक्षणाच्या बाबतीत ‘सारस्वत व कायस्थ’ या वर्गाचा नंबर होता. या दोन्ही जातीत उच्च संस्कृत शिकण्याची परंपरा नव्हती. पण कारकुनी व हिशेबाच्या कामासाठी लागणारे व्यवहारिक शिक्षण तसेच जुन्या मराठीतून मिळणारे धार्मिक काव्य व साहित्याचे शिक्षण या कुटुंबांना परंपरेने दिले जात असे. त्यामुळे कारकुनी व हिशेबी कामात या दोन्ही जाती पुढे होत्या.

मराठा जातीच्या अंगी असलेली लष्करी व्यवसायाची परंपरा फार जुनी होती. दक्षिणेतील इस्लामी राजवटीत लष्करी सेवा केल्यामुळे अनेक मराठा घराण्यांमधून घोडदळाचे उत्तम सैनिक व अधिकारी तयार झाले होते. सभासद बखरीत असा उल्लेख येतो की, “…  महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर हेतूपूर्वक ब्राह्यण – सबणीस (हिशेब खात्याचा प्रमुख),  मराठा-हवालदार,( किल्लेदार), मराठा – सरनोबत (शिबंदी प्रमुख) प्रभू – कारखाणीस -(भांडार प्रमुख) असे वेगवेगळया जातीचे अधिकारी त्यांच्यातील गुणांनुसार नेमल होते. … कोणतेही काम चौघांच्या माहिती व सहकार्याशिवाय होणे शक्य नव्हते….” . या माध्यमातून शिवाजीराजांनी या तीनही वरिष्ठ जातींमध्ये ऐक्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले होते.

मावळातील डोंगरी मुलखात पिढयानपिढया राहणारे मावळे  व हेटेकरी हे अत्यंत काटक व चपळ असून गिर्यारोहनात व द-याखो-यातून पायी हिंडण्यात तरबेज होते. त्याबाबत चिटणीस बखरीत असा उल्लेख येतो की,”… त्या मुलखातील कजाखीचे लोक व माहितगार… म्हणोन तेच अधिक ठेवून त्यास मावळे – सरदार येसाजी कंक व तानाजी मालुसरे व पासलकर देशपांडे- मुसेखोरे, पौडखोरे, व हिरडसमावळ वगैरे लोकांस किताब, सरदा-या देवून … शिपाई ऐसे ठेविते जाले. … ’’ लढाई व किल्ल्यांचे रक्षण करण्यात मावळयांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे ‘‘… प्रतापगड, उंबरखिंड, सालेरी, उमराणी, नेसरी येथील लढायात मावळयांनी बचावात्मक व आक्रमक अषी दोन्ही प्रकाच्या युद्ध तंत्रात आपले नैपुण्य सिद्ध केले. …” सिंहगडावरील तानाजीचे हौतात्म्य , बाजी पासलकर याचा वीरमृत्यू, सालेरीच्या लढाईत रामाजी पांगेरा  (पांगारे असावे ) कर्नाटकाच्या लढाइ्र्रत येसाजी कंकाची कामगिरी महत्वाची होती. विजापूरचे पादशाहीतून सातशे पठाण तिकडे बदलून चाकरी करावयास आले , त्याबाबत गोमाजी नाईक पानसंबळ यांचा सल्ला  घेऊन चाकरीस ठेवून घेतले. त्यांची सरदारी राघो बल्लाळ अत्रे यांसि सांगितली. रामोशी व महार जातीच्या लोकांना शिवपूर्व काळात गावांच्या सीमा व किल्ल्याभोवतीचे मुलुख(घेरा) रक्षण करण्याचे काम देण्यात येत असे. त्यामुळे बातम्या काढण्यात व पहा-याच्या कामात हे लोक वाक्बगार होते.  हेर व जासुद यांची कामे करण्यास लागणारे गुण त्यांच्यात होते. रामोशी लोकांना रात्री अपरात्री हिंडण्या फिरण्याची सवय असल्यामुळे हेरगिरीच्या कामात हे अधिक कुशल होते. महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावरील कोळी, भंडारी, गावीत या जाति वर्षानूवर्षे मच्छीमारी व होडयातून छोटया प्रमाणावरील व्यापार यावर आपली उपजिवीका करीत असत. त्यामुळे या जातींमध्ये दर्यावर्दीपणाचे गुण होते. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक जातीजमातीचे विशिष्ट गुण हेरून शिवाजी महाराजांनी त्यांच्या गुणानुरूप त्या – त्या जाती- जमातीला तिच्या ठराविक क्षेत्रासाठी निवडून, त्यांना पुढे येण्यास जास्तीतजास्त वाव दिला. विशिष्ट जातीचा माणूस विशिष्ट क्षेत्रासाठी निवडताना मात्र त्याच्या ठिकाणी आवश्यक ती पात्रता आहे की नाही हे पाहण्याची दक्षता महाराज घेत असत. गडांच्या शिबंदीत बहुजन समाजातील लोक असत. सर्वांना मिळून मिसळून वागावे लागे. त्यामुळे पारंपारिक जातीजातीतील उच्चनिचतेच्या भावनेची तिव्रता कमी होण्यास मदत झाली. किल्ल्याप्रमाणेच आपल्या लष्करातही महाराजांनी मुलकी अधिका-यांच्या नेमणूका जातीनुसार केल्या होत्या. शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेल्या ब्राह्मण वर्गाने… राज्यकारभारातील तळाच्या पातळीवरील खेडेगावच्या कारभरापासून अष्टप्रधान मंडळाच्या सर्वोच्च पातळीवरील कारभारात ब्राह्यणवर्ग होता. कार्यक्षम मंत्री, मुलकी अधिकारी, हिशेबनीस, लढवय्ये, सेनाधिकारी, राजदूत, न्यायाधिश, वकील, हेर , राजकीय सल्लागार, धर्माधिकारी आणि लेखक म्हणून ब्राह्यणांनी योगदान दिले होते. त्यात , मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक, निळो सोनदेव, निराजी राऊजी, सोनोपंत व त्यांचा मुलगा त्रिंबक डबीर, रघुनाथ पंडित, व्यंकोजी दत्तो, त्रिंबक भास्कर, पंताजी गोपिनाथ इत्यादिंचा समावेश करता येईल. महाराजांचे बहुतेक सर्व सुभेदार, सरसुभेदार, कारकून, सरकारकून, खेडेगावातील कुलकर्णी – देशपांडे आणि प्रत्येक किल्ल्यावरील सबणीस ब्राह्यण होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो व दत्तजी त्रिंबक हे महाराजांच्या पूर्ण विश्वासातील होते. महाराज आग्-याला गेले तेंव्हा आणि  कर्नाटक दिग्विजयाच्या मोहिमेवर गेले तेंव्हा त्यांनी स्वराज्याची जबाबदारी या तिघांवर सोपविली होती. कर्नाटकाच्या स्वारीवर निघण्यापूर्वी महाराजांनी राहुजी सोमनाथ या ब्राह्यण सरकारकुनास रायगड किल्ल्याचा ‘ राजप्रतिनिधी ’ म्हणून नेमले होते. राजकीय सल्लागार या नात्यानेही ब्राह्यणांची कामगिरी उल्लेखनिय होती. ब्राह्मणवर्गाने महाराजांना रणांगणावरही खूप मदत केली. अष्टप्रधान मंडळातील सात ब्राह्यण मंत्र्यांपैकी पाच जणांना युद्धशास्त्र उत्तम अवगत होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक यांनी अनेक लढायात विजय मिळवून दिले. जावळीच्या मोरे प्रकरणात रघुनाथ बल्लाळ सबणीस याने साहाय्य केले होते.  इ.स. १६६०च्या जुलै महिन्यात पन्हाळयावरून निसटताना महाराजांनी पन्हाळगड त्रिंबक भास्कर याच्या स्वाधीन केला होता. राजनैतिक दूत किंवा वकील या नात्याने ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्यकारभारात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यात पंताजी गोपिनाथ बोकील, रधुनाथ पंडितराव  व प्रल्हाद निराजी यांचा सिंहाचा वाटा होता. शेती व स्थापत्याच्या क्षेत्रात मारोपंत पिंगळे व अण्णाजी दत्तो यांनी मोठी कामगिरी बजावली. साहित्य निर्मिती व विद्वत्तेच्या क्षेत्रातही ब्राह्यण वर्गाने मोलाची कामगिरी बजावली. त्यात, राज्यव्यवहारकोष कर्ता-रघुनाथपंत हणमंते, राजनीती लिहीणारा-रामचंद्रपंत अमात्य, शिवभारताचा कर्ता – कवि परमानंद, पर्णालपर्वतग्रहणाख्यान लिहीणारा – जयराम पिंडे, शिवाजीचे चरित्र लिहीणारा, कृष्णाजी अनंत सभासद, इत्यादी.  

ब्राह्मणांप्रमाणेच ‘प्रभू’ जातीनेही महत्वाची कामगिरी बजावली होती. कायस्थ प्रभू हे लेखणी व तलवार बहाद्दर होते. त्यात लेखन क्षेत्रात, बाळाजी आवजी चिटणीस व नील प्रभू यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, विश्वासराव नानजी दिघे, सुंदरजी प्रभू  – यानी महाराजांचा वकील म्हणून इंग्रजांशी वाटाघाटी केल्या. कुंभारजुव्याचा कायस्थ गोविंद विश्वनाथ प्रभू याने सिंधूदुर्गाच्या बांधणीत मोठा वाटा उचलला होता.  महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावरील सारस्वत जातीचा इंग्रज व पोर्तुगिज या युरोपियनांशी दिर्घकाळ संपर्क आला होता. अशा सारस्वतांना महाराजांनी दुभाषे म्हणून काम करण्याची संधी दिली.

शिवाजी महाराजांनी मराठा जातीतील ढाऊ वृत्तीचा उपयोग आपले लष्कर सामर्थ्यवान व प्रभावी करण्यासाठी करून घेतला. दक्षिणेतील शाही राजवटीत मराठा क्षत्रिय वर्गाला राजकारण, युद्धतंत्र यांचा अनुभव मिळालेला होता. त्यामुळेच हा वर्ग महाराजांच्या घोडदळाचा कणा बनला होता. शिवभारत, जेधे शकावली, सभासद बखर, या साधनांतून शंभराहून अधिक मराठा जातीच्या घोडदळातील अधिका-यांची नावे येतात. सभासद बखरीच्या शेवटी महाराजांच्या घोडदळातील बारगिर व शिलेदार यांची यादी दिलेली आहे. तुकोजी चोर, माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर व हंबीरराव मोहिते हे चारही सेनापती मराठा होते. हिरोजी इंदुलकर,गिरजोजी यादव या मराठयांनी किल्ले बांधणीत कौशल्य दाखविले होते. राजगड बांधणीत हिरोजी, तर पन्हाळगड बांधणीत  गिरजोजी यादव. स्वराज्यातील बरेच जहागिरदार, वतनदार व देशमुख हे मराठा जातीचे होते. महाराजांनी त्यांचा उपयोग जमिनीची मषागत व शेतीचा विकास यासाठी करून घेतला. कुणबी मराठयांपैकी अनेक कुटुंबे पावसाळयातील चार महिने शेतावर राबत तर आठ महिने महाराजांच्या सैन्यात शिपाईगिरी करीत असत.

मागासलेल्या जातींनाही शिवाजी महाराजांनी लष्करी क्षेत्रात सामावून घेऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. शिवपूर्व काळात मावळे, हेटकरी, रामोशी, महार, मांग, ठाकर, कातकरी इत्यादी लोक, मुसलमान राज्यकर्ते व मराठे सरदारांची सेवा करीत होते. परंतु त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळत नव्हता. सामाजिकदृष्ट्या त्यांना हीन लेखले जात असे. रामोशी, बेरड, भिल्ल यांना लुटारू , दरोडेखोर म्हणून संबोधले जाई. महार- मांग, यांना पूर्वापार अस्पृष्य मानले जात असे. कोळी – भंडारी यांसारख्या दर्यावर्दी  जातींचे गुण निष्फळ ठरत होते. लोहार, सुतार, चांभार, न्हावी, यांसारख्या जातीचे लोक खेडयात बलुतेदार म्हणून सामान्य जीवन जगत होते आणि वतनदारांकडून होत असलेला अन्याय निमुटपणे सहन करीत होते. या सर्व जातींमधील विशेष व सुप्त गुण ओळखून शिवाजी महाराजांनी त्यांना योग्य संधी दिली व स्वराज्य स्थापनेच्या कामी त्यांचा योग्य उपयोग  करून घेतला. त्यामुळे त्यांच्या नैतिक व भौतिक प्रगतीचा मार्ग खुला झाला होता..  मावळे तलवारबाजीत, तर हेटकरी नेमबाजीत निष्णात होते. त्यांचे हे गुण हेरून त्यांचे एक स्वतंत्र पायदळ उभे केले. येसाजी कंक हा या  पायदळाचा प्रमुख होता.  शिवाजीराजाचे पायदळ हे दोन प्रकारचे होते. त्यात रणक्षेत्रावरील पायदळ व गडावरील पायदळ (‘शिबंदी’).  या दोन्ही पायदळात मावळयांचा भरणा होता. याच मावळयांमधून महाराजांनी आपले एक खास शरिररक्षक दल (‘हुजरात’)  उभारले होते. भिल्ल व रामोशी या जातीतील पारंपारिक गुण व कौशल्ये यांचा विचार करून शिवाजीने बहिर्जी नाईक या रामोशास हेर खात्याचा प्रमुख म्हणून नेमले. त्याचे आडनाव जाधव असे होते.  महार व डोंगरकोळी  यांनीही स्वराज्याची सेवा केली. किल्ल्याच्या बुरूजांचे रक्षण करण्याचे व तेथून टेहळणी करण्याचे काम महार जातीकडे होते. किल्ल्यावरील शिबंदीत डोंगरकोळयाचे प्रमाण मोठे होते. या डोंगरकोळयांना ‘नाईकवाडी’ असे म्हणत. स्वराज्याच्या उभारणीत न्हावी जातीने महत्वाची भूमिका बजावली. प्रतापगडच्या युद्धात जिऊ महाला या शिवाजी महारजांच्या अंगरक्षकाने महाराजांचे प्राण वाचविले. जिऊस ह्या कामगिरीबद्दल जोर खो-यात – जोर, गोळेगाव, व गुळूब अशी तीन गावे इनाम दिली होती. जिऊ जातीचा न्हावी , त्याचे आडनाव सकपाळ. इ. स. १६६० साली महाराज पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जात असताना महाराजांचा वेश धारण करून शिवबा काशिद याने स्वतःचे प्राण धोक्यात धालून महाराजांना पन्हाळयातून बाहेर जाण्यास मोलाची मदत केली. महाराजांच्या आरमाराच्या स्थापनेच्या प्रक्रियेत कोकण किना-यावरील सोनकोळी, भंडारी , गावीत, हटकर, भोई, खारवी, दलदी वगैरे दर्यावर्दी जातींनी महत्वाची भूमिका बाजावलीहोती.  ताडामाडाच्या झाडावर चढून ताडीमाडी काढण्याचा भंडारी लोकांचा परंपरागत व्यवसाय.  त्यांच्या या कौशल्याचा उपयोग महाराजांनी जहाजावरील चढ उतार करण्यासाठी करून घेतला. ‘दलदी ’ व ‘खारवी’ या बाटून मुसलमान झालेल्या जाती नावीक गोलंदाजीत निश्णात होत्या. या लोकांनी महाराजांचा सागरी व्यापार मध्यपूर्वेतील मस्कतपर्यंत पोहचविला. या दर्यावर्दी लोकांच्या मदतीने महाराजांनी कल्याण व भिवंडी या ठिकाणी मध्यम आकाराची जहाजे बांधणा-या गोदया उभारल्या. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग इत्यादी दुर्गांची आणि खांदेरी या नवीन नाविक केंद्राची उभारणी केली. 

राज्य कारभारात महाराजांनी जात व धर्म यापेक्षा  गुणांना अधिक महत्व दिले होते. शामराव निळकंठ रांझेकर, गंगाजी व मंगाजी वाकणीस, व माणकोजी दहातोंडे  इत्यादी लोकांना दूर करून त्याजागी मोरोपंत पिंगळे, दत्ताजी त्रिंबक, नेताजी पालकर इत्यादींची नेमणूक केली. प्रतापराव गुजर लढाई्रत मारला गेल्यावर आनंतराव उर्फ हंबीरराव मोहिते याचे कर्तुत्व पाहून त्यांना सेनापती पदावर नियुक्त केले. निळो सोनदेव याचा मोठा मुलगा नाकर्ता आहे, हे लक्षात येताच त्यांचा धाकटा भाऊ रामचंद्र निळकंठ यास मुजूमदार केले. शिवभारतकार कवि परमानंद याचा मुलगा देवदत्त याच्याजवळ वडिलांसारखे कवित्व गुण नाहीत, हे आढळून येताच महाराजांनी त्यास दरबारात स्थान दिले नाही. हे खरे असले तरी त्यांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील काही जागा वंशपरंपरेने चालविल्या परंतु त्या करतानाही माणसाची पात्रताच विचारात घेतल्याचे आढळून येते.

                 अशा रितीने शिवाजी महाराजांनी समाजाच्या विविध स्तरातील लोकांच्या अंगी असलेले पारंपारिक कला गुण हेरून त्यांना स्वराज्याच्या कामी लावले. त्यामुळे राजकीय प्रक्रियेत सर्वच घटकांचा निरनिराळया कारणांनी समावेश झाला व त्यामुळे त्यांच्या भौतिक व सामाजिक जीवनात बदल होऊन त्यांना इतिहासात महत्व प्राप्त झाले होते, असे दिसून येते.

राज्यात चोर भयापासून मुक्ती व्हावी ,यासाठी चोरांना पकडून शिक्षा दयावी. बेरड, रामोशी, इत्यादी जमातींना किल्ल्याच्या कामात सामावून घ्यावे, याबाबतचे विचार चिटणीस बखरीत व्यक्त केले आहेत. त्यात,‘‘ …  आपले राज्यात चोरभय अगदी नसावे ऐसे मनात आणून जागा जागा बेरड, चोर, आडेकरी होते त्यास धरून आणून कित्येकांचे शिरच्छेद केले आणि ज्या ज्या देशातील होते त्या त्या प्रांतातील किल्ले, ठाणी, कोट येथे असाम्या नेमून त्यास शेते वगैरे देऊन गडकरी यांत घेरीयाचे चैकीस नेमून त्यांची जीवीका चालेसे करून, यातून चोरी केली असता शिरच्छेद करावा ऐसे केले. प्रति गावास रखवालीस एक बेरड त्या किल्ल्याच्या त्या प्रांतात असावा. चोरी जालिया त्याने भरून द्यावी. नाहीतर पत्ता लावून द्यावा, ऐसे केले. याजमुळे राष्ट्रात कोठेही चोरभय नाही ऐसे जाले. समाजात नैतिकता निर्माण करण्यासाठी, द्युत खेळणे, मद्य सेवन करणे, शिकारीचा बहूत छंद, स्त्रियांचे ठायी आसक्ती, क्रोध इत्यादी, सप्त दुव्र्यसनांचा त्याग करावा.यासाठी प्रयत्न केले. याबाबत सन १६७३ मध्ये शिवाजी राजांनी आपल्या लष्कराला उद्देशुन काढलेला आदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा लोक कल्याणाचा विचार स्पष्टपणे दिसून येतो. पावसाळयासाठी लष्कराची छावणी चिपळूण जवळ पडली होती. छावणीसाठी दानागोटयाची सर्व व्यवस्था महाराजांनी केली होती. पण लष्करातील लोकांनी त्याची उधळमाधळ केली होती. ऐन पावसाळयात उपासमार घडेल याचा इशारा देताना महाराज म्हणतात,‘‘ …  नाहिसे झाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही  ! …  व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास  कोण्ही कुणब्याच्या येथील दाणे आणील, कोण्ही भाकर , कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी  … ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर करून जीवमात्र घेवून राहिले आहेत तिही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की, मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही !  ऐसा तळतळाट होईल.  …  सारी बदनामी तुम्हावरी येईल.  … हे तुम्ही बरे जाणून शिपाई हो … जे गाव राहिले असाल तेथे त्यांनी रयतेस काडीचाही आजार द्यावयास गरज नाही. …’’  शिवपूर्व काळात शेतकरीवर्ग पाटील, देशमुख व जहागिरदार यांच्या वंशपरंपरागत सत्तेखाली भरडून निघत होता. या वर्गाकडे मुसलमानी सत्ताधीशांनी रयतेकडून शेतसारा व इतर संबंधित कर गोळा करण्याचे काम दिलेले असे. हे वतनदार – लोक सरकारने ठरवून दिलेल्या करापेक्षा जास्त कर शेतक-यांकडून वसूल करून त्यांची अक्षरश पिळवणूक करीत असत. ते सारा नियमित तिजोरीत भरीत असल्याने त्यांच्या रयतेबरोबरच्या वागणूकीची चौकशी होत नसे. शेतक-यांकडून  अन्यायाने मिळालेल्या पैशाच्या जोरावर ते उन्मत्त बनले होते.. मोठे वाडे, गढया बांधून व मोठे सैन्य बाळगून ते राजसत्तेला डोईजड होऊ  लागले. या समस्येची सोडवणूक करण्यासाठी महाराजांनी वतनदारांचा शेतीवरील कर वसूल करण्याचा हक्क रद्द केला. कर वसूल करण्यासाठी स्वतःचे मुलकी अधिकारी नेमले, वतनदारांचे वाडे, गढया पाडून टाकल्या व  नवीन गढया बांधण्यास मनाई केली. ‘शिवाजी महाराजांनी रयतेची व सामान्य गोरगरीब लोकांची पिळवणूक थांबविली. …  शिवाजी महाराजांचे वतनदारी विरोधी धोरण हे तत्कालीन समाज जीवनातील क्रांतीकारक पाऊल  होते . , ’  असे मराठयांच्या इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या , ‘ शिवाजीचे स्वराज्य: कशासाठी? कोणासाठी ? ’ या लेखात लिहितात.   प्रामाणिक वतनदारांची वतने चालू ठेवले व त्यांचे हक्क बांधून दिले. अप्रामाणिकांची वतने जप्त केली. काही एकनिष्ठ वतनदारांना शिलेदारी सैन्य बाळगण्याची परवानगी दिली.परंतु त्यांचे प्रमाण बारगीरांपेक्षा कमी ठेवले.  …. शेतक-यांना वतनदारांच्या जोखडातून मुक्त केले, त्यामुळे शेतीची कामे सांभाळून महाराजांच्या सैन्यात भरती होऊन पराक्रमाच्या जोरावर मोठया जागा व द्रव्य मिळविण्याची संधी त्यांना मिळाली….  ’

कडक शिस्त:-  शासकीय कारभार स्वच्छ, शिस्तबद्ध व कार्यक्षम राखण्याच्या बाबतीत महाराज,  जातीचा श्रेष्ठपणा वा सामाजिक प्रतिष्ठा यांची पर्वा करीत नसत. असे तत्कालीन साधनांतील उदाहरणांवरून दिसून येते.  सुपे परगण्याचा कारभारी  संभाजी मोहिते (तुकाबाईचा भाऊ म्हणजेच शिवाजीराजांचा मामा)याने शिवाजी विरोधी भूमिका घेताच त्यास कैद करून  सुपे हस्तगत केले. प्रभानवळीचा सुभेदार जिवाजी विनायक याने जंजि-याच्या सिद्यीविरूद्ध महाराजांचा नाविक अधिकारी दौलतखान यास रसदेचा पुरवठा करण्याबाबत कुचराई केली.  तेंव्हा, ‘ ब्राह्यण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ’ असे उद्गार काढले. चिंचवडकर नारायणदेव गोसावी हे सत्पुरुष म्हणून महाराजांना त्यांच्याबद्दल आदर होता; पण स्वतःचे धार्मिक क्षेत्र सोडून जेंव्हा त्यांनी राजकारणात ढवळाढवळ केली तेंव्हा , ‘‘ तुमची बिरूदे आम्हाला द्या व आमची तुम्ही घ्या. ’’ अशा रोखठोक भाषेत महाराजांनी त्यांना पत्र लिहिलेेहोते.  सरदार वतनदारांचा वर्ग मुस्लीम राज्यकर्त्यांशी इमान राखून त्यांच्यासाठी आपले रक्त सांडीत असत.  तर कधी स्वार्थसाठी आपसात संघर्ष करीत असत. महसूल वसूलाच्या व आपल्या हकला जिम्याच्या वसुलासाठी सामान्य जनतेवर अन्याय – अत्याचार करीत असत. राज्य उभारणीच्या प्रक्रियेत छ. शिवाजी महाराजांनी या वतनदारांच्या शोषणाच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले.  ज्यांनी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला योग्य प्रतिसाद दिला नाही त्यांना बळाच्या व शस्त्राच्या जोरावर नमविले. त्यांचे वाडे – गढया उध्वस्त करून त्यांच्या छोटया साम्राज्याला सुरूंग लावला आणि सामान्य जणांची शोष]णातून मुक्तता केली. प्रति शिवाजी समजल्या जाणा-या नेताजी पालकराकडून इ. स. १६६६ साली पन्हाळयाच्या स्वारीत कुचराई होताच त्याला सेनापती पदावरून दूर केले. खंडोजी खोपडे याने अफझलखान प्रकरणात शत्रुला मिळून महाराजांचा विश्वासघात केला तेंव्हा जेधे , बांदल यांच्या मध्यस्तीला न जुमानता महारजांनी त्याचा एक हात व एक पाय काढण्याची शिक्षा दिली.    गडावर कोणाचे मनी दुर्बद्धी निर्माण झाली, आणि त्याने फितूर केला तर त्वरीत त्याला पत्ता लागू न देता तिथून उचलून आपणापाशी आणावा. योग्य तो न्याय करावा. त्याचा अपराध सिद्ध झाला, तर मग दया क्षमा न करता त्याचा शिरच्छेद करावा आणि त्याचे मस्तक गडोगडी हिंडवावे. रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रात लिहितात, ‘‘…   किल्याची सेवा परम कठीण, शासन न करता किल्ल्याचे काम सर्वसाधारण होऊन जाणार असे सर्वथैव न करावे. …’’   गडोगडी ; ज्योतिशी, वैदिक – वैद्य, जखमा बांधणारे, लोहार, सुतार, पाथरवट, चांभार इत्यादी,  निरनिराळी कामे करणारे कारागीर असावेत. त्यांची कामे संपल्यानंतर त्यांना इतर काम सांगून गुंतून ठेवावे … ‘ मोसे  खो-यातील  कुलकर्णी रंगो त्रिमल कुलकर्णी  याने स्त्रीविषयक बदकर्म केले. त्याला कैद केले.

सारांश:-

वरील सर्व माहितीच्या आधारे  असे आढळून येते की, मुस्लीम राजवटीच्या काळात महाराष्ट्रातील सर्वच समाज निरनिराळया मार्गांनी त्रासला गेला होता.  सरदारी, जहागिरी व वतनदारी यामुळे समाजात शौर्य व पराक्रम निर्माण झाला होता. परंतु त्याचा उपयोग समाजालाच छळण्यासाठी व शोषण करण्यासाठी केला जात असे. समाजाच्या खालच्या स्तरातील लोक पारंपारिक हिंदु समाजव्यवस्थेमुळे विघटीत झालेले होते, दबलेले होते, त्यात मुस्लीम राजवटीची भर पडल्यामुळे शोषणात अधिक भर पडली होती. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केल्यामुळे  ब्राह्मणांपासून ते महार  – मांग, कोळी , बेरड, दलदी, भंडारी इत्यादी जातींच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले. त्यामुळे त्यांचाही विकास झाला.आर्थिक व सामाजिक क्षेत्रात त्यांना महत्व प्राप्त झाले. समाजातील दबलेल्या लोकांच्या अंगी असलेल्या विविध पारंपारिक गुणांमुळे स्वराज्याच्या उभारणीतील दलीत शोषित समाजाचे ऐतिहासिक स्थान स्पष्ट होऊ शकले. कोणताही माणूस जन्माने श्रेष्ठ नसून तो त्याच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ होतो, हे सूत्र शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे स्पष्ट  झाले.

संदर्भ ग्रंथ

केळकर न.चि. व आपटे द.वि.,(संपा.) (भा.इ.सं.मं.) शिवजी निबंधावली -1, शिवचरित्रकार्यालय पुणे , १९३०

कुलकर्णी अ.रा., शिवकालीन महाराष्ट्र, पुणे, १९३०

दिवेकर स.म., (संपा.), परमानंद कृत  शिवभारत, पुणे ,

मेहेंदळे ग. भा. , श्री. राजा शिवछत्रपती, खं.1ला, भाग २ रा , ‘युरोपियनांचे वृत्तांत. ’

 पांगारकर ल.रा.,(संपा.),श्रीदासबोध,

केळकर न.चि., आपटे, (संपा.) , शिवाजी निबंधावली, पुणे, १९३०, पृ. ११

संत तुकाराम, म. शासन (प्रका.), श्री संत तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा, मुंबई, १९७३,

भा. इ. सं. मं., पुणे, शिवचरित्र साहितय, खं. ९

गाडगीळ स.रा., (संपा.), कृ. अ. सभासद कृत, श्री शिवप्रभू चरित्र, सभा. बखर, पुणे, प्रथम आवृ. पुणे, १९६४,

कुलकर्णी श्री. म. , (संपा.), रामचंद्रअमात्य कृत, मराठे शाहीतील राजनिती, ‘आज्ञापत्र ’, पृ.४४-४५,६८-६९. 

डॉ. मा. रा. कंटक , ‘ शिवछत्रपतींनी साधलेला जातीजमातीतील राजकीय समन्वय, ’. रा. षं. वाळिंबे,- संपा.,  भा. इ. आणि सं. पर्यालोचन पुणे. १९८५

गो. नी. दांडेकर,‘ दुर्गाधिराज शिवछत्रपती ’रा. षं. वाळिंबे, – संपा., भा. इ. आणि सं. ,पृ. १५०, पुणे १९८५.

वि. का. राजवाडे, म.इ. सा., खंड ८,

का. ना. साने , प्रका., म.रा. चि. विरचित, श्रीशिवछत्रपती यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र पृ. २०१.

डॉ. जयसिंगराव पवार ., शिवजीचे स्वराज्य: कशासाठी? कोणासाठी?, दै.सकाळ पुणे, दि. ९ मार्च २००४.

पुरंदरे –  आपटे, सं. शिवचरित्र साहित्य खं. ७ पृ. ३९.

डॉ. सोपान शेंडे, मराठेकालीन धार्मिक जीवन ,  अक्षरलेणे प्रकाशन , सोलापूर, २०१२.

लेखक सर परशुरामभाऊ महाविद्यालय ,पुणे येथे इतिहास विषयाचे सहयोगी प्राध्यापक व इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मराठेकालीन धार्मिक जीवन या विषयात त्यांनी पीएचडी संपादन केलेली आहे.

  •  

रामलाल गणपत शेंडे : महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्वप्न साकारणारा हमाल

  •  

डॉ.सोपान शेंडे

28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यस्मरण दिनी वडिलांनी (श्री. रामलाल गणपत शेंडे) इहलोकीची यात्रा संपविली हा योगायोग म्हणा किंवा त्यांचे भाग्य म्हणा, परंतु त्यामुळे विचारांचे भूतकाळाचा वेध घेण्याचे चक्र सुरू झाले. त्या प्रक्रियेतूनच हा मृत्यूलेख लिहिणची प्रेरणा मिळाली.

चांदा गावः-
नेवासे तालुक्यातील चांदा हे सर्वांगाने सपंन्न असे एक महत्वाचे गाव. राजकारण, समाजकारण, संसकृती या सर्वांगाने या गावाला संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यामुळे या गावातील सामान्यातला सामान्य माणूस एक प्रकारचे वेगळेपण घेउन समाजात वावरताना दिसतो. हे चांदे गावचे वैशिष्ट्य भूषण आहे.

बालपण व जडणघडण
रामलाल गणपत शेंडे यांचा जन्म हिवरे, तालुका नेवासा येथे सुमारे 1933 साली झाला. हे कोणी राजकारणी किंवा श्रीमंत घराण्यातील व्यक्ती नव्हेत. तर ते एक साधे शेतमजूरी व हमाली करणारी व्यक्ती होते. परंतु ज्यांनी आपल्या हयातीत केवळ श्रम साधना करून आपल्या प्रामाणिक ,प्रेमळ व निराभिमानी वर्तनाने गावातील लोक व नातेवाईक या सर्वांची मने जिंकली. त्यामुळेच कागदोपत्री रामलाल हे नाव गावामध्ये लालाभाऊ, नातेवाईकांमध्ये रामभाऊ या नावाने विशेष प्रसिद्धीस आले. ही तीनही नावे एकाच व्यक्तीची आहेत. हे देखील कित्येकांना नीटपणे उलगडत नाही. काही काळ त्यांनी आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला वास्तव्य केले. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आई राधाबाई यांच्या बरोबर चांदा येथे मामा दगडू कानडेच्या आश्रयास येऊन राहिले. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 10 वर्षांचे असेल. त्यावेळी तीन मुले आणि आई असे त्यांचे कुटुंब होते. त्याकाळात मुलांना लहान वयातच महिने किंवा सालाने कामासाठी ठेवण्याची पद्धत होती. परंतु स्वातंत्र्याच्या मानसिकतेमुळे तो मार्ग न स्विकारता कुटुंबातील वडिल मुलगा या नात्याने दोन भाऊ व आई यांची जबाबदारी स्वीकारून बाल वयातच जनावरे राखणे, शेतातील छोटीमोठी कामे करणे यांसारखी मिळतील ती कामे करून उदर निर्वाह सुरू केला. वाढत्या वयाबरोबर हमाली, विहीरी खोदणे यांसारखी कठीण श्रमाची कामे केली आणि कुटुंबाचा डोलारा सांभाळला.

सवंगडी व सोबतीः
चांदा येथे त्यांना अनेक साथी सोबती मिळाले. त्यात, रभाजी गायकवाड, बाजीराव मदगुल, बाजीराव थोरात, एकनाथ भवार, पासलकर, इत्यादींचा समावेश होता. जनावरे राखायला जाताना तालमीचा व कुस्तुीचा छंद लागला. प्रतिकुल परिथितीतही शरीर कमाऊन आपल्या लहान सोबत्यांनाही त्यांनी तालीम व कुस्तीचे धडे दिले. चांदा गाव हे त्याकाळी शेतमालाच्या खरेदीची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे कमावलेल्या शरीराच्या व ताकदीच्या जोरावर हमालीचे काम सुरू झाले. चांदा ही त्याकाळी नेवासा तालुक्यातील एक महत्वाची शेतीमालाच्या विक्रिची बाजारपेठ होती. पेठेतील अमोलशेठ गुंदेचा, झांबूरलाल कटारिया, कनकलाल गांधी इत्यादी व्यापा-यांकडे हमाली सुरू केली. कमी बोलणे व प्रामाणिकपणे आपले काम निमुटपणे करणे यामुळे चांदयाच्या बाजार पेठेत रामलाल या नावाचे लाडीक व प्रेमळ रूप म्हणजे लालाभाऊ. (उत्तरेत प्रभूरामचंद्राच्या बाल रूपाचा उल्लेख रामलल्ला असा केला जातो.त्याचे चंदेरी रूप म्हणजे लाला आणि लाला हे नाव समजून त्याला भाऊ ही उपाधी जोडून लालाभाऊ). याच नावाने त्यांची ओळख वाढत गेली. त्याकाळात मराठा, माळी व इतर समाजातील अनेक हमाल सहकारी त्यांना मिळाले. त्यांमध्ये गंगाधर थोरात, रामु शिंदे, बाजीराव शिंदे, रभाजी गायकवाड, अमीरभाऊ तांबोळी, जगन्नाथ दहातोंडे, बाजीराव दहातोंडे इत्यादींचा समावेश होता. पुढे काही काळ त्यांनी घोडेगाव येथी नहारशेठ यांच्याकडे व येथील सरकारी गोदामात लेव्ही संकलनाच्या कामात हमाल म्हणून काम केले. त्या काळात त्यांना छापवाडी येथील चिमाजी काळे, शहारामजी यांसारखे जीवाभावाचे सहकारी मिळाले. जात धर्म यापलीकडे जाऊन ही हमाल मंडळी काम करीत होती. कठिण प्रसंगात ही मंडळी टपाखालचे विविधप्रकारचे धान्य एकत्र करून वाटून घेत असत व त्या धान्यावर आपल्या कुटुंबाची गुजरान करीत असत. त्यामुळे त्यांचा स्नेह आजपर्यंत टिकून आहे. पुढे हमालीच्या कामाबरोबरच विहीर खोदण्याचे कठिण काम करावे लागले त्यामध्ये काम मिळेल त्या गावी जाऊन आठवडा- पंधरादिवस तेथेच राहून काम करावे लागत असे. ते ज्या गल्लीमध्ये रहात असत त्याच गल्लीत हात करवतीने लाकडी साटे लावून लाकूड कापण्याचे काम चालत असे. त्या मध्ये चांदयातील गायकवाडांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे त्यांना आरिकस किंवा लाकूडकापे या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या सहवासाने लाकुडकामाचे, शिलगारीच्या कामाचे धडे घेउन गरजेनुसार शेतक-यांचे औजारे बनवून गरज भागविण्याचे कामही केले. ज्यावेळी काही उद्य़ोग नसेल अशा वेळी शेतमजुरीची कामे केली. मान अवघडणे, उसण भरणे यांसारख्या व्याधीवर तात्काळ उपाय करून, बांळांतणीसाठी कमी वेळात बाज विणून देण यांसारखी कामे विनामोबदला कररून समाजसेवा करीत असत. सातत्याने श्रम करण्याच्या वृत्तीमुळे लोभ वाढला, अनेक चांगली, गुणी माणसे जवळ आली. त्यांचे सहकार्य, प्रेम हे कौटुंबिक अडचणीच्या काळात मिळाले.

लग्न एक आगळा सोहळा:-

दादांचे लग्न हा एक तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणारा महत्वाचा प्रसंग होता. कोणत्याही प्रकारची शेतीवाडी नाही, सांगण्यासारखी घराण्याची परंपरा नाही. रोहिदासाच्या कुळात जन्म झाला असला तरी उपरे व मामाकडे आश्रीत असल्यामुळे पारंपारिक व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. (त्याकाळी बलुतेदार पद्धती असल्यामुळे जे मूळचे बलुतेदार असत त्यांच्या शिवाय इतरांना ते काम करता येत नसे.) त्यामुळे लग्नासाठी मुलगी कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून वाट काढण्याचे काम त्यांचे मामा दगडू कानडे यांनी केले. त्यांची बायको भिमाबाई यांच्या बहिणीची पुतणी ( वडाळयाचे नामदेव राउत यांची मुलगी) हौसाबाई हिच्याशी विवाह करण्याचे ठरले. त्यासाठी नवरदेवाने नवरीच्या वडीलांना साठ रूपये दिले. त्याकाळी बाल विवाह होत असत. त्यामुळे नवरीचे वय अडीच वर्षाचे होते. विशेष बाब म्हणजे ज्या दिवशी दादांचे लग्न होते, त्याच दिवशी नवरीच्या आईने (सासुबाई गऊबाई ) मिशनच्या दवाखान्यात दुस-या मुलीला (कौसाबाई) जन्म दिला. अडीच वर्षाची नवरी आणि तेरा वर्षाचा नवरदेव. असे लग्न पार पाडले. तेथून पुढे आई दोन भाऊ आणि तिसरे भावंड म्हणजे अडीच वर्षाची बायको. असा संसाराचा गाडा सुरू झाला. नात्याला नाते जोडून भावांचीही लग्ने केली. त्याच्या मदतीने गोविंदराव आनंदा शेटे यांच्या कडून 1962 साली पाचशे रूपयात जागा विकत घेतली. त्या व्यवहाराचे साक्षीदार होते लक्ष्मीकांत दिनकर बिबवे व श्रीपती चौधरी. पुढे त्या जागेवर स्वतः सुतारकाम करून आपल्या भावांच्या मदतीने घर बांधले.

निराभिमानी निर्व्यसनी जीवन :-
प्रामाणिकपणा, सचोटी, निरपेक्ष विचार, निर्व्यसनी जीवन इत्यांदीमुळे प्रेम सहकार्य वाढीस लागून खडतर जिवनही सुसहय बनू लागले. काळाच्या ओघात प्रापंचिक जबाबदा-यावढीस लागल्या. कुटुंबाचा व्याप वाढत गेला सहा अपत्ये व त्यांचा सांभाब् याची जबाबदारी बाढली तसा विविधप्रकारची काम करून पती पत्नी या उभयतांनी रा़त्रीचा दिवस आणि कोंडयाचा मांडा करून आपल्या मुलांना वाढविले. मुले वाढविताना अपार दारिद्रयाशी समाना करावा लागला. परंतु श्रम, सत्य, स्वत्व, इमानादारीची भरपूर शिदारी देउन मुलाबाळांचे संगोपन केले. शिक्षण दिले. मोठे केले. जीवनात निरनिराळया आपत्ती आल्या परंतु त्याला निग्रहाने तोंड देउन नितीच्या बळावर आपला प्रपंच सुरळीतपणे चालविला.

संपन्न व समाधानी जीवन:-
महात्मा ज्योतिबा फुले यांनी 19 व्या शतकात स्त्री- शुद्रांच्या, श्रमिक व शेतकरी यांच्या उन्नतीसाठी विविधमार्गांनी प्रयत्न केले, प्रतिकुल परिस्थितीशी निकराने सामना केला. त्याचे सूत्र होते सदाचार (निती), शिक्षण, समता व श्रमप्रतिष्ठा. म्हणूनच ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ‘‘शेतक-यांचा आसूड’’ या प्रेरणादायी ग्रंथामध्ये बहुजनसमाजाच्या अधोगतीचे कारण मांडताना, ‘‘विद्येविना मति गेली, मतिविना गति गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले’’ अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे आणि ते दूर केल्याने समाजाचा विकास होईल म्हणून ज्योतिबांनी स्त्री- शुद्रांसाठी शाळा सुरू केल्या. आपली पत्नी सावित्रीबाई यांना प्रशिक्षण देऊन शिक्षिका बनविले. लहुजी साळवे वस्तादांसारख्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने अस्पृष्य मुलामुलींना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले. यामागे एकच भावना होती, ती म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून समाजोन्नती करणे.
कै. रामलाल शेंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले हे नाव माहित होते. त्यांनी म. फुले यांचे काही लेखन वाचलेही असेल , कदाचित त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपला जीवन मार्ग अनुसरला असावा. त्यांनी आपल्या आयुष्यात श्रमाला महत्व दिले. समाजातील निरनिराळया जातीधर्माच्या सहकार्‍यांशी स्नेह जोडला, बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही शिक्षणाला प्राधान्य देउन आपली मुले मुली, नातवंडे यांना शिकविले. त्यामध्ये मुलगा मुलगी असा भेद केला नाही. विचारात व घरात नवस सायास, सत्यनारायण, जागरणगोंधळ, दोरीगंडा, भुतेाखेते इत्यादींसारख्या अंधविश्वासास थारा दिला नाही. त्यामुळेच आपल्या कुटुंबाच्या तीन पिढयांचा उज्वल, निर्व्यसनी, निराभिमानी असा विकास केला. त्यांच्या मागे मुले सुना, नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यामध्ये पीएच्. डी., दोन इंजिनिअर, चार एम्.एस्.सी., तीन एम्. ए., असा उच्चशिक्षित परिवार उभा राहिला. नगर जिल्हयातील चांदे गावात चर्मकार समाजात दारिद्रयाच्या खाईत जन्मलेला मी, (सोपान शेंडे) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत तिचे शिरोभूषण असलेल्या सर परशुरामभाउ महाविद्यालयात 1990 पासून अध्यापक म्हणून काम करताना , जो सद्विचारांचा , आत्मविश्वासाचा व सचोटीचा वारसा वडिलांकडूून मिळाला त्याच्या आधारे महाविद्यालयात प्रदिर्घकाळ राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रमाधिकारी, कला शाखेचा उपप्राचार्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचा समन्वयक, इतिहास विभाग प्रमुख यांसारख्या महत्वाच्या पदावंर जबाबदारीने व प्रभावीपणे काम करू शकलो. या मागे आई वडिलांनी केलेल्या संस्काराचा सिंहाचा वाटा आहे. भाऊ दत्तात्रय शेंडे हे चांदा व परिसराची चरणसेवा करीत आहेत. सुभाष शेंडे आपला प्रपंच सांभाळून पडेल ते काम करून समाजसेवा करीत आहेत. हे सर्व त्यांनी शिक्षणाला महत्व दिल्यामुळे घडले. सर्व कुटुंबाला सुशिक्षित व सुसंसकृत बनविण्याचे मोठे सामाजिक कार्य त्यांनी केले. या सर्व कथनामागे एकच उद्देश आहे, तो म्हणजे सदाचरण, शिक्षण, श्रमप्रतिष्ठा यांना महत्व दिल्यास कुणाचाही भाग्योदय होउ शकतो. हा वस्तूपाठ समाजासमोर पोहचावा. पती-पत्नी या उभयतांनी अहोरत्र शारिरीक कष्ट करून प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाबांळांचे संगोपन केले. शिक्षणाचा उत्तम संस्कार देउन आपल्या कुटुंबाला सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या दिशेने पुढे नेले. या सर्व वाटचालीत ते आपल्या मुलांना भारी कपडालत्ता देउ शकले नसतील, परंतु विचार व आचारांची श्रीमंती मात्र दिली.
संतत्वाचा साक्षात्कार:
आयुष्यभर केलेले कष्ट, सात्वीक विचार यामुळे कोणत्याही प्रकारच्या दुर्धर रोगापासून दुर राहिले. वयपरत्वे शारिरीक व्यथा व्याधींशी आपली मुले सुना, नातवंडे, नातेवाईक यांच्या सहवासाने हलके करीत गेले. परंतु मानसिक दृष्टया अतिशय समाधानी जीवन त्यांनी उपभोेगले. भजनकीर्तन, ग्रंथांचे वाचन या सात्त्विक शिदोरीवर आपला वार्धक्याचा काळ त्यांनी व्यतीत केला. त्यांच्या जीवनाकडे पाहता असे म्हणता येईल की त्यांनी संतवृत्तीची जोपासना केली. कशातही लिप्त न राहता अलिप्तपणे संसार केला. मंगळवार दि. 27 रोजी अपल्या कपडयांच्या घडया घातल्या. हे पाहून त्यांना तुम्ही काय करता असे विचारल्यावर, ‘‘आता मला मला जायचे’’ असे उत्तर दिले आणि बुधवार दिनांक 28 नोवहेंबर 2018 रोजी चहापाणी घेउन सकाळी 9.15 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी आपला इहलोकीचा प्रवासास पूर्णविराम दिला. दादांचे जगणे वागणे आणि जाणे ही एक संपन्न जीवनाची अध्यात्मिक वाटचाल म्हणावी लागेल.

  •  

महात्मा फुले : एक निरीक्षण – दुर्गा भागवत

  •  

भरभराट इच्छिणा-या कोणत्याही समाजाला परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात , तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या पंरपरा जेव्हा घट्ट , खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात , तेव्हा मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात… अशी मांडणी केली विदुषी दुर्गा भागवत यांनी.

२ एप्रिल १९८९ ला महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल पुरवणीत हा लेख छापून आला होता..
…………………………….

गेले काही दिवस महाराष्ट्रभर महात्मा फुल्यांच्या संदर्भात मोठे वादंग माजल्याचे आपण पाहताहोत. हे वादंग त्यांच्या हिंदूधर्माबद्दलच्या विवेचनासंबंधी आहे आणि त्यातून प्रकरण हातघाईवर आल्याचे दिसते आहे , अशा वेळी या देशाची एक जबाबदार नागरिक , थोडीबहुत शिकलेली ,थोडासा नावलौकिक असलेली आणि विशेष म्हणजे समाजशास्त्राची अभ्यासक म्हणून चार समजुतीचे व जबाबदारीचे शब्द सांगावे यासाठी मी आज वा लेखाचा प्रपंच करते आहे.

फुल्यांसारखी माणसे हवीत की नकोत ? फुल्यांसारख्या व्यक्तीच्या बाबतीत पहिला महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की , समाजाला अशा व्यक्तीची गरज असते की नसते ? किंवा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होत असतो ? फुल्यांसाख्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा , मृत्यूला शतकापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला असतानासुद्धा तुम्ही – आम्ही कुठली भूमिका घ्यायची हे ठरविण्याची वेळ येते ती का ?

पण फुल्यांसारख्या व्यक्ती म्हणजे कुठल्या प्रकारच्या व्यक्ती बरे ? तर त्या व्यक्ती म्हणजे सामाजिक बंडखोरी करू पाहणा-या व्यक्ती. विचार आणि कृती या दोन्ही अंगांनी समाज सुधारायचा प्रयत्न करू पाहणा-या व्यक्ती. थोडक्यात , ज्यांना आपण ‘रेव्होल्युशनरी क्रिटिक ’ (क्रांतिकारक टीकाकार) म्हणतो अशा व्यक्ती. अशा व्यक्ती स्वभावतःच आदर्शवादी असतात आणि आदर्शवादी असल्याने त्यांना समाजाची अपेक्षित आदर्श स्थिती या दोहोंतली तफावर चटकन् जाणवते. जाणवते एवढेच नव्हे ,तर अंतर्यामी खोलवर खुपते ; आणि ही तफावत दूर करण्यासाठी ही माणसं कंबर कसतात. प्रस्थापित समाजावरचा त्यांचा हल्ला दोन वेगवेगळ्या बाजूंनी असतो. एक वैचारिक टीकेच्या स्वरुपात आणि दुसरा प्रत्यक्ष कार्याच्या स्वरुपात. तात्विक उपपत्ती मांडून एकीकडे प्रचलित समाजाचे दोष दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि दुसरीकडे त्याचवेळी हे दोष दुरुस्त करण्यासाठी हे लोक त्यांच्या परीने निरनिराळ्या प्रकारचे इलाजही सुचवीत असतात.

आता समाजामध्ये सामाजिक क्रांती घडून यावी यासाठी समाजावर टीका करणारे समाजसुधारक हवेत की नकोत? या प्रश्नाचे उत्तर कुणीही जबाबदार माणूस ’हवेत’ असेच देईल, असे मला वाटते. समाजाला स्थैर्य हवे असते आणि तसेच परिवर्त्न सुद्धा हवे असते. समाज नुसता एका जागी स्थिर राहिला तर त्याचे डबके होईल. म्हणून भरभराट इच्छिणा-या या कोणत्याही समाजाचा परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात. तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या परंपरा जेव्हा घट्ट, खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात, तेव्हा त्या मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात. समाजाची प्रगती पाहिली तर ती जुन्यातले सारेच काही टाकून देत नाही, ती काही नवे आत्मसात करीतच फक्त होऊ शकते.

रूढीवर टीका

समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखी सामाजिक अन्याय व दु:खे यांच्यावर बोट ठेवणारी नि त्यासाठी समाजाला धारेवर धरणारी माणसे हवीत, असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचवेळी ही माणसे प्रचलित धर्मसंस्थेवर, धार्मिक समजुतींवर, आचार धर्मावर कठोर प्रहार करणार आहेत, हेही मान्य करावे लागते. धर्मावरची त्यांची टीका अपरिहार्य असते. कारण धार्मिक समजुतींच्या बैठकीवरच सगळ्या जुन्या समाजांचा बराचसा कारभार चाललेला असतो. रिच्युअल्स ऊर्फ विधिजाल आणि देवादिकांबद्दलची मिथ्थके यांच्या मदतीनेच धर्म हे माणसांचे आपसाआपसांतले व्यवहार नियंत्रिक करीत असतात. काही प्रमाणात प्रजेला दिल्या गेलेल्या प्रत्यक्ष आदेशाच्या रुपात, तर ब-याच प्रमाणात प्रेरक स्वरुपाच्या सूचनांच्या स्वरुपात हे सर्व घडत असते.

विधिकल्प व मिथ्थके

जेव्हा कधी अगदी पूर्वकाळी या कथा वगैरे रचल्या जातात, तेव्हा त्यांचा उद्देश त्या घटितात (सिच्युएशन) किंवा मानवी प्रसंगामध्ये मानवाला कसे वागायचे हे शिकवावे हा असला, तरी कालांतराने त्या रुढींचे व कथांचे कठीणसे घट्ट साचे बनतात नि ते जनतेची हालचाल, चलनवलन वगैरे मर्यादितही करुन टाकतात. हे कसे घडले हे दाखविण्यासाठी अशा कथांचे एक उदाहरणच देते. हे उदाहरण साध्या लोककथेचे आहे. मूळ किंवा आदिम प्राक-कथनातला धर्मवाचक आशय जेव्हा कमकुवत होतो, तेव्हा त्या प्राक-कथांचे रुपांतर लोककथांमध्ये होत असते. नवरा-बायकोच्या जोडीत नव-याने पुरुषाची कामे करावीत नि बायकोने बाई माणसाची करावीत, हा धडा किंवा पाठ देणा-या कथा या सर्व जगभर प्रचलित आहेत. एका कथेत बायको शेतात जाऊन पुरुषाचे काम करु पाहते, तर नवरा घरात राहून रांधणे – वाढणे, धुणी – भांडी, मुले सांभाळणे हे बायकोचे काम करतो, तेव्हा त्यातून अनेक गमती-जमती आणि घोटाळे कसे होतात, त्याचे वर्णन येते. या कथेतील गमती – जमतीचा किंवा विनोदाचा भाग बाजूला सारला, तरी पुरुषांनी पुरुषांची नि बायकांनी बायकांची कामे केली, तरच संसार व्यवस्थित चालू शकतो, हा ’जैसे थे’ चा पुरस्कार करणार किंवा गतानुगतिकाचा गर्भित संदेश प्रतीत होतोच.

हीच गोष्ट थोड्या फरकाने अनेक प्रकारच्या धर्मसंलग्न मिथ्थकांच्या बाबतीत घडत असते आणि जैसे थे ऊर्फ गतानुगतिक परिस्थिती रुढी सांभाळून ठेवण्यासाठी समाजातले हितसंबंध गट त्या मिथ्थकांचा उपयोग करतात. समाजाच्या विकासाबरोबर असे हितसंबंध गट त्या समाजामध्ये उत्पन्न होणे हे देखील अपरिहार्य आहे. असो.

तर सांगायचा मुद्दा हा की, जो कुणी समाज सुधारण्याचा प्रयत्न करायचा म्हणून समाजातल्या दोषांवर टीका करु पाहतो त्याला धर्मावर टीका केल्यावाचून, धर्माची समीक्षा केल्यावाचून गत्यंतर नसते. कारण समाजातल्या हितसंबंधी गटांच्या हितसंबंधांवर आघात केल्यावाचून त्याला पुढे जाताच येत नाही.

समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखे आवश्यक आहेत, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते आपल्या धार्मिक समजुतींवर आघात करतात, हेही आपल्याला नुसते गृहित धरुन चालत नाही तर कबूल करावे लागते.

सुधारकांचा दुसरा प्रश्न
फुल्यांसारख्या समाजसुधारकांबद्दल दुसरा प्रश्न उत्पन्न होतो . समाजाच्या एकूण कल्याणासाठी फुल्यांसारखे लोक आवश्यक आहेत , ही गोष्ट खरी , पण म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानायचा काय ? माझ्या मते मानायचा नाही . फुल्यांसारखी माणसे समाजाला पुढे नेतात – ही गोष्ट खरी असली तरी ती शेवटी माणसेच आहेत . फार तर थोर माणसे म्हणा . पण शेवटी माणसेच . स्थल – काल – परिस्थिती यांनी बद्ध अशी माणसे . त्यामुळे त्यांचे शब्द , त्यांचे निष्कर्ष , त्यांची अनुमाने ही अंतिम सत्ये होऊच शकत नाहीत . त्यांचे शब्द , त्यांची वचने म्हणजे त्यांच्या वैयक्तिक भूमिका असतात आणि त्यांच्यावर त्यांनी स्वीकारलेल्या बौद्धिक दृष्टिकोनाचा ( परस्पेक्टिव्ह ) फार मोठा प्रभाव असतो . शिवाय तुमच्याआमच्या प्रत्येकाच्या विचाराला ज्या स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात , त्याही काही प्रमाणात तरी त्यांच्याही विचाराला असतात . तेव्हा फुल्यांसारख्या अगदी मोठ्या व्यक्तींच्या वक्तव्याचाही पुनर्विचार होणे आवश्यक ठरते . थोर व्यक्तींबद्दल आदर जरूर असावा . परंतु सत्याची कदर त्याच्याहीपेक्षा अधिक केली जावी , एवढंच . माणसाच्या शब्दांना परमेश्वराच्या शब्दाचा मान देण्याची गरज नाही . मुळात आमच्या संस्कृतीत परमेश्वर नैतिक वा अन्य प्रकारच्या आज्ञा देतो आहे , असा प्रकारच नाही .
समाजसुधारकांच्या धर्म आणि धर्मसंलग्न मिथ्थकावरच्या टीकांचा फेरविचार करणे आणखी एका कारणासाठी आवश्यक ठरते . समीक्षेसाठी विशेष अभ्यास आणि विशेष सहानुभूती या दोन्हींची नितांत गरज असते . अनेकदा हा विशेष अभ्यास समीक्षा करणारापाशी नसतो आणि मग तो समोरच्या धार्मिक साहित्यातून चुकीचे अर्थ काढतो . हे अर्थ चुकीचे असल्याने तज्ज्ञांनी ते केव्हा ना केव्हा दुरुस्त करणे त्यांचे कर्तव्यच ठरते. या विषयातील माहिती कच्ची असल्याने खुद्द फुल्यांनीच कशी चुकीची भाष्ये केली आहेत याचे एक उदाहरण येथे देत आहेत.

ब्रम्हदेव आणि त्याची मुलगी

ब्रम्हदेव स्वत : च्या मुलीशी (उषेशी किंवा सरस्वतीशी ) रममाण होते यावर फुलेंनी बरेच भाष्य केले आहे. परंतु ब्रम्हदेव आणि त्याची मुलगी या संबंधांबद्दल ज्या आदिम कथा आहेत त्या पहिल्या (आदिम) जोडप्याचे एकमेकांबरोबरचे नाते कोणते आणि कसे असावे याचा जो प्रश्न जगभराच्या सगळ्या संस्कृतींना पडला होता , त्याचा अपरिहार्य परिणाम होता. पहिल्याने कोण होते , पुरूष की स्त्री ? पुरूष असेल तर मागाहून येणारी स्त्री त्याची बहीण (अगर मुलगी) होते. स्त्री असेल तर मागाहून येणारा पुरूष तिचा मुलगा होतो. स्त्री-पुरूष दोन्ही एकदम असतील तर ती भावंडे असतील किंवा ज्यू आणि ख्रिस्ती परंपरेप्रमाणे पुरूषाच्या बरगडीपासून पहिली स्त्री उत्पन्न केली गेली असेल , तर ती स्त्री त्या पुरुषाची बहिण बनते. (ख्रिस्ती धर्मातील आदमचे पाप हे व्याभिचाराचे पाप होय.) फुल्यांपाशी हा धर्म आणि पुराणकथांचा किंवा प्राक-कथांचा तुलनात्मक अभ्यास नसल्याने त्यांनी जर या बाबतीत चुकीची विधाने केली असतील तर नंतरच्या लोकांना ती चूक आहेत हे सांगणे हे क्रमप्राप्त ठरते.

अश्वमेधाचा घोडा

हवे असल्यास धर्मसंलग्न मिथ्यांचे आणखी एक उदाहरण घेऊ. वाजसनेयी संहितेत अश्वमेध यज्ञाच्या वेळी होता आणि राजाची मुख्य महिषी यांच्या संवादाचे अनेकदा भांडवल केले जाते. हे संवाद अश्लील आहेत (अर्थात , आजच्या आमच्या दृष्टीने अश्लील. त्या काळातल्या लोकांच्या तर्फे नव्हेत.) .यात शंका नाही. परंतु शीर तुटलेल्या घोड्याच्या बाजूला राणी झोपते वगैरे सगळा जो पुजाविधी आहे त्याचे त्या काळाच्या दृष्टीने बरेच मोठे कार्य आहे. असाच विधी आयर्लंडमध्ये केला जात असे. मूळ स्वरूपात ही एक इंडो – युरोपियन मिथ्यकथा आहे. भारतीय , आयरिश , ग्रीक , रोमन , रशियन , वेल्श या सगळ्या लोकांमध्ये या ना त्या स्वरूपात ही मिथ्यकथा आढळते. अश्वमेधातला घोडा हे सूर्यदेवाचे प्रतिक आहे आणि म्हणूनच राजाचा ‘ अल्टर इगो ’ म्हणजे दुसरा आत्मा आहे. घोड्याचे डोके तोडणे म्हणजे घोड्याला खच्ची करणे. राणी घोड्याचे किंवा सूर्यदेवाचे पुरूषत्व त्याच्यापासून हिरावून घेते आणि आपल्या पतीला म्हणजेच राजाला बहाल करते. राजा हा परत विष्णूचा अवतार आहे. पृथ्वी ही त्याची पत्नी आहे. सूर्यापासून बीज घेऊन राजा पृथ्वीला सुफलित करतो असा एकुण मतितार्थ आहे. त्याकाळी अश्वमेध यज्ञ करणे हे राजाचे एक कर्तव्य होते. लोक त्याला तसे करायला भाग पाडीत असत.

आता वरीलसारखी विशेष माहिती ही फुल्यांना आणि त्यांच्यासारख्या इतरांना असणे दुरास्पात आहे. अशा वेळी त्यांनी यासंबंधी जी चुकीची विधाने केली आहेत , ती दुरूस्त करणेच योग्य ठरते.

खुद्द महात्मा फुल्यांना अशा प्रकारची आपल्या चुकीची दुरूस्ती भाग होती. कारण ‘ शेतक-यांचा आसूड ’ या आपल्या पुस्तकाच्या उपोदघातात ते लिहितात की ‘ या ग्रंथात जे काही मी माझ्या अल्पसमजुतीप्रमाणे शोध लिहिले आहेत , त्यात आमच्या विद्वान व सुज्ञ वाचणारांच्या ध्यानात जी जी व्यंगे दिसून येतील त्यांविषयी मला क्षमा करून… गुणलेषांचा स्वीकार करावा… आणि जर करिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग अयोग्य अथवा खोटासा दिसेल तर किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ तर त्यास काही (ग्रंथकार वगैरे) सुचविणे असेल… आम्हास कळवावे…दुस-या आवृत्तीचे वेळी त्याचा योग्य विचार करू ’ (कीर-मालशे संपादित , पृ.३)

धार्मिक मिथ्यकथा वगैरेंच्या बाबतीत फुले हे विशेष तज्ज्ञ नव्हते. त्यामुळे त्या विषयाचे विश्लेषण करताना त्रुटी राहण्याची , चुका होण्याची शक्यता होती आणि म्हणूनच विचारांची फेरतपासणी आवश्यक ठरते. त्याप्रमाणेच दुस-याही एका कारणासाठी ती आवश्यक होते. फुले सामाजिक टीकाकार होते , तसेच ते कर्ते समाजसुधारकही होते. सामाजिक टीकाकाराच्या भूमिकेतून त्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीची चिकित्सा केली होती आणि त्या दु : खद स्थितीला कारणीभूत ठरलेल्या गोष्टींची चर्चा करून ही स्थिती दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या परिने काही इलाजही सुचविले होते. फुल्यांनी सुचविलेल्या या इलाजांचे पुढे काय झाले , त्यांनी व्यक्त केलेली उद्दिष्टे पुढील काळात प्रत्यक्षात आणली गेली काय इत्यादी विचारसुद्धा फुल्यांच्या बाबतीत आवश्यक ठरतो. कारण या प्रकारच्या अभ्यासातूनच फुल्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीते केलेले विवेचन आणि त्या स्थितीमागील कारणाचे निदान चूक होते की अचूक होते हे आपण पाहू शकणार असतो. येथे फुल्यांच्या सर्वच उद्दिष्टांचा विचार अभिप्रेत नाही. फक्त काही काही निवडक उद्दिष्टे आपण विचारात घेऊ शकतो. ‘ शेतक-याचा आसूड ’ पृ. ८ वर फुले म्हणतात की , ‘ माझ्या मते एकंदर सर्व सरकारी खात्यात शेतक-यांपैकी त्यांच्या संख्येच्या प्रमाणाने कामगार घातल्यास ते आपल्या जात बांधवास इतर कामगारांसारखे नाडणार नाही. फुल्यांच्या मते सरकारी खात्यात ब्राम्हण कामगार असल्याने ते शेतक-यांना फार नाडत होते. फुल्यांच्या या निरिक्षणाची आज अवस्था काय आहे. आज सरकारात बहुजन समाजातील लोकांची बहुसंख्या आहे. तथापि , गोरगरिबांना नाडण्याचे त्यांनी थांबविले आहे काय ? सरकारात ब्राम्हण कामगाराचे वर्चस्व आणि ब्राम्हणांनी त्यांना नाडण्याचा काहीही कार्यकारण संबंध नाही. मुळात जातीने वरिष्ठ व कनिष्ठ वर्ग अशी समाजाची विभागणी करणेच चूक असते. सत्तेने वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्ग अशी समाजाची विभागणी त्या मानाने अधिक बरोबर ठरू शकते. कामगारांचे हितकर्ते खुद्द मार्क्स व एंगल्स यांच्याही तत्वज्ञानाच्या बाबतीत शेवटी जगभर हाच अनुभव आलेला आहे. मार्क्सची अपेक्षा होती की कामगार शतकानुशतके विशिष्ट वर्गाकडून नाडला गेलेला आहे , जेव्हा त्याच्या हाती सत्ता येईल किंवा तो वरचढ ठरेल तेव्हा तो सतत कामगार वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या योजना आखील. परंतु तसे कुठेही घडले नाही. उलट असे दिसून आले की , कामगार फक्त आपल्याला आर्थिक व इतर फायदे जास्तीत जास्त कसे मिळतील त्याच्याकडे लक्ष पुरवतो.

साधी आपल्याकडच्या कामगारांचीच गोष्ट घ्या. आपल्याकडचा कामगार ज्या क्षेत्रात- उदा. कापड-गिरण्या वा तेलधंदा इ.- तो असतो तिथले फायदे फक्त त्याला मिळावेत म्हणून धडपडत आहे. किंबहुना त्या त्या क्षेत्रात जर का नोकरीच्या जागा उत्पन्न झाल्या तर त्याही आपल्याच पुत्रपौत्रांना मिळाव्यात म्हणून व्यवस्थापनावर सर्व प्रकारचे दडपण आणतानाही दिसतो. या वस्तुस्थितावरून आपण फार तर एवढेच म्हणू शकतो की , माणसे त्यांना मिळालेल्या सत्तेचा उपयोग स्वत : चा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी करतात. मग ती माणसे ब्राम्हण असोत वा ब्राम्हणेत्तर. त्यांच्या जातीचा , वर्गाचा वा धर्माचा परिणाम वस्तुस्थितीवर होत नाही. कामगारांच्या जातीचे लोक सरकारी कचेरीत आले की , ते आपल्या जातीला नाडणार नाहीत , हा फुल्यांचा अंदाज अशा प्रकारे चुकला आहे.

स्त्रियांचा प्रश्न

त्यांचा दुसरा अंदाज असा की , स्त्रियांना शिक्षण मिळाले की त्या स्वतंत्र होतील हा होय. आज स्त्रिया पूर्वीच्या मानाने ब-यापैकी शिकताहेत व शिकल्या आहेत. पण त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार पूर्वीच्या मानाने वाढले आहेत. म्हणजे येथेही फुल्यांचे विश्लेषण न निदान कुठेतरी चुकले होते.

शिक्षण : तिसरा अंदाज

त्यांचा तिसरा अंदाज शिक्षणाने प्रजा शहाणी व समजूतदार होईल. आज शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. पण प्रजा शहाणी झाल्याचे दिसत नाही. असो. तर सांगायची गोष्ट ही की , मार्क्स , एंगल्स , फुल्यांसारख्याचीही सामाजिक विश्लेषणात गफलत होऊ शकते आणि ती समजावून घेणे आपल्या हिताचे असते. किंबहुना ही मंडळी जर हयात असती तर त्यांनी स्वत : च्या विचारातल्या गफलती कबूल केल्या आहेत. इतके ते सत्यनिष्ठ होते.

पुनर्विचार आवश्यक

आणखीसुद्धा एका कारणासाठी फुल्यांसारख्यांच्या प्रतिपादनांचा पुनर्विचार करणे आज आवश्यक आहे. आमची लोकशाही ही गर्दीने (ऊर्फ झुंडीने) घडवायची लोकशाही आहे. गर्दी ठरवील त्याच्या हाती राज्यकारभाराच्या नाड्या जातात. अशा वेळी जो कुणी या गर्दीला आपल्या बाजूला वळविण्यात यशस्वी होतो तो सत्तास्थान पटकावतो. गर्दी नेहमी घोषणांना वश होत असते. आकर्षक , नेत्रदीपक घोषणांना वश होत असते ; आणि लोकप्रिय थोरांची नावे ही आजकाल घोषणांगत वापरली जाताहेत , नव्हे , या मोठ्या नावांचा एक प्रकारे बाजारच मांडला जातो आहे. कुणी घोषणा देतो ‘ श्री प्रभूरामचंद्र की जय ’ . लगेच लाखोंच्या संख्येने लोक त्या घोषणा देणा-याच्या मागे जातात. दुसरा कुणी म्हणतो. ‘ श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ’ किंवा ‘ महात्मा फुले की जय ’ लोक तिथेही गर्दी करतात. तथापि , एखाद्या नावाची घोषणा म्हणजे त्याचे ते नाव असते , त्याचे ते तत्वज्ञान नसते. घोषणा देणारे स्वत : च्या स्वार्थासाठी ती मोठी नावे वापरीत असतात. त्यांचा बाजार भरीत असतात. अशा वेळी घोषणेसाठी ज्यांची नावे घेतली जातात , त्यांनी मुळात काय सांगितले आहे , त्यात काय तथ्य आहे इ. सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो.

फुले महात्माच

वरील विवेचनावरून कुणी असा ग्रह करून घेऊ नये की , मी महात्मा फुल्यांना कमी लेखते आहे ; किंवा कुणी असेही समजू नये की , मी जुन्या जमान्याचा , जुन्या वैचारिक मूल्यांचा व समाजपद्धतीचा पुरस्कार करते आहे. तसे अजिबात नाही. महात्मा फुले हे खरोखरच महात्मा होते. कामगारांची दयनीय स्थिती पाहून त्या स्थितीचे विश्लेषण करणारे , ‘ द कंडिशन ऑफ द वर्किंग क्लास इन इंग्लंड ’ हे पुस्तक एंगल्सने सन १८४४ मध्ये लिहिले. महात्मा फुल्यांनी येथल्या शेतक-याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान ‘ शेतक-याचा आसूड ’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतक-यांच्या हाल अपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये , यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी स्त्रियांसाठी , अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. आणि इतरही अनेक परोपकाराची नि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘ शेतक-याचा आसूड ’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.

सौजन्य : लेखसंग्रह…

  •