Category Archives: Poetry

लेखक असावेत असे ! माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे

 •  

गिरीश कर्नाड हे प्रथमतः मी ‘निशांत’ या चित्रपटात पाहिले होते.
सहज अभिनय आणि संवादफेक यातून हे गारुड निर्माण झाले ते कायम राहिले.
यांचे अभ्यासक्रमात लावलेले ‘हयवदन’ हे नाटक शिकवले.
‘मंथन’ या चित्रपटातून एक वेगळीच भूमिका त्यांनी साकारली होती.

त्यांचे आत्मचरित्र ‘खेळताखेळता आयुष्य’ हे काळजीपूर्वक वाचून काढले.

शाम बेनेगल, शबाना आझमी, नासिरुद्दीन शहा, ओम पुरी, स्मिता पाटील, मोहन आगासे हे त्या काळातले एक विलक्षण असे रसायन होते. समांतर सिनेमाने त्या काळात (१९८०’s) एक सांस्कृतिक क्रांतीच केली होती. अभिजन वर्गात एक सळसळ निर्माण केली होती.

नंतर हे कलाकार आपापल्या दिशेने काम करत राहिले. पण कर्नाड यांनी आपली वैचारिक बांधिलकी आणि त्यानुसार नाटक, सिनेमा आणि साहित्य या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान यात विसंगती नाही.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशात फोफावत चाललेल्या फासीवादाने ते त्रस्त झाले होते.
मनोहर ओक म्हणतात तसे:

लेखक कसे सापासारखे असतात
माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे

प्रागतिक चळवळीत व एकूणच मानवतावादाच्या बाजूने काम करणारे लेखक, कवी, कलाकार चित्रपट निर्माते, पत्रकार, राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे युवा कार्यकर्ते, वकील या सर्वांना “अब॔न नक्सल” नावाचे लेबल लावून त्यांना अटक करणे, त्यांच्यावर नाही नाही त्या केसीस घालून अडकवने हे सुरू झाले.

‘गुजरात फाईल्स’ या पुस्तकात तर अशा अनेक भयानक केसीसच्या व्यथा मांडल्या गेल्या आहेत.

गौरी लंकेश यांच्या पहिल्या स्मृतीदिनी

बंगलोर येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा कर्नाड यांची प्रकृती बरी नव्हती, तरीही ते या कार्यक्रमाला हजर होते. नाकातोंडातून त्यांच्या tubes होत्या; ते सरळ hospital मधूनच आले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या गळ्याभोवती एक विस्तव अडकवला होता आणि त्यावर लिहिले होते, “Yes I’m Urban Naxsal”

आज कर्नाड आपल्यात राहिले नाहीत पण हा विस्तव त्यांनी आपणांस दिलेला आहे.

आजचे सांस्कृतिक वातावरण अत्यंत भयाण आहे. आज पुर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. या तंत्रयुगात युवा पिढीला योग्य दिशा देणे आणि लोकशाही वाचवणे आवश्यक आहे. लोकशाही समाजवादासमोर म्हणून अनेक आव्हाने आहेत.
या कोंडलेपणाला वाट करुन द्यावे लागणार आहे. निराश होऊन चालणार नाही.
या लाटा आहेत सुप्त युवकांच्या मनात, देहात, रंध्रारंध्रात…

कोंडलेल्या वादळाच्या ह्या पाहा अनिवार लाटा
माणसासाठी उद्याच्या येथूनी निघतील वाटा
पांगळ्याच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू
नांगरु स्वप्ने उद्याची गर्द ही फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे येथुनी उठतील नेते
(बाबा आमटे)

गिरीश कर्नाड यांना भावपुर्ण श्रद्धांजली

-दीपक बोरगावे

 •  

मार्क्स अजून जीवंत आहे… आनंद विंगकर यांची कविता

 •  

नुमान जसा अजरामर
वारे जसे अविनाशी अवकाशात
तसा मार्क्स जीवंत भूमीवर
खरेच ही सांगीवांगीची नाही वार्ता
परवाच म्हणे बेगुसराईतील बारा तासांच्या मोर्चात
एका सुखवस्तू तहाणलेल्या अभिनेत्रीला पाणी देतांना म्हणाला
घामाचा वास कोणत्याही उग्र सेंटपेक्षा धुंद करतो
निरखून पाहिल्यास लक्षात येईल उन्हात रापलेला मुखचंद्रमा अधिक आकर्षित असतो
मनमोकळं हसून म्हणाली ती
इंन्कलाब जिंदाबाद.

आशा जशी मरत नसते
मरत नसातात मानवी स्वप्नं
मार्क्स सांजेच्या सूर्यासारखा मजूरीहून घरी परतणाऱ्या
रुपेरी बटांना हळूवार वार्यांने कुरवाळीत राहतो
सांगतो कानांत दिस येतील दिस जातील
भोग सरलं सुख येईल
भविष्याची स्वप्नं साकारीत
मार्क्स पाटीवर दप्तर टाकून उशीरा घरी पोहचणार्या
पोरासारखा.

मार्क्स जीवंत आहे
बंगालमधील
तपाहून जास्त काळातील वनवासा सारखा
शतकांच्या अज्ञातवासातील
आदीवाश्यांसारखा
दिवसाला दगडं मारीत जगणाऱ्या
अथेंस शहरातील मध्यमवर्गींया सारखा
नुकत्याच बेकार झालेल्या हवाईसुंदरीच्या
गालावरील अश्रूंच्या थेंबांसारखा
पराभूत वालस्ट्रीटच्या चौकात
शेपूट जड झाल्या वानरासारखा
निचेष्ट कलेवारच तो
आजवर
ज्याची फरफट अवघ्या गावातून शहरातून
जंगलांतून गर्दीच्या रेल्वेतून
नद्यांतून
कुठेच त्याला कोणी उगवू नाही दिले
एकदाचा पराभूत
जगभरातील चॕनलवरुन उठवलेल्या वावड्या
तो क्षिणपणे म्हणाला
जमीनीला मुळं फुटलेलं तेवढं माझं केसाळ शेपूट उचला
मग आयागमणी होईन मी कायमचा.
मारुतासारखा
मार्क्स अजून जीवंतच आहे.
तुम्ही टाळा अथवा वाट पहा
एक ना एक दिवस भेटेल तुम्हाला
जिवलग दोस्ता सारखा.

आनंद विंगकर

 •  

मार्क्स जेव्हा भेटतो! : सुभाषचंद्र सोनार यांची कविता

 •  

मार्क्स कोणाला कोठे भेटेल
हे सांगता येत नाही.
नारायण सुर्वेंना तो मोर्च्यात भेटला
तसा तो कोठेही भेटू शकतो
पण ज्याला तो भेटतो
त्याला अंतर्बाह्य बदलवून टाकतो
गदगदा असं हलवतो की,
झाडावर जुनं पान
एकही शिल्लक ठेवत नाही.

तो भेटला की व्यवस्था कळते,
शोषण कळते,
वेदना कळते.
सर्व कळते.
कळत नाही असं
काहीच उरत नाही.
उरते फक्त तळमळ,
हळहळ आणि कळकळ.

सर्वात महत्वाचं म्हणजे
माणसाला माणूस कळतो.
माणसाला माणूस भेटतो
माणसाच्या आतला आणि बाहेरचा
मार्क्स माणसाची
माणसाशी गाठ घालून देतो.
मग ती गाठ सुटता सुटत नाही
कारण माणसाच्या समस्या
त्यांची कारणे
त्यावरचे उपाय
आणि त्यासाठीची साधने
यांची तो सांगड घालून देतो

माणूस माणसाला
माणसाच्या डोळयांनी बघू लागतो.
मग त्याच्या लक्षात येतं
डोळे आकाशाकडे नव्हे,
जमीनीकडे पहाण्यासाठी आहेत.
माणसाच्या सर्व समस्यांवर उपाय
वर आकाशात नाहीत
खाली जमीनीवरच आहेत
कारण मानवी समस्यांची मुळं
वर आकाशात नाहीत
खोल जमीनीत आहेत

सुभाषचंद्र सोनार.

 •  

तयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले

 •  

सावित्रीबाई फुले. जन्म – ३ जानेवारी १८३१. (मृत्यू १० मार्च १८९७)
सावित्रीबाईंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांची एक कविता-

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार काही
तयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाही
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सद्गुण नाही
तयास मानव म्हणावे का? 

ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का? 

पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?

 •  

|| सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना : पाश || – डॉ. दीपक बोरगावे

 •  
‘पाश’ ची कविता बंडखोर, आक्रमक आणि चढा आवाज लावणारी कविता आहे. तिला शोषणकर्त्यांचा संताप आणि चीड आहे. ती आक्रमण करायला अजिबात घाबरत नाही.

‘पाश'(१९५०-१९८८) यांचे नाव अवतारसिंह संधू, जालंधर, (पंजाब) जिल्ह्यातल्या नकोदर या तालुक्यातल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म. ते साम्यवादी विचारांचे होते. त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असताना, म्हणजे साधारणपणे १९६५ ते १९८८ पर्यत ते निम्मा काळ तुरूंगातच होते. लोहकथा (१९७०), उड्डदे बाजाॅ मगर (१९७४), बिच का रास्ता नहीं होता (हिंदी अनु. प्रा. चमनलाल, १९७५), साडे संमियां विच (१९७८), सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना (हिंदी अनु. निलिमा शर्मा, १९८९), याशिवाय, ‘बेदखली के लिये विनयपत्र’ आणि ‘धर्मदिक्षा के लिये विनयपत्र’ (१९८४) या दोन दीर्घ कवितांमुळे ते खलिस्थानवाद्यांच्या हिटलिस्टवर आले आणि २३ मार्च १९८८ रोजी आपल्या गावी विहिरीवर आंघोळ करताना खलिस्थानी अतिरेक्यानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. वयाच्या केवळ ३७साव्या वर्षी चळवळ, गरीब आणि शोषितांच्या बाजूने लढणे आणि कविता यांची किंमत भारताच्या या महान भूमीपुत्राने चुकती केली. पाश हे अल्पशिक्षित होते; शिक्षकी पेशा पत्करायचा म्हणून त्यांनी डिप्लोमा ही पदवी प्राप्त केली होती. पण पाश यांचे वाचन आणि व्यासंग अफाट होते . त्यांचे पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. ते काही काळ आपली पत्नी आणि मुलीबरोबर अमेरिकेतही (१९८६-८७) होते.

प्रा. चमनलाल यांनी प्रथमत: ‘पाश’च्या कविता हिंदीत आणल्या, त्यामुळे त्या अनेक भारतीय भाषांतून अनुवादित झाल्या. चमनलाल यांच्याबरोबर इतरही अनुवादकांनी या कविता अनुवादित केल्या आहेत. निरंजन उजगरे यांनी ‘पाश’च्या निवडक कविता मराठीत अनुवादित केलेल्या आहेत (लोकवाङमयगृह, २०११), पण यातून ‘पाश’च्या कवितांचा समग्र असा वेध येत नाही. ही उणीव श्रीधर चैतन्य यांनी भरुन काढली आहे. त्यांनी ‘पाश’च्या हिंदीतून मराठीत अशा शंभरएक कवितांचा अनुवाद केला आहे. यात, पंजाबसंदर्भातल्या कविता, पत्रिकांमधून आणि इतरत्र सापडलेल्या कविता, लोहकथा, उड्डदे बाजाॅं मगर, आणि साडे समियां विच अशा अनेक स्त्रोतातून निवडलेल्या कविता (“पाशच्या कविता”, हरिती प्रकाशन, २०१७) या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत.


‘पाश’ च्या कविता
अनुवाद – श्रीधर चैतन्य
हरिती प्रकाशन, पुणे २०१७

आज पाश हा हिंदी पट्ट्यातला महत्त्वाचा कवी मानला जातो. त्याने आपल्या मातृभाषेत, म्हणजे पंजाबीत कविता लिहिल्या. १९८०-९०च्या दशकांत पाश हा तरुण वर्गाचा प्रेरणास्त्रोत होता. तरुणांमध्ये, ‘पाश’ च्या कविता या काळात खूप लोकप्रिय होत्या. मुक्तिबोध, धुमिल, नागार्जुन यांच्या कवितांवर पोसलेल्या ह्या पिढीने ‘पाश’ ला त्या काळात अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही परंपरा ‘पाश’ ने विस्तारित केली हे निःसंशयपणे मान्य करावे लागेल. आपल्या देशात शोषितांच्या साहित्य-कवितेचा, कलेचा उजव्या शक्तीनी नेहमीच सामना केला आहे. करुणा, सुधारणा, साहाय्याकाची भूमिका घेत त्यांनी महाराष्ट्रातील दलित साहित्याचा विद्रोह चालाखीने बोथट केला. हे कॉंग्रेसच्या काळात घडले, आता तर ते खूपच विपरीत पध्दतीने सुरू आहे. प्रत्यक्ष रणांगणातील राजकारणातसुध्दा (Real Politics) ही भूमिका घेऊन आजच्या उजव्या शक्तीनी अनेक प्रागतिक शक्ती फोडून काढल्या आहेत. अलिकडचा तर एक अफाट विनोद म्हणजे, सोशल मेडियावर नेहरु हे संघाचे समर्थक होते, अशी पोष्ट व्हायरल झाली होती. राष्ट्र सेवा दलातील नेहरूंची एक प्रतिमा संघाच्या शाखेत घुसवून हास्यास्पद असे उद्योग काही भाडेकरू ट्रोल्सकडून करवून घेतले होते. ही गोष्ट भयंकर आहे की, भगतसिंग यांनाही संघाने पचवले आहे. (अॅन्टोनिओ ग्राम्शी यांच्या शब्दांत याला “सांस्कृतिक राजकारण” असे म्हणता येईल) पण, या शक्तींना ‘पाश’ पचवने कठीणच नव्हे, तर अशक्य आहे. ‘पाश’ ची कविता ही केवळ धार्मिक दहशतवादाविरुद्ध बंड पुकारणारी नाही तर ती व्यवस्थेची भ्रष्ट नैतिकताही उघडी करणारी आहे. या ओळी पाहा :

मी,
त्यांच्या विरोधात विचार केलाय,
त्यांच्या विरोधात लिहित आलोय जन्मभर
जर,
त्यांच्या दु:खात देश सामील असेल,
तर,
या देशातून माझे नाव आधी कमी करा
……
यांचं जे काही नाव आहे
या गुंडांच्या साम्राज्याचं
मी थुंकतोय त्यांच्या नागरिकत्वावर
….
जर त्यांचा स्वत:चा
कुठला खानदानी भारत असेल
तर माझं नाव त्यातून वजा करा.
(पृ. १८-१८)

‘पाश’ ची खलीस्तानी दहशतवाद्यांनी हत्या केली. त्याला आपली हत्या होईल याचा अंदाज आला होता, कारण पाश जे काही कवितांच्या आणि चळवळीच्या माध्यमातून करत होता ते खरोखरच खतरनाक होते, यांची त्याला जाणीव होती; हे व्यवस्थेविरुध्दचे बंड होते.

‘पाश’ ची कविता ही ‘ स्व’ ची कविता नाही, ती ‘इतरत्वाची’ (otherness) कविता आहे, समष्टीची कविता आहे. ती कष्टकऱ्यांची, श्रमिकांची कविता आहे :

मी सलाम करतो
माणसाच्या कष्ट करत राहण्याला
….
या संपणाऱ्या दिवसांचं
माझं हे मातीमोल रक्त
नंतर कधीतरी
जीवनदायी मातीतून, जमिनीतून उचलून
कपाळाला लावलं जाईल.
(पृ. ३०)

‘पाश’ च्या कवितेत सामान्य लोक येतात; शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, कष्टकरी, मेंढपाळ, शिपाई, कर्ज वसूल करणारा बॅंकेचा कर्मचारी, अधिकारी, हे सारे येतात. भांडवली आणि साम्राज्यवादी व्यवस्था ही सामान्य माणसाचे शोषण करण्यासाठी जन्मत असते. तिचा पाया हा शोषणावर उभा असतो. पोलिस यंत्रणा, न्याय व्यवस्था ही साम्राज्याचे संरक्षण करत असते, तरीही सामान्य कष्टकरी या बलाढ्य शक्तीला कधीच घाबरत नसतो, कारण हरवण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते. म्हणून इतिहास आणि काळ हा ‘जगणाऱ्या माणसा’ बरोबर असतो हा आशावाद पुढील ओळींतून व्यक्त झाला आहे :

तू साम्राज्याला का घाबरत नाहीस,
जगणाऱ्या माणसा ?
त्यांनी पोलिस आणि वकिलांवर बराच खर्च केलाय
पण
तरीही प्रत्येक वेळी
हा काळ
तुझ्या बाजूनंच का साथ देतोय ?
(पृ. ३९)

‘पाश’ च्या प्रतिमा ह्या निसर्ग, जंगल, आणि श्रमाशी सहसंबंध सांगणाऱ्या आहेत. ‘पाश’ ला सौंदर्य हे ‘मक्याच्या भाकरीची लज्जत’ वाटते; ‘मी’ ची ओळख ही विविध पध्दतीने होते- ‘मी’ चा प्रवास ‘ शेतकऱ्याच्या साधू बनण्याआधीचा आहे’ ; ‘मी” हा ‘म्हाताऱ्या चांभाराच्या डोळ्यातला कमी होत जाणारा उजेड आहे’; ‘मी” हा ‘काळ्या देहावरच्या चौथ्या शतकातला एक डाग आहे’ (पृ. ५९). ह्या प्रतिमा श्रम, शोषण, दु:ख, इतिहास यांना खोदत जातात. ‘ऊसावरचे तुरे’ शत्रूवर नजर ठेवतात आणि ‘गव्हाच्या लोंब्या’ आपल्याला ‘झाकून ठेवतात’ (पृ.६३-६४) – म्हणून कवी त्यांचे आभार मानतो. एक क्रांतीकारक भूमिगताला निसर्ग हा पाशला असा भावतो.

भय, शांतता आणि युद्ध याबद्द्लची विधाने (पृ. ७६-८०) ही संवेदनशील मनाला ढवळून काढणारी आहेत:

भय- कधी आमच्या माथ्यावर पगडीसारखं संजलं गेलं; कधी आमच्या हातावर वेठबिगारासारखं उगवून आलं. शांतता – गुडघ्यात डोकं खुपसून आयुष्याची स्वप्नं पाहण्याचा प्रयत्न करते; शांतता म्हणजे शेतात जळणारी उभी पिकं बॅंकांच्या फायलीत बंदिस्त झालेली; शांतता – रवंथ करत असलेल्या विद्वानांच्या तोंडातून गळत असलेली लाळ आहे; शांतता म्हणजे- गांधींचा लंगोट आहे / ज्याचे धागे या एकशेवीस कोटी जनतेला /फाशी द्यायला पुरेशे आहेत

‘पाश’ ची कविता बंडखोर, आक्रमक आणि चढा आवाज लावणारी कविता आहे. तिला शोषणकर्त्यांचा संताप आणि चीड आहे. ती आक्रमण करायला अजिबात घाबरत नाही.

कुठल्याशा आकाशात
खोदलीय दरी एक भयानक अंधारी.
प्रत्येक पाऊल आमचं
घसरुन पडतंय त्या दरीत
आणि
आम्ही
रक्ताळलेल्या दिवसांचे तुकडे घेऊन
चालत राहिलोय…
(पृ. ३७)

किंवा

विषारी मधाच्या माशीकडे बोट दाखवू नका,
तुम्ही ज्याला पोवळं समजतात
तिथे
जनतेचे प्रतिनिधी बसतात !
(पृ. ३३)

दहशतीच्या उन्हात उमटणारी एखादी हताश भावनाही ‘पाश’च्या कवितेत व्यक्त होते.
त्यांच्या डोळ्यातलं काजळ/ आमच्या आसवांसाठी कफ्यू॔ बनून राहिलंय ( पृ.८२)

भविष्यातील मानवी संहाराचा आणि सांस्कृतिक अवनती यांचा नेमका वेध ‘तिसरं महायुद्ध’ या कवितेत दिसतो ( पृ.८३-८४)

तिसरं युद्ध-
सदऱ्यावर पडलेले / कधीच धुता न येणारे डाग लढतील
तिसरं युद्ध-
या धरतीला कैद करु पाहणाऱ्या/ चावीच्या जुडग्याविरुध्द लढलं जाईल
तिसरं युद्ध-
कधीच न उघडणाऱ्या मुठीविरुध्द लढलं जाईल
तिसरं युद्ध-
कुठल्याशा फाटक्या खिशात चुरगाळलेल्या / एका दुनियेसाठी
लढलं जाईल

आज फाशीवाद (Facism) हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसतो आहे. भय, दहशत, उद्या काय होईल याचा भरवसा नाही, जीव मुठीत घेऊन जगणारी हताश जनता- या अशा भयंकर सांस्कृतिक कलहाच्या वातावरणात आपण सारे जगत असताना ‘पाश’ च्या कवितेचा अन्वय अधिक महत्त्वाचा होतो.
देशात घडत असलेल्या सांस्कृतिक राजकारणातल्या या अशा पाश्र्वभूमीवर ‘पाश’ ची बऱ्याच अंशी समग्र कविता मराठीत आली आहे; त्याबद्दल श्रीधर चैतन्य यांनी घेतलेल्या श्रमाचे निश्चितच कौतुक आहे.

आपण लढूयात मित्रा,
नांगर अजुनही रेघा ओढतो
कण्हणाऱ्या धरतीवर

आपण लढूयात तोपर्यंत
मेंढ्यांचं मूत पितोय
बिरु धनगर जोपर्यंत

आपण लढूयात
सरकारी आॅफिसातले कारकून
रक्ताची अक्षरे लिहिताहेत तोपर्यंत

आपण लढूयात मित्रा,
कारण लढल्याशिवाय काही मिळत नसतं.
आपण लढूयात,
कारण आपण अजून लढलो नाही,
आपण लढूयात,
लढताना मेलेल्यांच्या,
आठवणी जिवंत ठेवण्यासाठी
आपण लढूयात मित्रा.
(पृ. ११६-१७)
*

'पाश' च्या कविता 
अवतारसिंह संधू 'पाश'
हरिती प्रकाशन, पुणे २०१७
पृष्ठ: १९२


 •  

एका अव्यभिचारी काव्यनिष्ठेला ‘जनस्थान पुरस्कार’

 •  

गणेश कनाटे

‘ते’ गेली जवळजवळ सहा दशकं ‘लिहिताहेत’ आणि अजूनही खूप काही लिहायचं राहून गेलं आहे, असंच म्हणताहेत. कविता, दीर्घ कविता, कादंबरी, समीक्षा, नाटक, स्तंभलेखन, संपादन असं सगळ्या साहित्यप्रकारांत ते लिहितच आहेत. चित्रकलेतही मुशाफिरी सुरूच असते.

या मुशाफिरीत त्यांचं पहिलं प्रेम हे कविता होतं आणि तेच सहा दशकं टिकुनही राहिलं आहे.
त्यांची कविता ही साठच्या दशकात प्रकाशझोतात आलेल्या कवींच्या पिढीतली स्वतःसारखी एकुलती एक कविता आहे. ती सामाजिक आणि राजकीय वास्तवाला सरळ भिडते पण आपली काव्यात्म वृत्ती सोडत नाही. त्यांच्या कवितेला आधुनिकतेचे भान असतेच पण ती आपली ‘मिथकांतून’ अभिव्यक्त होण्याची अस्सल भारतीय परंपरा विसरत नाही. ती आपला आधुनिक आशय आपल्या अस्सल भारतीय चिन्हसंस्कृतीतून व्यक्त करत राहते.

त्यांची कविता विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपले ‘काव्यात्म कर्तव्य’ एका अव्यभिचारी निष्ठेने पार पाडत आहे.
ते स्वतः लिहितात पण सोबत अनेक लिहित्या हातांना प्रोत्साहन देत लिहितं करतात.
आणि हे करताना कुठे गर्व नाही, अहंकार नाही, अगदी मुलाच्या आणि नातवाच्या वयाच्या मंडळींना अहो-जाहो शिवाय बोलणार नाही. कुणी प्रेमाने बोलावलं तर त्यांना नाही म्हणायला जड जातं. कुणी प्रस्तावना, ब्लर्ब लिहून द्या, अशी विनंती केली की नाही म्हणवत नाही, असा त्यांचा स्वभाव.
“थोडंफार गुणवत्तेत कमीजास्त असलं तरी लिहित्या हाताला प्रोत्साहन दिलेच पाहिजे,” ही भूमिका अनेकांना पटत नाही पण त्याबद्दल ते ठाम असतात.
हे प्रोत्साहन द्यायला ते महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरत असतात. त्यांनी अशी तब्येतीची हेळसांड करणे त्यांच्या पत्नीस कधीकधी पटत नाही; जवळची काही मंडळी त्यांना ‘जरा फिरणे कमी करा’, असा सल्ला देतात पण हे सगळे ‘आक्रमण’ ते ‘बरं, बघू. निश्चित विचार करू,’ असं म्हणून परतवून लावतात आणि पुढच्या प्रवासाची आखणी करायला लागतात!

मान, सन्मान, पुरस्कार किती तरी मिळाले पण त्याचा काहीही गर्व नाही. पण म्हणून पुरस्कार मिळायचे थोडीच थांबतात. ज्यांची पहिली ओळख ‘कवी’ हीच आहे त्या आदरणीय वसंत आबाजी डहाके यांना आज कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा ‘जनस्थान पुरस्कार’ घोषित झाला!
त्यांचे अभिनंदन करायची आमची पात्रता नाही म्हणून त्यांच्या तमाम मराठी कवी मुलांच्यावतीने आम्ही त्यांना नमस्कार करतो आणि त्यांचा आशीर्वाद असाच मिळत राहो, ही मनःपूर्वक प्रार्थना करतो.

 •  

पाशच्या कविता -अवतारसिंग ‘पाश’

 •  

अनुवाद: श्रीधर चैतन्य 

हरिती प्रकाशन

पुस्तकाच्या खरेदीसाठी  ; https://amzn.to/2SQXtbj

 

pash

 •  

लग्नाला चला हो लग्नाला चला

 •  

लग्नाला चला हो लग्नाला चला…
भांडवलशाहीच्या शोभेला चला

चार जमल्या शाह्या-फाया
मधी बसली लोकशाई
तिला मरायची घाई

सचिन भाऊ चला, बछन भाऊ चला
निक-प्रियंका तुम्ही म्होर म्होर ऱ्हावा
ऐश्वर्याबाय चला, आराध्याला धरा
सलमान, मुसलमान सारे खान मरा
घरचे कार्य समजून जोसात नाचा
बिदागीचे पाकीट कमरेला खोचा
सेलिब्रिटी सगळे झुल्यावर झुला
लग्नाला चला

दहा कोटी डॉलरचा होतो आहे चुथडा
बाभळीला कोण इथे लटकतोय उघडा
एसटीच्या पासापायी लेक कुणाची मरते
हुंडा नाही म्हणून कोणी विहीरीत बुडते
कोटीच्या गाड्यातून वऱ्हाड इथे फिरते
अँटिलिना उजळे मुंबई अंधारात डुबते
कमळाबाईचा डान्सबार बघायला चला
लग्नाला चला

लिपस्टिकचे होट पा चॉपस्टिकचे मेन्यू पा
सोने-हिरे-रग्गड पा ब्रॅण्डबाजी उंची पा
क्लिंटन-फ्लिन्टन पा झाडून सारे नेते पा
कुबेराची ऐट पा नव्या लंकेची वीट पा
विवाह पंचमी पा सुमुहूर्ताचा टायमिंग पा
राजेशाही गेली नि लोकशाही आली
तिच्या पोटामधून जन्मा पैसाशाही आली
कुठे पेरू नेरू कुठे अंबानीचा इमला
कसा पेटंल सांगा गरिबाचा चुल्हा
म्हणे लग्नाला चला

शेठ बघा साहू बघा मोठाले बँकर बघा
जगातून पैसा लुटणारे महाचोर बघा
ऑईल मनी गोल्ड मनी बिटकॉईन बघा
घरचे घेऊन पनामा पेपर देणारे बघा
गोऱ्यामोऱ्या कातडीचे सावकार बघा
यहुद्याच्या अवलादीचे व्याजभाडे बघा
उदारीकरणाने मारला बघा डल्ला
म्हणे लग्नाला चला

तेलघाल्या रिफायनरीचा डॉन हा झाला
कालचा चायवाला बघा खुर्चीमधी गेला
तडीपार देशाचा खुनी वाली झाला
बुटक्यांचा देशामधी झामझोल आला
साबरमती म्हातारा झुरूझुरू मेला
नथुरामी सुऱ्यांचा इथे बाजार खुला
गरिबाला मरण्याचा सारे देती सल्ला
म्हणे लग्नाला चला

लग्नाला चला हो लग्नाला चला
ठोकशाही, भांडवलशाही बघायला चला
गुडमॉर्निंग म्हणून घालतात गोळी
अशी बघा आली सनातनी टोळी
साऱ्याचीच युती इथे खुल्लमखुल्ला
म्हणे लग्नाला चला…

-संतोष पद्माकर

 •  

आता त्याचे लोक संविधान जाळताहेत रस्त्यावर !

 •  

कविता

आता त्याचे लोक संविधान जाळताहेत रस्त्यावर

नित्यानंद गायेन

सगळ्या जमातवादी संघटना
सत्तेने सन्मानित केल्या सारख्या आहेत
आणि सत्तेचे पूर्ण नियंत्रण आहे यांच्याच हातात

म्हणून हत्या
दंगली आणि शिव्या शाप करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे या गुंडाना
स्वतः निजाम करतो आहे फॉलो या गुंडाना सोशल मीडिया वर
आणि त्यांचे वजीर उभे असतात खुन्यांच्या स्वागताला हातात पुष्पहार घेऊन

द्वेषाचे विष पसरवून संपूर्ण देशात
निवडणूकीचे भाषण सूरु असताना थांबतो तो अजाण चे स्वर ऐकून
त्याने तो इस्लामचा आणि समाजाचा सन्मान करतो यासाठी नसतं केलेलं
दंग्यात मेलेल्या अन्य मजहब च्या लोकांना तो ‘पिल्ला’ म्हणून संबोधित करतो
सत्ता मिळवून संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकवून केलेलं अभिवादन त्याच्या रडण्याचा असतो अभिनय .

आता त्याचे लोक संविधान जाळताहेत रस्त्यावर
तिरंगा घेऊन हातात न्यायालयाच्या बाहेर झाडताहेत गोळ्या
शेतकरी-कामगारांशी नाहीच काही यांचे देणेघेणे

यात काही नवे किंवा विशेष नाही
तो स्वतः सुद्धा करतो शस्त्रपूजन
आणि त्याचे लोक आहेत गांधींच्या हत्याऱ्या गोडसेचे उपासक
म्हणूनच की काय विदेशी नेत्यांच्या सोबत जात असतो फोटो काढण्यासाठी … गांधी आश्रमात !

ज्यांचे स्वातंत्र्याच्या च्या लढाईत नव्हते कसलेच योगदान
ते आज लोकांकडून देशभक्तीचे प्रमाणपत्र मागताहेत
हे लोक इतिहास बदलून त्यास आपल्या बाजूने करू पाहताहेत

याकाळात मला गाय,गोबर संस्कृतीच्या अनुयायांकडून कुठलीही अपेक्षा नाहीये
ते प्रत्येक खुनांनंतर जल्लोष करतात
आणि हत्येला म्हणतात वध

असत्य आणि चालबाजी यांची खरी ओळख आहे
मानव-मानवता यावर नाहीये त्यांना कसलाच विश्वास
हे ऑक्सीजन बंद करून पोरांना मारून टाकतात

आधी ते लाल रंगाला घाबरायचे
ऐकलं आहे की आजकाल ते काळ्या रंगाला घाबरतात ….

अनुवाद : दयानंद कनकदंडे

देशभक्ती नाऱ्यात असत नाही – नित्यानंद गायेन

आणखी काही कविता…अवतारसिंग’पाश’ ,डॉम मोरेस व दीपक बोरगावे

भाषा आणि संस्कृतीचे आदान प्रदान हे विषमता व सत्तावर्चस्वाच्या आधारे होता कामा नये – न्गुगी वा थियोन्गो

 •  

समतेचा जिंदाबाद बुलडोजर – सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत

 •  

रात्र कितीही असू दे वैऱ्याची घनघोर
मी शाबूत ठेवीन तू हातात दिलेला कंदील
वादळे कितीही येऊ दे अंताची अजस्त्र
मी पुसत राहील कंदीलाच्या काचेवरील काजळी
तू विणून दिलेल्या तात्विक रुमालाने
तू वापरलेल्या शाईचा वास आहे ज्याला
तेच रॉकेल टाकेल मी माझ्या कंदिलात

तू मास्तर झालास
अन् तुझ्या खडूने उजळवलेस आयुष्य
हजारो वर्षे धूळ साचलेल्या फळ्याचे

तू डॉक्टर झालास
अन् बंडखोरीचे इंजेक्शन शक्तिशाली
टोचलेस माझ्या सहिष्णू नसांनसांत

जुलूमाच्या मगरमिठीत सर्वंकष
जेव्हा जेव्हा आम्ही वेढल्या गेलो
तेव्हा तूच खरा सेनापती झालास
मानवमुक्तीच्या लढ्याचा

गेल्या शतकाने जेथे कूस बदलली
तेथेच बदलत गेले आपल्या दुष्मनाचे स्वरूप
त्याने अडॉप्ट केलेले नवे नवे डावपेच

आम्ही भुलणार नाही तरीही
हा चक्रव्यूह भेदण्याचा मार्ग
जो शिकवून ठेवलायस तू
माझ्या जन्मापूर्वीच

बाबा,
ज्यांनी तुझे तळे राखले
तेच पाणी चाखत राहीले
त्यांना कधी कळलाच नाही
पाण्याच्या चवदारपणाचा अर्थ

आता आम्ही बदलू तळ्याचे राखणदार
आणि अपॉईन्ट करण्याआधी मेडिकल करू
शोधू तुझे खरे अंश त्यांच्या रक्तात

निराशा, स्वार्थ अन् दुफळीच्या प्रतिरोधात
अमर राहोत तुझी संघर्षप्रवण जनुकं
अखंडित राहो माझ्यात निरंतर
तुझी प्रज्ञा, शील करूणेची भक्कम अनुवंशिकता
समतेच्या जिंदाबाद बुलडोजरने कोसळोत
शोषणकर्त्या जुन्या गढ्या अन् नवे टावर्स

 •  

|| अयोध्या : एक दिवस ||- डॉम मोरेस /अनु. दीपक बोरगावे

 •  

गावाच्या आतील भागात, वेळ ही नेहमी दुपारचीच वाटते.
देवळाभवती टाळांचा गजर सुरू असतो
जिथे एक सूज आलेला सूर्य पोसत असतो
माण्सांचा दुर्गंध आणि कृमी माशा भवताली.
यात्रेकरू तुडवत एकमेकांना, पहारा असलेल्या द्वारांकडे.
बाहेर, एका कपड्यात गुंडाळलेली, एक विधवा म्हातारी
मरत असते, एकटीच, कृमीकीटके तिचे डोळे खात असतात.

आम्ही एक गाईड भाड्याने घेतलेला असतो,
केवळ बारा वर्षाचा एक मुलगा.
हे नागमोडी रस्ते त्याच्यासाठी कलहांचे आणि युद्धग्रस्त असतात.
तो आम्हांला घेऊन जातो
विणत एकएक गल्ली, शिताफिने, काळजीपूर्वक,
लहान मुलासारखे नव्हे.
जेव्हा लहान मुले युध्दाच्या जगात अडकतात,
आताही, कातडीखाली, त्याला कवटी दिसते,
तो कधीतरी हसतो, कारण तुम्ही सुंदर असता.

घनगर्द अंधाराचा एक गडद तुकडा,
साठलेली घाण आणि दुर्गंध,
तुम्हाला लक्षात येतं आजुबाजुला पाहात असताना,
अल्लाहची झोपडी, आता ती नष्ट झालेली असते.
ते सारेच यात्रेकरू
कोल्ह्यासारखे विव्हळत राहातात

त्यांचे कपडे असतात भगवे
काही धोका होणार आहे असे सुचवणारे त्यांचे डोळे असतात,
आणि लगेचच ते धावा करणार असतात देवाचा
जवळच, पक्षाच्या ड्रोनजनी,
म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमावर मजा मारणारे,
नव्यानी बनवलेल्या, पवित्र विटा,
सजवलेल्या असतात शेल्फवर
मंदिर बनवण्यासाठी.

आम्ही त्या मरणाऱ्या स्त्रिला तिथेच सोडून देतो
आणि त्या मुलाला विचारतो,
तुला हे सारे कसे वाटते आहे,
ही कडवी माणसं प्रथमतःच या गावात आल्यापासून

आणि पांढऱ्या कबुतरांप्रमाणे
शांततेला टराटरा फाडायला लागल्यापासून ?
पण तुलसीराम काहीच बोलत नाही.
तो आम्हाला मुस्लिम राहातात तिथे घेऊन जातो
आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो
पण ते सारे पळून जातात.

संध्याकाळी, आम्ही पोचतो एका टोकाला जिथे हे गाव संपलेले असते.
तुझे नाव हे त्या वाहत्या नदीतून आलं आहे
हिरवीगार झाडं इथं फुलताहेत, हवा आल्हाददायक आहे,
तू चालतो आहेस कसातरी ओढत स्वत:ला
तुझ्या सोनेरी पायांने, या मधुर पाण्यातून,
कालच्या सूर्याने रंगविलेले पाणी उडवत,
पाण्याचे तरंग आणि शिडकावा पसरवत.

तुलसीराम खिदळतो, टाळ्या वाजवतो,
परत एकदा लहान मुलगा होतो,
आणि तुम्ही पश्चिमेकडे वळता
सूर्यप्रकाश तुम्हाला सोडून जात असतो.
हळूवारपणा आता वाहात राहातो माझ्यातून,
तो तुम्हाला चकीत करत राहातो.
तू पाहातो आहेस माझ्याकडे आणि हसतो आहेस.
हे क्षण आम्ही खरंच जगत असतो
ते पुढे पुढे सरकत राहातात,
आणि नंतर ते एक स्मृती होऊन गोठून जातात.

भाड्याच्या एका जीपमधून
आम्ही दुसऱ्या गावाकडे जातो.
वातानुकूलित खोल्या आणि चायनीज अन्न.
बाजारापासून दूर असलेल्या झोपडपट्टीत,
आम्ही हात जोडतो, आणि आम्ही आमच्या पोराचा, म्हणजे आमच्या गाईडचा निरोप घेतो,
आणि प्रार्थना करतो, तो जिवंत राहो म्हणून
कारण, देवाच्या घरट्यात असतात पोरं सुरक्षित अनेक म्हणून,
ज्यांना असतात नवे शब्द शोधायचे, मानवी प्रेमाचे.

———————————————————-

 •  

संविधानवाद !

 •  

कविता ….. 

                                                                    संविधानवाद ! 

 

डार्वीनचा उत्क्रांतीवाद
आईनस्टाईनचा सापेक्षतावाद असो की…
हाॅकीन्सचा विश्वनिर्मितीवाद…
बसतात झक मारत सगळे वाद..
हिंदुस्थानी पुराणवाद्यांच्या वितंडवादात !

मंदीर – मशिद, काश्मीर,खलिस्तान,बोडोवाद
कमी की काय…
जाती,धर्म,पंथ,वर्णवादाच्या बुरसट वादांना आजही कवटाळून बसलेलो आपण…
शून्याला आकार देत..सा-या विश्वसिद्धांतांना पूर्णत्व दिलेले आपण…
आज आपल्याच भारतवर्षाला जणू..
पुनश्च अधोगामी शून्याकडेच नेत असलेलो आत्ममग्न आपण…

आणि कालच म्हणे नविन वादात भर पाडलीय कुणी…
संविधान बदलासाठी आम्ही आलोय म्हणे !…
संविधान!…स्वातंत्र्य ,समता,बंधुता,माणवता,सहिष्णुतेच्या वैश्विक मूल्यांनी परिपूर्ण…
पवित्र  संविधान…
वादावादीच्या चिखलफेकीत
चिरफाड होत चाललेलं बाबांचं संविधान !
थोड्याच दिवसांत कदाचित ‘महामानवमुक्त’ केलं गेलेलं संविधान !

✍🏽 सुनील म्हात्रे (बोईसर) 

कविता …. 

कविता : जेव्हा माझीचं मुलं विचारतात मला माझी जात

कविता : आमच्या जगण्याची रीत ऐका – अवतारसिंह ‘पाश’

कविता : पुरूष म्हणून जगताना…

डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता

 •  

कविता : आमच्या जगण्याची रीत ऐका – अवतारसिंह ‘पाश’

 •  

आमच्या चुलींचं संगीत ऐका .

आम्हा पिडीतांच्या वेदनेच्या किंकाळ्या ऐका.

माझ्या बायकोची मागणी ऐका .

माझ्या मुलीचा प्रत्येक हट्ट ऐका.

माझ्या बिडीतलं विष मोजा.

माझ्या खोकण्याचा मृदंग ऐका.

माझ्या ठिगळ लावलेल्या

पायजम्याचे थंडगार सुस्कारे ऐका.

माझ्या पायातल्या जोड्यातून

माझ्या मनाचं दु:ख ऐका.

माझा निशब्द आवाज ऐका.

माझ्या बोलण्याची ढब ऐका.

माझ्या देहबोलीचा जरा अंदाज घ्या.

माझ्या संतापाचा जरा हिशोब ऐका.

माझ्या सज्जनपणाचं प्रेत पहा.

माझ्या जंगलीपणाची रागदारी ऐका.

 

आता

या निरक्षर बोटांनी लिहिलेलं एक गीत ऐका

तुम्ही चुकीचं ऐका किंवा बरोबर ऐका

आता आज आमच्याकडून

आमच्या जगण्याची रीत ऐका.

( अनुवाद- श्रीधर चैतन्य ) 

“पाशच्या कविता’ या अनुवादित काव्यसंग्रहातून ….. 

पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी..https://www.amazon.in/dp/8193321197

 

इथेही कविता आहेत.. 

कविता : पुरूष म्हणून जगताना…

कविता : कुणीतरी भेदायला हवेत हे गोल

कविता : वेदनेचे साहित्य – जितेंद्र अहिरे

 •  

कविता : पुरूष म्हणून जगताना…

 •  

पुरूष म्हणून जगताना…

मी शोधतोय तुला
ता उम्र माझी
माझ्याच स्वतःच्या शोधात

तुझे असणे
माझ्या पुर्णत्वाची साक्ष आहे
कसे कळेल तुला?

मी जन्मतःच अधूरा आहे
तुझ्यातूनच जन्मलो आहे
दिसतो जरी परिपूर्ण मी
तुझ्याविना अपुर्ण आहे.

तू प्रसवलेस मला
तू जोजवलेस मला
रक्ताने शिंपून प्राण
ममत्वे भरविलेस मला.

परिपक्व जरी जाहलो
वयानेही वाढलो
अदृश्य नात्यात तरी
तुझ्या सवेच गुंतलो.

मनास गुढ ओढ जरी
बेधुंद आज भान जरी
तरी मनात दाटतो
तुझ्याच साठी स्नेह उरी

□□

123

दत्ता चव्हाण
परभणी

आणखी काही कविता….   

कविता : नांगेली

स्वतंत्र स्त्री

कविता : वेदनेचे साहित्य – जितेंद्र अहिरे

कविता : हे रहस्यमयी ! -पवन पटेल

 

 •  

कविता : वेदनेचे साहित्य – जितेंद्र अहिरे

 •  

भव्यमहालातील रंगीबेरंगी जगणे
आमच्या कादंबरीत नाही
चकचकीत जग, हौस मजा
आमच्या कवितेत नाही
आहेत ते फक्त
वेदनेतून पाझरणारे शब्द

प्रेमाला कवटाळणारे दारिद्रय
भयमुख नजरा
जीर्ण चेहरा
थकलेले शरीर
पुसलेल्या हाताच्या रेषा

व्यवस्थेला सुरुंग लावणारे
शब्द असतात आमच्या
साहित्याचा अलंकार
यमक लय चौकट सौंदर्यशास्र
कुरूप असते आमच्या आयुष्यासारखे

सोपे काहीच नसते
आमचे लिहिणे आणि जगणेही ..

 •  

कविता : नांगेली

 •  

                 शबरीमला मंदिराच्या निमित्ताने केरळची चर्चा सुरु आहे. स्तन झाकण्याच्या अधिकारासाठी नांगेली या दलित महिलेने आपले स्तन कापून टाकले होते. नांगेली चे नाव केरळच्या बाहेर खूप लोकांनी ऐकलेले असेल. त्रावणकोर राज्यात जातीवादाची मुळे खोलवर रुजलेली होती. दलित महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. त्याकाळात नांगेलीने स्तन झाकून विद्रोह पुकारला. तसे करण्यास जेव्हा विरोध झाला तेव्हा तिने स्वतः च आपले स्तन कापून टाकले.

कवी,लेखक,अनुवादक डॉ. दीपक बोरगावे यांची कविता “असंतोषच्या” वाचकांसाठी …..

 

     नांगेली

वर्ष होतं 1803
पानथळीचा प्रदेश ; समुद्र किनाऱ्याजवळ
गाव होतं चेरथाल
राज्य केरळ

तिथं होती जळत
एक क्रांती…
तिचं नाव होतं नांगेली…
***
नांगेली, काय केलंस हे तू ?

स्तन कापलेस तू, तुझे ?
स्वत:च, स्वत:चे ?
फळ चिरावं तसं ?
आपल्याच खोपटयात !

नि काय केलंस स्तन कापून ?
तर केळीच्या पानात ठेवलंस त्यांना
जसं काही जेवायचं पान मांडावं !

रक्ताचे थेंब ठिबकायला लागले
काठांवरून पानांच्या

तरीही तू उभी राहून
चालत राहिलीस
चालत आलीस
बाहेर आलीस
तुझ्या खोपटातून

कशीबसी पोचलीस तू
कशीबसीच… माझी आर्इऽऽऽ
सैनिकांच्या सावल्यांपर्यंत

तुला तुझे स्तन अर्पण करायचे होते…
कुणासाठी ?
कशासाठी ?
कुणी सांगीतलं होतं तुला, असं करायला ?

कुणीच नाही ?
मग का केलंस हे तू नांगेली ?

थारोळा झाला रक्ताचा
जमीनीवर
कोसळ लीस जेव्हा त्या सावल्यांत
तुझ्या कापलेल्या स्तनांसह सैनिकांजवळ ..

तुझा नवरा, चिरूकंदन
तो होता बाहेर
कुठेतरी कामासाठी गेला असणार !

नि तू अशी विना स्तनाची
जमीनीवर आडवी
सैनिकांच्या पायाजवळ
डोळयांत उडाली धूळ तुझ्या
डोळे बंद झाले तुझे,
म्हणजे बंदच झाले कायमचे…
पण शेवटच्या श्वासांपर्यंत
वाट पहात…
इंतजार करत राहिलीस तू…
चिरूकंदनच नाव घेत राहिलीस
तुझ्या नवऱ्याच नाव
नि मग अखेर संपून गेलीस तू
तुझी भेट झालीच नाही
तुझ्या चिरूकंदनची
***

काय झाले होते नांगेलीला ?
आपले स्तन कापावे असे ?
वेडी होती का नांगेली ?
अशी अगोचर का वागली ती ?

तिच्या राज्यात स्तन-कर सुरू झाला होता
पुरूषांना मिश्यावरचा कर भरावा लागतच होता
पुरूषांना… त्यांच्यामिश्यावरील केसांवरचा कर !

हा आता नवा कर आला होता
स्तन – कर…
स्त्रियांसाठी…
स्तनावरचा कर
जगावेगळाच कर !
***
अहो…फासिस्ट राज्यात असेच घडते
हा कर नि तो कर
नि हजारोे कर

अगोचरी कर गोचर करत
व्यवस्था उभी होते फासिस्ट
किंवा अशीच उगवतात लाखो अगोचरी सैताने
या व्यवस्थेत…

त्यांना संपवायचेच असते सामान्यांना
किंवा त्यांचे इतके मामुलीकरण करायचे
की किडामुंगीसारखे निमूट फिरतील ते मग
त्यांच्या भवती दहशतीच्या सावलीत
म्हणून त्यांना संपवणारे हे असे कर…

कष्टकऱ्याना नागवणारे कर

राबनाऱ्याना नाडवणारे कर
नंदी-कर म्हणजे कुल्यांच्या केसांवरचे कर…
***
नांगेलीला हे कळाले तेव्हा
तिचे रक्तच उसळले
हे काय विक्षिप्त, विचित्र नि विपरित !
डोळयांत उतरले रक्त तिच्या
साफ दिला इन्कार तिने
हा कर भरायला

पण तरी काय ?
कर हा भरावाच लागतो
फासिस्ट राज्यात तर त्याला पर्यायच नसतो

माफी नसते, कर- माफीला !

सैनिक नांगेलीच्या स्तनांचे
मोजमाप घेण्यास
खोपटाबाहेर आलेसुध्दा
आता मात्र हदद् झाली…

नांगेलीने स्तन कर भरलाच नाही
मात्र, तिने स्तनच कापले आपले
केळीच्या पानात ठेवले
अर्पण करायला सैनिकांना
आणि, ह्या अघोरी व्यवस्थेला
***
काय करू शकत होती नांगेली ?
इतरांसारखे कर भरू शकत नव्हती नांगेली ?
काय करू शकत होती नांगेली ?
मान पाडून जगू शकत नव्हती नांगेली ?
काय करू शकत होती नांगेली ?
तिला काहीही करता आले असते
व्यवस्थेशी जुळवून घेता आले असते .
पण नाही,
आपले स्तन कापून
तिने घडवली एक क्रांती
व्यवस्थेसमोर उभी केली
एक लढार्इ…
व्यवस्थेलाच धक्का देणारी !

PicsArt_10-09-07.43.05.jpg

नांगेलीचे कल्पनाचित्र http://nangeli.com वरून साभार ……

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

आणखी काही कविता …..⇒ 

डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता

स्वतंत्र स्त्री

कविता : कुणीतरी भेदायला हवेत हे गोल

कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

तेव्हाही जात असतो एक बळी पुरुषसत्तेचा… – श्रद्धा देसाई

 

 •  

कविता : हे रहस्यमयी ! -पवन पटेल

 •  

अगं रहस्यमयी,
तुला मी भेटलो
आणि
हादरूनच गेलो अगदी मी
डोक्यापासून मनापर्यंत.

असो,
तू कुठे होतीस आतापर्यंत
एका तपापूर्वी
मी जी स्वप्ने पहिली होती
त्यामध्ये तू ……

मानवतेच्या शोधात
मी भटकत राहिलो
देश-परदेशात.
पण तुझ्याशिवाय
मला संपत्तीच्या
अधांतरी असलेल्या रस्त्यांनी व्यापलेले
लेचे-पेचे बाजारच मिळाले ……
चेहऱ्यांवर चेहरे …….

तुला भेटणे म्हणजे
अंतर्मनाला पाहणे.

तुला ठाऊक आहे ?
त्या स्वप्नांची राख
अजूनही धगधगते आहे.

बस,
आता एकदाच
तुला पहायचे आहे,
त्या न विझलेल्या राखेमध्ये
मी पेटवली आहे आग.

अगं रहस्यमयी,
कुणास ठाऊक कसा पण
मला माझा हरवलेला रस्ता
पुन्हा गवसू लागला आहे…..

मूळ हिंदी कवितेचा अनुवाद :- डॉ.प्रेरणा उबाळे

 •  

स्वतंत्र स्त्री

 •  

प्रज्ञा विद्रोही

स्वतंत्र अभिव्यक्तीची स्वतंत्र स्त्री
खरच स्वतंत्र आहे का?
सिद्धतेच्या शर्यतीला निघालेली ती
उंबरठ्यातच हरली का?

कारण तिला ठाऊकच नव्हतं ठिकाण शर्यतीचं,
उंबरठ्याच्या आतल्या तिच्या पूर्वपरीक्षेच..
मग सुरू झाली तिची लढाई,
व्यवस्थेविरुद्धची!

अस्तित्वाच्या सिद्धतेआधी अस्तित्व शोधण्याची!
ते संपवू पाहणाऱ्या हातांशी झगडण्याची,
विजू पाहणाऱ्या ज्योतीला वादळातही थोपवण्याची!

वादळापूर्वीची शांतता आता कलहच वाटू लागली,
तीसुद्धा आता वादळाच्या व्यवस्थापनाचे डाव मांडू लागली!
ढगांनी झाकोळलेल्या आकाशात
कसं शोधायचं स्वतःला?

घरात बेड्या न घराबाहेरचे दोर असताना त्यांच्या हाती!
आमच्या जगण्याचा खेळ असा चौकात मांडला,
अन फुकटात मजा घेणाऱ्यांचा डाव साधला!
भोगणार्यांची अन उपभोगणारांची गर्दी वाढतच राहिली,
शोषकांपासून.. शोषितांपर्यंतची!

अन्याय, अवहेलना, लाचारीचा आता कहर झाला,
अंधाराच्या मुक्ततेसाठी मला सूर्य हवा!
आवाहन माझे तुला शोषका,
‘स्त्रीत्वाच्या मुक्तीसाठी’
तूच तो ‘सूर्य’ अभिप्रेत मला,
तूच तो ‘सूर्य’ अभिप्रेत मला!

ही कविता वाचलीत का…?

तेव्हाही जात असतो एक बळी पुरूषसत्तेचा

आणि

देशभक्ती नाऱ्यात असत नाही -नित्यानंद गायेन

कुणीतरी भेदायला हवेत हे गोल- मोहिनी कारंडे

डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता

 •  

कविता : देशभक्ती नाऱ्यात असत नाही

 •  

नित्यानंद गायेन

माझ्या कवितेत

माझे मित्र तुला शोधतात

त्यांना माहीत नाहीये कदाचित

प्रेमिका कवितेत नव्हे तर

ह्रदयात असते

प्रेम,देशभक्ती ह्या भावना आहेत

ज्या नाऱ्यांनी नव्हेतर

डोळ्यांनी व्यक्त होतात नेहमी

डोळ्यांची भाषा सर्वांनाच कळत नसते .

(अनुवाद -दयानंद कनकदंडे)

 •  

डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता

 •  
 1. अस्मिता

त्याने दरवाजा उघडला.

बाहेर

अस्मितेचं एक झाड उभं होतं.

त्या पलिकडे होती

अनेक झुडपं वेली गवत
कचरा
आणि तत्सम असे बरेच काही…

वाराही होता
विरुद्ध दिशेने.

अस्मितेवर काय होणार परिणाम त्याचा ?

शून्य.

ती असते भिनलेली डोक्यात
मेंदूच्या उघडलेल्या कुपीत
बंद
आतल्या वाहिन्यांच्या रस्त्यांवर
असतं तिचं
तिथंच उठणं बसणं
खाणंपिणं आणि लोळणं.

जात वर्ग वरचढपणा
मुजोर कुंपणं चालढकलपणा.

वरचष्मा,
तुडव खाली तिला
कुळ इज्जत खानदान औकात
आॅनर बॅनर गनर
आणि सीनर.

हा प्रश्न
थोडा भावनेचा
थोडा अभिमानाचा
थोडा चिखलाचा
थोडा धुसमुसणाऱ्या मनातल्या खेळाचा
थोड्या चटणी मीठाचा

आणि मसाल्याचासुध्दा असतो
बऱ्याचदा.

गोडं तेलाची वरुन धार असणाऱ्या तेलाच्या भांड्याचाही
हा प्रश्न असू शकतो.

अस्मिता

ही शाळेत असल्यापासून
किंवा नसल्यापासून
बिंबते
किंवा बिंबवली जाते.

शरीराच्या हरएक भागात
मनामनाच्या सांदरीत लिंपून राहते.

दरवाजा उघडला काय
आणि
बंद ठेवला काय
तिला काही फरक पडत नसतो.

अस्मितेची झाकणं
लहानपणीच बंद करता यायला हवीत,
खेळ सुरू होण्याअगोदरच
असे ते म्हणत असतात अधेमधे.

पण हे कधी घडत नाही
आणि
घडणारही नसते

2.पाथरवट

आरशातल्या प्रतिमांवरुन
ते
बोलत असतात
नेहमी
रस्त्यावरच्या शेवटच्या माणसाबद्दल
आणि बापूंचे नाव घेऊन
तर जोर देऊन बोलत असतात ते.

दुपारचे झोंबणारे उन
किमान दोनवेळा तरी
रक्तपात घडवते
नाकाच्या सांदरीतून.

तो पाथरवटी तरुण
आणि तरुणीसुध्दा
दिवसाकाठी
पत्थर तोडताना
आपली दहाही बोटे
दहावेळा चेंबवून घेतात.

तुमचे
ते शुभ्र उत्थान तर्क
आणि
तुमचे
ते पाषाण अर्क
थोडे राहू द्या बाजूला.

आत्ताच त्यांनी तारुण्यात पाय ठेवला आहे.

मला हे पैले सांगा,
त्यांनी
आरशाबाहेरच्यांवर विश्वास ठेवायचा ?
का
तुमच्या आरशाच्या
आतील
प्रतिमांना
त्यांनी कवटाळायचे ?

•••

■ डॉ.दीपक बोरगावे हे कवी,लेखक,अनुवादक व समीक्षक आहेत आणि ‘असंतोष’ चे एक सल्लागार आहेत.

ही कविता वाचलीतं का ?

मार्क्स काय म्हणाला ? – डॉ.दीपक बोरगावे

 •  

कविता : कुणीतरी भेदायला हवेत हे गोल

 •  

मोहिनी कारंडे

सोम्या गोम्या हऱ्या नाऱ्या या सर्व आदिमानवांच्या मेंदूत
एकदा परिवर्तनाची खुमखुमी आली

त्यांनी मिळून कंपासच्या साहाय्याने

३६ अंशातला एक गोल काढला

ते विस्मय चकित आनंदाने एकाचवेळी हरखले.
त्यांनी गगनाकडे पाहत हात वर केले

३६० च्या अंशात आणखी मोठ्ठा गोल काढता येतो
त्यांना नव्हतं माहिती,
मग सुरू झाला खेळ गोलातला.
गोल खूपच भला थोरला मोठ्ठा असल्यानं
आणि सगळेच गोलाच्या आत असल्यानं
एकमेकांना भेटायचे

मग काय ..?
इव्हेंट, परिसंवाद, चर्चा झडू लागल्या
प्रबोधनाची ललकारी
आंदोलनाची आरोळी
सगळीच खेळीमेळी
सगळे खेळ गोलातलेच
गोलगोलराणी, इथं इथं पाणी
सगळे गोलरहिवासी सुखसमाधान मानणारे

पुढं त्यांच्या उपमूळांनाही तशाच फिलिंग आल्या

पुढे गोलांचे अनेक गोल होत गेले
हळूहळू शहरं व्यापत चाललेत गोल
कुणीतरी भेदायला हवेत हे गोल

 •  

मी, माय आणि बाप – चंद्रशेखर राजपूत

 •  

वावरात राबताना
दिसायची माय
शाळेच्या खिडकीतून…
शाळा माझी गावाच्या वेशीवर
आणि वावर वेशी पल्याड….

ते दृष्य कायमचं बसलंय
काळजाच्या खिडकीत…

अधुन मधून त्याची
होत राहते उघड छाफ
अन् शाळेत जातांना
पाठीवरचं ते ओझं;दप्तराचं
दप्तराचच की ज्ञानाचं…?
तेव्हा ते कळलच नाही
पण,त्याच शाळेच्या वाटेवर
बाप कळायचा; कित्यकदा
उभ्या जगाचं अख्खं पोट पाठीवर घेऊन..

तेंव्हा मि विद्यार्थी होतं
अन् बाप पोशिंदा;आता

ती खिडकीही गेली…
ती वाटही गेली…
ती शाळा ही गेली…
ती माय ही गेली…

राहिला फक्त बाप;
तोच बाप
सा-या जगाचं पोट पाठीवर घेवून
निरंतर चालनारा…
चालतच जाणारा…

क्षितिजा पल्याड…..!


चंद्रशेखर राजपूत 
9834465581 •  

मार्क्स काय म्हणाला ? – दीपक बोरगावे

 •  

मार्क्स काय म्हणाला ?

(कार्ल मार्क्स यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त)

 

एकदा कविता मार्क्सच्या अभ्यास खोलीत शिरली.

मार्क्स खोलीत एकटाच होता

तो होता लिहण्यात मग्न

त्याचं लक्षचं नव्हतं कवितेकडे.

 

आपला गळा खाकरत

तिने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला

पण काही उपयोग झाला नाही.

 

मनाचा हिय्या करून

शेवटी ती अक्षरशः ओरडीलच

कार्ल …..कार्ल …

 

मार्क्सने आपल्या जाड्या भिंगातून कवितेकडे पाहिले

त्याने विचारले, काय पाहिजे ?

 

काही नाही

सहजच आले होते,

मी कविता आहे.

 

असं म्हटल्यावर, मार्क्सने आपला पेन खाली ठेवला.

 

कुठून आलीस ? मार्क्सने विचारलं.

 

इंडियातून, कविता म्हणाली.

 

मार्क्स थोडा बावचळला;

इतक्या लांबून कशी काय ?

असं वाटलं असावं त्याला कदाचित.

 

काय काय लिहतेस ?

आय मीन, कसल्या कविता लिहतेस ?

 

कविता थोडी लाजलीच

मार्क्सने आपल्याला हा प्रश्न विचारावा म्हणजे…

 

आपल्या पापण्या मिटून ती म्हणाली,

काही नाही, असंच काहीतरी !

 

म्हणजे ?

 

अहो, गाणी, निसर्ग, श्रावणातला घन निळा वगैरे…

 

श्रावण म्हणजे काय ?

 

अहो, तो एक ऋतू आहे

आय मीन, निसर्गच म्हणा की !

 

निसर्ग ? ठीकच आहे मग.

 

माणसांबद्दल लिहते की नाही ?

शेताबद्दल, कारखान्याबद्दल ?

आणि स्वयंपाक घर ?

तिथे तर असशीलच तू रोज ?

 

चर्चमध्ये जातेस ?

धर्मगुरू, धर्मग्रंथ, शाळा, फळा, खडू

हे माहित असेलच ?

 

समाज व्यवस्था, धर्मव्यवस्था, उत्पादन व्यवस्था, उत्पादन साधनांची मालकी ?

 

म्हणजे, आपल्या जगण्याच्या भौतिकतेबद्दल म्हणतोय मी.

 

आपलं जगणं हे ह्या भौतिकतेमध्ये घडत असतं

काही समजते का ?

 

कवितेचा मख्ख चेहरा पाहून

मार्क्स म्हणाला,

दे सोडून, समजत नसेल तर !

 

हे सांगताना

तो हसला स्वतःशीच

गालातल्या गालात,

त्याच्या भारदार दाढीमुळे

ते कवितेला समजलं नसावं.

 

तो पुढे म्हणाला,

बरोबर आहे तुझं…

तुला तिकडे वळूच दिलेलं नाही,

तेव्हा तुझा तरी काय दोष ?

 

तुझे आईवडील काय करतात ?

त्याने विचारले.

 

शेतात काम.

मीही करते मदत त्याना…

 

शाळेला जाते की नाही ?

 

अहो, मी महाविद्यालयात शिकते.

कविता आत्मविश्वासाने म्हणाली.

 

इतकी लहान दिसते ही हाडाची जुडी

महाविद्यालयात असेल का ही ?

मार्क्सला हे पटलेच नसावे.

 

मग मार्क्स म्हणाला,

खूपच मोठी आहेस मग तू

प्रोढ झाली आहेस, किमान वयाने तरी !

 

म्हणजे,

तुला विचार करता येतो

एवढी निश्चितच मोठी झाली आहेस तू.

 

प्रथमतः

म्हणून,

विचार कसे निर्माण होतात

याचा विचार कर !

 

ते ब-याचदा लादले जातात आपल्यावर,

कुणाच्या तरी सोयीसाठी,

कुणाच्या तरी फायद्यासाठी, स्वार्थासाठी,

दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठी,

म्हणजे वर्चस्वासाठी,

तेही दुसऱ्यांचे श्रम चोरून !

 

कवितेला फारसं समजलं नाही;

तिने मान हलवली

नि पुन्हा मार्क्सच्या डोळ्यात पाहू लागली….

 

मार्क्स पुढे म्हणाला,

तुझे प्राध्यापक काय म्हणतात,

ते ऐक,

विचार प्रश्न त्यांना

टाक भंडावून त्यांना.

 

ऐक,

रस्त्यावरील माणूस

त्याच्या बोटांमधून घरंगळणारे कौशल्याचे संगीत.

 

ऐक,

कारखान्याचे भोंगे

त्यातला आकांत आणि आक्रोश.

 

ऐक शेतातील मातीला,

ती काहीतरी म्हणत असते नेहमीच,

तिच्या आतील आकसलेले विभ्रम.

 

ऐक,

चर्चच्या घंटानादात

तुझ्या शेजारच्या मुलीचे रक्त

प्राचीन काळापासून वाहणारे.

 

विचार प्रश्न देवांना नि दगडांना

धर्मगुरूंना आणि धर्मग्रंथांना

काय म्हणणं आहे त्यांचं ?

 

तसं बघितलं तर, ते काहीच म्हणत नसतात;

त्यांच्या वतीने त्यांचे रखवालदारच बोलत असतात.

लिहित असतात पोथ्या पुराणे

नि काहीबाही

हे तुझ्या लक्षात यायला पाहिजे.

 

पाणी वाहते उताराकडे

खड्ड्याकडे

साचले तर तिचा प्रवाह बंद होतो.

 

जिथे कमतरता तिथे भरून राहते पाणी

आणि मग मुरते मातीच्या पोटात

पुन्हा उगवण्यासाठी

सर्वाच्या उत्थापनासाठी

हिरव्या आकाशाची आस घेऊन

भुकेल्या आतड्यांच्या तहानेसाठी.

पाणी हा समतेचा विचार आहे

विषमतेचा व्यवहार पाणी करत नाही.

हे निसर्गाचं म्हणतोय मी

माणसाचं नव्हे;

हे लक्षात घे तू !

याशिवाय,

ऐक,

तुझ्या आईचा गोंधळ तिच्या मनातला

तिची धुसपूस तिचं कोंडलेपण

तिचा अडकणारा श्वास.

ऐक,

तुझ्या मित्राचा आक्रोश

पहा त्याच्या दारिद्र्यातील फाटके दरवाजे

ऐक त्याचे करूण गाणे.

ऐक,

तुझ्या मैत्रिणीची कैफियत

महाविद्यालयाच्या जिन्यावरुन उतरताना.

ऐक,

तिचा पितृसत्तेचा सापळा

तिच्या कपाळावर उमटलेली हिंसा

तिच्या कातडीवरची नक्षी

खरचटलेली

तिच्यावर टेहळणारी नजरकैद नि पहारा

आणि वाच तिच्या वह्यांमधल्या कविता

पाठीमागील पानांवर गळणा-या.

ऐक,

काळजीपूर्वक तुझ्या वडलांचे डोळे

खोलवर पापण्यांच्या आंत.

ऐक,

तिथे दडलेली नि जळणारी एक आग

एक हिंसा

म्हणजे सापडेल तुला

तुझ्या आईचं दु:ख

नि तिच्या यातनेचा कल्लोळ.

ऐकू येईल मग

तुझ्या बोटांना एक वेगळेच महाकाव्य

होईल स्पर्श मग

तुला ख-या काव्याचा.

मार्क्स बोलतच राहिला-

बोलतच राहिला…

डोळे झाकून स्वतःचे

तिथं उभं राहणं देखील

कवितेला अवघडल्यासारखे वाटू लागलं

ती संपूर्णतः गोंधळून गेली.

याचा काय संबंध कवितेशी ?

ती स्वतःशीच पुटपुटली

घराकडे परतली गोंधळ घेऊन मनात.

शेतात, कारखान्यात, स्वयंपाकघरात,

महाविद्यालयात, देवळात, परसात, धर्मग्रंथात

भटकत राहिली

शोधत स्वतःला नि दुसऱ्यांना

पण तिला काहीच सापडले नाही.

तिच्या मैत्रिणीला तिने विचारलं

तुला श्रावण कसा काय आवडत नाही गं ?

 

तिचा मैत्रीण म्हणाली,

कुठला श्रावण ?

तो श्रावण बाळ?

म्हणजे शाळेत वाचलेली गोष्ट ?

अगं वेडे, तो श्रावण नव्हे

श्रावण मासी हर्ष मानसी… तो श्रावण !

कुठाय तो ?

तिच्या मैत्रिणीने विचारले.

श्रावणात,

म्हणजे किती सुंदर आणि प्रसन्न वाटते !

तुला कसं काय हे दिसत नाही ?

मला महाविद्यालयाची फी भरायला पैसे नाहीत

घरात रोज कटकटी.

शेजारचा मुलगा मला रोज त्रास देतो.

रोजचे आहेत खाण्याचे वांधे.

नोकरी कर, असं वडील म्हणताहेत.

आईवर सतत संशय

तिचा कुणाशी तरी संबंध आहे

कामाच्या ठिकाणी म्हणून.

रोजच हाणामा-या !

परवा आईने एका बाईला पकडून आणले घरात

आणि वडलांना विचारले,

हिचा तुमचा काय संबंध ?

वडील हादरलेच प्रथमतः

नंतर आईलाच बदडून काढले मरेस्तोवर.

ह्या अशा रोजच्या भानगडीत मला श्रावण कुठे दिसणार ?

कवितेने विचार केला.

विचार निर्माण होतात कसे?

याचाच प्रथमतः विचार करायला हवा.

दीपक बोरगावे

कवी,अनुवादक व समीक्षक, इंग्रजी विषयाचे निवृत्त प्राध्यापक,

भाषांतर विद्येत पीएचडी

 

 •  

तेव्हाही जात असतो एक बळी पुरुषसत्तेचा… – श्रद्धा देसाई

 •  

जेव्हा बलात्कार होतो तिच्यावर,
त्यातही दिवसाढवळ्या,
त्यातही लहानगीवर,
त्यातही वर्दळीत,
त्यातही नातलगाकडून,
आणि त्यातही क्रुर पाशवी असेल,
मग तर पेटून उठतात तुझ्या धमन्या,
बेभान होतं सणसणीत शिवी हासडतोस “भडव्या”.
तेव्हाही जन्माला येत असतो आणखी एक बलात्कारी .

जेव्हा पुरुषसत्तेचा बळी जाते ती,
त्यातही हुंड्यापायी,
त्यातही नवविवाहित, त्यातही माता,
त्यातही लहान लेकरांची,
अन त्यातही जिवंत जाळली असेल,
मग तर उसळून उठत तुझं मस्तक.
पण कधीतरी बायकोच्या चार दिवसातही,
“जगावेगळं तुलाच होतं नाही”;
म्हणत जेवणाची फर्माईश करतोस,

जेव्हा सावित्रीला नाकारलं जातं,
त्यातही स्रीवादात,
त्यातही स्त्रियांकडून,
त्यातही परजातीतल्याकडून,
त्यातही विरोधकांकडून,
मग तर खवळतोस तू संपूर्णच.
पण कधीतरी लग्न लावून दिलेल्या बहिणीने हिस्सा मागताच मात्र ,
नात्याचाच ताळेबंद लावतोस लगोलग,
तेव्हाही नाकारलं जात असतं अस्तित्व एका सावित्रीच.

जेव्हा पैशापायी विकली जाते स्त्री,
त्यातही कोवळी,
त्यातही सुंदर,
आणि त्यातही एकुलती एक,
अन त्यातही आईबापाकडून,
मग तर हडबडतोस तू पुरता.
पण कधीतरी पोटच्या पोरीने परजातीतला मुलगा आणताच,

पैशाने मढवत देतोस कुण्या दुसऱ्याच्या गळ्यात;
तेव्हाही विकली जात असते स्त्री पैशापायी.

जेव्हा सरशी करत तिचं सौंदर्य,
त्यातही तुझ्या कर्तृत्वावर,
त्यातही सिलेक्शनमध्ये,
त्यातही प्रमोशनमध्ये,
अन त्यातही लग्नाच्या बाजारातसुद्धा,
मग तर उखडतोस तू या व्यवस्थेवर .
पण कधीतरी उद्विग्न असताना मात्र,
बायकोच्या स्पर्शाऐवजी रिझवतोस मन कुणा मादक तरुणी जवळ,
तेव्हाही बोलीत वरचढ ठरत असतं स्त्रीच सौंदर्य.

सहज मारली जात असते स्त्री गर्भातच,
त्यातही बापाच्या हट्टापायी,
त्यातही चार पैशात,
त्यातही स्त्री डॉक्टर कडून,
अन त्यातही आईच्या मनाविरुद्ध,
मग तर विव्हळतोस तू आकांताने.
पण कधीतरी तुझ्याच पोटच्या लेकाला साडीच नेसावी वाटते; म्हणून त्याच्याच जीवावर उठतो तू,
तेव्हाही सहजच मारली जात असते एक स्त्री.

असाच जन्माला येत असतो बलात्कारी,
अशीच पैशापायी विकली जात असते स्त्री,
असंच नाकारलं जात असत सावित्रीला,
असंच कर्तृत्वापेक्षा वरचढ ठरत असत सौंदर्य,
असाच मारला जात असतो गर्भ स्त्रीचा,
तेव्हाही, जेव्हा कधीतरी स्त्रीच म्हणत असते,

“बाईच्या आयुष्याला भोग भोगावेच लागतात”

श्रद्धा देसाई

9607052334

टाटा सामाजिक विज्ञान संस्था,मुंबई

 •