डॉ. सोपान शेंडे : इतिहासाचे प्रयोगशील प्राध्यापक

पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोपान शेंडे सर हे ३१ मे २०२१ रोजी आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने प्रा.वर्षा वाघमारे यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीचा करून दिलेला परिचय..

अभ्यासू वृत्ती, शांत स्वभाव पण शिस्तप्रिय, तसेच प्रयोगशील व व्यासंगी व्यक्तिमत्व असणारे प्रा. शेंडे सर एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. पीएच.डी.च्या निमित्ताने सर मला मार्गदर्शक म्हणून लाभले.
सरांचा संघर्षमय जीवनपट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील चांदे गावातील एका मागासवर्गीय व गरीब अल्पशिक्षित परंतु ध्येयवादी आई-वडिलांच्या प्रेरणेतून हालाखीची परिस्थिती असतानाही ग्रामीण भागातून येऊन पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयासारख्या प्रतिथयश संस्थेत गेली ३१ वर्षे इतिहास विषयाच्या अध्यापनाचे कार्य करणे म्हणजे मोठीच झेप म्हणावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न वारसा लाभलेल्या नेवासे तालुक्यातील चांदे गावात एक जून १९६१ रोजी सरांचा जन्म झाला. वडील रामलाल शेंडे अल्पशिक्षित तर आई हौसाबाई अशिक्षित. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असूनही आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मुलांना चांगले संस्कार देत चांगले शिक्षणही दिले. सरांनीही खूप कष्टातून एस.एस.सी., डी.एड्. करत १९७९ साली नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर विद्यालय, खरवंडी येथे प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळवली. विद्यार्थीहितासाठी सदैव प्रयत्नशील व प्रामाणिक अध्यापनाच्या सरांच्या स्वभावामुळे लवकरच ते विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय शिक्षक झाले, परंतु काही कारणास्तव त्यांनी तेथील नोकरीचा राजिनामा दिला. त्यानंतर उच्च शिक्षण मिळविण्याच्या हेतूने अखंड ज्ञानसाधना करत सरांनी इतिहास विषयात बी.ए., एम.ए. करून शिवाजी विद्यापीठातून एम.फील.ची पदवी प्राप्त केली. याकाळात अनेक अडचणींवर मात करत सरांनी आत्मविश्वासाने वाटचाल केली. लग्न झाल्यामुळे, त्यातच नोकरी नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी सरांनी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील एका महिला महाविद्यालयात अपुर्‍या मानधनावर इतिहास व्याख्याता म्हणून नोकरी पत्करली. या वेळी प्राथमिक गरजा भागविण्या इतकेही पैसे मिळत नसल्यामुळे त्यांना कधी उपाशीपोटी दिवस काढावे लागले. मात्र लवकरच म्हणजे जानेवारी १९९० मध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे सरांना इतिहास विषयाचे कायमस्वरूपी प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली आणि त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले ; आयुष्याला स्थैर्य प्राप्त झाले.


एस. पी. महाविद्यालयासारख्या नामांकित संस्थेत काम करताना महाविद्यालयीन स्तरावरील अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी इत्यादी.. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करताना सरांनी अनेक विद्यार्थी घडविले. सरांचे अनेक विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध अधिकार पदांवर कार्यरत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून विद्यापीठाने दिलेल्या उपक्रमां व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपत सरांनी समाज परिवर्तनासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमांतर्गत सरांनी एड्सविरोधी जाणीव जागृतीसाठी प्रबोधनपर व्याख्याने, तसेच एड्स आणि तरुण, राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक, माझी प्रबोधनाची कविता या विषयांवर आकाशवाणी पुणे च्या कार्यक्रमांसाठी लेखनही केले आहे. वृत्तपत्रांमधून लेखन करत समाजात जाणीव-जागृती निर्माण केली. याशिवाय प्लास्टिक निर्मूलन मोहीम, निर्माल्य दान करून त्याचा रचनात्मक कार्यासाठी उपयोग करण्याची संकल्पना, पाणी आडवा पाणी जिरवा यासारख्या नवनवीन संकल्पना कल्पकतेने राबविल्या.
१९९७-९८ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सरांनी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस : जीवन व कार्य’ या विषयाला अनुसरून शंभर व्याख्याने देण्याचा संकल्प शाळा- महाविद्यालय व सामाजिक संस्थांमधून व्याख्याने देऊन यशस्वीरित्या पूर्ण केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याता म्हणून विविध विषयांवर ठिकठिकाणी व्याख्याने दिली. पुण्यातील ऐतिहासिक गीताधर्म मंडळामध्येही अनेक नाविन्यपूर्ण विषयांवर व्याख्याने दिली. सरांच्या या विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्यानमालांमधून विद्यार्थी वर्गात व समाजात राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांबद्दल व इतर सामाजिक महत्त्वाच्या विषयांबद्दल प्रचार-प्रसाराची तळमळ दिसून येते.
सामाजिक कार्याप्रमाणेच संघटनात्मक पातळीवरही सरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९८३ पासून ‘समता शिक्षण प्रसारक मंडळ’, खरवंडी या संस्थेची पुनर्स्थापना करून जळके गावी माध्यमिक शाळा स्थापन करण्यात सरांचा पुढाकार होता. बरीच वर्षे ते या संस्थेचे पदाधिकारी होते. तसेच १९९२ पासून पुणे जिल्हा मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस असताना सरांनी शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे प्रश्न सोडवून न्याय मिळवून दिला. जून २००० पासून सरांनी महाविद्यालयाच्या कला शाखेचे उपप्राचार्य म्हणून प्रशासकीय भूमिकाही उत्तमरित्या पार पाडली. याच दरम्यान २००५ मध्ये अनेक अडचणींचा सामना करत सरांनी पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. २००९ साली सर इतिहास विभाग प्रमुख झाले. त्यानंतर सरांनी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात मळलेल्या वाटेने न जाता नवनवीन प्रयोग सुरू केले. त्यामध्ये ‘पुणे शहरातील पुतळ्यांचा इतिहास’ हा लघु संशोधन प्रकल्प केला. तसेच ‘वंशावळीच्या आधारे सर्वसामान्यांचा इतिहास’ या विषयांतर्गत चर्चासत्राचा केलेला प्रयोग म्हणजे वंचितांच्या इतिहासाचे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. सरांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण संशोधनाची दखल घेऊन इतिहास शिक्षक मंडळाने २०१७ साली स्वर्गीय डॉ. अरविंद देशपांडे यांच्या नावे दिला जाणारा संशोधनासाठीचा मानाचा पुरस्कार देऊन सरांचा गौरव केला.
सरांची इतिहास विषयातील अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा पहाता ते केवळ पुस्तक नसून संदर्भग्रंथ ठरतात. ‘मराठेकालीन धार्मिक जीवन’, ‘छत्रपती शिवाजी आणि शिवकाल’, ‘प्राचीन भारताचा समग्र इतिहास’ तसेच ‘विविधा : महाराष्ट्राचा समग्र इतिहास’ इत्यादी ग्रंथसंपदा म्हणजे इतिहास संशोधकांसाठी संदर्भ ग्रंथ आहेत. याशिवाय इतिहास दर्पण, नवभारत संशोधक, इतिहास शिक्षक यासारख्या इतिहासाच्या नामांकित नियतकालिकांमधून विद्वत्तापूर्ण संशोधनात्मक लेख लिहिले. एकंदरीतच सरांचा जीवनपट पाहता ग्रामीण भागातील एका मागासवर्गीय व कष्टकरी कुटुंबातून संघर्ष करत, शिक्षण घेत फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचार व कार्याचा आदर्श पुढे ठेवून कठीण परिस्थितीतही न डगमगता धैर्याने पुढे वाटचाल करत पुण्यासारख्या शहरात सचोटीने व स्वकर्तुत्वाने शून्यातून स्वतःची ओळख निर्माण केली. समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरा मोडीत काढताना केवळ उपदेश न करता स्वतःच्या आचरणातून समाजप्रबोधन केले. यातून त्यांना समाजाप्रती असलेली तळमळ दिसून येते. सर एक उत्कृष्ट कवीही आहेत. आपल्या कवितांमधूनही त्यांनी समाजप्रबोधन केले आहे. असे मितभाषी, साधे परंतु शिस्तप्रिय आणि अभ्यासू, व्यासंगी व्यक्तिमत्व, हाडाचे शिक्षक असलेले प्रा. डॉ. सोपान शेंडे सर विद्यार्थ्यांप्रती असणाऱ्या तळमळीतूनच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावारूपाला आले. अशाप्रकारे अखंड परिश्रमातून उत्कृष्ट संशोधक व मार्गदर्शक म्हणून सरांच्या आयुष्याची झालेली वाटचाल आम्हा विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल.
आदरणीय प्रा. डॉ. सोपान शेंडे सरांना निवृत्‍तीनंतरच्या आरोग्यसंपन्न वाटचालीसाठी आम्हा विद्यार्थ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा!

प्रा. वर्षा वाघमारे
डॉ. आंबेडकर महाविद्यालय, येरवडा

Leave a Reply