डॉ. सो रा शेंडे म्हणजे वेगळ्या वाटेने जाणारा व विद्यार्थांना
त्यांच्या वाटा शोधण्यास मदत करणारा इतिहास शिक्षक


ही गोष्ट सामान्य कुटुंबात जन्मास आलेला मुलगा कोणतीही सामाजिक, आर्थिक वा राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाच्या जोरावर व धडाडीने काम करत पुण्यासारख्या महत्वाच्या शहरात एका प्रतिष्ठित महाविद्यालयाचे उपप्राचार्य पद भूषवितो व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान बनतो त्याची आहे.डॉ. सोपान शेंडे, विभागप्रमुख,इतिहास विभाग सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांचा आज महाविद्यायातील निरोपाचा दिवस. महाविद्यालयामध्ये ‘शुभेच्छा समारंभ’ म्हणून दिनांक ३० मे २०२१ रोजी साजरा केला. मागील 3 दशके विद्यार्थ्यांना शिक्षण देत अविरतपणे घडवताना त्यानी महाविद्यालयीन उपप्राचार्य,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख, एन एस एस संयोजक, स्पर्धा परीक्षा केंद्र प्रमुख अश्या विविध पदांवर देखील काम केल्याचे दिसते.


        सरांचा वाचनाचा व्यासंग प्रचंड आहे त्याची प्रचिती त्यांच्याशी चर्चा करताना येतेच येते याशिवाय दुसरे उदाहरण म्हणजे महाविद्यालयाच्या विशाल लायब्ररीमध्ये इतिहास, भाषा व सामाजिक शास्त्रांच्या पुस्तकांच्या मागे असलेल्या बुक इश्यूपुठ्ठीकांवर सरांचे नांव पाहिल्यावर येते. सरांची अभ्यास पद्धती पाहिल्यास  पहाटे 2 वाजता उठून त्यांचा वैचारिक चिंतन मनन व लेखन करणे विद्यार्थी व अभ्यासकांस अनुकरणीय असावी अशी आहे. शेंडे सरांचे लेखन विविध रिसर्च पेपर्स सेमिनार, परिषदा इत्यादी ठिकाणी केल्याचे दिसते. त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास पोवाडे, पुतळा निर्मिती अभ्यास, शिवकालीन समाजातील वंचित लोक, पोर्तुगिजांचा भारतातील धर्म प्रचार व त्यावरील हिंदूंची प्रतिक्रिया, डॉ. भाऊ दाजी लाड, स्वातंत्रवीर सावरकर, गोपाल गणेश आगरकर यांचेपासून सुभाषचंद्र बोस यांचेपर्यंत असे अनेक विषयांवर त्यांनी सखोल  विस्तृत व विविधांगी लेखन केल्याचे  आपणास दिसते. त्याचबरोबर मराठेकालीन धार्मिक जीवन, छत्रपती शिवाजी आणि शिवकाल, प्राचीन भारताचा समग्र इतिहास, विविधा : महाराष्ट्राचा समग्र इतिहास  अशी पुस्तके लिहिली आहेत. याव्यतिरिक्त कौटिल्याचे अर्थशास्त्र : राज्य समाज आणि जीवनदर्शन तसेच पुतळ्यांचा इतिहास :  निर्मिती प्रेरणा आणि परिणाम ही पुस्तके आगामी काळात प्रकाशित होत आहेत. इतिहास लेखनाचे अनेकविध  आयाम आहेत त्याचे एकंदर स्वरूप पाहता सरांनी स्थानिक इतिहास लेखन व वंचितांचे इतिहास लेखनात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. “सामान्य कुटुंबाचा जरी अभ्यास केला तरी त्यामधून समकालीन सामाजिक, आर्थिक व राजकीय जाणिवांचा अभ्युदय जडण-घडण व वाटचाल पाहता येते” असे सरांचे प्रमुख मत आहे. यावरच त्यांनी विद्यार्थ्यांकडून वंशावळीवर आधारित सेमिनार तसेच विद्यार्थ्यांना लेखनात प्रत्यक्षपणे प्रोत्साहित केल्याचे  दिसते. तसेच मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग भरवत विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय इतिहासलेखनास आवश्यक असणाऱ्याशास्त्रांची
ओळख व गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न देखील सरांनी केला.
          शेंडे सरांनी इतिहास अभ्यास लेखन याचेबरोबर समाजाप्रती,पर्यावरणाप्रती असलेले ‘देणे’ देखील जपल्याचे दिसते. ‘अंधश्रद्धा निर्मुलन’, ‘नदी स्वच्छता अभियान’, एड्स विरोधी ‘भाई बचावो मोहीम’,‘अभिनव रक्षाबंधन अभियान’ असे बहुविध कार्यक्रम राबवल्याचे दिसते व त्यावर माजी विद्यार्थी उत्स्फूर्ततेने बोलताना दिसतात. फेसबुक, ट्विटर,व्हॉट्सअॅप अथवा तत्सम सोशलमिडियाचे प्रस्थ नसताना समाजात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचून सरांनी समाज प्रबोधनात सक्रीय सहभाग नोंदवल्याचे दिसते. ‘माझी प्रबोधनाची कविता’ या कवितेवर आधारित विषयावर सरांनी काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख असताना सरांनी बाबासाहेबांनी लिहिलेले साहित्य अध्यासन केंद्राच्या लायब्ररीद्वारे विद्यार्थ्यांना खुले करत बाबासाहेबांचे आर्थिक सामाजिक व वैचरिक आयामांचा धांडोळा घेण्यास मदत केली.  भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे नेताजीसुभाषचंद्र बोस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेताजींचे विचार व कामगिरी जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी १०० पेक्षा जास्त व्याख्याने दिल्याचे दिसते तसेच नेताजींचे पुण्याजवळ इंदापूरमध्ये राहणारे अंगरक्षक श्री. सिंग यांच्या भेटीबद्दल महाविद्यालयातील त्यांचे विद्यार्थी व नंतरचे सहशिक्षक श्री राहुल मेश्राम सर हे सांगताना दिसतात.  महात्मा गांधी जयंतीचे दिवशी शेंडे सरांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यास कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा बनवत गांधीजींना अभिप्रेत असलेल्या अंत्योदय मोहिमेस प्रतिसाद देत महात्म्यास एक अद्भुत आदरांजली दिल्याचे दिसते.
         सरांचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये काम करत असल्याचे दिसते अध्यापन क्षेत्र, इतिहास अभ्यासक, राजकारण, वकीली, व्यवसाय याचबरोबर विविध सामाजिक संस्थांशी निगडीत असल्याचे दिसते.
विद्यार्थी, सह – शिक्षक, अध्यापक, गुरुवर्य यांचेकडून सरांना भावी आयुष्य व पुढील संशोधनासाठी शुभेच्छा.
—————-
                                   ० अक्षय तानाजी काकडे
                           सहाय्यक प्राध्यापक (हंगामी)
                                    इतिहास विभाग
                सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे ३०

Leave a Reply