शेवटची कथा सुरुवातीपासून सांगण्याआधी..

आपण, म्हणजे वाचक, बऱ्याच वेळा लेखकांवर शिक्के मारून त्यांचं वर्गीकरण करून टाकतो. म्हणजे उदाहरणार्थ आयन रँड या कम्युनिस्ट विरोधीच आहेत, असा शिक्का त्यांच्यावर मारला गेला. त्यामुळं साम्यवादाकडे झुकणाऱ्या मंडळींत आयन रँड यांचं लिखाण वाचणं, किंवा वाचलं आहे, असं कबूल करणं म्हणजे महापाप !

पण त्यांची, अँथम, ही लघुकादंबरी वाचताना किंवा तिचा अनुवाद करताना मला भावला तो त्यांचा टोकाचा व्यक्तिस्वातंत्र्यवाद. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीला असलेला ठाम विरोध. ही हुकूमशाही व्यक्तीचं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य पूर्णत्वाने नष्ट करण्याचा प्रयत्न करते. विचारस्वातंत्र्य, उच्चारस्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आहार विहार परिधान स्वातंत्र्य.  आणि अगदी व्यक्तींच्या धारणा कोणत्या असाव्यात, किंवा नसाव्यात, यावरही अतिक्रमण करते.

यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन आवश्यक असतंच. पुरोगामी आणि आधुनिकतेकडे पाठ फिरवून लोकांना स्वतःच्या सोयीच्या इतिहासात गुंतवून ठेवणं भाग असतं. एखादा समान शत्रू निर्माण करणं भाग असतं. आणि या सगळ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवला जाण्यासाठी लोकांचं अर्धशिक्षित असणं, अर्धपोटी असणं, रोजचं जगणंच इतकं असह्य आणि कष्टप्रद व्हावं की इतर कोणता विचार करणंच अशक्य व्हावं, आपली ही अवस्था त्या काल्पनिक शत्रूमुळं आहे आणि त्याच्यापासून आपला बचाव फक्त आताचा समर्थ राज्यकर्ताच करू शकतो अशी सर्वांची मानसिकता निर्माण करणं महत्वाचं असतं. 

ब्रिटीश लेखक जॉर्ज ऑरवेल यांनी साधारण पाऊणशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या, ऍनिमल फार्म आणि त्यानंतरच्या नाईनटीन एटीफोर या दोन कादंबऱ्यांतून अशा प्रकारच्या हुकूमशाहांवर आणि ते सोसत राहणाऱ्या लोकांवर, त्यांच्या अगतिकतेवर कठोर प्रहार केले आहेत.

ऍनिमल फार्म या छोट्या कादंबरीत प्राण्यांची प्रतीके वापरून लेखकानं, आधीच्या, नेहमीच्या खडतर आयुष्याला जबाबदार असा शत्रू निर्माण करणं, त्याच्या विरोधात तीव्र सार्वत्रिक भावना निर्माण करणं, हा नाहीसा झाला तर जगणं सर्वार्थानं सुसह्य होईल, कोणी मालक नसेल, सगळे समान असतील, असा उदघोष करणं, त्यानुसार सर्वांनी मिळून बंड किंवा क्रांती करणं, क्रांती यशस्वी झाल्यावर भव्य स्वप्ने दाखवून सर्वांना आधीपेक्षा जास्त काम करायला लावणं, त्यागाची भावना जागवून आधीपेक्षा कमी मोबदला देणं, त्याचवेळी राज्यकर्ता वर्ग आणि त्याच्या मित्र, सहायकांनी स्वतःच्या सुखसोयी, ऐषोआराम गतीनं वाढवत नेणं, ते करताना, या सुखसोयी भोगण्याचा त्याग सर्वांच्या भल्यासाठीच करावा लागत आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रभावी प्रचारतंत्र वापरणं, आधी जाहीर केलेला बाह्य शत्रू असतानाच अंतर्गत शत्रूही उभा करून त्याचा निःपात करणं, अन्यायाविरुद्ध उठू पाहणाऱ्या आवाजांना या शत्रूचे सहकारी अथवा समर्थक आहेत असं जाहीर करून ते आवाज कायमचे बंद करणं, आणि नंतर सगळीच औपचारिकता गुंडाळून राज्यकर्ता आणि त्याचे मित्र व इतर सगळे,  यांतील असमानतेचा उघड पुरस्कार करणं, त्यासाठी, सगळे समान आहेत, पण त्यातील काही अधिक समान आहेत, हे सूत्र लागू करणं हे सगळे टप्पे एखाद्या अंधभक्ताला सुद्धा समजतील, अशा रीतीनं मांडले आहेत.

आणि हे घडण्यासाठी, जॉर्ज ऑरवेल यांच्यावर शिक्का मारला गेला आहे तसं, स्टॅलिन शैलीतील समाजवाद किंवा हिटलरशाही यांपैकीच काही असलं पाहिजे, असं नाही. सर्वाग्रासी हुकूमशाही ही लोकशाहीच्या पडद्याआड सुद्धा जन्म घेते, वाढते आणि ती अधिक संहारक, क्रूर, आणि समाजविनाशी असते, हे आपण आज आपल्याभोवती जगभरात जे चालू आहे, त्यातून पाहू शकतो.

फक्त ते दिसण्यासाठी, अंधभक्तीची झापडं डोळ्यांवर आनंदानं बसवून ती मिरवण्यात धन्यता मानणारांच्या कळपात सहभागी झालेलं नसणं, ही एकमेव पूर्वअट आहे.

…………….…

परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत आहेत.

सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते मागील महिन्यात प्रकाशित झाले आहे.

णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, बाळकृष्ण शिंदे, नरहर कुरुंदकर इत्यादी इत्यादी लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय त्यांनी या सदरातुन करून दिला.

एका महत्वाच्या कादंबरीच्या अनुवादात ते गुंतले असून ती पूर्ण होईपर्यंत आपण थांबणार आहोत पुढच्या लेखमालेच्या आरंभापर्यंत..

तूर्तास ह्या कथेचा हा आहे समारोप..

– दयानंद कनकदंडे

Leave a Reply