‘नसीम’, लेफ्टिस्ट सूफी ‘सईद अख़्तर मिर्जा’ आणि डेमोक्रेटिक सिनेमा – दत्ता चव्हाण

दिनांक १७ ते ३१ जानेवारी दरम्यान साजरा होत असलेल्या दुसर्‍या इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या वर्षी सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सईद मिर्जा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी कोविड-१९ मुळे हा फेस्टिव्हल ऑनलाईन होत असून संयोजन समितीचे सदस्य मिर्जा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित करणार आहेत. त्या निमित्ताने सिनेमा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा परिचय करून देणारा दत्ता चव्हाण यांचा विशेष लेख

  

जग महायुध्दाच्या खाईत लोटले गेलेले असताना १९४७ साली रक्ताचा एकही थेंब न सांडता आपला देश स्वतंत्र झाला पण त्याला फाळणीच्या भळभळत्या जखमेची रक्तरंजित किनार होती.  ब्रिटीश कुटनीतीच्या परिणामस्वरूप काही महत्त्वाकांक्षी मुस्लिम नेत्यांनी व्यक्तिगत स्वार्थ आणि स्वहितासाठी केवळ मुस्लिमांसाठीच म्हणून वेगळ्या भूभागाची मागणी करत पाकिस्तान भारतापासून तोडून वेगळा केला. स्वातंत्र्योत्तर भारत एक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी देश म्हणून उभा रहात होता. मात्र बदलत्या परिप्रेक्ष्यात सत्तेपासून वंचित असंतुष्ट सुप्तपणे आपल्या राजकीय महत्वाकांक्षांसाठी समाजात वितुष्ट आणि दुही निर्माण करण्यात व्यग्र होते. ऐंशीच्या दशकता सूरू झालेले धार्मिक आंदोलन, त्यातून उद्भवलेला उन्माद आणि १९९२ साली अनियंत्रित जमावाच्या माध्यमातून अयोध्येत घडवून आणण्यात आलेली बाबरी मशिद पाडण्याची दुर्दैवी घटना, त्यांच्या याच मनसुब्यांची प्रत्यक्ष परिणती होती. एका अर्थाने तो प्रजासत्ताक भारताच्या धर्मनिरपेक्ष संरचनेवरच थेट हल्ला होता. या पार्श्वभूमीवर “अब्बु, मुल्क जब आज़ाद हुआ, तो आप पाकिस्तान क्यों नहीं गये?” हा नसीम सिनेमातील एका मुस्लिम मुलाने आपल्या वडिलांना विचारलेला प्रश्न अप्रत्यक्षपणे खूप काही सांगून जातो.

‘नसीम’ हा दिग्दर्शक सईद मिर्जा यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा. ज्याचे कथानक त्याच्या नावाप्रमाणेच पहाटेच्या प्रसन्न आल्हाददायक हवेसारख्या निरागस शाळकरी मुलीभोवती विणलेले आहे. मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील पंधरावर्षीय नसीम आणि तिचे अंथरूणाला खिळलेले अशक्त वृद्ध आजोबा यांचे मनोविश्व कथानकाला आकार देते. जून ते डिसेंबर १९९२ या कथानकाच्या काळात टीव्हीवरून घराघरात सतत आदळणा-या देशातील वाढत्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नसीमचे आजोबा तिला गतकाळातल्या आपल्या आग्रा शहरातील सौहार्दपूर्ण धार्मिक सहजीवनाच्या कहाण्या सांगत असतात. पाकिस्तानात न जाता भारतातच रहाणे पसंत केलेल्या मुस्लिमांच्या  पिढीचे प्रतिनिधी असलेल्या नसीमच्या आजोबांची भावावस्था सिनेमाभर आपणास अस्वस्थ करीत रहाते आणि त्याचवेळी नसीमच्या माध्यमातून आपल्या भावी पिढीच्या मानसिकतेला निकोप द्वेषमुक्त घडविण्यासाठीची त्यांची प्रामाणिक धडपड आपल्याला आश्वासक दिलासाही देऊन जाते.

वाढता धार्मिक विद्वेष आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या उद्वेगाच्या भरात जेव्हा नसीमच्या आजोबांना तिचे वडील फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानात का गेला नाहीत म्हणून विचारतो तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तराचा क्षण भारतीय म्हणून आपणास अंतर्मुख करून जातो. मोठ्या कष्टाने उठून काठी टेकत दारापर्यंत येऊन अंगणातल्या झाडाकडे बोट दाखवत ते उत्तर देतात, “यह  दरख़्त देख रहे हो ना। यह तुम्हारी अम्मी को बहुत पसंद था।”

दरम्यान संपूर्ण शहर धार्मिक विद्वेषाच्या सावलीत वावरत असताना दररोज येणा-या दंग्यांच्या हिंसक बातम्यांमुळे समाजाचा मानसिक तणाव वाढला आहे. शाळकरी नसीम ही त्याला आपवाद नाही. तिचे तरूण मन, तिची शाळा आणि आजुबाजुच्या परिसरातील बदलत्या परिस्थितीची दखल घेत असताना, तिचे अंथरूणाला खिळलेले आजोबा मात्र समाजमन दुभंगून विभाजीत होताना असहायपणे पहात  असतात. शेवटी ६ डिसेंबर रोजी बाबरी मशिदीच्या विध्वंसाची बातमी आल्यानतंर ते मूकपणे हे जग सोडून जातात.

    बाबरी मशिद  पाडण्यात आल्यानंतर देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेच्या झालेल्या क्षतीच्या पार्श्वभूमीवर १९९५ साली नसीम प्रदर्शित झाला. त्याचवर्षी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासह पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार  मिळाला. नसीम मध्ये सईद मिर्जा यांनी खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यानंतर अनेक वर्षे ते सिनेमा या माध्यमाकडे वळलेच नव्हते. त्याविषयी राज्यसभा न्युज या वाहिनीवर गुफ़्तगू कार्यक्रमातंर्गत इरफ़ान यांना दिलेल्या मुलाखतीत ते सांगतात, ” बाबरी मशिदीचा विध्वंस जवळपास शेवटची काडी होती आणि नसीम होता एखाद्या उपमेसारखा. त्यानंतर खरोखरच माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं. मला माझा हरवलेला विश्वास परत मिळवून माझी पवित्रता कायम राखणं आवश्यक होतं आणि मग मी देशाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला.” 

१९९३ नंतर त्यांनी १२ वेळा भारत भ्रमण केले. हा सर्व प्रवास बाबरी मशिदीच्या विध्वंसाला एका संवेदनशील मुस्लिम मनाची प्रतिक्रिया होती. हा त्यांचा प्रवास त्यांचे  समाजवादी भारताचे स्वप्न डोळ्यासमोर कोसळताना पाहून स्वतःचा हरवलेला विश्वास परत मिळवण्यासाठीचा होता. हा प्रवास त्यांच्या लेफ्टिस्ट सूफ़ी  असण्याचा होता. ते स्वतःला लेफ्टीस्ट सूफ़ी म्हणवतात. राज्यसभा वाहिनीवरील त्याच मुलाखतीत त्यासंदर्भात पुढे ते म्हणाले आहेत की, लेफ्टिस्ट असण्याचा अर्थ काय आहे? तो काही पार्टी नाही. ती एक जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे, जी एखादी व्यक्ती पडत असताना त्याला पडू न देता त्याचा हाथ पकडायला, त्याला आधार द्यायला सांगते आणि आपल्या मनात सहमानवांबद्दल करूणा असणे हे तिचे मूलभूत तत्व आहे.” आपल्या सूफ़ी संकल्पनेविषयी ते स्पष्ट करतात की  सूफ़ी असणे म्हणजे आपले चराचरांशी नाते आसणे.

एक दिग्दर्शक म्हणून  आपल्या सिनेनिर्मीती प्रक्रियेबाबत बीबीसी उर्दू वाहिनीवर ललीत मोहन जोशी यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सांगतात की माझे डेमोक्रेटिक सिनेमे बनविण्याचे निश्चित होते. माझ्या सिनेमाची कथा पृष्ठभागावर असते, आणि माझा सिनेमा सूरू होतो विचारापासून. ह्या विचाराला जोडत जेव्हा मी कथा निर्माण करतो तेव्हा मी हे विसरत नाही की मूळात तो एक विचार आहे आणि तो विचार काय आहे तर अल्पसंख्यांक मुख्य प्रवाहात कसे येतील? आणि मग मी कथानक जोडत जातो. त्या अनुषंगानेच पुढे ते म्हणतात की मुस्लिमांच्या परिस्थितीबद्दल देशात जे काही सुरू आहे. मुंबईत पहा,  अनेक मुस्लिम तरूण अंडरवर्ल्ड मध्ये आहेत. तुलनेने त्यांचे प्रमाणही खूप आहे. प्रश्न होता की हे असे कसे होते?  हे सर्व कष्ट करतात. गॅरेज मेकॅनिक आहेत किंवा आणखी काही करतात. त्यांच्या या परिस्थितीचे कारण काय आहे?  तिथून हा प्रश्न सुरू झाला आणि माझे सिनेमे बनत गेले.

आपल्या याच भूमिकेतून सईद अख़्तर मिर्जा यांनी त्यांच्या सिनेमांची निर्मिती केलेली आहे. त्यांचे सिनेमे जनसामान्यांचे जीवन, त्यांच्या आशा-आकांक्षा आणि त्यांच्या दुःस्वप्नांना सामोरे जात त्यांच्या मनोवैज्ञानिक जटिलतांना उलगडवून दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे  नामवैशिष्ट्यांसह स्वतःची  वेगळी आणि स्वतंत्र  ओळख निर्माण करण्यात त्यांचे सिनेमे यशस्वी ठरले आहेत. ज्यात प्रामुख्याने त्यांच्या ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ (१९७८),  अल्बर्ट पिन्टो को गुस्सा क्यों आता है? (१९८१), मोहन जोशी हाज़िर हो (१९८४), नसीम (१९९५) या सर्व वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित सिनेकृतींसह त्यांच्या ‘छू लेंगे आसमान’ (२००१), ‘दुनिया गोल है’ (२०१५) आणि ‘करमा कॅफे’ (२०१८) या सिनेमांचा उल्लेख करावा लागेल. सिनेमासाठीच्या योगदानासाठी २०१५ साली त्यांना साउथ एशियन सिनेमा फाउंडेशनचा एक्सलंस अवार्ड इन सिनेमा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.  सिनेमांच्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक डाॅक्युमेंट्रीजसह दुरदर्शनसाठी ‘नुक्कड’ (१९८६) आणि ‘इंतज़ार'(१९८८) या अत्यंत लोकप्रिय अशा मालिकांची निर्मितीही केली आहे. 

मुंबई शहरातच जन्मलेल्या सईद मिर्जा  यांना सिनेमाचा वारसा घरातूनच लाभला आहे. त्याचे वडील अख़्तर मिर्जा हे एक उत्तम पटकथा लेखक होते. नया दौर, वक़्त सारख्या लोकप्रिय सिनेमांच्या कथा त्यांनी लिहिल्या आहेत. दुरदर्शनवरील सुप्रसिद्ध धारावाहिक ‘सर्कस’चे दिग्दर्शक अजीज मिर्जा हे  त्यांचे भाऊ आहेत. सुरवातीला सईद मिर्जा यांचा कल सिनेमाकडे नव्हता. सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर आणि काही वर्षे जाहिरात एजन्सीत कॉपीरायटिंग विभागात प्रमुख म्हणून काम केल्यानंतर सईद मिर्जा यांचे कलावंत मन रुटीन कामाच्या साचलेपणाला कंटाळले होते. दरम्यान लग्न होऊन दोन मुलेही झालेली होती. त्यांची अस्वस्थता ओळखून त्यांच्या पत्नी जेनिफर यांनी स्वतः त्यांचा फॉर्म भरून घेवून त्यांना एफटीटीआय, पुणे येथे धाडले आणि तिथून पुढे त्याचा सिनेप्रवास सुरु झाला.

सईद मिर्जा हे एक सशक्त दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात तितकेच ते महत्त्वाचे लेखकही आहेत. आपल्या दिवंगत आईच्या स्मृतींवर आधारित त्यांची ‘अम्मी : लेटर टू अ डेमोक्रेटिक मदर’ (२००८) आणि ‘द माँक, द मूर अॅन्ड मोसेस बेन जालौन'(२०१२) या कादंब-या त्यांच्यातील सशक्त लेखकाची साक्ष देतात. तसेच त्यांच्या स्मृतीलेख, प्रवासवर्णने आणि निबंधांचे संकलन असलेले वर्तमानाच्या  अस्वस्थ समकालाचा दस्तऐवज, ‘मेमरी इन द एज्  ऑफ अम्नीजिया’ (२०१८) ही त्यांच्या बहुआयामी लेखनाची साक्ष देते. 

एक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून सशक्त वास्तववादी कलावंत असण्यासोबतच एक सच्चा संवेदनशील माणूस असलेल्या सईद अख़्तर मिर्जा यांना पुण्यात यावर्षीच्या  दुस-या इंटरनॅशनल कल्चरल् आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टीवलमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमीत्ताने  त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आयोजकांना खूप खूप शुभेच्छा !

Leave a Reply