जनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .

नितीन साळुंखे

परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत असतात.

णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, जॉर्ज ऑरवेल या व अन्य देशविदेशातील लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय ते या सदरातून करून देणार आहेत.

सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते मागील महिन्यात प्रकाशित झाले आहे.

आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने नितीन साळुंखे यांचा हा विशेष लेख प्रसिद्ध करीत आहोत.

……………………………..

परदेशी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या तुलनेत भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही.

याखेरीज आणखी एक विध्वंसक बाब दिसते आहे. बहुजनांच्या हिताचे तत्त्वज्ञान सांगितलेल्या व आचरण केलेल्या महामानवांचे विकृतीकरण केले जाते व संपूर्णतः खोटा प्रचार करून अर्धसत्य सांगून, आणि विकृत मांडणी करून समाजहितदक्ष महामानवांचे विद्रुपीकरण केले गेले आहे. 

शिवाजी महाराज मुस्लीमद्वेष्टे होते, त्यांना हिंदूंचे राज्य स्थापन करायचे होते, ते गोब्राह्मणप्रतिपालक होते असा आणि या स्वरूपाचा संपूर्णतया खोटा, पूर्णतया निराधार आणि विकृत प्रचार केला जात आला आहे व आजही होतो आहे.

भारतातील हिंदुत्ववाद्यांनी शहीदे आझम भगतसिंगांचा वापर केलाच होता. जेंव्हा भगतसिंगांच्या अनुयायांनी व अभ्यासकांनी भगतसिंगांचे, मी नास्तिक का आहे ?, अछुतों का सवाल, आम्ही कशासाठी लढतो ? बॉम्बचे तत्त्वज्ञान हे व असे वैचारिक निबंध प्रसिद्ध करून थोडे फार प्रचारले, तेंव्हा हिंदुत्ववाद्यांनी भगतसिंगांचा वापर थोडा कमी केला.

स्वामी विवेकानंदांचे सुद्धा असेच चालू होते व चालू आहे. त्यांचे बहुजनांच्या हिताचे विचार प्रचारले गेले नाहीत. त्यांनी परिधान केलेली भगवी वस्त्रे आणि धारण केलेल्या नावातील स्वामी हा शब्द प्रचारला गेला. यावरून ते हिंदुत्ववादी व अध्यात्मवादी होते, त्यांनी ऐहिक जगाचा जणू विचारच केला नाही असे सांगितले गेले. हे सारे अर्थातच संपूर्णपणे खोटे आहे.

त्यांनी सांगून ठेवले आहे — मी समाजवादी आहे. जातीभेद पाळणे चूक आहे. वर्षानुवर्षे दडपून ठेवलेल्या समाज विभागांना सामाजिक न्यायाने वागविले पाहिजे. परधर्मद्वेष हिंदू धर्माने सुद्धा शिकवलेला नाही. सर्व धर्मांबाबत आदर बाळगला पाहिजे. सर्व जाती समान आहेत. इत्यादी इत्यादी इत्यादी.

कॉम्रेड आनंद मेणसे यांनी स्वामी विवेकानंदांचे खरे विचार समाजापर्यंत पोचविण्याच्या हेतूने विवेकानंदांच्या विचारांचा व व्यवहाराचा परिचय करून देणारी पुस्तिका लिहिली आहे, स्वामी विवेकानंद कोण होते ? या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ही मांडणी केली आहे.

जनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी हा घाणेरडा खेळ खेळत असतात. अशा व्यक्तींनी कोणतेही विचार मांडले असतील, तरीही ते मूळ विचार दडपायचे. आणि आपल्या सोयीने विकृतीकरण करून समाजासमोर त्यांची फेरमांडणी करायची की जणू हे महामानव यांचेच कार्यकर्ते होते. स्वामी विवेकानंद, सरदार पटेल, शिवाजी महाराज, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस ही यातील काही ठळक उदाहरणे.

स्वामी विवेकानंद यांचा विचार केला तर असं दिसतं की हिंदुत्ववादी मंडळी विवेकानंदांची सामाजिक भूमिका दडवून ठेवत आहेत.  त्यांच्या सामाजिक भूमिकेवर न बोलता, तरुणांनी व्यायाम करावा, शुद्ध चारित्र्य ठेवावे, देशभक्ती जोपासावी असे सांगता सांगता त्यांच्या फक्त अध्यात्मावर भर दिला जात आहे. 

पण मुळात विवेकानंद, अथवा नरेंद्र विश्वनाथ दत्त कसे होते ?

अभ्यासात हुशार. वकिलीचं शिक्षण पूर्ण. बंगाली आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व. बंगाली संगीताची आवड. उत्तम फुटबॉलपटू. चांगले बॉक्सर म्हणून ख्याती. आकर्षक व्यक्तिमत्व. 

रामकृष्ण परमहंस हे तत्त्वचिंतक होते. विज्ञानाला डावलून समाज पुढे जाऊ शकत नाही, याचे त्यांना पूर्ण भान होते. त्यांच्या सहवासात आल्यानंतर विवेकानंदांनी संपूर्ण देश फिरून येथील समाज समजावून घेतला. संत नामदेव, महापंडित राहुल सांकृत्यायन आणि महात्मा गांधी यांनीही संपूर्ण देश फिरून सगळीकडच्या लोकांशी संवाद साधला होता, म्हणून तर ते तिघंही समाजोपयोगी असं लोकोत्तर काम उभं करू शकले.

देशभरच्या प्रवासात विवेकानंदांची भेट जमशेटजी टाटा यांच्याशी झाली. टाटांनी भारतात वैज्ञानिक विचारांचा प्रसार करण्यासाठी एखादी संस्था उभी करावी, अशी अपेक्षा विवेकानंदांनी व्यक्त केली. स्वामीजींचा हा विचार पटला म्हणून टाटांनी बंगळूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था उभी केली. आज ती देशातील अग्रेसर संस्था म्हणून संशोधन कार्यात मौलिक योगदान देत आहे.

अशाच प्रवासात स्वामीजींना लोकमान्य टिळक भेटले. टिळक त्यांना पुण्याला स्वतःच्या घरी घेऊन आले. त्या वेळी पुण्यात संमती वयाच्या कायद्यावरून वैचारिक वादळ उठले होते. लोकमान्यांची भूमिका सामाजिक सुधारणांना विरोध करणारी, प्रतिगामी आहे असं लक्षात आल्यावर, आपल्या आदरातिथ्याबद्दल आपले आभार, एव्हढीच चिठ्ठी ठेवून, दुसऱ्याच दिवशी पहाटे स्वामीजी तेथून निघून गेले.

सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्म परिषद भरत आहे, हे त्यांच्या वाचनात आले. हिंदू धर्माने समुद्र पर्यटन निषिद्ध मानले असल्याने शंकराचार्यांनी तेथे जाण्याचा विचारही केला नव्हता. पण पैशांची व्यवस्था करून, आमंत्रण नसतानाही स्वामीजी तेथे गेले आणि त्यांनी त्या परिषदेतील उपस्थितांची मने जिंकली. 

त्यानंतरही युरोपात फिरून त्यांनी तेथील त्या काळातील निरनिराळे विचारप्रवाह समजावून घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्यांना पत्रे लिहिली, त्यात ते स्पष्टपणे म्हणतात की, मी समाजवादी आहे. समाजवादी समाजव्यवस्थेबद्दल त्यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. समाजवादसुद्धा अजून परिपूर्ण नाही. पण सध्या हीच एक अशी व्यवस्था आहे की, जी प्रत्येक माणसाला किमान दोन वेळच्या जेवणाची हमी देऊ शकते, असं ते म्हणतात.

1896 सालीच त्यांनी, समाजवादी समाजव्यवस्था कोठे आणि कशी प्रस्थापित होऊ शकेल, याबद्दल अभ्यासपूर्ण मांडणी केली होती. मोठा सामाजिक बदल रशिया किंवा चीनमध्ये होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. 1917 साली रशियात, तर 1949 मध्ये चीनमध्ये क्रांती झाली. 

भारतीय समाजाबद्दल ते म्हणतात की, हिंदू समाजातील चार वर्णांपैकी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांनी क्रमाने भारतीय समाजावरील सत्ता भोगली आहे. आता येथून पुढे सत्तास्थानी असतील ते शूद्रच. शूद्र म्हणजे कोण, तर ते म्हणजे येथील श्रमिक. आता भारतातील श्रमिकांना सत्तेत येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, अशी त्यांची मांडणी आहे.

स्वामी विवेकानंद यांचे हिंदू धर्म विषयक विचार —

१. धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय हवा.

२. पुरोहितशाहीने आपल्या देशाचे आणि धर्माचे अतोनात नुकसान केले आहे. म्हणून ही पुरोहितशाही उखडून टाकली पाहिजे.

३. प्रचलित हिंदू धर्म ही अवकळा आलेल्या बौद्ध धर्माची आवृत्ती आहे.

४. भारताला आज धर्मापेक्षा अधिक गरज विज्ञानाची आहे.

५. धर्म की भाकरी, यात भाकरी महत्वाची आहे.

७. भारतात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माची वाढ त्यांनी जबरदस्ती केल्यामुळं नाही, हिंदू धर्मातील वरिष्ठ वर्णीयांनी दलित बांधवांना जी हीन दर्जाची वागणूक दिली, त्यामुळे झालेली आहे.

८. गाय आणि माणूस, यात माणूस महत्वाचा मानला पाहिजे.

९. जो धर्म विधवांचे अश्रू पुसू शकत नाही, पोरक्या, अनाथ मुलांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही अशा हिंदू धर्मावर आणि त्या ईश्वरावर माझा विश्वास नाही.

१०. गरीब आणि खालच्या समाजाच्या लोकांना हिंदू धर्माने जेव्हढे पायाखाली तुडवले आहे, तेव्हढे इतर कोणत्याच धर्माने केलेले नाही.

११. खाणे, पिणे, स्नान असल्या मुद्यांविषयीच्या लोकभ्रमाचे गाठोडे म्हणजे आपला धर्म. अप्रामाणिक आणि ढोंगी पुरोहित जे सांगतात तो आपला धर्म. त्यामुळे आपल्या देशाचे अधःपतन झाले आहे.

भारतात त्यांना परिवर्तन हवे होते. पण कसे ?

१. भारताची खरी समस्या भूक, दारिद्र्य आणि अज्ञान ही आहे. या समाजाचे परिवर्तन व्हायचे असेल तर आधी भुकेचा प्रश्न सोडवावा लागेल. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी समाजवादाचा आग्रह धरतो. 

२. भारतात सर्वत्र आणि सर्वांना शिक्षण मिळायला हवे. समाज अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडला आहे. या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे.

३. आपल्या देशात हिंदू आणि मुसलमान यांच्यात निर्माण झालेली तेढ मिटवायला हवी. मुस्लिमांच्या जेवणाच्या सवयींचा आणि पद्धतींचा आदर केला पाहिजे.

४. स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्ता नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे दुष्काळ, भूक, गरीबी, अज्ञान, दारिद्र्य यांचे निर्मूलन.

५. रोजगारनिर्मितीसाठी ठोस कार्यक्रम आखायला हवा.

६. ज्योतिष आणि कर्मकांड बंद करून विज्ञान आणि तंत्रज्ञानावरच भर दिला पाहिजे.

७. धर्माच्या नावाखाली सुरु असलेली कर्मकांडे बंद झाली पाहिजेत.

८. सामाजिक जीवनात धर्माने हस्तक्षेप करू नये.

हिंदुत्ववादी समाजापुढे मांडतात ते विवेकानंद आणि हे वास्तवातील स्वामी विवेकानंद यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हे वास्तवातील स्वामी विवेकानंद समाजातील प्रत्येकाला आपले वाटतील, असेच आहेत. ज्यांना सखोल अभ्यासाची सवय आणि आवड आहे, त्यांनी ज्येष्ठ संशोधक आणि विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांचे, शोध स्वामी विवेकानंदांचा, हे पुस्तक जरूर आणि आवर्जून वाचावे. मात्र प्रत्येकाने विवेकानंद कोण होते ? हे, प्रा. आनंद मेणसे यांचे छोटे पुस्तक वाचलेच पाहिजे. तरच या दृष्ट्या समाजवादी विचारवंताचे विकृतीकरण जरा कमी होईल !

Leave a Reply