– १ –
थंडी वाढली.जाड लोकरीचे स्वेटर मागवून घेतले ब्रान्डेड. थर्मल वेअर साठी दोनतीन शो रूम्स धुंडाळल्या. सॉक्स,मास्क्स, यांची रंगसंगती पसंत केली. हात शेकण्यासाठी हिटर मागविला. गरम लिंबू पाणी धुण्यासाठी पिण्यासाठी लेमन डार्क टी..
मग देखण्या पोरीला बोलावून नोट्स घ्यायला सांगितले. तीने लिखाणात सुधारणा केली.आंदोलनाचा रीपोर्ताज छापण्यासाठी गेला. लेखाची चर्चा झाली.नोट्स घेत्या पोरीने कालच एफबी पोस्ट करून सायबाला नागवं केलं..
आज तिचा देह अपघातात चोळामोळा झालाय.
ग्राउंड रिपोर्टर लाईव येतायत.
दुसरा सायब गरम खोलीत बसलाय.
बेकारी भोगलेली पण भोगवस्तू न झालेली दुसरी एक पोरगी देखणी घटनेची माहिती देतेय,लवकरच तीला मीडियात बढती मिळेल.असं तिच्या चाली वरून अंदाज लावतोय,भूमिका घेऊन जगणारा फुटकळ नवा मीडियाकर्मी.
कर्मण्ये अधिकारे असता..
– २ –
दिवसभर जयंती कार्यक्रमांचे नियोजन निवेदन करून तो घरी परतला. आज सगळं भारी घडलं होतं. थंडीत मूठभर अंगावर चरबी वाढल्याची उगा जाणीव घेऊन तो परतला घरी.
मुलगी कोपऱ्यात शांतअभ्यासात, बायको ची चिडखोर मुद्रा, आणि आईचा कळवळ्या चा नूर, पैसे किंवा किराणा संपला की असेच वातावरण असते घरी.एवढाच संसार याला कळला होता. त्याने बाजार आणला.पडलेल्या तोंडाला, नूरानी आली. पोटभरल्यावर ढेकर देऊन तो मुलीला फातिमाबद्दल दोनेक ओळीत बोलला.
आई अंगणवाडी त शिकवायची पूर्वी त्याची.
आत्ता कुणाच लक्ष नसतं तिच्याकडं..
– ३ –
पुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली
आणि लेखक मेला.
मोठ्या लोकांना साखर रोग लवकर होतो.
– ४ –
कडू चेहऱ्याने किंचाळून सरकार विरोधी घोषणा दिली त्यानं
ओरडतच कवितेच नाटक केलं त्यानं.
भर रस्त्यावर, रस्त्यांवरल्या माणसांचे प्रश्न मांडत राहिला
दरबदर झाला.
त्याच्या काही दोस्तानी याच्यावर लिहिलं, आर्टिस्टिक कामं केलं, त्यांना सरकारने आपल्या जाहिरातींचे कामं दिलं. रातभर जागून त्यांनी प्रसार केला. ते जगवले गेले
तो मारला गेला.
– ६ –
तो- चला संकल्प करू
मी- नेत्यांचे पाय धरू
तो- तरच जिवंत राहू
मी-नायतर फुकट मरु
तो- चिंता जीवा जाळीते
मी-सत्ता आम्हां पोळीते
तो-चळवळ्या टाळीते
मी-सध्या जीभ लाळीते.🔘
–—————————-
तिथे थंडी आणि पावसाचा कहर सूरूय
तरी ते हटत नाही.
त्यांना सत्तेच खोटं पटत नाही.
पाण्याच्या संघर्षातुनच क्रांतीचा प्रवाह पसरला होता.
यावेळी पाऊसपाण्यातून नव्या क्रांतीची सुरुवात होईल ?!?
– साहिल कबीर