बाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते

– देवकुमार अहिरे

पंजाबच्या भूमीने इंग्रजविरोधी लढ्यात मोठी किंमत चुकवली आहे. हिंदू, मुस्लीम आणि शिखांची एकत्र बहुधार्मिक वास्तव असलेल्या या प्रांतात एकोणिसाव्या शतकात आर्य समाज, सिंग सभा आणि अहमदिया पंथ यांच्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक तणाव – टकराव निर्माण झाले. त्यांच्यातील जमातवादी स्पर्धेमुळे दंगे झाले आणि हिंसाही झाली. म्हणून, विसाव्या शतकाच्या सुरुवातील धार्मिक झापडबंदवृत्तीतून मुक्त होऊन  पंजाबी तरुणांनी राष्ट्रवादी, समाजवादी आणि मार्क्सवादी विचारांची दीक्षा घेतली. पंजाब प्रांतातील अनेक तरुण शिक्षणासाठी युरोपात आणि अमेरिकेत गेले. त्यांचा तिकडच्या साम्राज्यवाद, वसाहतवाद आणि भांडवलशाहीविरोधी  क्रांतिकारी चळवळींशी, अराज्यवादी, समाजवादी, सकल आशियावादी, सकल-इस्लामवादी चळवळींशी ओळख झाली. शिक्षित तरुणांप्रमाणेच पंजाब प्रांतातून नेक मजूर स्थलांतरित झाले होते. त्यांना तिकडे भेदभावात्मक वागणूक मिळत होती. त्यामुळे त्यांनी त्याविरोधात राजकीय चळवळी चालवल्या होत्या. सुशिक्षित बुद्धीजीवी क्रांतिकारक आणि स्थलांतरित मजूर यांच्या राजकीय चळवळींच्या एकत्रीकरणातून गदर पार्टीचा जन्म झाला आणि त्या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते – बाबा सोहनसिंह भाकना! 

Courtsy – The Tribune

कौटुंबिक पार्श्वभूमी- 

         ब्रिटीश भारतातील पंजाब प्रांतामधील अमृतसर जिल्ह्यातील गावात २२ जानेवारी १८७० रोजी बाबा सोहनसिंह भाकना यांचा शेतकरी जाट कुटुंबात आणि शीख धर्मात झाला. भाई करमसिंह हे त्यांचे वडील तर रामकौर ह्या त्यांच्या आई होत्या. सोहनसिंह एका वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आईनेच त्यांचे संगोपन केले. तरुण असतांना त्यांनी आपली सर्व संपत्ती दारू आणि इतर व्यसनांमध्ये विकून टाकली. पुढे, बाबा केशवसिंह यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी व्यसनमुक्ती केली. बिशनकौर त्यांच्या पत्नी होत्या. गुरुद्वारा आणि आर्य समाज शाळेत प्राथमिक शिक्षण, पंजाबी, उर्दू आणि पर्शियन भाषा येत होत्या. 

 शेतकरी लढ्यात सहभाग- 

          १९०० पासूनच पंजाबमधील राष्ट्रवादी चळवळीमध्ये प्रामुख्याने ब्रिटीश शेतकी कायद्यांविरोधात सहभाग सोहनसिंह घेत होते. १९०६-०७ मध्ये शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात पंजाबमध्ये उभ्या राहिलेल्या शेतकरी लढ्यात ब्रिटीशांच्या विरोधात बाबा सोहनसिंह यांनी सहभाग घेतला होता.  उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्थलांतर केले आणि अमेरिकेत गेले. 

गदर पार्टीची स्थापना आणि सोहनसिंहांचे नेतृत्व – 

           १९०९ मध्ये सोहनसिंह अमेरिके स्थलांतरित झाल्यावर सेटल शहरात लाकडी वस्तूंच्या कारखान्यात कामाला लागले. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर भारतीयांचे १९१० च्या पहिल्या दशकात बरेच स्थलांतर होत होते. ब्रिटीश भारतातील पंजाब प्रांतामध्ये मोठ्याप्रमाणात शेती संकट निर्माण झाल्यामुळे लोक स्थलांतर करायला लागले होते. स्थलांतरितांची संख्या वाढल्यामुळे कॅनडामध्ये स्थलांतरितांवर बंधने घालण्यात आली. तसेच, त्यांचे राजकीय अधिकार मर्यादित करण्यात आले. पंजाबी लोक हे ब्रिटीश साम्राज्याचे भाग होते आणि कॅनडासुद्धा भाग होता त्यामुळे पंजाबी लोकांनी सन्मान, अधिकार आणि समान संधीसंबंधी राजकीय चळवळ सुरु केली. कॅनडा सरकारने सक्तीने धोरण राबविल्यामुळे बहुसंख्य लोकांनी कॅनडा सोडला आणि अमेरिकेत स्थलांतरित झाले. पण तेथेही त्यांना समान समस्यांना सामोरे जावे लागले. 

           दरम्यानच्या काळातच अमेरिकेत पांडुरंग खानखोजे, पंडित कांशीराम, तारकनाथ दास आणि भाई भगवान सिंह राजकीय संघटन आणि चळवळ करत होते. खानखोजेंनी पोर्टलँड येथे इंडियन इंडिपेंडंन्स लीगची स्थापना केलेली होती.  भारतीय स्थलांतरीतांमध्ये आकारास येत असलेल्या राजकीय चळवळीमध्ये सोहनसिंह भाकनांनी सहभाग घेतला होता आणि त्यामुळे अमेरिकेतील भारतीय राष्ट्रवादी लोकांची त्यांचा संबंध आला. १९१० च्या जवळपास लंडनमधील इंडिया हाउसमधील चळवळींवर बंधने आल्यामुळे अनेक क्रांतिकारी अमेरिकेतील सन फ्रान्ससिस्कोमध्ये संघटीत होत होते. लंडनमधील प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारी हर दयाळ अमेरिकेत आल्यामुळे बुद्धीजीवी क्रांतिकारी आणि पंजाबी मजूर आणि स्थलांतरित यांच्यात बैठका झाल्या आणि त्यातून गदर चळवळीचा जन्म झाला.

          १९१३ च्या उन्हाळ्यात स्टोकटोन येथे कॅनडा आणि अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय प्रतिनिधी भेटले आणि त्यांनी तेथे ‘ द पॅसिपिक कोस्ट हिंदुस्तान असोशिएशन’ ची स्थापना हर दयाळ, पांडुरंग खानखोजे आणि सोहनसिंह भाकना यांच्या नेतृत्वाखाली झाली. सोहन सिंह भाकना हे संस्थापक अध्यक्ष बनले. सदरील संघटनेमध्ये पंजाबमधून स्थलांतरित झालेले पंजाबी मजूर, कॅलीफोर्निया विद्यापीठातील हर दयाळ, तारकनाथ दास, कर्तारसिंह सराभा, वी. जी. पिंगळे यांच्या सारखे तरुण होते. सन फ्रान्ससिस्कोमध्ये गदर पार्टीच्या क्रांतिकारींनी युगांतर आश्रम स्थापन केला आणि आपल्या चळवळीची भूमिका लोकांपर्यंत जावी म्हणून ‘हिंदुस्तान गदर’ नामक पार्टीचे मुखपत्र काढले. पंजाबी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये आपली भूमिका गदर पार्टीचे लोक प्रसारित करत होते. 

           १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या छायेत भारतीय स्थलांतरितांच्या जहाजाला कॅनडात उतरू दिले नाही. अनेक दिवस जहाजाला समुद्रावरच लटकत राहावे लागले आणि त्यामुळे २० लोकांचा मृत्यू झाला. प्रवास्यांमध्ये हिंदू, मुस्लीम आणि शीख होते. ही घटना कोमागाटा मारू प्रकरण म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे. सदरील घटनेमुळे लोकांच्या मनात  ब्रिटीश सत्तेविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचा राजकीय उपयोग सोहनसिंह भाकना, तारकनाथ आणि मौ. बरकतुल्ला यांनी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी उपयोग करून घेतला आणि म्हणूनच, गदर पार्टीची सदस्यसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली. जर्मनीच्या मदतीने भारतातील ब्रिटीशांची सत्ता काही भारतीय क्रांतिकारक उलथवून टाकण्याची योजना आखत होते. त्यालाच हिंदू- जर्मन कारस्थान असेही म्हटले गेले. गदर पार्टीच्या क्रांतीकारकांचा सुद्धा यामध्ये सहभाग होता. त्यानुसारच बाबा सोहनसिंह भाकना काही क्रांतीकारकांना घेवून जहाजाने कलकत्तामार्गे भारतात येण्यासाठी निघाले आणि अफगाणीस्तानात राजा महेंद्र वर्मा, मौ. बरकतुल्ला आणि मौ. ओबेदुल्ला सिंधी यांनी गदर पार्टीच्या वतीने हंगामी सरकार स्थापन केले होते. 

         ब्रिटीश सरकार गदर क्रांतीकारकांवर पाळत ठेवून होते. त्यामुळे त्यांच्या गुप्तचर विभागाला उठावाची वार्ता कळाली आणि त्यांनी सोहनसिंह भाकना यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सगळ्या क्रांतीकारकांना १३ ऑक्टोबर १९१४ रोजी कलकत्तामध्ये अटक करण्यात आली आणि मुलतानच्या केंद्रीय कारागृहात पाठवण्यात आले. ब्रिटीश सरकारविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली म्हणून सगळ्यांना त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली. यालाच लाहोर कारस्थान प्रकरण म्हटले गेले. १० डिसेंबर १९१५ मध्ये त्यांना अंदमान पाठवण्यात आले. 

कारागृहातील उपोषणे आणि भगतसिहांची भेट- 

          १९१५ ते १९२१ ही सहा वर्ष सोहन सिहांनी अंदमानातील काळ्या  पाण्याच्या कारागृहात काढली. १९२१ मध्ये सोहन सिहांना कोईम्बतूर कारागृहात पाठविण्यात आले आणि तेथून पुण्यातील येरवडा कारागृहात पाठविण्यात आले. या काळात शीख कैद्यांना पगडी बांधण्याची परवानगी द्यावी यासाठी उपोषण केले. पुढे, १९२७ मध्ये त्यांना लाहोरच्या केंद्रीय कारागृहात हलविण्यात आले. कारागृहात  तथाकथित उच्चजातीय शीख आणि तथाकथित कनिष्ठ जातीय मजहबी शिखांना वेगवेगळे जेवण देण्यात येत होते म्हणून सोहन सिहांनी पुन्हा उपोषण केले. १९२८ मध्ये सोहनसिंह भाकना आणि भगत सिंह यांची भेट झाली. त्यावेळी सोहनसिहांनी भगतसिहांना प्रश्न विचारला की, “ एवढ्या लहान वयात तू कारागृहात का आला.” त्यावेळी, भगतसिंह म्हणाला की, “ यात माझी काहीही चूक नसून तुमची चूक आहे.  कर्तारसिंह सराभा आणि इतरांनी हसत हसत मृत्यूला जवळ केले नसते आणि तुमच्यासारखे लोक नरकयातना भोगूनही येथे उभे राहिले नसते, तर मी इकडे कधीही आलो नसतो.”  १९२९ मध्ये भगतसिहांच्या समर्थनात त्यांनी उपोषण केले होते.

कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेत सहभाग- 

            १९३० मध्ये कारागृहातून बाहेर आल्यावर इतर बहुसंख्य क्रांतीकारकांप्रमाणे बाबा सोहन सिंह भाकना सुद्धा कम्युनिस्ट पार्टीत सहभागी झाले. १९१७ मध्ये रशियन राज्यक्रांती झाल्यामुळे आफ्रिका आणि आशियाई देशांमध्ये मार्क्सवादाचा मोठा प्रसार झाला. जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये कम्युनिस्ट पार्ट्या स्थापन झाल्या. काही भारतही स्वतंत्र कम्युनिस्ट पार्टी स्थापन झाली होती. तसेच, १९३० च्या दशकात कॉंग्रेस पक्षाच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांवर मार्क्सवाद आणि समाजवादाचा प्रभाव पडला होता. अशा काळात कारागृहातून बाहेर आलेली क्रांतीकारी मंडळी मार्क्सवादी बनत होती. सोहन सिंह त्यापैकी एक होते. शेतकरी पार्श्वभूमी असल्यामुळे सोहन सिंह किसान सभेच्या कामात सक्रीय झाले आणि त्यांनी १९४३ मध्ये आपल्या भाकना गावात ‘ अखिल भारतीय किसान सभे’चे आयोजन केले. ब्रिटीश राज्यात कम्युनिस्ट पार्टीवर बंदी होती. तसेच, सगळ्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर ब्रिटीशांची पाळत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दुसऱ्यांदा बाबा सोहन सिहांना कारागृहात टाकण्यात आले. कारागृहात तीन वर्ष घालून सोहन सिंह बाहेर आले. तोपर्यंत, देशात वासाहतिक धोरणांनी आणि जमातवादी राजकारणाने धर्मांधतेचा द्वेषाणूने दंगली घडवल्या आणि देशाची फाळणी केली. सोहन सिहांच्या कम्युनिस्ट पार्टीने जमातवादी हिंसा थांबविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण. शेवटी देशाची आणि पंजाबची फाळणी झालीच! 

स्वातंत्र्योत्तर भारत, श्रमिकांचा युटोपिया आणि सोहन सिंह भाकना –  

        १९४७ मध्येच फाळणी आणि स्वातंत्र्य एकदाच मिळाले. फाळणी, जमातवादी दंगे आणि हिंसा यामुळे श्रमिक जनता देशोधडीला लागत होती आणि भारतातील सत्ताधारी वर्ग आनंदोत्सव साजरा करत होता.  अशी ही विरोधाभासी स्थितीमुळे तत्कालीन भारतात बरीच मंडळी होती की, त्यांना ब्रिटीश गेल्यामुळे आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले असे वाटत नव्हते. राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही असे म्हणणारी मंडळी प्रामुख्याने मार्क्सवादी आणि समाजवादी होती. कॉंग्रेसप्रणीत सरकारवर भांडवलदार वर्गाचा प्रभाव वाढत आहे म्हणून त्यांनी कॉंग्रेसविरोधी आघाडी उघडली. काही ठिकाणी सशस्त्र लढा सुरु झाला तर काही ठिकाणी जनआंदोलने सुरु झाली. त्यामुळे स्वातंत्र्य भारतात पुन्हा बाबा सोहन सिंह आणि त्यांच्या कॉम्रेड साथींना कारागृहात जावे लागले. त्यासंदर्भात बाबा सोहन सिंह म्हणतात की, “अंग्रेजी हुकुमत सानू झुका ना सकी, पर अपनी सरकार ने कंबर कुबी कर दी. ( इंग्रजांचे सरकार आम्हाला वाकवू शकली नाही पण आपल्याच सरकारने आमचे कंबर मोडून टाकले)” 

         सगळ्यांना नोकरी, शिक्षण आणि आरोग्याची उपलब्धी असेल आणि सर्व समान असतील अशा समाजाची स्वप्ने बाबा सोहन सिंह भाकनांनी पाहिले होते. २१ डिसेंबर १९६५ मध्ये त्यांचे निधन झाले. परंतु, त्यांच्या स्वप्नातील भारत अजूनही साकार झालेला नाही. सामाजिक- आर्थिक विषमता वाढत आहे. धार्मिक- जातीय द्वेष पसरवला जात आहे. लोकांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जात आहेत आणि देशातील आणि पंजाबातील शेतकरी अजूनही सन्मान आणि अधिकारासाठी लढत आहे. अशावेळी, आपण सर्वांनी बाबा सोहनसिंहांच्या स्वप्नपूर्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने झटले पाहिजे. 

………

आधुनिक भारताच्या जडणघडणीत अनेक प्रकारच्या वैचारिक घुसळणीचा आणि बौद्धिक परंपरेचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे आधुनिक भारतातील आणि स्वातंत्र्य चळवळीतील लोकांवर एकदाच स्थानिक, राष्ट्रीय आणि वैश्विक अशा अनेक विचार परंपरेचा प्रभाव राहिलेला होता. त्यामुळेच ब्रिटिश काळात भारतातील अनेक स्वातंत्र्य आणि समतेसाठी लढणारी लोक देश – विदेशातील लोकलढे आणि लोक चळवळी यांच्यासोबत राजकीय आणि वैचारिक नाते जोडत होते म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर अशा वैचारिक परंपरा आणि प्रभाव यांना समजून घेतले पाहिजे. त्यासाठी ” व्यक्ती, विचार आणि विश्व “ या पाक्षिक सदरात देवकुमार अहिरे भारतातील आणि भारताबाहेरील वेगवेगळ्या व्यक्तींविषयी लिहीत आहेत.

_______________________________________

या सदरातील याआधीचे लेख …

सकल इस्लामवाद, समाजवाद आणि भारतीय राष्ट्रवादातील संपर्कबिंदू – क्रांतिकारी मौलाना बरकतुल्ला

मार्क्सवादी चिंतक,समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य – नरेंद्र देव !

Leave a Reply