मनोरंजनाचा हा काळ दीर्घ नसावा एवढीच सामूहिक प्रार्थना – साहिल कबीर

१ .

क्रूर जनावराने कापसाचे मऊ मुलायम बूट शिवले. मातीवर आपल्या खुणा राहू नयेत म्हणून त्याने ही शक्कल केली.

एका माणसाने दाढी वाढविली.
चरखा घेतला चित्रण केलं.
छायाचित्रातून आपली इमेज प्रोफाइल गोड केली.

एकाने रक्तमाखल्या हातांना रेशमी वस्त्रानी झाकून घेतलं.

एकाने तर अख्ख्या मीडिया च्या
बोलघेवड्यांना चतुर कोल्हे बनवलं.

बनवाबनवी चालत राहिली.
गिधाडाचे भाउबंद कूत्राखुळी माणसं, घुबडाचे सख्खे सगळ्यानी आपला पेहरावा केला.
शेवटी जंगलातल्या प्राण्यांनी या दशकाचा निषेध केला.

मग बहुरूप्यानी जंगल जाळायला सुरुवात केली. वृक्षकत्तली केल्या.
मेल्या वाघाचे रूप पांघरन्याचे धाडस मात्र त्यांना झाले नाही.

२.

हातांना बेड्या ठोकल्या..
जे हात सत्तेच्या विरोधात आणि सत्याच्या बाजुने लिहीत होते.


मग सत्य बोलणाऱ्यांना मांडलिक करण्याच्या अपयशी प्रयत्नांनी थकून त्यांना ठोकण्यात आले.
गोळ्या झाडण्यात आल्या.


उरल्यासुरल्या भोळ्याखुळ्या नागरिकांना झापडं लावण्यात आली. मेंदूत भुसा भरून शो पीसी करण्यात आलं प्रचंड लोकसंख्येला. व्यवस्थेच नवं सॉफ्टवेअर डेव्लप झालं.


लोकांनी लोकांसाठी अतीद्वेष ठेवण्याच्या बैठका परिषदा दले परिवार निर्माण झाले. उरले मोजके ते पुस्तकी बाता मारत आपला गिल्ट शमवू लागले.
मग ऐसपैस पैश्या चे नियम आले.
रंगा प्रतिमांची वाटणी झाली. पोटाचा खड्डा गहिरा खोल झाला. जिव्हाळ्याची ओल संपली. व्यवस्था धर्म जाती ची नशा पुरवू लागली. म्हणेल ती दिशा पूर्व झाली.

तो- लिही की पुढं
मी- हे संपणार नै.
तो-संपेल रे लवकर
मी- किती शहीद झाल्यावर?
तो- तू आणि मी शहीदल्या वर
मी- आज बरं वाटल बघ मला.
तो-व्हय, का?
मी- आज तू स्वतःला माझ्या सोबत ठेवलास म्हणून
तो- देर आए दुरुस्त आए..
………………………………..

तो- अरे आंदोलनाला परवानगी सहज मिळाली

मी-मग आंदोलन उपयोगाच नाही.
तो-कस काय?
मी-
ज्याला ही सत्ता जागा देते आणि परवानगी ही देते.त्या आंदोलनाचे कोणतेही मूल्य नाही.
तो- पण मी आलोय ना रस्त्यांवर.
मी- होय, पण दिल्ली अभी दूर हैं!
तो-व्हय खरयं,संसदभवन कुठं
दिसेना!
मी- नवं उभं राहील, पायाभरणी
शुध्द शुचीर्भुत पावन झाली
आहे.धार्मिक मंत्रोंचारानें..
तो-घटना तर धर्मनिरपेक्षतेचे मूल्य
सांगते ना!
मी- येवढं जरी समजलं तरी लढू
आपण.
……………………………………..


पूर्वी इतिहासातल्या कथातून राजे, बादशहा वेषातर करून प्रजेची विचारपूस आणि आपल्या कार्याची तपासणी करायचे.
आता जनतेला वेठीस धरून बहुरूपी वैताग आणतोय.
मनोरंजनाचा हा काळ दीर्घ नसावा एवढीच सामूहिक प्रार्थना करून बहुरुप्याच्या विश्वासघाती रुपांचे आंदोलकांनी दहन केले.


मूठभर माती देऊन सरळ मातीची क्षमा मागितली.

बहुरूपी निर्लज्जपणे रूपं बदलतोय. चलाख आणि माहिर आहे तो.
नसिरुद्दीन च्या गोष्टीतला गाढव याच्यापेक्षा समजदार होता येवढं मात्र खरं!▪

Leave a Reply