सातारा येथील प्रा. अजित साळुंखे लिहीत आहेत क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या प्रतिसरकारची कथा..
दर महिन्याच्या शेवटच्या व दुसऱ्या रविवारी त्यांचा साप्ताहिक लेख असंतोष च्या वाचकांसाठी प्रसिद्ध होईल..
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातले एक असामान्य व्यक्तिमत्व होते. सत्यशोधक चळवळीतून ते तावून सुलाखून निघालेले असल्याने अंधश्रद्धाविरोधी आणि समतावादी असे त्यांचे व्यक्तित्व होते.
सगळं घर वारकरी संप्रदायाचं होतं ! नानांच्या गळ्यात लहानपणीच माळ घालण्यात आली. भजन कीर्तनाचा त्यांना लहानपणापासूनच नाद होता. ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा ,रामायण, महाभारतातल्या कथा जिभेवर होत्या. कुस्तीचा खूप नाद होता. जबरदस्त कमावलेलं शरीर आणि पहाडी बुलंद आवाज लोकांना प्रभावित करत असे.

ते स्वतः एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते आणि त्यामुळे स्वतः कष्ट करणाऱ्या सर्व लोकांबद्दल त्यांना अतिशय प्रेम व जिव्हाळा होता.
त्यांना सारे अण्णा म्हणत असत.
त्याकाळातील सरकारी अधिकारी असलेली तलाठ्याची नोकरी सोडून नानांनी गांधीजींच्या हाकेला ओ देऊन स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. सामान्य लोकांना,शेतकऱ्यांना त्यांच्याच भाषेत ते समजावून सांगत असत.
१९३० साली ‘रेठरेधरण’ येथे नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह झाला. नाना पाटलांनी महात्मा गांधींचा जयघोष करून विळयाने गवत कापले व नंतर हजारो लोकांनी पण गवत कापले. पोलिसांच्यासमोरच ही घटना घडली पण नाना तुरी देऊन निसटले. बिळाशीच्या जंगल सत्याग्रहात पण त्यांनी भाग घेतला व सातशे पोलिसांसमोरून ते निसटले. त्यांच्यावर दोन पकड वॉरंट लागू होती पण ते पोलिसांना सापडत नव्हते!
१९३२ साली गांधीजींनी पुन्हा कायदेभंग चळवळ सुरू केली. या चळवळीत भाग घेतल्याबद्दल प्रथमच त्यांना अटक झाली. पॅरोलवर सोडल्यावर त्यांनी पुनः कायदेभंग केला. नानांना आता येरवडा जेलमध्ये सहा महिने सक्तमजुरी व १०० रु. दंडाची शिक्षा झाली!
आपल्या २३ जाने. १९३२ च्या रिपोर्टमध्ये सातारा मॅजिस्ट्रेट नानांना अटक केल्यावरचा अहवाल लिहितो.
“ …… कायदेभंगाच्या चळवळीतील अत्यंत त्रासदायक आणि अत्यंत जहाल वक्ता नाना रामचंद्र पाटील, ज्याचे नाव मी स्पेशल लिस्टमध्ये घालत आहे…”
पुढच्या १० वर्षांत नाना पाटलांनी एकूण आठ वेळा तुरुंगवास व सक्तमजुरीची शिक्षा भोगली. कित्येकदा एका शिक्षेतून सुटून आल्या आल्या ते लगेचच पुढच्या सत्याग्रहात भाग घेत असत व त्यांची परत रवानगी येरवडा जेलमध्ये होत असे ! या तुरुंगाच्या वाऱ्यांनी त्यांचे आधीच कणखर असलेले मन आता पोलादी बनले.
या काळात नानांनी जबरदस्त वाचन केले. येरवडा या माहेरघरात त्यांनी सचिंद्रनाथ संन्याल यांचे “बंदी जीवन” , शहीद भगतसिंगचे “अखेरचा संदेश” ,“ए बी सी ऑफ सॅबोटाज्”, थॉमस पेनचे चरित्र असे अनेक ग्रंथ वाचून त्यांचे मनन केले. या तुरुंगातील शाळेत त्यांना साने गुरुजी, विनोबा , एस. एम. जोशी,आचार्य नरेंद्र देव, अच्युत पटवर्धन आदि कॉंग्रेस पक्षातील समाजवादी नेत्यांचा सहवास मिळाला.सर्व वर्तमानपत्रे बारकाईने वाचून त्यांची टिपणे काढण्याची त्यांना तुरुंगात लागलेली सवय अखेरपर्यंत टिकून होती. त्यांचे अक्षर अत्यंत वळणदार व मोत्यासारखे होते.

त्यावेळच्या सातारा (आताचा सातारा व सांगली) जिल्ह्यात नाना पाटलांचे नाव जोराने गाजू लागले होते.
या नेत्याचे अमोघ भाषण ऐकण्यासाठी वीस वीस किलोमीटरची पायपीट करून खेड्यापाडयातून हजारो लोक जिवाचा कान करून प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी येऊ लागले होते. . . !! त्यात केवळ खेड्यातली जनताच नव्हती तर नामवंत वकील, डॉक्टर , प्राध्यापक इ. उच्चशिक्षित पण होते.
१५ सप्टें. १९४१ रोजी नाना पाटील यांना हणमंत वडिये येथे सत्याग्रह करताना अटक केल्यावरचा सातारा पोलिस प्रमुखाचा मॅजिस्ट्रेटला दिलेला गुप्त अहवाल सांगतो, – येडेमच्छिंद्र गावचा नाना पाटील याची ८००च्या जमावाने ६९ बैलगाड्यांची मिरवणूक काढून चरखा देऊन व सुताचा हार घालून सत्कार केला. तेव्हा त्याने केलेले भाषण असे होते,
“मी आठच दिवसांपूर्वी जेलमधून सुटलो आहे. सत्याग्रहाची माझी सहावी वेळ आहे…”
जालियनवाला बाग घडामोडीची त्याने माहिती दिली आणि पुढे सांगितले की ,
“ब्रिटिश सरकार लोकांना युद्धासाठी मदत मागत आहे. श्रीमती ह्युलंड यांनी लोकांनी दागिने द्यावेत असे सांगितले आहे. पण आत्ता लोकांकडे सरकारला देण्यासाठी सोने नाही. लोकांनी कॉंग्रेसचे आदेश पाळावेत असे आवाहन करून वक्ता नाना पाटील याने मोठी आरोळी ठोकून लोकांना सांगितले की, “हे युद्ध लोकशाहीसाठी नसून साम्राज्यवाद्यांसाठी आहे. सरकारला या युद्धात माणसांची किंवा पैशांची कोणतीही मदत करू नका !”
१९४२ची चले जाव चळवळ सुरू झाली, तेव्हापर्यंत वारकरी आणि सत्यशोधकी विचारांनी भारावलेल्या, बलदंड देहाच्या पहिलवान असलेल्या एका भोळ्याभाबड्या तरुण कार्यकर्त्याचे रूपांतर एका अत्यंत ध्येयनिष्ठ, जहाल क्रांतिकारी नेत्यामध्ये झाले होते !
इस्लामपूर, वडूज गोळीबार
८ ऑगस्ट १९४२. चले जाव आंदोलन सुरू झाले. देशभर प्रमुख नेत्यांची धरपकड सुरू झाली.
आता लढाई होती , ‘ करेंगे या मरेंगे’ , ‘चले जाव’. देशभर प्रमुख नेते , कार्यकर्ते यांची धरपकड झाली. पण भारतभर महात्मा गांधींचा आदेश पाळून ब्रिटिशविरोधी सत्याग्रहांची सुरुवात झाली. हे काही केवळ तुरुंग भरण्याचे आंदोलन नव्हते, तर देशभर ब्रिटिश सत्तेची प्रतीके व सरकारी कचेऱ्या प्रत्यक्ष ताब्यात घेण्याचे आंदोलन होते.
९ ऑगस्ट पासूनच नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, जी. डी .लाड, वसंतदादा पाटील ,बर्डे गुरुजी,पांडू मास्तर, धोंडीराम माळी इ .सातारा जिल्ह्यातील प्रमुख मंडळी भूमिगत झाली. पण भूमिगत राहूनही चले जाव चळवळ चालू ठेवायची होती.
नाना पाटील व त्यांचे सहकारी यांनी सातारा जिल्ह्यात सत्याग्रहांची मालिका सुरू केली.
गावेच्या गावे बैठकांनी व सभांनी ढवळून काढून खूप मोठे मोर्चे काढायचे असं निर्णय झाला.
पहिल्यांदा ३ सप्टेंबर १९४२ ला तासगावच्या तहसील कचेरीवर शांततामय मोर्चा काढण्यात आला. किर्लोस्करवाडी,पलूस ,कुंडल,बांबवडे या भागातून एक, भिलवडी,येळावी,अंकलखोप या भागातून दुसरा तर सावळज,पदमाळे, कुमठे मधून तिसरा असे मोठे गट तयार करून सुमारे १०,००० लोक त्यात सहभागी झाले. लोकांनी तासगावातून घोषणा देत मिरवणूक काढली व दिवाणी कोर्टाच्या न्यायाधीशांनी गांधी टोपी घालून स्वतः राष्ट्रीय निशाण फडकावले. नंतर मामलेदार कचेरीत जाऊन युनियन जॅक खाली उतरवला व राष्ट्रीय झेंडा लावला.
या सर्व मोर्चाचे नियोजन नाना पाटलांनी केले होते. मोर्चाचे प्रत्यक्ष नेतृत्व कृष्णा कुऱ्हाडे हे करत होते. आता आंदोलकांचा उत्साह प्रचंड वाढला. नंतर लगेचच कराडलाही यशस्वी मोर्चा निघाला. नाना पाटील पायाला भिंगरी लावून हिंडू लागले. त्यांची अमोघ वाणी लोकांना संघटित करू लागली. पोलिस त्यांच्या मागे मागे धावू लागले.
याच प्रकारे पुढील ८ सप्टेंबर च्या मोर्चाची तयारी इस्लामपूरमध्ये करण्यात आली. नाना पाटील व त्यांचे सहकारी रात्रंदिन त्यासाठी जनजागृती करत होते.
शेकडो लोक इस्लामपूरमध्ये सत्याग्रहासाठी जमा होऊ लागले. नाना पाटील यांच्या जीवाला धोका होणार असल्याची बातमी निकटच्या कार्यकर्त्यांना लागल्यावर त्यांनी नानांना वेशीबाहेरच थांबवून ठेवले.
इकडे कराड व तासगावचे मोर्चे यशस्वी झाल्याने ब्रिटिश संतापले होते व त्यांनी सत्याग्रहींवर हिंसक कारवाई करायची आणि हा उठाव पूर्ण मोडून काढायचा असे ठरवले होते.
शांतपणे शेकडो लोक शिस्तीत व रांगेत पुढे निघाले. त्यांच्या हातात कॉँग्रेसचा झेंडा होता. महात्मा गांधीकी जय , ब्रिटिशांनो चालते व्हा, चले जाव इत्यादि घोषणा करीत लोक पुढे चालू लागले. शेकडो सशस्त्र पोलिसांनी त्यांना घेरलेले होते. एक पाऊल जरी आता पुढे टाकले तरी कारवाई केली जाईल अशी घोषणा पोलिसांनी केली.गोविंदराव खोत ,उमाशंकर पंड्या, विष्णु बारबट्टे हे अग्रभागी होते. चार -पाच हजार लोकांच्या या मोर्चावर पोलिसांनी अचानक गोळीबार सुरू केला. किर्लोस्करवाडी कारखान्यातील इंजिनीअर पंड्या आणि विष्णु बारबट्टे हे छातीत गोळ्या लागून ठार झाले तर पंधरा लोक जखमी झाले. एकच पळापळ सुरू झाली. कॉँग्रेसचे सर्व प्रमुख नेते तुरुंगात असल्याने हिंसेचा वापर करून ही चळवळ दडपता येईल असे ब्रिटीशांना वाटत होते.
नाना पाटलांना हे समजल्यावर जोरदार धक्का बसला. पण लोकांची चळवळ चालू ठेवणे आवश्यक होते. दुसऱ्याच दिवशी वडूजला मोर्चा होता.परशुराम घार्गे,गौरीहर सिंहासने व बंडोपंत लोमटे यांनी तयारी केली होती.
दि. ९ सप्टेंबर १९४२. सकाळी सहा वाजता जयरामस्वामीचे वडगाव इथून १५०० लोक चालत वडूजकडे मोर्चाने निघाले. हा मोर्चा वाटेत वाढत गेला आणि सकाळी ११ वा. वडूजमध्ये पोचला. दुपारी १२ ला मोर्चा कचेरीजवळ पोचला. मामलेदार अंकली आणि फौजदार बिंडीगिरी यांनी एक पाऊलही पुढे टाकाल तर याद राखा , मागे फिरा अशी घोषणा केली.
स्तब्ध जमावातून हाती झेंडा घेतलेला परशुराम पहिलवान पुढे झाला. त्याबरोबर पोलिसांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. परशुराम छातीत गोळ्या लागून खाली कोसळला. त्यापाठोपाठ पोलिसांनी जबरदस्त गोळीबार सुरू केला. परशुरामच्या कवटीत दुसरी गोळी शिरली. गोळ्यांचा पाऊस निःशस्त्र जमावावर झाल्याने पाच जण जागेवर ठार झाले तर चार जणांना वाटेतच मृत्यू आला. नऊ जण ठार झाले तर एकूण ७० लोक जखमी झाले.अरविंद व अशोक लोमटे ही तरुण मुले पायातून गोळ्या गेल्याने अपंग झाली.

परशुराम श्रीपति घार्गे, किसन भोसले, बलभीम आणि बाळकृष्ण खटावकर,खाशाबा शिंदे, सिदू पवार,राम सुतार ,श्रीरंग शिंदे ,आनंद गायकवाड या नऊ जणांचे देह दहिवडीला नेऊन त्यांच्यावर कोणतेही नातेवाईक जवळ नसताना अंत्यसंस्कार करण्यात आले.
परशुराम पहिलवान सारख्या ताकदीच्या अनेक बिनीच्या कार्यकर्त्यांचा, जिवाभावाच्या सहकाऱ्यांचा असा हकनाक मृत्यु नाना पाटलांची झोप उडवणारा होता. ते तळमळू लागले. डोळ्यांना धारा लागल्या.
लोकांच्या निःशस्त्र मोर्चांनी केवळ प्राणहानीच होणार होती. सर्व राष्ट्रीय नेते तुरुंगात होते. आता स्वतःच निर्णय घेण्याची वेळ होती.
आत्तापर्यंत मोठ्या अहिंसक चळवळीला ब्रिटिश सत्ता सनदशीर मार्गाने प्रतिसाद देत होती. पण आता त्यांनी रणनीती बदलली होती. . .
चळवळीची पण रणनीती बदलण्याची वेळ आली होती.
सर्व अहिंसक सत्याग्रह थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला !
…… मात्र आता हे ब्रिटिश सत्तेचे जोखड संपूर्णपणे फेकून देऊन या भूमीत स्वतःचे लोकराज्य स्थापन करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी घेतला !
आपल्या शेकडो साथीदारांसह नाना पाटील भूमिगत झाले.
भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व सुरू होत होते.
सातारा जिल्ह्यात वणवा पेटायला लागला होता.
भारताच्या एका कोपऱ्यातील असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांत एक सिंह गर्जना होणार होती, जिचा आवाज सर्वश्रेष्ठ अशा ब्रिटिश सत्तेच्या पार्लमेंटपर्यन्त घुमणार होता . . .!!!
क्रांतिसिंह जन्माला आलेला होता ! ही नव्या इतिहासाची सुरुवात होती.
प्रतिसरकारची पहाट झाली होती ! !