मातीगारी : स्वातंत्र्याच्या स्वप्नभंगाची आणि मन मेलेल्या मुर्दाड माणसांची गाथा

परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत आहेत.

सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते मागील महिन्यात प्रकाशित झाले आहे.

णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, जॉर्ज ऑरवेल या व अन्य देशविदेशातील लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय ते या सदरातून करून देणार आहेत.

त्याने उजव्या हातात ए के 47 पेलली …

या वाक्याने सुरुवात होणारी एखादी गोष्ट, कादंबरी वाचताना वाचणाराच्या मनात, पुढे काय होणार, किंवा असणार, याबद्दल एक चित्र आकार घेऊ लागतं. आणि जसं पुढं वाचत जाईल तसं ते चित्र, बाह्याकार कायम ठेवून, आतील आकार थोडे थोडे बदलत, त्यात रंग भरत जातं.

ही गोष्ट आहे एका क्रांतिकारकाची.

जो आधी त्याचा देश स्वतंत्र करण्यासाठी लढला.

आणि नंतर, लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी भांडवलदारी, सरंजामी शक्तींशी लढला.

परदेशी भांडवलदार आणि त्याचा देशी नोकर यांच्याशी दऱ्या, डोंगरांत दीर्घकाळ लढून, त्यांना संपवून तो क्रांतिकारक त्याची शस्त्रे शहराबाहेर जंगलात झाडाखाली पुरून ठेवतो. आणि बायको मुलांसह इथून पुढचा काळ स्वतःच्या घरात शांततेनं राहायचं म्हणून काडतुसांचा पट्टा काढून ठेवून शांततेचा पट्टा कमरेला बांधून परत येतो.

स्वतःच्या घरी.

पण तिथे दुसरंच कोणी आहे.

त्या परदेशी भांडवलदाराच्या मुलानं त्याच्या वडिलांनी या क्रांतिकारकाचं हडपलेलं घर त्या भांडवलदाराच्या नोकराच्या मुलाला विकलं आहे. त्या नोकराच्या या मुलाला सगळ्या स्थानिकांनी वर्गणी काढून पैसे गोळा करून परदेशी शिकायला पाठवलं होतं. पण, स्थानिक लोकांच्या पैशातून उच्च शिक्षण घेऊन आलेला देशी नोकराचा हा मुलगा, आणि त्या परदेशी भांडवलदाराचा मुलगा हे दोघे आता तिथले मळे, शेतं, कारखाने, शेतमाल प्रक्रिया केंद्रं या सगळ्याचे मालक झाले आहेत. त्या देशाचा प्रमुख त्या दोघांच्या तालावर नाचतो आहे. त्यामुळे त्याचे मंत्री आणि लष्कर आणि पोलीस आणि न्याय यंत्रणा हे सगळे मिळून या दोघांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी तेथील स्थानिक जनतेवर अत्याचार करताहेत.

नाही. ही कोणत्याही विशिष्ट देशाच्या, दोन भांडवलदारांच्या स्वार्थासाठी देश विकायला काढलेल्या प्रमुखाची, अथवा त्याच्या इशाऱ्यावर त्या देशातील शेतकरी, मजूर, कामगार, विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, लेखक, विचारवंत यांच्यावर अकारण अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांची, अथवा त्या दडपशाहीला पाठीशी घालणाऱ्या न्याययंत्रणेची गोष्ट नाही. 

कारण गोष्ट सांगायला सुरुवात करण्यापूर्वीच वाचकांना सांगितलं गेलेलं आहे —

— ही गोष्ट काल्पनिक आहे.

— यातील घटना काल्पनिक आहेत.

— यातील व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत.

— यातील देश काल्पनिक आहे. त्याला नाव नाही.

    वाचक त्यांच्या पसंतीनुसार कोणताही देश या गोष्टीत     

    घेऊ शकतात.

— यातील काळ निश्चित नाही. 

    काल, परवा, मागच्या आठवड्यात … 

    मागच्या वर्षी …

    किंवा मग दहा वर्षांपूर्वी ?

    वाचक त्यांच्या पसंतीनुसार यातील काळ ठरवू 

    शकतात.

— आणि यातील स्थळ सुद्धा निश्चित नाही.

    येथे. किंवा तेथेही …

    हे खेडे. किंवा तेही …

    हा प्रदेश. किंवा तोही …

    वाचक त्यांच्या पसंतीनुसार स्थळ ठरवू शकतात.

— आणि, या गोष्टीत वेळही निश्चित ठरलेली नाही.

    ना सेकंदात

    ना मिनिटांत

    किंवा तासांत

    अथवा दिवसांत …

    वाचक त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही घटनेसाठी    

    कितीही वेळ देऊ शकतात …

हे सगळं तुम्हाला मान्य असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.

केंव्हातरी एकदा, कोणतंच नाव नसलेल्या एका देशात …

असं म्हणून या गोष्टीला सुरुवात होते.

व्यक्तिरेखा, देश, काळ, स्थळ, वेळ काहीच निश्चित नाही. आणि वाचक त्यांच्या पसंतीनुसार हे सगळं ठरवू शकतात, याचा दुसरा अर्थ असा की, ही गोष्ट कोणत्याही देशातील कोणत्याही काळातील व्यक्तिरेखांना लागू होऊ शकते. मागील काही वर्षांत जगभरातच उजव्या, प्रतिगामी, भांडवलदारी, सरंजामी शक्तींना मिळणारे वाढते बळ पाहता, आणि मुर्दाड मनाच्या लोकांचे वाढते प्रमाण लक्षात घेता ही गोष्ट जगातील कोणत्याही देशात घडू शकते.

देशभक्तीच्या आणि लोकांच्या कल्याणाच्या नावाखाली ठराविक लाडक्या बड्या भांडवलदारांना देश विकायला उत्सुक असलेल्या राष्ट्रप्रमुखाची ही गोष्ट आहे.

प्रमुखाचा कल लक्षात घेऊन त्यानुसार सामान्य माणसाला चिरडणाऱ्या, आणि तसं करताना सामान्य माणसाच्या हितासाठी आणि देशासाठीच हे सगळं करावं लागत आहे असं बजावणाऱ्या मंत्र्याची ही गोष्ट आहे. 

प्रमुख आणि मंत्री यांचा कल लक्षात घेऊन त्यांना हवा तसाच निकाल देणाऱ्या न्याययंत्रणेची ही गोष्ट आहे.

या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन क्षुद्र स्वार्थासाठी लोकांना छळण्यात आनंद मानणाऱ्या पोलीस यंत्रणेची ही गोष्ट आहे.

त्याहीपेक्षा जास्त, हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत राहणाऱ्या, स्वतःवर थेट काही येत नाही तोवर निव्वळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या, राज्यकर्ते आणि यंत्रणा यांच्या असामाजिक अथवा समाजहितविरोधी कृत्यांबद्दल निषेधाचा सूरही न उमटू देण्याची काळजी घेणाऱ्या, व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही कोणतीच भूमिका न घेणाऱ्या मुर्दाड मनाच्या लोकांची ही गोष्ट आहे.

आणि ती वाचकांसमोर उलगडत जाते या कथेच्या नायकाच्या डोळ्यांतून. सामान्य आयुष्य जगण्याच्या त्याच्या इच्छेच्या आड येणाऱ्या सगळ्या घटकांचे पापुद्रे उकलत जाऊन समाजाच्या एकेका घटकातील मूळचं गलिच्छ अंतरंग ती वाचकांसमोर उघडं करते. आणि त्या घाणीकडे जगण्याचा अटळ भाग म्हणून बघणाऱ्या मुर्दाड मनाच्या माणसांच्या आतील काळे, करडे, पांढरे आणि जीवनाचे सगळेच रंग त्यांच्या जीवनातून, विचारांतून, वैयक्तिक व समूह पातळीवरच्या कृतींतून कथेच्या चित्रात भरत जाते.

नायक जाहीर करतो की त्याने स्वतःच्या हातांनी ते घर बांधलं आहे, म्हणून तो त्या घराचा मालक आहे. स्वतः घर बांधून त्यानं उघड्यावर झोपावं, आणि तो राबत असताना जो बघत बसला होता, त्याने त्या घरात राहावं, हे आता चालणार नाही.

त्याने स्वतःच्या हातांनी तिथली जमीन, झाडं तोडून मोकळी केली आहे. नांगरली आहे. तिथं बी पेरलं आहे. त्यामुळं त्या जमिनीतील पिकाची मालकी त्याची आहे. स्वतः पिकवून, दुसऱ्यांना खायला घालून तो अर्धपोटी राहिला. त्यानं पिकवलेलं धान्य विकून इतरांचे खजिने भरता यावेत, यासाठी आता तो तसा अर्धपोटी राहणार नाही. ज्याने जमीन नांगरली नाही, बी पेरलं नाही, त्याला त्यातील पीक खाण्याचा अधिकार नाही.

त्यानं कापसापासून कापड आणि त्यापासून कपडे तयार केले आहेत. आणि असं असूनही त्याला उघडं राहावं लागतं, हे त्याला मान्य नाही. तो ते कापड बनवत असताना आणि कपडे शिवत असताना जो नुसता बघत बसला होता, त्याला ते कपडे घालायला मिळणं म्हणजे अन्याय आहे. 

रक्त, अश्रू आणि घाम गाळून कारखाना त्यानं उभा केला आहे. इतरांना मजेत जगता यावं, यासाठी आता तो कमी मोबदल्यात काम करणार नाही. 

सरकारी यंत्रणा ताबडतोब त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट म्हणून घोषित करतात आणि त्याचं समाजात असणं त्यांच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे असं लक्षात येत जाईल तसं त्याला दिसता क्षणी गोळी घालण्याचा आदेश जाहीर करण्याच्या पातळीवर पोचतात.

स्वातंत्र्याचा लढा चालू असताना जे लढत नव्हते. उलट स्वातंत्र्य योध्यांच्या मार्गात अडथळे उभे करत होते. तेच लोक आता सत्तेत आहेत. आणि दोन ठराविक भांडवलदारांना देश विकत आहेत. लोकांना देशोधडीला लावत आहेत. विद्यार्थी, मजूर, शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक, छोटे उद्योजक अशा सगळ्यांच्याच मुळावर उठले आहेत. त्यासाठी यंत्रणांना बिनदिक्कत वापरून घेत आहेत. यावर प्रश्न उपस्थित करायला नायकाने सुरुवात केली, तर त्याला देशद्रोही ठरवलं जात आहे. त्याला नाहीसं करण्यासाठी सगळ्या यंत्रणांची सगळी ताकद पणाला लावली जात आहे. 

या दरम्यान, सत्य आणि न्याय कोठे आहे, हा प्रश्न नायकाने सतत विचारत राहण्यातून, वास्तव काय आहे याची जाणीव लोकांना करून देत राहण्यातून, प्रेतासारखं थंडगार जिणं जगणं लोक नाकारू लागले आहेत. नायक सरकारसाठी त्यामुळं अधिकाधिक धोकादायक ठरू लागला आहे. 

आता अशा सरकारसमोर आणि अशा यंत्रणांसमोर शांततेचा पट्टा घालून उभं राहणं, म्हणजे स्वतःचा जीव गमावणं. म्हणजे लोकांना पुन्हा त्याच गर्तेत लोटून देणं. म्हणजे देश विकायला प्रमुखाला मोकळं सोडणं. म्हणजे लोकांना गुलामगिरीकडे ढकलत नेणं. 

हे टाळायचं असेल, तर पुन्हा जंगलात जाऊन, काढून ठेवलेली हत्यारं पुन्हा हातात घेणं, याला पर्याय नाही, या निष्कर्षापर्यंत नायकाला यावं लागतं. 

गोष्टीचं नाव आहे : मातीगारी

केनियातील एक बोली भाषा गिकुयु मध्ये एनगुगी वा थ्योंगो यांनी ही गोष्ट सांगितली आहे. त्यांची ही पहिलीच कादंबरी.

गिकुयु भाषेत मातीगारी या शब्दाचा अर्थ आहे, ज्यानं गोळ्या झेलल्या आहेत, असा क्रांतिकारक देशभक्त.

पूर्ण केनियामध्ये या कादंबरीने खळबळ माजवली.

मातीगारी खरोखरच अस्तित्त्वात आहे, आणि तो आपल्यावरील अन्याय्य अत्याचार आणि शोषणाविरुद्ध लढेल, असं तिथल्या लोकांना वाटायला लागलं.

केनियाच्या गृह मंत्रालयाने या मातीगारी नावाच्या देशद्रोही कम्युनिस्ट गुन्हेगाराला ताबडतोब अटक करावी, असे आदेश जारी केले.

जेंव्हा त्यांना समजलं की मातीगारी हे कादंबरीतील नायकाचं नाव आहे, तेंव्हा त्यांनी बाजारातून आणि दुकानांतून तर या पुस्तकाच्या सर्व प्रती हस्तगत केल्याच. पण घराघरांत घुसून या कादंबरीच्या प्रती शोधून नष्ट करण्यात आल्या.

असे भाग्य क्वचितच एखाद्या कादंबरीला लाभले असेल !

Leave a Reply