सहकार,राजकारण,लेखन,वाचन सर्वच बाबतीत सातारा आणि आम्हाला अप्पांनी भरभरून दिलं..

लेखक- भाषांतरकार नितीन साळुंखे यांनी गणपतराव साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख.

गणपतराव साळुंखे. घरातले आणि बाहेरचे, सारेच त्यांना अप्पा म्हणतात. अप्पांनी एलआयसीत नोकरी केली. एलआयसीवरच्या प्रेमापोटी विम्याचं महत्व सांगणारं दोन अंकी नाटक त्यांनी नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच लिहिलं. पण ही साहित्यसेवा तेथेच थांबली. कारण एलआयसीत असताना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करायला त्यांनी सुरुवात केली. 

सुरुवात अर्थातच मातृसंस्थेपासून. एलआयसी कर्मचाऱ्यांसाठीच्या, डाव्या पक्षांचा वरचष्मा असलेल्या ए आय आय ई ए या संघटनेत त्यांनी सदस्यत्व घेतले. अभ्यासू वृत्तीच्या बळावर तेथे विभागीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी वीस वर्षे सांभाळली. 

दरम्यानच्या काळात त्यांचा सहकार क्षेत्रातील कामाचा पसारा खूपच वाढला होता. आणि सहकार क्षेत्रावर सर्वत्र काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. यात सुसंगती हवी यासाठी एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी इंटक संघटना स्थापन केली आणि सेवानिवृत्त होईपर्यंत तेथे राष्ट्रीय उपाध्यक्ष ही जबाबदारी सांभाळली.

सत्तरीच्या दशकाच्या आरंभीचा तो काळ सहकार क्षेत्राच्याही उभारीचा, भरारीचा काळ होता. अप्पांनी एलआयसी कर्मचाऱ्यांची गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून सातारा शहरालगतच्या ओसाड, निर्मनुष्य माळावर साठ स्वतंत्र प्लॉट्सवर साठ बंगल्यांची सुंदर देखणी कॉलनी उभी राहिली. तेंव्हाचे आमदार दादासाहेव जगताप यांच्या मदतीने कृष्णा नदीतून या कॉलनीसाठी स्वतंत्र पाईप लाईन टाकून घेऊन पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली. तीच आजही संपूर्ण शाहूपुरी ग्रामपंचायत परिसरात पाणी पुरवठा करते आहे.

देशात त्याकाळी मूलभूत अवजड उद्योगांची उभारणी वेगाने सुरु होती. पण ग्राहकोपयोगी उत्पादन उद्योग बाल्यावस्थेत होते. त्यामुळे वस्तूंची टंचाई ही नेहमीची बाब होती. यावर सहकाराच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात जीवन विकास प्राथमिक ग्राहक संस्था स्थापन केली. हजारो सर्वसामान्य सातारकरांनी या संस्थेला उदंड प्रतिसाद दिला.

मग काही काळाने त्यांनी एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी आयुर्विमा कामगार ग्राहक सहकारी भांडार सुरु केले.

त्या काळी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांचे जाळे आताच्या प्रमाणात पसरले नव्हते. बँक ही सर्वसामान्य माणसासाठी बाहेरूनच कुतूहलाने बघण्याची वस्तू होती. अशा माणसांना वेळेला आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी अप्पांनी मराठा सहकारी पतसंस्था सुरु केली. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि महत्वाच्या, मोठ्या गावांत तिच्या शाखा काढल्या. छोटे व्यावसायिक आणि नोकरदार यांच्यासाठी मराठा पतसंस्था म्हणजे कोणत्याही आर्थिक अडचणीला आपल्या पाठीशी भक्क्मपणे उभं राहणारं एक मोठं कुटुंव आहे, हीच विश्वासाची भावना तयार झाली होती.  या पतसंस्थेमार्फत त्यांनी शेतकऱ्यांना गाय अथवा म्हैस खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना सुरू केली. शेतकऱ्यांनी गावातील सहकारी डेअरीत दूध घालायचं, आणि डेअरीने कर्जाचे हप्ते मराठा पतसंस्थेकडे भरायचे, अशी व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातही रोख रक्कम खेळायला लागली. घर, गाडी, मुलांचे शिक्षण, विवाह या सगळ्याचा विचार ते, मराठा पतसंस्था पाठीशी असल्याने अधिक आत्मविश्वासाने करू लागले.

मराठा पतसंस्था आणि जिल्ह्यातील अन्य पतसंस्थांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी आणि वसुलीची एकात्मिक यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांनी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन स्थापन केले.

त्या वेळी रिझर्व्ह बँकेने अस्तित्वातील पतसंस्थांना हवे असल्यास आणि सर्व अटींची पूर्तता करत असल्यास बँकिंग लायसेन्स देण्याचे धोरण सुरु केले होते. त्यानुसार मराठा पतसंस्थेचे बँकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव त्यांनी तयार केला. सर्व अटींची पूर्तता होत असल्याने रिझर्व्ह बँकेने पतसंस्थेचे बँकेत रूपांतर करण्यास अनुकूलता दर्शवली. पण संचालक मंडळात चार संचालक अन्य बँक अथवा शासकीय नोकरीत होते. त्यामुळे हे चार लोक बँकेचे संचालक होण्यास अपात्र होते. रिझर्व्ह बँकेने या चार लोकांनी संचालक मंडळातून बाहेर पडावे, अथवा नोकरीचा राजीनामा द्यावा आणि संचालक राहावे, असा पर्याय दिला. काही काळ तुमच्या घरातील व्यक्ती पर्यायी म्हणून द्या, लायसेन्स मिळाल्यावर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं परोपरीने समजावण्याचा प्रयत्न अप्पांनी केला. पण संचालक मंडळाचे बहुमत स्वतःकडे वळविण्यात यशस्वी ठरून या चौघांनी बँकेत रूपांतरणाचा प्रस्ताव धुडकावण्यात यश मिळवलं.

दरम्यान अप्पांनी इतर लोकांना बरोबर घेऊन शाहूपुरी नागरी सहकारी बँक स्वतंत्रपणे स्थापन केली होती. त्या काळात शाहूपुरी बँकेबरोबर सुरु झालेल्या सर्व बँकांत शाहूपुरी बँक सर्वार्थाने अग्रेसर होती. तीनच वर्षांत मराठा पतसंस्थेत बसलेल्या मंडळींना शाहूपुरी बँक हवीशी वाटायला लागली. सहकारातील प्रदीर्घ अनुभव आणि अनेक संस्था उत्तमपणे चालवल्यामुळे अप्पांना जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. ती पाहून मत्सराने पेटलेल्या विघनसंतोषी स्वभावाच्या शाहूपुरी बँकेतील संचालकाला त्यांनी हाताशी धरलं. त्याला पुढे करून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचे कान भरले. आणि या स्थानिक नेत्यांच्या मार्फत त्यावेळी दिल्लीच्या राजकारणात सर्वोच्च नेता व्यस्त असल्याने राज्याच्या राजकारणाची सूत्रे हाती घेतलेल्या धडाडीच्या तरुण नेतृत्वाच्या  कानात उलट सुलट बातम्या पेरल्या. स्वतःचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची स्वतःची फळी उभारण्यासाठी उत्सुक असलेल्या या धडाडीच्या नेत्याने कोणतीही शहानिशा करण्याची तसदी न घेता ते सगळं खरं मानलं, आणि त्यामुळे शासकीय यंत्रणा घरचं काम असल्याच्या उत्साहात या संस्थांमधून अप्पांना बाहेर काढून त्या संस्था मराठा पतसंस्थेत बसलेल्या मंडळींच्या हातात सोपविण्यासाठी सक्रीय झाल्या. सर्वोच्च नेतृत्व बहुधा तरुण धडाडीच्या नेतृत्वाच्या निर्णयांत हस्तक्षेप करू इच्छित नव्हते, किंवा संस्था हातातून घालवलेल्या कार्यकर्त्यासाठी त्यांच्याकडे त्यावेळी वेळ नव्हता.

मराठा पतसंस्थेतील ते कारस्थानी संचालक, शाहूपुरी बँकेतला तो मत्सरी विघ्नसंतोषी संचालक, स्वतःच्या संस्थांना स्पर्धा होते म्हणून या कारस्थानी संचालकांची कुवत विचारात न घेता, किंवा ते या संस्था नंतर चालवू शकणार नाहीत या खात्रीतूनच, त्यांच्या हाती संस्था देण्यासाठी धडाडीच्या नेतृत्वाचे कान भरणारे स्थानिक नेतृत्व, कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे त्या कारस्थानी संचालकांच्या बाजूनेच बोलणारे संबंधित शासकीय अधिकारी आणि यांच्यावर विश्वास ठेवून इतक्या साऱ्या संस्था दीर्घकाळ उत्तमपणे चालविणाऱ्या संस्थापकाविरोधात कायद्याच्या विरोधात जाऊनही निर्णय देणारा धडाडीचा नेता हे सारे घटक एकाच वेळी एकत्र आल्याच्या परिणामी काही काळात जीवन विकास सोसायटी बंद पडली. मराठा पतसंस्था सर्व शाखा बंद करून कर्जदारांकडून मनमानी पद्धतीने रक्कमा वसूल करण्यासाठीच केवळ सुरु आहे. आणि शाहूपुरी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने ती दुसऱ्या बँकेत विलीन करावी लागली. आणि कोणतेही राजकीय व आर्थिक पाठबळ नसताना स्वतःची बुद्धी, अनुभव, जिद्द आणि प्रामाणिकपणा या बळावर जिल्हा पातळीवरील अनेक संस्था स्थापन करून त्या दीर्घकाळ उत्तमपणे चालवणारा अप्पांसारखा सहकारातील स्वयंभू नेता सार्वजनिक जीवनातून हद्दपार होऊन घरी बसला.

पण यामुळं एक झालं.

अप्पा त्यांच्या मूळच्या आवडीकडे, पुस्तकांकडे पुन्हा वळले. पुन्हा अनेकविध विषयांवर वाचन चालू झालं. इतिहासाची त्यांना विशेष आवड. त्यातलं वाचन चालू झालं. आणि अलीकडच्या पिढीतल्या मुलांशी बोलताना त्यांना लक्षात आलं की, या पिढीला सगळं इन्स्टंट हवं असतं. वाचनही ते त्यामुळंच मोठ्या पुस्तकांचं सहसा करतच नाहीत. पण छोट्या पुस्तिका वाचतील !

मग त्यांनी विषय निवडले. ज्या महान व्यक्तिमत्वांबद्दल सगळ्यांना माहिती असणं आवश्यकच आहे, त्यांच्याबद्दल लिहायचं ठरवलं. पण सुरुवात करताना पहिलं पुस्तक लिहिलं ते, शिवकालातील राज्यव्यवस्था. शिवाजी महाराजांच्या नावानं छाती फुगवणं किंवा गळे काढणं किंवा वर्षातून पाच वेळा मशाल हाती उंचावून रस्तोरस्ती पळत सुटणं, यापेक्षाही, तो राजा श्रेष्ठ का ठरला, त्यांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी विचारपूर्वक उभारलेली राज्यव्यवस्था. त्यामुळेच सम्राट औरंगजेबाशी सत्तावीस वर्षे युद्ध चालू होतं तेंव्हा लौकिकार्थाने राज्यप्रमुख दीर्घकाळ राज्यावर नव्हता, तेंव्हाही एका बाजूला घनघोर युद्ध सर्व आघाड्यांवर चालू होतं. आणि राज्य कारभारही सक्षमपणे चालला होता. हे समजावून घेणं आवश्यक आहे.

त्यानंतरचं पुस्तक, असा घडला सातारा. संभाजीपुत्र शाहू महाराज यांनी बेचाळीस वर्षे राज्य केलं. त्यांच्या काळात सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला ही राजधानी होती त्या दूरवर पसरलेल्या साम्राज्याची. त्यानंतर काळाच्या ओघात सातारा शहर अजिंक्यताऱ्याच्या अंगाखांद्यावर वाढू लागलं. या भौगोलिक वाढीचा, पेठांचा, पेठांच्या नावांचा, शहरातील तळी, नळपाणी योजना, राजवाडा, महत्वाच्या इमारती, शहरातील संस्था, महनीय व्यक्ती या साऱ्याचा आढावा या छोट्या पुस्तकात घेतला आहे. 

खरंतर शाहूपुरी बँकेच्या काळातच अप्पांनी सातारा शहराची ही वाढ ज्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली झाली, त्या छत्रपती प्रतापसिंह यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं. आणि त्याची मूळ प्रत वाचण्यासाठी म्हणून तो मत्सरी संचालक घेऊन गेला होता. त्याने नंतर ते लिखाण परत केले तर नाहीच. स्वतःच्या नावाने ते पुस्तक छापून तो सगळीकडे मिरवायला लागला. अप्पांनी आणखी अभ्यास करून ते पुस्तक पुन्हा लिहून काढले, आणि मग हे दुसऱ्यांदा लिहिलेले पुस्तक अप्पांच्या नावाने प्रसिद्ध झाले.

सातारा जिल्ह्यातील शिवकालीन गडकोट किल्ले हे आणखी एक पुस्तक. साताऱ्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे की तुम्ही कोणत्याही दिशेने शहराच्या बाहेर थोडं अंतर गेलात, तरी तुम्ही निसर्गाच्या कुशीत असता. याचं कारण सह्याद्री. या सह्याद्रीच्या रांगा सातारा जिल्ह्यात सर्वदूर पसरल्या आहेत. शिवकाळात यांचे किल्ल्यांत रूपांतर करण्यात आले. या सर्व किल्ल्यांची नावे, इतिहास, उभारणी, त्याचा काळ, कालावधी, महत्त्वाची वैशिष्ट्ये अशी एखाद्या अभ्यासू पर्यटकाला आवश्यक आणि उपयुक्त ठरणारी माहिती यात दिली आहे.

याशिवाय त्यांनी, छत्रपती संभाजी राजे, सातारा छत्रपती संभाजीपुत्र शाहू महाराज, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि शेवटचे छत्रपती, सध्याच्या सातारा गादीचे पूर्वज आप्पासाहेब महाराज यांची संक्षिप्त चरित्रे लिहिली आहेत.

यामध्ये सनावळ्यांना महत्व न देता या लोकांचे कार्य, ते काम ज्या परीस्थितीत केले, ती पार्श्वभूमी याची माहिती दिली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या, शिवाजी कोण होता, या पुस्तकातून, वाचण्याची सवय नसलेल्यांना सुद्धा शिवाजी राजे श्रेष्ठ का होते, हे समजते, तसेच ही पुस्तके वाचून या महान व्यक्तिमत्वांची, ते महान का ठरले, त्या कामाची माहिती मिळते.

अप्पांना त्यांच्या आगामी लेखनासाठी शुभेच्छा !

— नीतिन साळुंखे

Leave a Reply