हुतात्मा भगतसिंग यांच्या सांगण्यानुसार धर्म व शासन यांच्या पूर्ण फारकतीवर आधारलेल्या धर्मनिरपेक्षतेमुळेच हा देश विनाश रोखू शकतो. 

नितीन साळुंखे

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक असे कोणतेही शिक्षण दिले जात नसतानाही त्यांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शस्त्रक्रियांचे कोणतेही ज्ञान नसताना त्या करणे रुग्णांच्या जीवावर बेतणार, हे अलीकडे सांगावे लागते ! 

त्यांना असे ज्ञान न देताच शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याचा हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी भारतातील सर्व अलोपॅथी डॉक्टरांनी नुकताच एक दिवसाचा बंद पाळला होता. 

विरोधाचा सूर नष्टच करण्याचे सध्याचे सर्वमान्य धोरण आहे.  ते इमाने इतबारे अंमलात आणणे, हे स्वयंघोषित राष्ट्रभक्तांचे आद्य कर्तव्य आहे. त्याला जागून एका राष्ट्रभक्त वैद्यकाने, अलोपॅथी ही पाश्चात्य देशांतून आलेली आहे. त्यामुळे अलोपॅथी डॉक्टर्स हे राष्ट्रद्रोही आहेत, असा तर्कशुद्ध सिद्धांत मांडला. अलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या या सर्व देशद्रोही डॉक्टरांना, आणि त्यांच्याकडूनच हौसेने उपचार करून घेणाऱ्या, देशभरातील सर्व देशद्रोही रुग्णांना काय शिक्षा द्यावी, आणि त्यांना कोणत्या देशात पाठवावे, याबद्दलचे आदेश अजून वरून प्राप्त झाले नसावेत, त्यामुळे आय टी सेलने या वैद्यकाला इतकेच बोलायला सांगितले असावे.

असल्या युक्तिवादांबद्दल भाई वैद्य यांनी १९९३ मध्येच लिहून ठेवलं आहे —

— विद्युतप्रवाह, प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि अणुविज्ञान यांचीही सुरुवात प्रथम पाश्चात्य देशांत झाली असली, तरी त्यांच्यामागे कोणी पाश्चात्य,  हे विशेषण लावत नाही. शंभर टक्के गावांत विद्युतीकरण झाले पाहिजे, असे शंभर टक्के जनता म्हणते. हे लोण पाश्चात्य देशांतून आले आहे. हे खूळ आमच्या भारतात नको, असे एकही भारतीय का म्हणत नाही ? त्याचे फायदे उघड आहेत. म्हणूनच विद्युतप्रवाह, या शब्दामागे कोणी, पाश्चात्य, हा शिक्का मारत नाही. मात्र ज्या गोष्टीला विरोध करायचे ठरते, त्याची गरज लक्षात न घेता पाश्चात्य अशी हेटाळणी केली जाते. शोधांपेक्षा विचारांबाबत हे आणखी सोपे जाते.

पुणे जिल्हा राज्य कर्मचारी संयुक्त संघ, सामाजिक समता परिषद संयोजन समिती, महात्मा फुले स्मृती शताब्दी समिती, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी समिती यांनी संयुक्तपणे १४ एप्रिल १९९३ रोजी प्रकाशित केलेल्या, धर्मनिरपेक्षता, या छोट्या पुस्तकातील, हुतात्मा भगतसिंग मार्ग की विनाश मार्ग ? या लेखात भाई वैद्य यांनी हे लिहिले आहे.

ते पुढे म्हणतात, प्राचीन काळी भारतात अनेक गणराज्ये म्हणजे लोकशाही होतीच की. आम्हाला लोकशाही नवी नाही. तीच गोष्ट धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेची आहे. वास्तविक भारतात जीवनप्रणाली म्हणून धर्मनिरपेक्षता याच विचारांचा प्रभाव दीर्घकाळ होता. आपला इहवादी व धर्मनिरपेक्ष विचार तत्त्वज्ञान, समाजकारण, अर्थकारण व राज्यव्यवहार अशा, जीवनाच्या सर्व क्षेत्रांना, वेदप्रामाण्य नाकारणारी चार्वाकांची फार मोठी परंपरा लागू करत होती. 

सर्वसाधारणपणे परधर्माबाबत आदरभाव ही येथील परंपरा राहिली. अशोक — अकबर — शिवाजी ही धर्मनिरपेक्ष राज्यशासनाची थोर परंपरा येथे निर्माण झाली. ब्राह्मण पेशव्याने शृंगेरीचा मठ लुटणे जसे घडले, तसे औरंगजेबाने चिंचवडच्या मोरया गोसावीला इनाम देणेही घडले. सर्वच राज्ये बहुधर्मीय प्रजेची असल्यामुळे राजा वा बादशहांनाही सर्व प्रजेला सांभाळून राज्य करावे लागले. त्यामुळेच शिवाजीच्या पदरी लाखो मुसलमान सैनिक आणि जीवाला जीव देणारे मातब्बर मुसलमान सेनानी होते. तर राजपूत सैन्यावर औरंगजेबाची भिस्त होती.

आपल्या इतिहासाची जशी ही परंपरा होती, तशीच स्वातंत्र्य लढ्याचीही परंपरा धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था निर्माण करण्याच्या दिशेनेच अबाधित राहिली. या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. ज्यांना या पार्श्वभूमीचे भान नाही, तेच ही राज्यघटना बदलून धर्माधिष्ठित घटना निर्माण करू पाहत आहेत.

या विचारांचे नेतृत्व जो संघ परिवार करीत आहे, त्या संघ परिवाराने ना कधी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, ना कधी स्त्रीया व दलितांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला. ज्यू द्वेष्टा हिटलर हा त्यांचा आदर्श. मुस्लिम द्वेष या एक कलमी कार्यक्रमावर त्यांचा सारा भर आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शासन या संकल्पनेची विकृत बुद्धिवादातून टर उडवणे, हाच एक उद्योग चालू आहे. मुस्लीम जातीयवादीही त्यांना भरपूर साथ देत असून तरुणांना अतिरेकाच्या विनाशक मार्गाकडे रेटत आहेत. अशा स्थितीत हुतात्मा भगतसिंग यांच्या सांगण्यानुसार धर्म व शासन यांच्या पूर्ण फारकतीवर आधारलेल्या धर्मनिरपेक्षतेमुळेच हा देश विनाश रोखू शकतो. 

या संकल्पनेची अधिक सविस्तर चिकित्सा धर्म आणि राष्ट्र या लेखात ना ग गोरे यांनी केली आहे — 

— गेल्या काही काळापासून देशभर जे वारे घोंघावत आहेत, त्याचे उगमस्थान धर्म आणि राष्ट्र या संकल्पनांचा अर्थ नीट न समजण्यात आहे. माझे हे विधान देशातील पंचाहत्तर टक्के अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोकांना लागू आहे. धर्माचा नारा देऊन सामान्य लोकांना हिंदुत्त्वाच्या किंवा इस्लामच्या झेंड्याखाली गोळा करणारे हात आहेत. स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या, भारतात जवळपास ८० ते ८५ टक्के संख्या असणाऱ्या जनतेची मतपेटी आपल्या हाती लागावी, एव्हढ्याच एका संकुचित विचाराने ते एकामागून एक शकला योजीत आहेत. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये धार्मिक गोष्टींचा हस्तक्षेप नसावा, असे जे आमच्यासारखे आग्रहाने प्रतिपादन करणारे आहेत त्यांना ते नकली धर्मनिरपेक्षतावादी, असे हिणवीत असतात. स्वातंत्र्यपूर्व संघर्षांमध्ये हिंदुत्ववादी संघपरिवार कधीही उतरलेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळातसुद्धा जवळपास तीन दशके बाबरी मशीद अथवा राम मंदिराचा मुद्दा त्यांना सुचला नाही. यावरून हे सिद्धच होते की, केवळ मतदानावर डोळा ठेवून हे हिंदुत्त्वाचे खेळ चालू आहेत.

संघ परिवार मानतो त्याप्रमाणे हिंदुत्त्वावर आधारलेले राष्ट्र असे जरी स्वरूप भारताला आले तरी त्यामुळे भारतात एकात्मता निर्माण होईल, असे नाही. उलट जपान, युरोपातील अनेक राष्ट्रे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये अनेक धर्मांचे, वंशांचे आणि भाषांचे स्त्री पुरुष सुखाने एकत्र नांदत आहेत.

संघ परिवाराकडून, आम्ही हिंदू आहोत म्हणून आमच्या हाती सत्ता राहिली पाहिजे, हा जो ठेका धरला गेला आहे, त्याला धर्मातीत लोकशाही मानणाऱ्या व्यक्तींचा व पक्षांचा विरोध का होतो, हे यावरून लक्षात यावे.

धर्मनिरपेक्षता आणि भारतीय राज्यघटना, या लेखामध्ये सत्यरंजन साठे म्हणतात की, भारतीय राज्यघटनेने जी तत्त्वे सांगितली आहेत, ती वादातीत आहेत. मात्र अल्पसंख्यांकांचे स्वार्थी नेतृत्व, बहुसंख्यांचा आक्रमक हिंदुत्ववाद आणि राजकीय पक्षांचा संधीसाधुपणा आणि तत्त्वशून्यता, यामुळेच धर्मनिरपेक्षता हे तत्त्व आज संकटाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

फुले आंबेडकर शताब्दी निमित्ताने, या लेखात डॉ. बाबा आढाव म्हणतात, संघाच्या मार्फत मुस्लीम द्वेषाचा पारा सतत वर नेणे, इतर मागासवर्गीयांना पक्षातील प्रमुख पदे देणे, सामाजिक समरसतेच्या नावाखाली मागसवर्गीयांतील मध्यमवर्गीयांना जवळ करणे, त्यांचे साहित्य उजेडात आणणे, अशा विविध मार्गांनी भाजपने आपली घोडदौड चालू ठेवली आहे. देशातील आजचे वातावरण मंदिर – मशीद वादाने झाकोळले आहे. दोन्ही समाजांतील सनातन्यांचा हा संघर्ष आम जनतेच्या नावाने केला जात आहे. भोळी भाबडी जनता त्याला फशी पडत आहे. फुले शाहू आंबेडकरांना मानणारी मंडळी केवळ गाफील नाहीत, तर बेफिकीर बनली आहेत.

धर्मनिरपेक्षता आणि कामगार वर्ग या लेखात रा प नेने यांनी एका वेगळ्याच मुद्याला स्पर्श केला आहे. धर्माचा जीवनावरील अवाजवी प्रभाव कमी करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी आत्मसात करणे आवश्यक असते. कामगार आधुनिक तंत्रज्ञान शिकला. परंतु दसऱ्याच्या दिवशी यंत्राची फुले वाहून पूजा केली नाही तर यंत्र सुरळीत चालणार नाही, ही श्रद्धा त्याच्या मनातून निघून गेली नाही.

धर्म हा आधार बनला म्हणजे त्याची मूळ प्रेरणा व शिकवण लयाला जाते. सत्ताधारी आणि धर्ममार्तंड यांचे संगनमत होत जाते आणि अनेक जुलमी बंधने ईश्वरदत्त आहेत असा दावा करून समाजावर लादली जातात. 

धर्मांधता परधर्मीयांबद्दल शत्रुत्वाची, वैराची भावना निर्माण करून समाजाला खोट्या शत्रूगटात विभागून टाकते. सामान्य लोकांना त्यांच्या खऱ्या समस्यांपासून दूर नेते. सहकार्याची भावना नष्ट करते. निकोप धर्माचरणाचे जागी बाजारू, बेगडी, तकलादू, दुरभिमानावर आधारलेले धर्माचरण प्रतिष्ठा मिळवते. स्त्री पुरुष समानता, मानवा मानवातील समानतेला काटशह दिला जातो. वैज्ञानिक बैठक नाकारून एकारलेली विपर्यस्त दृष्टी समाजात रुजवली जाते.

यावर उपाय काय ? तो उपाय याच पुस्तकात अगदी थोडक्यात दिलेला आहे —

तुम्हाला थोड्या काळात पुष्कळ ज्ञान मिळवावे लागेल

तुमच्या मनावर मानवी प्रेमाचे उच्च संस्कार झाले पाहिजेत

ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर बौद्धिक परिश्रम करा, आणि 

सर्व माणसे समान आहेत, निसर्गाची लेकरे आहेत,

हे लक्षात ठेवून परस्परांवर भावंडांसारखे प्रेम करण्यास शिका

जातिधर्मभेदांनी तुमच्या मनात दुरावा येऊ देऊ नका, आणि कटुतेला तर कधीच थारा देऊ नका.

— एस एम जोशी

व्यक्तीशः मला स्वतःला हे सर्व विचार पटतात. 

मात्र मी त्यांवर काही भाष्य करणार नाही. 

ज्यांनी लिहिले आहे, ते समाजासाठी प्रत्यक्ष काम केलेले, विचारवंत आहेत. 

त्यांनी जे काही लिहिले आहे तेही स्वयंस्पष्ट आहे.

त्यामुळे त्यावर मी अथवा इतर कोणी काही बोलावं, अशी गरज नाही.

गरज इतकीच आहे की, आता हे पुस्तक उपलब्ध नसेल तर, व्यवहारापेक्षा विचार रुजवणे महत्वाचं मानणाऱ्या कोणी प्रकाशकाने पुन्हा छापून हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध व्हावे, याची सोय करून देण्याची. आणि अर्थातच हे पुस्तक म्हणजे आपल्याला विनाशापासून लांब ठेवणारी शक्ती आहे हे लक्षात घेऊन समाजातील सर्व विचारी व्यक्तींनी ते खरेदी करून वरचेवर त्याचे वाचन करत राहण्याची !

हे सुद्धा वाचा..

चॅटो – स्वातंत्र्यासाठी झटणारा साम्राज्यवादविरोधी ‘वैश्विक कार्यकर्ता’!

याआधीचे नितीन साळुंखे यांचे लेख …

परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार – श्री.ना.पेंडसे

नरहर कुरुंदकर – विचार करायला शिकविणारा विचारवंत

शांत इथे पहाटवेळा : मन सुन्न करणारी युद्धकथा


त्या व्यक्तीने पॅपिलॉन वाचलं असतं तर …!

Leave a Reply