दिवस ६ डिसेंबर : नोंदी ना कोंडून नै कोंदणात ठेवायला पायजे.

दिवस ६ डिसेंबर

१.

काळ्या दिवसाच्या गडद आठवांसोबत तो निघाला
जोडीला ती बसलेली गाडीवर .

पांढऱ्या सफेद कपड्यांत दोघे रुबाबदार. गारठाळलेल्या उन्हाची ऊब घेत मास्कावून दोघे जोडीने
चौकात अडवले पोलिसांनी
‘इथूनच अभिवादन करा

‘सोशल डिस्टंसिंग चे आदेश पाळा’

ती- ह्यो कसला जुलूम म्हणायचा
तो- जुलूम नव्हं हेच सत्य असेल
इथनं पुढं.
ती- पण नियम पाळूनच इथवर
आलोय आपण.
तो- सत्तेचे नियम वेगळे असतात

२.

ती- आपण पुस्तक भेट देऊयात
गल्लीतल्या मुलांना.
तो- शेतकऱ्यांचा आसूड च्या प्रती
देऊ.
ती -संविधानाच प्रिएंबल देऊ की
तो- ते गहाळ होण्यापूर्वी…

चल लवकर.

३ .

तो-सत्य आणि सत्ता यांचं सख्य
नसतं.
ती- म्हणूनच डिसेंबरच्या या
दिवशी लढण्याची ऊर्जा
मिळते.. म्हंजे मूकनायक
सूर्या सारखा व्यापून राहतो
आपल्यावर.
तो- लै भारीच बोललीस. पण या
दिवसाला काळी घटना नोंद
आहे .

४ .

पोटभर जेऊन त्याने आपली सर्विस बंदूक घेतली
गणवेश ठिकठाक केला.
आणि ब्यारिकेटच्या परत लावून पलीकडे थांबला.
एकामागोमाग एक सगळ्या जवानांनी खाऊन घेतलं. मायेने दिलेले चवीचे असतेच.
ढेकर देणाऱ्या पोलीसाची तहान भागवून शेतकरी मोर्च्यातल्या माणसांनी आरोळी दिली.
‘जो बोले सो निहाल.
कोरस आवाज उठला.
‘सत श्री अकाल’

आपापल्या शिदोऱ्या बांधल्या. कुर्ता पगडी ठीक करून बसले.
दिल्ली ला थंडीने लपेटून घेतले होते
गारठ्यात एका म्हाताऱ्या किसानसिंग ने भूमी ला सलाम केला. जीव सोडला. झेंडा पाडला नै खाली.
डोळ्यांतल्या अश्रूंना वाट मोकळी करून हक्कांसाठी सत्यासाठी आंदोलकांनी वाट तयार केली नवी. वाटेवर पुन्हा कर्तव्यदक्ष जवान ऊभेच. मघाशी ज्यांनी जेवायला दिलं त्याचं माणसांना मारताना त्याचे हात जड झाले.
मोर्चा मौन होऊन थांबला…..
कुण्या लोककलाकार धावत आला. ढीगभर ऊबेचे कपडे दिले.

ऊर्जा विचारांची प्रेमाची एकतेची मिळत राहिली.

न्याय मिळेल का? कायद्याच्या राज्यात.
सहा डिसेंबरच्या काही नोंदी गोंदवून ठेवतोय


जवान किसान रयत कामगारमजूर मालक नीच उच्च जात धर्म उतरंड ,अमुक तमुक म्हणून असणाऱ्या आम्हां साऱ्यांनाच ‘भारतीय म्हणून ओळख देणाऱ्या मुक्तीदात्याचा,
घटनेच्या शिल्पकाराचा महापरिनिर्वाण दिन,
देशाला उघडपणे असहिष्णु करणाऱ्या बाबरी च्या हिणकस हिंसक आठवणीचा दिवस.
कवी मनाच्या सत्यप्रीय पत्रकाराचा निसटलेला वाढदिवस, फोकसिंगरने भक्तांना दिलेले भगतसिंगी ठोस उत्तर..मोर्च्यात दिलेला सोबतीचा आवाज, केलेली मदत. दिल्ली दादी जी मुलाकात,

नोंदी ना कोंडून नै कोंदणात ठेवायला पायजे.

हलकी मजेत गझल गुणगुणली पायजे.-
” चुपके चुपके रातदीन आंसू बहाना याद हैं
अब तक हमें बाबरी का वो जनाजा याद हैं…

कवी कथाकार साहिल कबीर लिहीत आहेत दर सोमवारी…

आधीचे भाग वाचा…

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता -१

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : शांततापूर्ण तणाव

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : भाग ३

खोटा माणूस आणि सत्याचा आग्रह?? : सायलेंट घुसमट आणि काव्यसदृश्य बात ..मागील पानावरुन पुढे ..

Leave a Reply