अंतराळातील एका प्रगत, पण मानवाला धोकादायक ठरू शकेल, अशा संस्कृतीकडून होणारे आक्रमण कशा प्रकारचे असेल याबद्दल भाष्य करणारी कादंबरी व्हायरस

एखाद्या विषयाचा मुळातून अभ्यास करायचा. आणि मग ती माहिती वेगवान कथानकाला आणखी रंजक बनेल अशा रीतीने पेरत कादंबरी फुलवत न्यायची, हा बहुतेक सर्व पाश्चात्य कादंबरीकारांचा शिरस्ताच आहे. 

आर्थर हेली या ब्रिटीश कॅनेडियन कादंबरीकाराच्या हॉटेल, एअरपोर्ट, व्हील्स अशा कादंबऱ्या वाचल्या की या लेखकाने लिहिण्यापूर्वी त्या विषयाचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे बघून अचंबित व्हायला होतं. त्या क्षेत्रात अनेक वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा थोडी जास्तच माहिती आपल्याला हे एक एकच पुस्तक वाचल्यानंतर मिळते. 

आणि असं या पाश्चात्य लेखकांपैकी कोणत्याही लेखकाचं कोणतंही पुस्तक वाचताना घडतं. आर्थर हेली, फ्रेडरिक फोरसिथ, डॅन ब्राऊन, अलिस्टर मॅक्लीन, सिडने शेल्डन … मूळ इंग्रजी आणि भाषांतरित कादंबऱ्या वाचणाऱ्या वाचकांच्या ओठांवर अशी चारदहा नावं तरी पटकन येतील.

मराठीत अनंत सामंत यांनी लिहिलेली एम टी आयवा मारू ही सर्वांगसुंदर परिपूर्ण कादंबरी वाचकांना जहाजे, त्यांचे प्रकार, त्यानुसार रचना, त्यांचे काम, त्यावरील प्रशासकीय रचना, तिथे काम करणारांना येणाऱ्या अडचणी याबद्दल सविस्तर माहिती वेगवान कथानकाच्या ओघात देतेच. त्या हलत्या, तरंगत्या जगात दीर्घकाळ काही ठराविक लोकांबरोबर राहताना त्या माणसांच्या मानसिकता कशा असतात, कशा बदलत जातात हा गाभा घेऊन वाचकांना त्या जहाजावर चाललेल्या अतिरंजक नाट्याचा संवेदनशील प्रेक्षक बनवल्याचा अद्भुत आनंद देते.

प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेली रारंगढांग ही सुद्धा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या, भारतीय सीमांवर, विशेषतः अस्थिर, ठिसूळ हिमालयात रस्ते बांधणाऱ्या, भारतीय लष्कराचा भाग असलेल्या आस्थापनेच्या अवघड कामावर, त्यांच्या समोरील आव्हानांवर, त्यांवर मात करण्याच्या त्यातील लोकांच्या जिद्दीवर लिहिलेली अतिशय वाचनीय कादंबरी आहे. 

कल्पनेपेक्षाही वास्तव अधिक रंजक, रोचक, भीतीदायक, अद्भुत आहे, असा अनुभव अनेकवेळा येतो. अशा रंजक, रोचक कल्पनेची जमिनीवरच्या वास्तवाशी सांगड घालून सायन्स फिक्शन्स लिहिणारे शास्त्रज्ञ लेखक जयंत नारळीकर यांच्या कादंबऱ्या वाचतानासुद्धा पाश्चात्य लेखकांच्या कादंबरी वाचनासारखाच बौद्धिक आनंद मिळतो. 

भय, भूक, निद्रा आणि मैथुन या मानवाच्या आदिम प्रेरणा आहेत. पण यातील भय, हे समाजाच्या आणि त्यातील व्यक्तींच्याही, व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवनातील वर्तन, प्रतिक्रिया नियंत्रित करते. निश्चित करते. ठरवते. हेच लक्षात घेऊन फॅसिस्ट संघटना वाढल्या आहेत. मानवी मनातील भीतीच्या आदिम प्रेरणेचे सूत्र घेऊन अलीस्टर मॅक्लीन यांनी, फिअर इज द की, ही कादंबरी लिहिली आहे. त्या पुस्तकाची शेवटची ओळ वाचून संपल्यानंतर काही वेळाने आपल्या लक्षात येते की, वाचताना भीतीने आपण आपले शरीर आपल्या नकळत आक्रसून घेतले होते. 

भीतीच्या याच आदिम प्रेरणेतून अज्ञात अशा कोणत्याही नवीन गोष्टीला, तंत्रज्ञानाला प्राणपणाने विरोध केला जातो. भारतात कॉम्प्युटरायझेशन करण्यास त्यावेळी कामगार संघटनांनी केलेला तीव्र विरोध माझ्या पिढीतल्या अनेकांच्या स्मरणात असेल. ही मानसिकता लक्षात घेऊनच इंग्रजीत म्हण तयार झाली असेल; नोन डेव्हिल ईज बेटर दॅन अननोन गॉड !

लहान मुलं घाबरून हातांनी डोळे झाकतात, आणि पुन्हा बोटांच्या फटींतून बघण्याचा प्रयत्न करतात, तसंच काहीसं मानवाचं आहे. भीती तर असतेच. पण त्याला उत्सुकताही असते इकडे तिकडे डोकावण्याची, जाणून घेण्याची. आपला पुढचा प्रवास कसा होणार आहे, त्याचा शेवट काय आणि कसा होणार आहे, हे माहित व्हायला हवं असेल तर त्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, तेंव्हापासून ते आजपर्यंत काय काय झालं, हे तपासायला हवं. काय आहे, त्या तिथे, पलीकडे, तिकडे ? हे जाणून घेण्याची अनावर उत्सुकता असते माणसाला.  विशेषतः शास्त्रज्ञांना तर आणखीच जास्त. या उत्सुकतेतून, शोध प्रक्रियेतून, संशोधनातून, अविरत कष्टांतून तर शोध लागतात निरनिराळे. आणि मानवी संस्कृती आणखी एक आकार घेत पुढे सरकत राहते.

खगोल शास्त्रज्ञसुद्धा याच उत्सुकतेतून फार पूर्वीपासून आकाश न्याहाळत आले आहेत. पृथ्वीबाहेरच्या अथांग अंतराळात आणखी कुठे जीवसृष्टी असू शकेल काय ? मानवाला राहण्यासाठी पृथ्वीसारखा आणखी एखादा आदर्श ग्रह असेल काय ? पृथ्वीच्या बाहेर जिथे कुठे जीवसृष्टी असेल, ती मानवापेक्षा प्रगत असेल काय ? असेल तर ते मानवाचे मित्र असतील की शत्रू असतील ? शत्रू असतील तर त्यांचा मुकाबला कसा करायचा ? या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती कशी झाली, या प्रश्नाइतकेच हेही प्रश्न शास्त्रज्ञांसाठी उत्तरे मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

अशीच एक प्रगत संस्कृती पृथ्वीवरच्या माणसाला मदत करू पाहते आहे. पण ती आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहे. त्यामुळे वेळ पडली तर तिचा मुकाबला करता येणार नाही, या भीतीतून, मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्त्वावरच हा घाला आहे, या धारणेतून पृथ्वीवरील शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते, मदतीसाठी येणारे ते अंतराळ यान आतील जीवांसह दूर अंतराळातच नष्ट करतात. वामन परत न आला, हे जयंत नारळीकर यांनी या कथाबीजावर लिहिलेले पुस्तक वाचकाला चटका लावते. या पुस्तकात नारळीकरांच्यातील शास्त्रज्ञ लेखकापेक्षा त्यांच्यातील, मानवी भावना जाणणारा सहृदय लेखक जास्त प्रभावी ठरला आहे.

व्हायरस ही त्यांची आणखी एक कादंबरी अंतराळातील अशाच एका प्रगत, पण मानवाला धोकादायक ठरू शकेल, अशा संस्कृतीकडून होणारे आक्रमण कशा प्रकारचे असेल, याबद्दल भाष्य करते.

 

देशाला, भारतीय समाजाला आणि लोकांना, त्यांचे जीवन अधिक सुखकर होत राहावे यासाठी, देशाला जगाच्या किमान बरोबर ठेवण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होता यावे यासाठी भारतात विज्ञान तंत्रज्ञान आणि अनेक क्षेत्रांत संशोधनाचे मूलभूत काम करणाऱ्या अनेकानेक संस्थाही उभारल्या गेल्या आहेत. यांतील बहुसंख्य संस्थांची किमान प्राथमिक पायाभरणी आणि संपूर्ण नियोजन नेहरूंच्या काळातच पूर्ण झाले होते. काळाची गरज ओळखून नेहरूंच्या नंतरच्या जवळजवळ सर्व पंतप्रधानांनी आणि सरकारांनीही विज्ञान तंत्रज्ञान संशोधन याला प्राधान्य दिले. प्रसंगी एखादी नवीन संस्थाही उभारली. अर्थात, याला काही सन्माननीय अपवाद आहेत. अशांचे सारे ज्ञान आणि विज्ञान गाय आणि गायीचे शेण मूत यात सामावले आहे. त्यामुळे अशा संशोधन संस्था हे त्यांना राष्ट्राचे भूषण नव्हे, तर लाडक्या मित्रांना आंदण देण्यासाठीची वडिलार्जित जहागीर वाटते.

पण असे काही निवडक मोजके सन्माननीय अपवाद वगळता इतर प्रत्येकाने या संशोधन संस्थांना त्यांचे काम करण्यासाठी यथाशक्ती प्रोत्साहनच दिले आहे.

इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे अवकाश संशोधन क्षेत्रातही भारतीय शास्त्रज्ञांनी मोठी झेप घेतली आहे. २०१३ -१४ मध्येच भारताने मंगळाकडे यशस्वीरीत्या यान पाठवले. २०१९ मध्ये चांद्रयान मोहिमेचाही भारतीय शास्त्रज्ञांनी अयशस्वी प्रयत्न केला.

पण सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह आणि त्या पलीकडील अफाट, अनंत विश्वाची माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी यान पाठवणे खर्च आणि कालमर्यादा, या दोन्ही दृष्टींनी शक्य नाही. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने १९७७ मध्ये व्हॉयेजर १ आणि व्हॉयेजर २ ही दोन याने वेगवेगळ्या दिशांना सोडली. सेकंदाला १७, ताशी ६१,००० किलोमीटर वेगाने झेपावणाऱ्या या यानांपैकी व्हॉयेजर १ या यानाने ऑगस्ट २०१२ मध्ये सूर्यमालेची कक्षा ओलांडून बाहेर, खुल्या अंतरिक्षात प्रवेश केला. सप्टेंबर २०१३ मध्ये हे यान पृथ्वीपासून जवळपास १९ अब्ज किलोमीटर अंतरावर जाऊन पोचले होते. म्हणजे, सूर्यमालेच्या बाहेर पडायला या यानाला ३५ वर्षे लागली. सूर्यापासून सर्वांत जवळच्या ताऱ्यापर्यंत पोचण्यास त्याला किमान चाळीस हजार वर्षे प्रवास करावा लागेल.

हा कालावधी प्रचंड आहे. यावर पर्याय म्हणून, अशा अंतराळ मोहिमा चालूच ठेवून, त्या व्यतिरिक्त अवकाश निरीक्षण करत राहणे आवश्यक असते. त्यासाठी उपयोगी पडतात त्या दुर्बिणी. सर्व प्रगत देशांनी अवकाश निरीक्षणासाठी आणि संशोधनासाठी अशा दुर्बिणी बसवल्या आहेत. असेच एक महाकाय दुर्बिणींचे भव्य संकुल त्या काळातच भारतातही उभे राहिले आहे. 

या दुर्बिणींचे काम, त्यांची रचना, आकारमान, त्यांचा संशोधकांना, देशाला, मानवजातीला होणारा उपयोग, नोकरशाहीच्या धारणा, मानसिकता, अहंकार, हितसंबंध, त्यानुसारचे त्यांचे वर्तन, या सगळ्याकडे महाकाय दुर्बिणीतून बघत बघत आपण पोचतो, एका दुर्बिणीत आढळलेल्या तांत्रिक दोषाकडे.

याबद्दल वाचत असताना आपल्याला इतर देशांत उभ्या असलेल्या अशा प्रकल्पांबद्दलचीही माहिती मिळते. देशादेशांमध्ये माहिती मिळवण्यासाठी चालू असलेल्या हेरगिरीच्या प्रयत्नांची माहिती मिळते. जास्त न बोलणारा, संबंधित विषयाची पुरेशी समज असणारा, आकलनक्षमता असणारा, तरीही अनुभवी अधिकारी आणि संशोधकांचं ऐकून घेणारा, त्यांची मते विचारणारा, ती मते विचारात घेणारा, त्यांचा सल्ला विचारून त्याप्रमाणे वागणारा, त्यांना कामात मुक्त वाव देणारा पंतप्रधान असेल तर संशोधक आणि अधिकाऱ्यांना कामाला एक वेगळाच हुरूप येतो, आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात, याचं चित्र नारळीकरांनी यात उभं केलं आहे. अर्थात, यातील काळ त्यांनी, त्या दुर्बिणींच्या संकुलाच्या उभारणीचा, म्हणजे तीस वर्षांपूर्वीचा गृहीत धरला आहे.

पंतप्रधानांनी बैठक बोलावली आहे, कारण दुर्बिणीत आढळलेला तांत्रिक दोष फक्त भारतीय दुर्बिणीतच आहे असे नाही, तर इतर देशांतल्या अशा प्रकल्पांतील दुर्बिणींमध्येही नेमका हाच दोष निर्माण झाला आहे. याबाबत, म्हणजे हा दोष नेमका कोणामुळं, अथवा कशामुळं निर्माण होत आहे, याबाबत कादंबरीच्या नायकाला एक शंका आहे. अशक्यप्राय वाटणारी शंका. पण इतर सर्व शक्यता संपल्यावर तो या शक्यतेकडेच लक्ष केंद्रित करतो. आणि इतर देशांतील अशा महाकाय दुर्बिण प्रकल्पांच्या संचालकांना विश्वासात घेऊन त्याची अशक्य वाटणारी शंका खरी आहे याची खात्री करून घेतो. त्याचे पुरावे गोळा करतो. 

या दुर्बिणी अवकाशातील रेडिओ लहरी पकडतात, आणि त्याचे विश्लेषण करून शास्त्रज्ञ आकाशगंगेच्या निर्मितीचे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करतात. परग्रहावरील एक प्रगत संस्कृती रेडिओ लहरी पाठवत आहे. आणि या रेडिओ लहरींमध्ये जाणीवपूर्वक व्हायरस सोडला गेला आहे. त्यामुळे दुर्बिणींना दिला गेलेला कॉम्प्युटर प्रोग्रॅम मध्येच अचानक बदलला जातोय. कादंबरीचा नायक अर्थातच हे रहस्य सोडवतो. जाणीवपूर्वक व्हायरस सोडणे हा, त्या संस्कृतीच्या प्रत्यक्ष आक्रमणापूर्वीच्या पूर्वतयारीचा भाग आहे, हे या शास्त्रज्ञांच्या लक्षात येते. या व्हायरसवर तात्पुरता उपायही ते शोधतात. आणि मानवजातीवरील एक संभाव्य संकट काही काळासाठी लांबवतात.

आजवर लिहिल्या गेलेल्या विज्ञान काल्पनिकांमधील अशक्यप्राय वाटणाऱ्या कल्पना पन्नास सत्तर वर्षांनंतर वास्तवात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या नियमाने, पंचवीस वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या या विज्ञान काल्पनिकेतील संकट अजून पन्नासेक वर्षांनी पृथ्वीवर येऊही शकते. भारत आणि जगातील महासत्तांकडे त्यावेळी तरी, या कादंबरीत वर्णन केलेल्या पंतप्रधानांसारखे सुयोग्य नेतृत्व एकसमयावच्छेदेकरून असले, तर त्यावेळची आपली मुलं पृथ्वीवरील येऊ घातलेले संकट परतवून लावतील, यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा..

चॅटो – स्वातंत्र्यासाठी झटणारा साम्राज्यवादविरोधी ‘वैश्विक कार्यकर्ता’!

याआधीचे नितीन साळुंखे यांचे लेख …

परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार – श्री.ना.पेंडसे

नरहर कुरुंदकर – विचार करायला शिकविणारा विचारवंत

शांत इथे पहाटवेळा : मन सुन्न करणारी युद्धकथा


त्या व्यक्तीने पॅपिलॉन वाचलं असतं तर …!

Leave a Reply