संवेदनशील कलाकार, लेखक : बाळकृष्ण शिंदे आणि अमावास्येचा चंद्र वाचताना …

नितीन साळुंखे

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला सगळीकडेच एक वेगळंच वातावरण होतं. साताऱ्यात राजवाड्याच्या समोर, नगर वाचनालयाच्या रांगेत, त्याही काळात जुनं असणारं, मंदार नावाचं हॉटेल होतं. एका अर्थी ते साताऱ्याचं सांस्कृतिक केंद्रच बनलं होतं तेंव्हा. परळी खोऱ्यातल्या आणि ठोसेघर पठारावरच्या गावांतल्या लोकांची तिथं दिवसभर वर्दळ असायची. संध्याकाळी पाच, सहाच्या दरम्यान शेवटच्या, मुक्कामाच्या गाडीनं ही सगळी मंडळी गावाकडं निघून जायची.

आणि मग एकएक जण यायला सुरुवात व्हायची. सातारला त्यावेळी नाट्यकर्मी आणि नाट्यरसिक या दोन्हींची संख्या खूप होती. एकांकिका आणि नाटकांच्या तालमी चाललेल्या असायच्या. राज्य नाट्य स्पर्धा, राज्य पातळीवरील एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. सहभाग आणि प्रेक्षक अशा दोन्ही बाजूंनी त्यांना उदंड प्रतिसाद मिळायचा. त्या वेळी अभिनव ही नाट्यसंस्था होती. सुनील कुलकर्णी, विलास ढाणे, तुषार भद्रे, प्रमोद कोपर्डे, विजय मांडके यांची लोकरंगमंच होती. चंद्रकांत कांबिरे, राजेश मुळे यांची लोकायत, आकाश कला अकादमी, दिलीप आंबेकर आणि नितीन साळुंखे यांनी स्थापन केलेली नाट्यासक्त, रवीन्द्र डांगे, सुधीर धुमाळ, नितीन वाडीकर, राजा अत्रे यांची थिएटर वर्कशॉप अशा अनेक संस्थांतून अनेक मुलंमुली नाटक, एकांकिकांच्या तालमी करत असायचे. 

दिलीप आंबेकर, सयाजी शिंदे, रघू आपटे, रवीन्द्र डांगे यांना चित्रपटांत अभिनयाची संधी मिळाली होती. दिलीपने नंतर चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही चांगले नाव मिळवले. आशुतोष गोवारीकर, अश्विनी भावे आणि राहूल सोलापूरकर यांना त्यानेच ब्रेक दिला, असं म्हटलं तरी चालेल. नलावडे हे हिंदी चित्रपट निर्माते होते. बाफना, इकबाल शेख, अफझल बागवान, अशोक जानी, भंवर शेठ, दीपक देशमुख, अरुण गोडबोले, अबूभाई बागवान, मधुकर देशपांडे, रमेश शानबाग यांनी मराठीत चित्रपट निर्मिती सुरु केली होती. विजयश्री टोपे, आशा टोपे, हेमांगी डांगे, नंदिनी खांडेकर, गौरी खांडेकर, संध्या लिमये असे अनेक स्त्री कलाकारही त्यावेळी साताऱ्यात होते. एस टी मधील कालिदास सावंत यांनी काही नाटके लिहिली होती, ज्यांना ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत होता.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं युवा कला महोत्सव आयोजित केला जायचा. सातारचं शिवाजी कॉलेज आणि एल बी एस कॉलेज या दोन कॉलेजांतली मुलंमुली विद्यापीठाच्या युवा कला महोत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी व्हायची. हीच मुलं नंतर कोणत्या तरी संस्थेत सामील व्हायची. 

बी प्रेमानंद यांनी भारतभर लोक विज्ञान यात्रा फिरवली होती. त्या यात्रेच्या धर्तीवर ग्रामीण भागांत लोककलांच्या धर्तीवर हे कलाकार प्रयोग करायचे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनंही शहर आणि ग्रामीण भागांत चमत्कारांचा पर्दाफाश करणारे कार्यक्रम केले जायचे. 

या सगळ्यांतून कलाकार म्हणून ही मुलं घडत होती. यातले अनेकजण, नाट्यकर्मी आणि कवी प्रमोद कोपर्डे, दलित साहित्यिक लक्ष्मण माने, पार्थ पोळके, नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धिबळ खेळाडू जयंत उथळे, अजित साळुंखे असायचे. पत्रकार कार्यकर्ता विजय मांडके, नाट्यकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ता श्रीधर चैतन्य, कॉम्रेड किरण माने, सुधीर धुमाळ, नाट्यकर्मी प्रकाश टोपे, अमर गायकवाड, भगवान अवघडे,  पत्रकार सुभाष देशमुख, सहकार चळवळीतले, सामाजिक चळवळीतले, कामगार चळवळीतले कार्यकर्ते जमायचे. काही वेळा तेथे आमदार विलास उंडाळकर आणि अभयसिंहराजे भोसलेही येऊन गेले आहेत.

वेगवेगळे ग्रूप पडायचे आणि चहा आणि सिगारेटच्या आवर्तनांबरोबर त्यांच्या गप्पा, चर्चा, कधी वादविवाद रंगत जायचे. शिवाजी साळुंखे हे मालक, मॅनेजर काउंटरवर बसून ते सगळं बघत, ऐकत असायचे. संध्याकाळी साताऱ्यातला कोणत्याही क्षेत्रातला चळवळ्या सापडण्याचं मंदार हे हमखास ठिकाण होतं. साळुंखे यांच्याकडं कोणासाठी काही निरोप दिला तर तो बिनचूक पोचायचा.

रात्री नऊ नंतर यांपैकी अनेकजण मोती चौकात काकीच्या दुधाच्या गाडीकडे सरकायचे, आणि तिथं त्यांच्या चर्चा सुरूच राहायच्या. काहीवेळा तर, रात्री बारा साडेबारानंतर, चोवीस तास उघडं असतं म्हणून काही मंडळी एस टी कँटीनमध्ये जाऊन बसायची. तिथं अड्डा जमायचा. पहाटे ताज्या दुधाच्या वेगळ्या चवीच्या चहाने मंडळी भानावर यायची आणि मग आपापल्या घरी परतायची.

शेजारी नगर वाचनालयात अनेक विषयांवर व्याख्याने असायची. यातीलच अनेक चेहरे तिथंही दिसायचे. बुद्धिबळ स्पर्धांत, यातील काही. नाटक, एकांकिका करायला आणि बघायला, यातील बहुतेक. सामाजिक चळवळी, मोर्चे, आंदोलनं, कलेक्टर ऑफिसमोर ठिय्यासाठी यातलेच चेहरे. असे, सगळ्या क्षेत्रांत काम करणारे चळवळे इथं येत राहायचे रोज.

नंतर काळाच्या ओघात मंदारची जुनी झालेली इमारत पाडली गेली. तेथे नवी, वेगळीच दुकानं सुरु झाली. सहकार, सामाजिक चळवळींना ओहोटी लागली. मोर्चे, आंदोलनं, बॅनरबाजी, घोषणा हे सगळं थंडावत गेलं. सातारा एम आय डी सी तल्या मोठ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यामुळं कामगार चळवळीची रया गेली. साताऱ्यात होणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा बंद पडल्या. 

तरी काही लोक चिकाटीने मंदारच्या पलीकडे, नगर वाचनालयाच्या शेजारी, राधाविलास हॉटेलमध्ये जमत राहिले. ग्रूप बंद पडले तरी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवत राहिले. कष्ट करत, झगडत, स्वतःला सिद्ध करत राहिले. त्यातलं एक नाव बाळकृष्ण शिंदे. नाटक, एकांकिका, चित्रपट, टीव्ही मालिका असा सगळीकडं अभिनय, दिग्दर्शन आणि स्वतः लिहिलेली नाटक आणि एकांकिका सुद्धा. या एकांकिकांनी राज्य आणि विद्यापीठ पातळीवर पारितोषिके पण मिळवली. इतकंच नाही, अमावास्येचा चंद्र आणि इतर एकांकिका या त्यांच्या पुस्तकाला राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून गौरवून पारितोषिक दिलं.

काही काळापूर्वी सारा देश अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर झुलत होता. त्या काळात, हा प्रतिगाम्यांचा पुरस्कृत राजकीय कट आहे, मूलभूत मुद्याचं काहीही हा माणूस बोलत नाही, लोकांची डोकी भडकवण्यासाठी मुद्दे नसलेल्या या पोकळ आंदोलनात हवा भरली गेली आहे, असं नगर वाचनालयाच्या शेजारच्या त्या अड्यावर स्पष्टपणे बोलत राहणारा हा जागृत, संवेदनशील कलाकार, लेखक म्हणून त्याच्या एकांकिकांमधूनही समाजातल्या मूर्खपणावर आणि विचार व वागणं यातल्या विसंगतींवर उपहासात्मक कोरडे ओढत राहतो.

अमावास्येचा चंद्र

या एकांकिकेच्या नावापासूनच उपरोध स्पष्ट व्हायला सुरुवात होते. समाजातला एक मोठा वर्ग मनोमन कोणत्या ना कोणत्या बाबा, बुवाच्या आहारी गेलेला असतो. त्यांच्या त्या बाबा, बुवावरील त्यांची श्रद्धा तारतम्य आणि वास्तवाचं भान सोडून सावकाशपणे वेडसरपणाच्या सीमारेषेच्या पलीकडे, अंधभक्तीकडे झुकत जाते. अशा लोकांनी समजा त्यांच्या बाबाला चंद्र मानलं असेल तर अमावास्येच्या दिवशी ते म्हणणार, आज चंद्र दिवसा उगवला आहे, म्हणून इतका प्रकाश पडला आहे. आणि अमावास्येच्या रात्री म्हणणार, चंद्र आहेच. ज्याची श्रद्धा असेल, त्यालाच दिसेल. आणि अशा श्रद्धावान पुण्यात्म्यांनीच इथं राहावं ! अशा उन्मादी मनोवस्थेत असे लोक, आपण आणि ते, अशी दुफळी समाजात निर्माण करतात.

या मानसिकतेबद्दल कोणतंही थेट भाष्य न करता ती निर्माण कशी होते, आणि वाढत जात विकृतीचं स्वरूप कसं घेते, त्याचे परिणाम स्वतः त्या व्यक्तीवर, त्याच्याशी संबंधित इतरांवर आणि समाजावर कसे होतात, हे या एकांकिकेच्या माध्यमातून मांडलं आहे. एकांकिकेला तीस मिनिटांचाच वेळ असतो, हे लक्षात घेता, बाळकृष्ण शिंदे यांनी अत्यंत थोडक्यात, पण अत्यंत प्रभावीपणे ही मांडणी केली आहे.

अशा कोणा बाबा, बुवाच्या नादाला लागून स्वतःचा मेंदू वापरणं बंद करण्याच्या सीमेपर्यंत पोचत आलेल्या कोणी ही एकांकिका पाहिली, तर त्या धक्यानं कदाचित तो जागच्या जागी थांबेल, आणि अंधाराकडं दौडत जाण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून, विवेकाच्या उजेडाकडं परत येईल, अशी शक्यता दाट आहे.

एका स्ट्रगलरचा स्ट्रगल

पूर्वी असं म्हटलं जायचं की, महानगरांतल्या कलावंतांचे, विशेषतः लेखकांचे कळप असतात. या कळपातला प्रत्येक लेखक त्याच्या कळपातल्या इतर लेखकांची भलामण करत राहतो. आणि एकमेकांची स्तुती करत करत हे सारेच प्रसिद्ध होतात. प्रथितयश होतात. त्यांची सरकारदरबारी दखल घेतली जाते. अशा एखाद्या महानगरी साहित्यिकांच्या कळपात त्यांनी छोट्या गावातल्या एखाद्या प्रतिभावंत लेखकाला सहभागी करून घेतलं तर ?

तर अशा स्ट्रगलरचा स्ट्रगल संपून जातो. तो रातोरात मोठा होतो. एखादेच पुस्तक लिहून अचानक आणि अनपेक्षितपणे प्रसिद्धी मिळाल्यानं तो हवेत जातो. स्वतःच स्वतःवरच खुष होऊन त्या एकाच पुस्तकाच्या पुण्याईवर पुढच्या काळात मिरवत राहतो… आणि नवं काही लिहायचं विसरूनच जातो. खूप काळानं जर कधी त्याला भान आलंच, तर तेंव्हा त्यांच्यातली नवनिर्मितीची उमेद संपलेली असते. लेखक म्हणून तो संपलेला असतो.

हे सगळं, एका स्ट्रगलरचा स्ट्रगल, या एकांकिकेत बाळकृष्ण शिंदे यांनी मांडलं आहे. एकच कथा, किंवा एकच पुस्तक लिहून पुढे काहीच लिहिलं नाही. किंवा पहिलंच पुस्तक वाचकांच्या काळजाला हात घालणारं, पण पुढच्या साहित्यात नव्या, वेगळ्या जीवनानुभवाचा अभाव असल्यानं ते नि:सत्त्व, बेचव. असे खूप साहित्यिक आपल्या आजूबाजूला दिसतात.

साहित्यिकांनी सातत्यपूर्ण सकस लिखाण करायला हवं. लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली तरी ती डोक्यात न जाऊ देता, समाजापासून न तुटता सामान्य माणसाशी, स्वतःच्या जगण्याशी जोडलेलं राहायला हवं. सशक्त जीवनानुभव गोळा करत राहायला हवं. आणि तितक्याच उत्कटतेनं आणि जिवंत रसरशीतपणानं ते साहित्यात उतरवत राहायला हवं. थोडक्यात, कितीही लिहिलं, तरीही आपण स्ट्रगलरच आहोत, असंच लेखकाला वाटत राहिलं पाहिजे. तरच तो उत्कटतेनं, अनावर असोशीनं जगत राहील, काही सांगू पाहील, त्यासाठी लिहीत राहील …

रीमा मानसी थोरात

विवाहसंस्थेत किंवा स्त्रीपुरुष नात्यात एका टप्प्यावर त्या जोडप्याला मूल होणं, ही बाब मानसिकदृष्ट्या त्या दोघांसाठी जितकी महत्त्वाची असते, तितकीच ती सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरते. पुरुषाच्या पौरुषत्त्वाबाबत शंका घेणे किंवा स्त्रीला वांझ ठरवणे आणि त्याबद्दल चवीनं चर्चा करत राहणे, हे अशा वेळी त्यांना ओळखणाऱ्या बहुतांश लोकांचे आवडते कर्तव्य असते.

या सार्वकालिक समस्येला सामोरे जाताना त्यातील स्त्री आणि पुरुष हे दोघेही आपापले स्वभाव, धारणा, मानसिकता आणि विचार करण्याची पद्धत यानुसार व्यक्त होतात. याचे पडसाद त्यांच्यातील नातेसंबंधांवरही पडतात. त्यालाही ते आपापल्या पद्धतीनं सामोरं जातात. याच समस्येचा आणि त्याला सामोरं जाताना त्यांची होणारी घुसमट, पुरुषांचा त्यावरील प्रतिसाद आणि स्त्रीयांची त्या पडसादावरची प्रतिक्रिया यांचा वेध या एकांकिकेत घेतला आहे.

“स्वातंत्र्याच्या काठावरती”

स्वातंत्र्य महत्त्वाचं की भाकरी महत्त्वाची ?

स्वातंत्र्य फुकट, आयतं मिळतं का ? फुकट मिळालं तरी ते टिकवण्यासाठी काही किंमत द्यावी लागते का ? ती किती असते ? कोणत्या मर्यादेपर्यंत असेल तर द्यायची आणि स्वातंत्र्य टिकवायचं ? भाकरी आणि किमान सुखसोयीची हमी मिळत असेल तरत्यावर पाणी सोडून स्वातंत्र्याच्या नादी लागावं का ?

लोकांच्या मनात व्यक्तिशः  सहसा खरंतर हे इतके सगळे प्रश्न येतच नाहीत कधी. पण समाजासमोर हे प्रश्न उभे राहत असतात. आणि मग समाजातील काही व्यक्ती पुढाकार घेऊन आपापल्या क्षमतेनुसार या प्रश्नांवर उत्तर शोधून ते समाजासमोर ठेवत जातात. समाजसुद्धा, स्वातंत्र्यही नाही, आणि भाकरीही पुरेशी नाही, अशीच अगदी अवस्था आली असेल तरच, गमावण्यासारखं काही नाहीच, झाला तर फायदाच, अशी स्थिती असेल तरच अशा स्वातंत्र्याच्या प्रयत्नांना साथ देतो. 

एका सुखवस्तू कुटुंबातील कुत्रा, मांजर आणि पोपट या तिघांना मध्येच अचानक ते गुलामगिरीत असल्याची जाणीव होते, आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बंड करून घरातून पळून जातात. परावलंबी जीवन जगणाऱ्या सामान्य लोकांना स्वातंत्र्य आणि भाकरी यातल्या मूल्यांबद्दल काय वाटतं, हे उपहासात्मक विनोदी अंगाने या एकांकिकेत मांडले आहे.

होळी रे होळी पुरणाची पोळी

एक काळ असा होता की सार्वत्रिक शिक्षणाची सुरुवात होत होती. आणि सरकारी कार्यालये, उद्योगसमूह यांत काम करण्यासाठी पुरेसं शिक्षण घेतलेल्यांची वानवा होती. त्यामुळं मग, नोकरीसाठी कोणत्याही कार्यालयात अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रांची फाईल घेऊन गेलं की सहसा लगेच नोकरी मिळत असे.

शिक्षण घेणाराचं प्रमाण वाढलं. शिक्षितांची संख्या वाढत गेली. उपलब्ध नोकऱ्यांची संख्या त्या प्रमाणात वाढणं शक्यच नव्हतं. मग बेरोजगार तरुणांपुढं अनेक समस्या फेर धरून नाचू लागल्या. नोकरी नाही, त्यामुळं उत्पन्न नाही. ते सुरु होत नाही तोवर लग्न करता येत नाही. घरात, समाजात, अगदी स्वतःच्या नजरेत सुद्धा किंमत नाही. नोकरी नाही त्यामुळं वेळच वेळ. तो घालवण्यासाठी काही करावं तर खिशात पैसा नाही. शिक्षणाला अनुरूप नोकरी मिळत नसेल तर तडजोड म्हणून कमी स्तरावरची नोकरी करण्याची या मुलांची तयारी नाही. मात्र पैसे मिळवणं, टाईम पास करण्यासाठी उडवायला असेल, पण पैसे मिळवणं, ही गरज असते. अशा वेळी राजकीय पुढाऱ्यांचा, गणेशोत्सवासारख्या संधींचा, उडवण्यासाठीचे पैसे मिळवण्यासाठी कसा वापर केला जातो, याचं वास्तवदर्शी चित्रण या एकांकिकेत आलं आहे.

अशा तरुणांची मानसिकता, या तरुणांची होणारी अवहेलना, काम करत शिकणाऱ्या मुलांची जिद्दी मानसिकता, गणेशोत्सवासारख्या उत्सवाचे ‘उपयोग’, स्थानिक पातळीवरील राजकारणी, त्यांची मानसिकता, विचार, हिशोबीपणा, अशांच्याबद्दल ही तरुणाई करत असलेला विचार या सगळ्याचं वास्तवदर्शी चित्रण या एकांकिकेत आलेलं आहे.

एकुणात, समाजातल्या विविध समस्यांना कधी उपरोध, तर कधी उपहासातून विनोदनिर्मिती करत, तर कधी वास्तवदर्शी थेट भिडणाऱ्या या एकांकिका आहेत. याच लेखकाचे तीन फुल्या दोन बदाम हे नाटकही आहे. सन्मित्र विजय मांडके आणि माझे मित्र आरिफ बागवान यांच्याशी झालेल्या संवादातून जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या आणि हे लिहून झालं..

हे सुद्धा वाचा..

चॅटो – स्वातंत्र्यासाठी झटणारा साम्राज्यवादविरोधी ‘वैश्विक कार्यकर्ता’!

याआधीचे नितीन साळुंखे यांचे लेख …

परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार – श्री.ना.पेंडसे

नरहर कुरुंदकर – विचार करायला शिकविणारा विचारवंत

शांत इथे पहाटवेळा : मन सुन्न करणारी युद्धकथा


त्या व्यक्तीने पॅपिलॉन वाचलं असतं तर …!

Leave a Reply