प्रतिभा, जीवनानुभव आणि व्यासंग या तीनही बाबतीत डोस्टोव्हस्की कमी पडत नाहीत आणि या तीनही बाबी त्यांच्या कादंबऱ्यांत उत्क्रांत होत गेलेल्या आहेत.

नितीन साळुंखे

परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत आहेत.

सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित झाले आहे.

णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, जॉर्ज ऑरवेल या व अन्य देशविदेशातील लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय ते या सदरातून करून देणार आहेत.

साताऱ्यात प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात भव्य ग्रंथ प्रदर्शन भरायचं. आणि पुस्तक प्रदर्शनं तर वरचेवर होतच असतात. हे एकच ठिकाण असं आहे की मी आवर्जून आणि ठरवून एकटाच जातो. कारण ज्याला पुस्तकांचा नाद आहे, तो तिथं आत गेला की आपल्याला विसरून त्या पुस्तकांत हरवून जातो. ज्याला असा नाद नाही, असा माणूस सहसा आपला मित्र नसतो. असला तरी मग अशा ठिकाणी तो कंटाळून जातो. त्यापेक्षा एकटंच जायचं. निवांतपणानं आपल्याला हवी ती पुस्तकं शोधत बसायचं.

चार पाच वर्षांपूर्वी असाच एकटाच गेलो होतो. आणि सुरुवात केल्यावर तिसऱ्याच स्टॉलवर टॉल्स्टॉयचं वॉर अँड पीस ! आधी ते ताब्यात घेतलं, आणि आणखी काय काय आहे ते बघायला लागलो. तर इडियट, क्राईम अँड पनिशमेंट आणि ब्रदर्स कारमाझफ ही फ्योदर डोस्टोव्हस्की यांची पुस्तकं ! खजिनाच !! मग दुसरीकडं कुठं गेलोच नाही. तिथंच थांबून तिथली सगळी पुस्तकं बघितली. आणि, टॉल्स्टॉय आणि डोस्टोव्हस्की या दोन लेखकांची मराठी, इंग्रजीतली जी मिळतील ती पुस्तकं घेतली. टॉल्स्टॉय तर बोलून चालून उमरावच होता. पण शब्द संपत्ती उधळण्याच्या बाबतीत डोस्टोव्हस्की सुद्धा काही कमी नव्हता. प्रत्येक पुस्तक किमान चारसहाशे पानांचं. 

त्यात फक्त एक पुस्तक छोटं, म्हणजे दीडशे पानांचं होतं. दस्तयेवस्की याच नावाचं. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी लिहिलेलं. अनावर उत्सुकतेनं ते पुस्तक सर्वांत आधी उघडलं. पुस्तकं वाचणाऱ्या प्रत्येकाच्याच कानावर गॉर्की, टॉल्स्टॉय आणि डोस्टोव्हस्की या तीन रशियन लेखकांची नावं आलेलीच असतात. अनील हवालदार यांनी अनुवाद केलेली गॉर्की यांची पुस्तकं पूर्वी सहज उपलब्ध होत होती. आणि अनेकांच्या संग्रही अजूनही असतील. टॉल्स्टॉय : एक माणूस, या सुमती देवस्थळे यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळं टॉल्स्टॉय यांच्याबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल सगळ्यांना माहिती मिळाली आहे.

पण डोस्टोव्हस्की किंवा दस्तयेवस्की या तितक्याच जगप्रसिद्ध विचारवंत लेखकाबद्दल अथवा त्यांच्या साहित्याबद्दल लिहिलं गेलेलं तोपर्यंत तरी काही वाचण्यात आलेलं नव्हतं. ती कमतरता अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या या पुस्तकानं भरून निघाली. 

सुमती देवस्थळे यांनी टॉल्स्टॉय यांच्या आयुष्यावर ओघवत्या भाषेत एक सुंदर वाचनीय कादंबरीच लिहिली आहे. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी मात्र डोस्टोव्हस्की यांच्या साहित्याबद्दल अभ्यासपूर्ण रीतीनं मांडणी केली आहे. डोस्टोव्हस्की यांच्या साहित्याच्या अभ्यासकांना आणि चिकित्सक वाचकांना दिशादर्शक ठरेल, असेच हे पुस्तक आहे.

अभ्यासकांच्या सोयीसाठी डोस्टोव्हस्कीच्या साहित्यातील वैशिष्ट्यांनुसार वेगवेगळे भाग पाडले आहेत. 

पहिले प्रकरण आहे, दस्तयेवस्कीय कादंबरी– 

डोस्टोव्हस्कीचा समकालीन, आणि आधुनिक कादंबरीचा पाया ज्याने घातला, असे मानले जाते, त्या फ्लोबेर यांची आधुनिक कादंबरी आणि दस्तयेवस्कीय कादंबरी यांच्यातील तफावत, दोघांच्या वास्तववादातील फरक मांडला आहे. 

यातील फक्त डोस्टोव्हस्की यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य बाजूला काढले तर असे दिसते की, डोस्टोव्हस्की यांची कादंबरी काहीशी विस्कळीत वाटते. तिच्या रचनेत शैथिल्य असते. ती काहीवेळा पाल्हाळीक आणि अनेकदा जाडजूड होते. अगदी छोट्या कादंबऱ्यांमध्ये देखील उपकथानक असते. वातावरण निर्मितीसाठी निसर्गवर्णने क्वचितच येतात. मात्र व्यक्तिरेखा खूप असतात. आणि त्या सर्व व्यक्तिरेखा बारकाईने तपशीलासह उभ्या केलेल्या असतात. ही पात्रे तत्त्वचिंतन करतात, आणि त्याप्रमाणे वागतातही. खरंतर या कादंबऱ्यांची जडणघडणच तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली होते. संवाद, वादविवाद, चर्चा, खडाजंगी यांचा सढळ हस्ते वापर असतो. पत्रं सुद्धा भलीमोठी असतात. भडक, असंभाव्य, नाटकी प्रसंग असू शकतात. प्रसंगी रहस्यकथांतील चातुर्यपूर्ण कल्पनांचाही वापर केला जातो.

आणि तरीही, आधुनिक कादंबरीवर डोस्टोव्हस्कीचा मोठा प्रभाव आहे. जीद, काफ्का, मान, काम्यु, सार्त्र असे मोठे कादंबरीकार डोस्टोव्हस्की यांच्या प्रभावाखाली आलेले आहेत.

त्यांच्या, नोट्स फ्रॉम अंडरग्राऊंड या छोट्या कादंबरीला अस्तित्त्ववादी विचारवास्तूची कोनशिला मानले जाते. परात्मता, न~नायकत्व, उपरेपणा, व्यस्तता, अस्तित्त्वाचे उत्कट भान, निर्णय स्वातंत्र्य यांसारख्या, अस्तित्त्ववादी साहित्यात पुढे रुजलेल्या मूल्यांची बीजे यात स्पष्ट दिसतात.

त्यांच्या प्रत्येक कादंबरीत एक संकल्पना आहे. त्यांना नेहमीच काही सांगायचे असते. आणि हे सांगणे अगदी व्यवस्थितपणे झाले पाहिजे, असेही त्यांना वाटत असते. इतकेच नव्हे तर, कादंबरीतील प्रत्येक व्यक्तिरेखेमागे संकल्पना हवी, असाच त्यांचा आग्रह असे. आणि तरीही जिवंत धगधगीत अनुभव आणि असामान्य प्रतिभा यांच्यामुळं त्यांच्यातील विचारवंताला त्यांच्यातील कादंबरीकारावर मात करता आली नाही. अन्यतः त्यांच्या कादंबऱ्या प्रबंधवजा, आणि व्यक्तिरेखा म्हणजे विचारांच्या मूर्ती झालेल्या दिसल्या असत्या.

ज्याप्रमाणे वैचारिकता हे डोस्टोव्हस्की यांच्या कादंबरीचे ठळक वैशिष्ट्य आहे, त्याचप्रमाणे नाट्यमयता, हेही तिचे दुसरे वैशिष्ट्य आहे. मृत्यू, खून, आत्महत्या अशांसारख्या धक्का देणाऱ्या, नाटकात किंवा सिनेमात शोभतील अशा प्रसंगांची या कादंबऱ्यांत रेलचेल असते. आणि हे नाट्य आंतरिक, मानसिक असते. 

प्रतिभा, जीवनानुभव आणि व्यासंग या तीनही बाबतीत डोस्टोव्हस्की कमी पडत नाहीत आणि या तीनही बाबी त्यांच्या कादंबऱ्यांत उत्क्रांत होत गेलेल्या आहेत. कादंबरीकार म्हणून डोस्टोव्हस्की यांचा प्रवास हे सिद्ध करतो की, हा एक फार गंभीर साहित्यिक आहे. म्हणजे मानवी जीवन, त्याचे आकलन आणि अन्वयार्थ व साहित्यनिर्मिती यांचे नाते किती खोलवर आणि उंचीवर नेता येईल याचे भान डोस्टोव्हस्की निग्रहाने, सातत्याने राखतात.

जीवनविषयक नव्या धारणा आणि साहित्य यांची सर्जनशील सांगड घालण्याचा अतिशय समर्थ प्रयत्न ते करतात. आणि हे प्रयत्न त्यांनी मध्येच सोडून दिलेले नाहीत. कादंबरी लेखन हे त्यांचे जीवितकार्य बनते, आणि वाढते.

यामुळे, त्यांचा समकालीन, आधुनिक कादंबरीचा पाया ज्याने घातला असे मानले जाते त्या फ्लोबेर यांच्या शब्दांत सांगायचं तर, जे जगण्यासाठी कादंबऱ्या वाचतात, अशांसाठी डोस्टोव्हस्की यांच्या कादंबऱ्या आहेत.

दुसरे प्रकरण आहे, कादंबऱ्यांतील जीवन प्रक्षेपण —

असे दिसते की, डोस्टोव्हस्की यांच्या जीवनातील काही घटनांनी त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम केला. आणि या घटनांचा प्रभाव त्यांच्या कादंबऱ्यांवरही विलक्षण तीव्रतेने पडला आहे. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी यांनी यांपैकी काही निवडक घटनांचा डोस्टोव्हस्की यांच्या जीवनावर आणि साहित्यावर कसा परिणाम झाला, हे मांडले आहे.

वडिलांचा खून —

डोस्टोव्हस्की यांची त्यांच्या आईवर नितांत श्रद्धा आणि प्रेम होते. त्यांचे वडील राकट वृत्तीचे होते. त्यांच्या वागणुकीमुळे आईची प्रकृती खालावली, आणि तिचा अकाली मृत्यू झाला, या भावनेतून डोस्टोव्हस्की यांना वडिलांबद्दल प्रेम असले तरी आत्यंतिक रागही येई.

त्यामुळे, डोस्टोव्हस्की अठरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा खून झाला तेंव्हा, आता मला मोकळं वाटतंय, अशी त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मात्र त्या बरोबरच, वडिलांच्या खुनाला आपण जबाबदार आहोत, अशीही भावना त्यांच्या मनात मूळ धरून प्रबळ होत गेली. 

वडिलांविषयीचे प्रेम आणि तिटकारा या भावनांचे द्वंद्व, वडिलांचा खून होणे, आणि या खुनाला मुलगा जबाबदार असणे हा घटनाक्रम कारमाझफ बंधू, या कादंबरीच्या केंद्रस्थानी आला.

मनोविकृती —

डोस्टोव्हस्की यांना अपस्माराचे झटके येत असत. आणि त्यावर वैद्यकीय उपचारही सुरु होते. प्रसिद्ध मानस विश्लेषक सिगमंड फ्रॉईड यांनी डोस्टोव्हस्की यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या कादंबऱ्या यांचा साक्षेपी अभ्यास करून त्यांचे मनोविश्लेषण केले आहे.

फ्रॉईड यांच्या मते, डोस्टोव्हस्की यांचा अपस्मार अथवा एपिलेप्सी ही मेंदूतील अथवा जैविक बिघाडामुळे नाही. तर तो मानसिक बिघाड आहे. त्यांना वडिलांविषयी प्रेम असले तरीही आईवरील नितांत प्रेमामुळे, आणि आईच्या मृत्यूला वडील जबाबदार आहेत असं वाटत राहिल्यामुळे वडिलांबद्दलचा द्वेषही इतका टोकाचा होता की, डोस्टोव्हस्की यांच्या सुप्त मनात पितृहत्येची इच्छा निर्माण झालेली असावी. प्रत्यक्ष खून झाला तेंव्हा त्या इच्छेची पूर्ती झाली, पण अपराधभाव निर्माण झाला. या आघातामुळे सौम्य स्वरूपातील फिट्स येऊ लागल्या असाव्यात.

कारमाझफ ब्रदर्स, इडियट, लॅण्ड लेडी या कादंबऱ्यांमध्ये अनेक प्रमुख पात्रे आणि इतर प्रत्येक कादंबरीमध्ये किमान एक तरी पात्र अथवा व्यक्तिरेखा अपस्मार अथवा मनोविकृत असल्याचे दिसते.

फाशी आणि सुटका —

तरुण डोस्टोव्हस्की रशियातील समाजवादी वर्तुळात वावरत असे. समाजवाद म्हणजे प्रचलित सरंजामशाही व्यवस्थेला विरोध. आणि असा विरोध राज्यकर्ता झार याला मान्य नव्हता. 

यातून चाळीस लोकांना पकडण्यात आले. त्यांपैकी काहींना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावून सैबेरियात पाठवण्यात आले. उरलेल्यांना, त्यात डोस्टोव्हस्कीचाही समावेश होता, फाशीची शिक्षा झाली. तेंव्हा फाशी म्हणजे वधस्तंभाला बांधून गोळ्या घालत. तसे डोस्टोव्हस्की आणि इतरांना वधस्तंभाला बांधण्यात आले. त्यांच्या तोंडावर बुरखे चढवण्यात आले. सैनिक बंदुका रोखून सज्ज झाले. पडघम वाजू लागले…

… आणि सरकारी दूत बग्गीतून उडी मारून बाहेर आला. त्याच्या हातात नवे सरकारी फर्मान होते. कैद्यांना फाशीची शिक्षा माफ !

मृत्यू आणि पुनर्जन्म यांचे हे भीषण, जीवघेणे नाट्य …

या प्रसंगाचा त्यांच्यावर विलक्षण मानसिक आघात झाला. जीवन आणि जीवनेच्छा यांचे मूलभूत महत्त्व त्यांच्या मनावर कोरले गेले.

क्राईम अँड पनिशमेंट आणि इडियट या कादंबऱ्यांत या प्रसंगातील तत्त्वज्ञानात्मक आशय, आणि पुनर्जन्म अथवा पुनरुज्जीवन ही संकल्पना डोस्टोव्हस्की यांनी वापरली आहे.

तुरुंगवास

फाशीची शिक्षा रद्द झाली तरी डोस्टोव्हस्की यांना पुढील चार वर्षे सश्रम कारावासात काढावी लागली. या तुरुंगवासाच्या खुणा, दि हाऊस ऑफ दि डेड या आत्मकथनात उमटल्या आहेत. आणि तेथील गुन्हेगारांना अगदी जवळून दीर्घ काळ पाहता आल्यामुळे त्यांची व्यक्तिमत्त्वे पुढच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये वापरली गेली. 

मुख्य म्हणजे तुरुंगवासाच्या अनुभवाने डोस्टोव्हस्की यांना स्वातंत्र्य आणि प्रेम या दोन उच्च मानवी मूल्यांचे अगदी नवे भान आले. त्यातूनच विलक्षण खोलवर जाऊन मानवी मनाचे चित्रण त्यांच्या कादंबऱ्यांत आले, आणि विचारही मांडले गेले.

पोलिना प्रेम प्रकरण —

पोलिना ही देखणी, पुरोगामी आणि बंडखोर विचारांची अवखळ तरुण लेखिका डोस्टोव्हस्की यांच्या जीवनात आली. पण तुलनेने डोस्टोव्हस्की यांच्या प्रेमाची तीव्रता खूप अधिक होती. या प्रेम प्रकरणावर आधारित वर्णन दि गॅम्बलर या कादंबरीत आले आहे, तर पोलिनाच्या व्यक्तिमत्त्वावर आधारलेल्या व्यक्तिरेखा तेथून पुढच्या काळातील अनेक कादंबऱ्यांमध्ये आहेत.

जुगार —

डोस्टोव्हस्की यांना वयाच्या चाळीशीत जुगाराचे वेड लागले. जुगार, जुगारी आणि त्यांची अवस्था या संकल्पनेवर दि गॅम्बलर आणि अ रॉ यूथ अशा दोन अजरामर कादंबऱ्या डोस्टोव्हस्की यांनी लिहिल्या आहेत. 

अनिरुद्ध कुलकर्णी यांनी यातून शोध घेतला आहे तो हा की, साहित्यिकांजवळ अस्सल अनुभव असणे मूलभूत महत्त्वाचे असते. आणि त्यांच्या आधारानेच त्यांना साहित्य रचना करावी लागते. या अनुभवांचा वापर कसा करावा याबाबत स्वतःचा असा स्वतंत्र विचार त्यांच्याजवळ असावा. या अनुभवाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी असावी.

या पुस्तकातील आणखी एक प्रकरण आहे – दस्तयेवस्कीच्या बांधिलकीचे स्वरूप

डोस्टोव्हस्कीच्या साहित्यातून दिसते त्यानुसार त्यांची मूलभूत बांधिलकी माणसाशी आहे. आणि ही निष्ठा अखेरपर्यंत अविचल राहिली. 

Dostoevsky devoted the whole of his creative energy to the single theme – Man and Man’s destiny … असं सुप्रसिद्ध रशियन अस्तित्त्ववादी तत्त्वज्ञ बारद्याएव्ह म्हणतात.

स्वतः डोस्टोव्हस्की असं म्हणतात की, माणूस हे एक रहस्य, गूढ आहे. त्याचा भेद केलाच पाहिजे. यासाठी जर तुम्ही तुमचे जीवन खर्ची घातले, तर ते वाया गेले असे समजू नका. मी या रहस्याला वाहून घेतो आहे, कारण मला माणूस व्हायचे आहे.

माणसाशी बांधिलकी असल्याने भ्रमिष्ट, वेडे, नडल्या पिडलेल्या स्त्रीया, वेश्या, गुन्हेगार, व्यसनी, जुगारी, मध्यम वर्गातील असहाय्य दुर्दैवी माणसे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते मनाने या लोकांशी एकरूप होऊन जात. 

आणि ही माणसेच त्यांच्या सर्व गुणदोषवैशिष्ट्यांसह व्यक्तिमत्त्व धारण करून डोस्टोव्हस्की यांच्या कादंबऱ्यांत सशक्तपणे येत गेली.

छाया – व्यक्ती

एकमेकांशी काही नाते नसतानाही एकमेकांसारखी दिसणारी माणसे कधी पाहायला मिळतात. डोस्टोव्हस्की यांनी याच छाया व्यक्ती या संकल्पनेचा वापर मानसशास्त्रीयदृष्ट्या करून घेतला आहे. दि डबल या कादंबरीत, आणि तेथून पुढे अखेरपर्यंत ही मूळ संकल्पना न सोडता त्यांनी तिचा मानसशास्त्रीय व तत्त्वज्ञानदृष्ट्या पाठपुरावा करत राहिले.

छाया व्यक्ती ही शारीरिक, मानसिक आणि तात्त्विक आशय असणारी संकल्पना डोस्टोव्हस्की यांना एक वाङ्मयीन तंत्र, व्यक्तिरेखा रंगवण्याचे तंत्र म्हणूनही सामर्थ्य मिळवून देते. या तंत्रामुळे या व्यक्तिरेखा इतर कादंबरीकारांच्या तुलनेत जास्त गुंतागुंतीच्या आणि वेगळ्या ठरतात.

तत्त्वमंथन

डोस्टोव्हस्की यांच्या कादंबऱ्यांत संवाद, वादविवाद, स्वगतपर चिंतने, उपदेशात्मक भाषणे, कादंबऱ्यांच्या कथानकांची सूत्रे, व्यक्तिरेखांच्या निर्मितीमागची तत्त्वे, विलक्षण घटना, कृत्ये यातून तत्त्वमंथन येते. 

साहित्यकृतीला अंतर्बाह्य आणि सर्वांगांनी वेढून घेणारे आणि उजळवून टाकणारे हे तत्त्वज्ञान फार गुंतागुंतीचे किंवा अवघड नाही. ते तसे अवघड वाटते, कारण डोस्टोव्हस्की यांचे मानसशास्त्र गुंतागुंतीचे, अवघड आहे. विविध व्यक्तिरेखांच्या मनोव्यापाराचे इतके सूक्ष्म आणि चित्रविचित्र चित्रण ते करतात की, मूळ विचार अवघड आणि नाट्यपूर्ण होऊनच आपल्यासमोर येतात.

हे तत्त्वज्ञान दोन दिशांनी वाटचाल करते. पहिली दिशा ही बंडाची, क्रांतीची दिशा आहे. हत्येची दिशा आहे. तर दुसरी दिशा नव्या माणसाच्या निर्मितीची दिशा आहे. 

अशा दोन्ही दिशा एकाच वेळी सारख्याच समर्थपणे उभ्या करणाऱ्या या लेखकाला, त्याच्या कादंबऱ्यांना समजावून घ्यायचे असेल तर आधी, दस्तयेवस्की, या, अनिरुद्ध कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अभ्यास करून मगच डोस्टोव्हस्कीची पुस्तके वाचायला सुरुवात करावी, हे श्रेयस्कर, अशा मताला मी हे पुस्तक वाचल्यावर आलो.

हे सुद्धा वाचा..

चॅटो – स्वातंत्र्यासाठी झटणारा साम्राज्यवादविरोधी ‘वैश्विक कार्यकर्ता’!

याआधीचे नितीन साळुंखे यांचे लेख …

परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार – श्री.ना.पेंडसे

नरहर कुरुंदकर – विचार करायला शिकविणारा विचारवंत

शांत इथे पहाटवेळा : मन सुन्न करणारी युद्धकथा


त्या व्यक्तीने पॅपिलॉन वाचलं असतं तर …!

Leave a Reply