मराठ्यांनी आरक्षणाची मागणी करताना आपण ही मागणी समाजाला आलेली विपन्न अवस्था म्हणून करतोय कि इतर प्रवर्गांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या विरोधापोटी करतोय, हे निश्चित करणे गरजेचे आहे. – राहुल गायकवाड

प्रा. यशवंत सुमंत सांगतात त्यानुसार भारतातील वंचित समूहांचा विचार आपल्याला तीन-चार टप्प्यात करावा लागतो ते म्हणजे “पारंपारिक वंचित समूह, दुसरीकडे वासाहतिक राजकीय अर्थव्यवस्थेने निर्माण केलेले वंचित समूह, स्वातंत्र्योत्तर भांडवलशाहीतील वंचित समाज आणि जागतिकीकरणाच्या रेट्यातून निर्माण झालेला वंचित समाज.” महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या आणि दीर्घकाळ राजकीय प्रतिनिधित्व लाभलेला समाज हा मराठा समाज म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात राजकीय वर्चस्व असलेल्या समाजास आज आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. यातील वर्तमान राजकारणाचा भाग सोडला तर मराठा समाजातील मोठ्या भागास विपन्न अवस्थेला सामोरे जावे लागत आहे, यात शंका नाही. मराठा समाज हा महाराष्ट्रातील खूप मोठा शेतकरी समाज म्हणून शतकापासून परिचित आहे. इंग्रजी राजवटी मध्ये वसाहतीक राज्यकर्त्यांनी शिक्षण, शेती, उद्योग, समाजकारण, प्रशासन, विकास या बाबत जी धोरण राबवली, त्यामुळे कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, शेतीवर अवलंबून असलेले व शेतीला पूरक असे अनेक व्यावसायिक यांच्या वाटयाला वंचितता आली. महात्मा फुले ज्या शोषित शेतकरी वर्गाचे वर्णन आपल्या साहित्यात करतात त्यात मुख्यत्वे मराठा शेतकरी दिसतो. इथून कमी अधिक प्रमाणात सुरु झालेली वंचिततेने तुम्ही आम्ही जगत असलेले जागतिकीकरण सुरु झाल्यापासून टोक गाठलेले आहे. कारण कुठलाही  भांडवली दृष्टीकोनातून केला गेलेला विकास हा नवनवीन वंचित समूहांना जन्माला घालत असतो. मराठा समाजातील मोठ्या भागास आलेली वंचितता ही माझ्या मते प्रा. सुमंत यांनी सांगितलेल्या चौथ्या प्रकारात मोडते. या सोबतच मराठा समाजाचे काही सामाजिक पिढीजात चालत आलेले दोष देखील त्यांच्या वंचिततेत भर घालत आलेले आहे, त्यामुळे त्यांच्या व्यापाक समस्यांवर फक्त आरक्षण किती उपाय करेल यावर प्रश्नचिन्ह आहे. परंतु तरी सुद्धा त्यांच्या सर्व समस्यांवर चर्चा करणे गरजेचे ठरते. 

शेतीपासून सुरुवात करायची म्हणजे शेती क्षेत्राची मोठ्या प्रमाणात मागील २०-२५ वर्षात कधी नव्हे एवढी हाणी झाली आहे. शेतीच्या विषम विकासामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत. दुष्काळ व शेतकरी या विषयावर दीर्घकाळापासून काम करत असलेले रेमेन मक्सेस पुरस्कार प्राप्त पत्रकार पी. साईनाथ हे महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश यांना हे जणू शेतकऱ्यांची स्मशान भूमी झाल्याचे म्हणतात. यात नक्कीच मराठा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. हवामान बदलाने नैसर्गिक गती पेक्षा अधिक वेग पकडलेला आहे त्याचा पर्यावरणावर आणि परिणामी शेतीवर झाला आहे. शेतीचे तुकडीकरणासोबत शेती क्षेत्र आकसत जाऊन कमी शेतीवर अधिक उत्पादनाचा ताण निर्माण होत आहे. पिकांचे बी आणि औषध यावर निवडक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व निर्माण झाल्याने नफ्यासाठी सतत किटकनाशके निर्माण होऊन काही दिवसांनी जमिनीची उत्पादकता व दर्जा खालवण्याची भीती निर्माण झाली आहे. यावरून सुद्धा शेतकऱ्याला पिकासाठी योग्य दर आणि हमीभावासाठी याचना करावी लागते. नवउदारमतवादीकरणाच्या शक्तिशाली प्रभावाने ‘विमा’ संस्कृती प्रचंड फोफावली आहे. आजारी पणाच्या विम्यापासून पाचशे रुपयाच्या वस्तू पर्यंत कशालाही काढ विमा, दे विमा फ्री ह्या गोष्टी वाढल्या आहेत. यातून अनेक मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय भांडवली कंपन्या या बक्कळ नफा कमवत आहेत व यांनी यात शेती क्षेत्राला देखील सोडलेले नाही. त्यामुळे याचा परिणाम म्हणजे यातून शेतकऱ्यांची लुट होऊन वित्त भांडवली कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. ही संपूर्ण देशातील विविध ठिकाणांची समस्या असली तरी महाराष्ट्रात ही मराठा समाजाची देखील प्रमुख समस्या आहे, कारण महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज सर्वात मोठा शेतकरी वर्ग देखील आहे. या सर्वातून शेतीक्षेत्रातील समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 

    ह्या सोबतच मराठा समाजाचे शेती संबंधित काही दोष गुण चालत आलेले दिसून येतात. महाराष्ट्रातील इतर समाजात ते फार कमी दिसतात. ‘वावर आहे तर पावर आहे’ हा शब्द आधुनिक काळात मराठ्यांच्या तोंडी मोठ्या प्रमाणत एकायला येतो, कारण जमीन हा मराठ्यांचा वेगळा मानबिंदू बनलेला आहे. फुटभर बांधावरून मारामाऱ्या करणे, प्रसंगी खून देखील पडणे हे गावोगाव अनेक ठिकाणी घडते. बांध  कोरून कोणी फार मोठी जहागिरी कमावली असे ऐकण्यात कधी आले नही,  मात्र कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झालेली अनेक उदाहरणे आहे. ही सामाजिक कारणे शेती संदर्भात असली तरी मुख्य कारणे ही आधी सांगितली तीच आहे, असे म्हणावे लागेल एकूणच मराठा शेतकऱ्यांचे शेतीवरील उपजीविका झटकायचा प्रयत्न शेतीच्या वातहातीमुळे दिसतो. ते आपल्या मुलांना शेतीक्षेत्रात येऊ देण्यास धजावत नाही. मराठा आई-वडील किंवा तरुणांचे ‘जाऊदे काही नाही झालं तर शेती करू’ हे पूर्वीच वाक्य बदलून ‘शेतीचं काही खरं नाही, त्यापेक्षा कंपनीत गेलेलं बरं’ हे वाक्य रुजलेले दिसते. 

Courtesy : DNA

    आता शिक्षणाचा विचार करयचा म्हणजे मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षणाचे आधीपेक्षा अधिक महत्व वाटायला लागले आहे आणि ते अश्या वेळेस जेव्हा शिक्षण क्षेत्र निव्वळ नफा, विक्रीची वस्तू आणि सुमार दर्जाचे कामगार तयार करण्याच्या दृष्टीने उदयास येऊ घातलेले आहे. ह्या खाजगीकरणाच्या रेट्यात परवडेनासे झालेल्या शिक्षणामुळे मराठा तरुण अधिक नैराश्यात जाऊन त्याची प्रतिक्रिया एससी, एसटी, ओबीसी यांना मिळणाऱ्या थोड्या बहुत सुविधा यांच्या विरुध्द उफाळून येत आहेत त्यामुळे एक प्रकारचा अशत्रूभावी संघर्ष निर्माण होत आहे व एससी, एसटी, ओबीसी हे जणू त्यांचे शत्रू असल्याची (जे कि ते शत्रू कधी नव्हते आणि आताही नाहीत) भावना जोर धरते आहे. याचा फायदा जातीय राजकारणाला होताना दिसतो आहे. पण मराठा समाजाने आत्मपरीक्षण करून हे समजून घेतलं पाहिजे. कित्येक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रावर संस्थात्मक नियंत्रण हे मोठ्या प्रमाणावर श्रीमंत मराठ्यांचे राहिलेले आहे. तसेच राजकारणावर देखील नियंत्रण राहिलेले आहे. त्यामुळे मराठ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी यांनी किती प्रयत्न केले याचे परीक्षण करायला हवे. आपण स्वतः दारिद्र्यात पिचत असतानाही आपले शोषण करून श्रीमंत व बलाढ्य होणाऱ्या व्यक्तीचे कौतुक व विभूतीपुजेची सरंजामी वृत्ती मराठे किती काळ उराशी बाळगणार? कारण नवउदारमतवादीकरणाने शिक्षणाला खाजगीकरण व बाजारीकरणाचे क्षेत्र बनवलेले असले तरी मराठ्यांच्या सरांजामशाही वृत्तीचा देखील बऱ्याच प्रमाणात त्यांच्या अवनतीमध्ये वाटा आहे त्यातच शिक्षणाची हेळसांड देखील येते.

    नोकरी किंवा उपजीविका यासंदर्भात देखील मराठा समाजाची अडगळ झालेली दिसते. २०-२५ वर्षांपासून आलेली अनिश्चितता आणि मराठा समाजाची ऐतिहासिक मनोवृत्ती या दोन्ही संदर्भात ही अडगळ झालेली दिसते. मी अनेक कुटुंबात अशी पद्धत पाहिलेली आहे कि कुटुंबातील भावंडांपैकी काही नोकरी करतात व काही शेती. अशी परिस्थिती काही वर्षापर्यंत होती परंतु साधारण १०-१२ वर्षापासून हि पद्धत बदलताना दिसते नोकरी मधील अनिश्चितता, कामगारकायद्यातील बदल त्यातून आलेली असुरक्षितता तसेच व्यावसायीकतेचा अभाव यामुळे भावंडामधील असलेलं सामंजस्य नाहीसे झालेले आहे व सर्वच शेतीच्या तुकडीकरणावर भर आलेला आहे त्यात रिअल इस्टेट क्षेत्राची भर पडलेली आहे यातून मराठ्यांची जमिनी विकून मजा करण्याची चंगळवादी वृत्ती बळावली आहे. ही परिस्थिती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात दिसते. यामुळे मराठ्यांमधील मोठ्या वर्गात कष्ट न-करता ही पैसे कमावण्याची वृत्ती  वाढते आहे.

    गरीब मराठ्यांमध्ये सुद्धा आर्थिक परिस्थितीची जाणीव झाल्याने शिक्षणाची आस वाढताना दिसते आहे परंतु ते अभियंता, स्पर्धा परीक्षा, १०-१२ झाली कि पोलीस-आर्मी कुठल्या तरी क्षेत्रात लागणे इ. निवडक क्षेत्रच धुंडाळताना दिसतात. आपल्या आवडीनुसार क्षेत्रात झेप घेण्याची इच्छा गरीब वा श्रीमंत मराठा तरुणात मी अपवादानेच बघतो. मराठा समाज हा सत्ताधारी वर्ग म्हणून ओळखला जातो. म्हणून आज सुद्धा ३५% असणाऱ्या मराठा समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व ७०% पर्यंत दिसून येते. त्यामुळे ह्या समाजाचा राजकरणात सक्रीय सहभाग असणे अपोआपच आले आणि यात वाईट देखील नाही. परंतु मराठा समाजातील मोठ्या वर्गाने केवळ राजकारणाचा ध्यास घेतल्यामुळे देखील मोठी हानी झालेली आहे. उठसूट राजकारण यामुळे साहित्य, संगीत, इतर कला, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा इ. क्षेत्रात ज्या प्रमाणांत दिसायला हवे, तितका मराठा समाज दिसत नाही. डॉ. इरावती कर्वे म्हणतात, “गुजरातमध्ये ह्या दिवसांमध्ये अतिशय जोराने पुढे सरसावलेला शेतकरी-वर्ग पाटीदार आहे. दुर्दैवाने पाटीदाराना कुठलेही क्षत्रियत्व चिकटलेले नाही. वाटेल ते काम नाक घासून करायला ते तयार असतात आणखी आमच्याकडचे जे मराठी आहेत, त्या ब्राम्हणांना जसे ब्राम्ह्ण्य चिकटलेले होते, तसे त्यांना क्षत्रियत्व आणि कुळी चिकटलेली असल्यामुळे, पाटीदाराइतकेच जोमाने पुढे सरसावलेले नाही. अजून ते आपले क्षत्रियत्व आणि कुळी यातच अडकून पडलेले आहेत.” ह्या वाक्यांमध्ये बरेच तथ्य आहे. मराठा समाज अनेक वर्षांपासून क्षत्रियत्व-कुळ यांच्या अभिमानाला कवटाळून आहे. मला वाटत ज्या प्रमाणे भारतीय स्त्रिया बऱ्या वाईट चालीरीतींचे ओझ विचार न करता कौतुकाने वाहतात, त्याचप्रमाणाचे ओझ मराठे क्षत्रियत्व किंवा कुळ मिरवण्यात वाहतात. शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपर्यंत मराठ्यांच्या क्षत्रियत्वावर उपस्थित झालेल्या प्रश्नचिन्हांची सिद्धता करण्यात वर्तमानात देखील मराठे तत्पर असतात. मराठ्यांचा ब्राम्हणवादा विरुद्ध विचार  देखील त्यांच्या नेणीवेत तेवढ्यापुरताच असतो, यामुळे वर्णव्यवस्थेला तात्विक दृष्टीने जहाल विरोध सुद्ध त्यांच्याकडून दिसून येत नाही. याचा फायदा हिंदुत्ववादी राजकारण शिताफीने करून घेताना दिसते. सध्या मराठ्यांच्या या क्षत्रियत्वाची भलामण हिंदुत्ववादी राजकारण चतुराईने करत आहे यातून मराठ्यांच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन, पोटाचे प्रश्न बाजूला राहून फक्त अस्मिताकेंद्री राजकारण पुढे जात आहे. कुठलाही हिंदुत्ववादी मराठ्यांच्या समस्येवर (शेषराव मोरेंचा थोडक्यात अपवाद वगळल्यास) अभ्यासपूर्ण बोलताना मला दिसलेला नाही. अर्थात ती हिंदुत्ववादी राजकारण आणि विचाराचीच मर्यादाच आहे असे मला वाटते. परंतु सांगायचा मुद्दा असा कि यातून मराठ्यांचा फक्त मतपेढी म्हणून उपयोग होतो व प्रगतीच्या बाबतीत नुकसानच होते आहे व व्यापक वर्गीय दृष्टिकोण अंगीकारता येत नाही. 

    मराठ्यांची नायकांबाबत सुद्धा मोठी समस्या झाली आहे. तशी नायकांबाद्द्लची समस्या अनेक जातींमध्ये आहे, यात दुमत नाही, ती कोणालाच मुक्त अभिव्यक्तीच्या चौकटीत आणत नाही पण सध्या मराठा समाजाबाबत बोलूयात. खर तर मराठ्यांच्या नेणीवेत तर सोडाच पण जाणीवेत सुद्धा ते स्वतःचे नायक म्हणून किंवा महापुरुष म्हणून शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या पलीकडे फारसे जात नाहीत. डॉ. अ. हा. साळुंखे म्हणतात, “आता शिवाजी हे मराठ्यांचे स्फ्रुतीस्थान उरले नसून ते एक मर्मस्थान बनले आहे. आता हे खरे आहे कि, एवढ्या चतुरस्त्र प्रतिभेच्या व उत्तुंग कर्तुत्वाचा महापुरुष कोणत्याही समाजात निर्माण झाला असता, तरी त्या समाजाने त्याचा अभिमान बाळगला असता. परंतु अभिमान बाळगणे वेगळे आणि बाजार वा प्रदर्शन मांडणे वेगळे … शिवाजीचे नाव घेण्यामुळे नव्हे, तर त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या बद्दलचा अभिमान सार्थ राहणार आहे. पण येथे स्थिती अशी आहे कि, शिवाजीचे नाव घेऊन कोणी आपल्या पार्श्वभागावर दोन लाथाहाणल्या, तरी आपल्याला त्याचे कौतुक वाटावे, हा भाबडे पानाचा कळस झाला.”  हे सांगायचा उद्देश म्हणजे यातून आत्तापर्यंत मराठ्यांचे बरेच नुकसान झालेले आहे व या नुकसानीत खुद्द श्रीमंत मराठा राजकारण्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मराठ्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या सोबतच मराठा समाजातील इतर नायाकांकडे बघण्याची देखील गरज आहे. शाहू महाराज , जेधे, जवळकर, ताराबाई शिंदे, महाराज सयाजीराव गायकवाड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, क्रांतीसिह नाना पाटील इ. ह्या समृद्ध परंपरेचे कार्ये सोडाच नावे सुद्धा बहुसंख्य मराठ्यांच्या खिजनित देखील नाही. यातून महापुरुषांना जातीच्या अस्मितेत वाटण्याचा हेतू नाही परंतु भारतासारख्या जातीबद्ध समाजात मराठ्यांना त्यांच्या मधील उदात्त समतावादी व परिवर्तनवादी परंपरा माहित नसणे ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे या नायकांचा आदर्श घेऊन व्यापक परिवर्तनाची वाट मराठ्यांना दिसू शकते. 

    विषयाच्या शेवटला वळायचे म्हणजे, आरक्षणाने त्यांच्या इतक्या मोठ्या समस्या किती प्रमाणात सुटतील, यात माझ्या मनात साशंकता आहे. त्यासाठी त्यांनी व्यापकहिताने वर्गीय भूमिका घेणे गरजेचे आहे. परंतु तरीही मराठ्यांनी आरक्षणाची मागणी करताना आपण ही मागणी समाजाला आलेली विपन्न अवस्था म्हणून करतोय कि इतर प्रवर्गांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या विरोधापोटी करतोय, हे निश्चित करणे गरजेचे आहे. जर समाजातील मागास पणासाठी पाहिजे आहे तर एससी, ओबीसी विरुद्ध मराठा हे भांडण बिनबुढाचे ठरते. मराठ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि एससी, एसटी, ओबीसी, हे तुमचे कधीही शत्रू नव्हते आणि नाहीत सुद्धा ते तुमच्या सारखेच काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि तुमच्याहून अधिकप्रमाणात नागवले गेलेले तुमचेच बांधव आहेत. हे मराठा समाजाने समजून घ्यावे. सोबतच मराठा समाजाने मोफत व स्वस्त शिक्षण, आरोग्य, सर्वाना रोजगार ह्या मागण्यांकडे डोळेझाक करता कामा नये.  

    या मांडणीतून कुठलीही जातीय चौकट मजबूत करण्याचा मुळीच हेतू नाही.  भारतीय समाजाच्या मुक्तीसाठी जातीअंत घडून आणणे ही आग्रहाची बाब आहे, यात शंका नाही. पण मला वाटते आधी आपल्याला त्यातील घटकांच्या वेगवेगळ्या समस्यांना समजून घेणं गरजेचे आहे. त्यामुळे माझा आवाका व विचारांच्या सर्व मर्यादांसोबत हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. 

राहुल गायकवाड,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे, इतिहास विभाग, वर्ष २

One comment

 1. या लेखाच मनापासून स्वागत,अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रभावी मांडणी.. काही बाबी सोडल्या तर लेखन वास्तवाला भिडणार

  काही आक्षेप…

  “ह्या खाजगीकरणाच्या रेट्यात परवडेनासे झालेल्या शिक्षणामुळे मराठा तरुण अधिक नैराश्यात जाऊन त्याची प्रतिक्रिया एससी, एसटी, ओबीसी यांना मिळणाऱ्या थोड्या बहुत सुविधा यांच्या विरुध्द उफाळून येत आहेत ”

  हि मांडणी न पटण्यासारखी आहे
  संधी पासून आपण नाकारले जातोय या भावनेतुन आलेली निराशा sc st obc च्या विरोधी कशी..!
  अलीकडच्या काळात मा.हरी नरके,श्रावण देवरे,प्रदीप ढोबळे,प्रकाश शेंडगे,हरिभाऊ राठोड, adv. सदावर्ते या सारखे काही विचारवंत मंडळी “लांडगा आला रे आला” म्हणून मराठा समाजाची भीती इतर समाज समूहाला दाखवून त्यांच्या मध्ये भीती निर्माण करणार असतील आणि वरील मांडणी असेल तर निश्चितच समतेकडे निघालेला मराठा तरुण हिंदुत्वाच्या वळचणीला गेला तर दोषारोप कोणावर करायचा…?
  20% सरंजामदार मराठ्यांकडे बघून 80% सामान्य मराठयांना झोडपून वर्गीय लढा उभा राहील का …?
  आरक्षणातून काही तितकंसं साध्य होईल न होईल पण ही एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया आहे आरक्षण विरोधी समूहाला आरक्षण समर्थक बनवणं मागास अमागास क्षत्रियत्व असली बेगडी कुंडल फेकून एका वर्गात आणण्याची परंतु तथाकथित समतेची झूल पांघरलेल्या विचारवंतांकडून सातत्याने लिखाणातून, tv वाहिन्यातून, चर्चेतून मराठा समाज खलनायकी रंगवला जातोय याचं परीक्षण कोणी करायचं…? जबाबदारी कोणाची..?
  मराठा समाजात मोठा असा एक वंचितांचा गट आहे जो ताराजूच्या काट्या प्रमाणे आहे ज्या बाजूने त्याच्या मागण्यांना प्रतिसाद मिळतो त्या दिशेने तो वाहायला सुरुवात करतो

Leave a Reply