नितीन साळुंखे
मागच्या काही काळातल्या घटना पाहिल्या. निर्णय पाहिले. घोषणा पाहिल्या. या सगळ्याबाबतची समाजमाध्यमांवरची प्रतिक्रिया पाहिली. आणि कधी नव्हे इतक्या तीव्रतेनं पाशच्या कवितांची आठवण आली.
मला वाचायला आवडतं. पण कविता समजून घेण्यासाठी, त्या मन मेंदूत झिरपण्यासाठी जे तरल, संवेदनशील मन आवश्यक असतं, तो भाग माझ्याकडं कदाचित कमी असावा. त्यामुळं महानोरांच्या रानातल्या कविता, भटांच्या गझल आणि भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीशिवाय इतर पद्याच्या फारसं वाटेला गेलोच नाही.
पाश मात्र वाचायला खूप उशीरा मिळाला. श्रीधर चैतन्य यांनी पाशच्या कविता मराठीत आणल्यानंतर. तोपर्यंत पाशच्या कविता आणि पाश याबद्दल फक्त ऐकत होतो श्रीधरकडून. साधारण नव्वदच्या आसपास केव्हातरी श्रीधरला पाशची कविता मिळाली. आणि श्रीधर त्या कवितांनी भारला गेला. भेटल्यावर, फोनवर, इतकंच काय, त्या काळात एकमेकांना पत्र लिहून ती पोस्टाद्वारे पाठवली जायची त्या पत्रांतून पण हा पाशबद्दल बोलायचा, पाशच्या कवितांबद्दल लिहायचा.
तेंव्हापासून पाश हा आमच्या या मित्राच्या जीवनाचा, विचारसरणीचा, मानसिकतेचा अविभाज्य भाग झालेला आहे.
आणि का असणार नाही ?
कष्टाची दौलत लुटली जाणं सगळ्यात खतरनाक नसतं
पोलिसांचे चार तडाखे खाणं खतरनाक नसतं
सगळ्यात खतरनाक असतं
आपल्या स्वप्नांचं मरत जाणं
असं बजावणारा पाश. आपल्याला जागं ठेवण्यासाठी कठोर शब्दांचे प्रहार आपल्यावर करत राहणारा पाश. राजसत्तेला आणि धर्मसत्तेला एकाच वेळी आव्हान देऊन अंगावर घेणारा निर्भय पाश. त्याच्या या लिहिण्यामुळं त्याला मारण्याचा धर्मांधांनी निश्चय केलेला आहे हे माहित असतानाही अमेरिकेतून परत इथेच येऊन लिहीत राहणारा, लोकांना जागं ठेवण्याचा प्रयत्न करत राहणारा, त्यासाठी उघड्या विहिरीवर उघड्या अंगाने अंघोळ करत असताना उघड्या छातीवर धर्मांधांच्या गोळ्या झेलणारा निधड्या छातीचा पाश…
विचार मांडणारांची निःशस्त्र उघडी छाती धर्मांधांच्या गोळीला बहुतेक अधिक जवळची वाटत असावी !
पाशवी धर्मसत्तेविरुद्ध लिहिलेल्या, अमानुष राजसत्तेबद्दल बोलणाऱ्या, कष्टकऱ्यांच्या जोडलेल्या हातांना सलाम करणाऱ्या, माणसाला निराधार करणाऱ्या ईश्वराच्या आधाराची गरज नाहीय असं बजावणाऱ्या, सामान्य माणसाच्या डोळ्यांतल्या मरू घातलेल्या स्वप्नांकडं आणि विझू विझू घातलेल्या साध्या साध्या इच्छांकडं हताशपणे नुसतं बघत न बसता संतापाने पेटून उठणाऱ्या, आणि त्या अंगाराने वाचणाराच्या काळजाची जळती मशाल बनवणाऱ्या या कवितांबद्दल तर श्रीधर भरभरून बोलतोच.
पण त्या कविता लिहिणाऱ्या कवीबद्दलसुद्धा भरून येऊन बोलतो.
दहशतवाद आणि शासन व्यवस्थेबद्दल सतत बोलत राहणारा, केवळ बोलत न बसता त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता, वाचक संपादक कवी, लेखणीमुळं धर्मांध अतिरेक्यांना नकोसा झालेला, लोकांसाठीच जगलेला आणि मरणाला सामोरा गेलेला हा मनस्वी कवी.
विसरून जा सगळं काही
माझ्या मैत्रिणी
फक्त विसरू नकोस
की, मला खूप जगायचं होतं
की, जीवनरसात गळ्यापर्यंत डुंबू पाहत होतो मी
असं म्हणणारा हा कवी, अवतारसिंग संधू, पाश, वयाच्या अडतीसाव्या वर्षी जाणतेपणाने मृत्यूला सामोरा गेला. पण जाताजाता हे बजावून गेलाय की,
जसे सूर्य आणि हवा
घरांत आणि शेतांवर
आमच्या अंगाखांद्यावर असतात,
अगदी तसंच
सत्ता, विश्वास आणि आनंद
आमच्याशी जोडला गेलेला पाहू इच्छितो
आणि हे साध्य झाल्यावर ?
आम्हाला हवंय हातांच्या तळव्यावर
एक अस्सल सत्य
जसं मीलनाच्या वेळी प्रेयसीच्या ओठांवर
सायीसारखं काहीतरी अद्भुत असतं
तो खरंतर आधीपासूनच सांगत होता
माहिती नाहीये तुला
ती हत्यारांसारखी माणसं आहेत
किंवा माणसांसारखी हत्यारं
खरंतर ती माणसंही नाहीत
आणि हत्यारंही नाहीत
ती हत्यारांमुळं माणसाच्या
संपत जाणाऱ्या प्रेमाची तडफड आहेत
हत्यारांमध्ये रूपांतरित झालेल्या त्या नृशंस हत्याऱ्यांपर्यंत ही तडफड पोचूच शकत नाही. म्हणून तर सामान्यांच्या वेदनांना शब्दरूप देणाऱ्या या कवीला संपवून त्यांनी सामान्य माणसांच्या त्या वेदनांना शब्दांवाचून तडफडत ठेवलं. आणि मग त्या सामान्य माणसाची अशी अवस्था झाली —
चिमण्यांचा थवा
उडून कुठेच जाणार नाही
असाच इथेतिथे कुठेतरी
बांधावर गवत कापत बसेल.
कोरड्या चटणी भाकरीचं ओझं वाहत राहील
आणि मळक्या विटक्या ओढण्या भिजवून
उन्हाने जळलेले चेहरे पुसत बसेल
आणि असं सुद्धा —
दोस्तांनो,
नाचण्या खेळण्याच्या वयात
नांगराला जुंपून घेऊन
तुम्ही ढोर मेहनत करता
आणि तुमच्या कोवळ्या स्वप्नांना
छोट्या छोट्या इच्छांना
तुमच्या घामट कुबट सदऱ्याशेजारी
बांधावर ठेवून देता
आणि मग खंतावून पुढे सांगतो —
माफ करा
माझ्या गावातल्या माझ्या दोस्तांनो,
कविता लिहिणारा हा पुस्तकी मुलगा
तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही
पाच – पाचदा तुरुंगात जाणं
किंवा दूर शहरातल्या व्यासपीठावरून
पोलिसांनी हाणलेल्या दंडुक्यांबद्दल सांगणं
तुमच्या होरपळलेल्या दुनियेसाठी
एखाद्या आटलेल्या तलावासारखं आहे …
धर्मांधांना काय पाहिजे याबद्दल तो सांगतो —
आम्ही जगायला नको होतं
आम्ही लढायला नको होतं
आम्ही तर होमकुंडावर बसून
भक्ती करायला हवी होती तुम्हाला …
आज पाशच्या साधारण १७५ कविता उपलब्ध आहेत. लोहकथा आणि उड्डे बाजां मगर हे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. साडे समियाँ विच हे संकलन आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी प्रकाशित केलेलं, लडांगे साथी हे कवितांचं संकलन. लाहोरमधून त्याची संपादकीय टिपणं आणि इतर स्फुट लेखनाचं एक पुस्तक. बहुतेक सर्व भारतीय भाषा आणि इंग्रजीत पाशच्या कवितांचा अनुवाद झाला आहे. त्याच्या अस्थिर, भटक्या जीवनात त्याने कुठे कुठे प्रसिद्ध केलेल्या आणि अप्रकाशितसुद्धा, अनेक कविता अजूनही सापडत आहेत.
पाशच्या कवितांमध्ये विविध विषय त्याने हाताळले आहेत. राजकीय, पंजाबतल्या लोकांच्या व्यथा, जगभरातील जनसंघर्ष, सामान्य कष्टकऱ्याचे जीवन, सत्याचा शोध, संताप, हे सगळं दिसतंच. पण त्याशिवाय एक समान धागा सर्व कवितांमध्ये आहे. तो धागा आहे माणसाचा, माणसाच्या सन्मानाचा, आणि माणूस म्हणून जगण्याच्या त्याच्या इच्छेच्या गौरवगाथेचा.हा धागा म्हणजे अमानुष परिस्थितीला, मानवाच्या होत असलेल्या दमनाला दिलेले आव्हान आहे. हा एक सांस्कृतिक विद्रोह तर आहेच. तितकाच तो एक दृढ विश्वासही आहे. या संघर्षात अंतिमतः माणसाची, माणूस म्हणून जगण्याच्या हक्काची सरशी होईल, हा विश्वास.
असा हा पाश. आणि त्याच्या कविता.
आपल्याला झटका देऊन जागं करणाऱ्या.
अशा या कवितांचं पुस्तक.
श्रीधर चैतन्य यांनी मराठी रूपांतर केलेलं.
हरिती प्रकाशनाने प्रकाशित केलेलं.
पाशच्या कविता.
हे सुद्धा वाचा..
चॅटो – स्वातंत्र्यासाठी झटणारा साम्राज्यवादविरोधी ‘वैश्विक कार्यकर्ता’!
परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत आहेत.
सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित झाले आहे.
णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, जॉर्ज ऑरवेल या व अन्य देशविदेशातील लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय ते या सदरातून करून देणार आहेत.
याआधीचे लेख …
परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार – श्री.ना.पेंडसे
नरहर कुरुंदकर – विचार करायला शिकविणारा विचारवंत