हैद्राबाद आणि गोवा मुक्ती संग्राम, आणि त्याही आधीची सातारा येथील प्रतिसरकारची चळवळ याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही.

परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत आहेत.

सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित झाले आहे.

णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, जॉर्ज ऑरवेल या व अन्य देशविदेशातील लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय ते या सदरातून करून देणार आहेत.

सिद्धार्थच्या घट्ट मित्राचं, मयूरचं लग्न ठरलं. मुलीकडे आणि इकडे, दोन्ही घरांत लगीनघाई सुरु झाली. कपडे आणि सोनं खरेदी झाली. तिकडे लग्नासाठी कार्यालय ठरलं. इकडे लग्नानंतर रिसेप्शनसाठी कार्यालय बुक झालं. घराची रंगरंगोटी, फर्निचर बदलणे आणि अशा असंख्य गोष्टी युद्धपातळीवर सुरु झाल्या. हनिमूनसाठी परदेशातलं हॉटेल बुकिंग आणि विमानाची तिकिटं मयूरच्या हातात आली.

आणि कोरोना काळ सुरु झाला ….

आता पुन्हा नव्यानं सुरुवात झालीय. पुन्हा नवीन तारखा ठरल्या. मध्येच अचानक थांबलेली खरेदी पुन्हा सुरु झाली. 

ओघानंच हनिमूनचा मुद्दा पुढे आला. आता परदेशाचा विचारसुद्धा करता येत नाही. म्हणजे भारतातच. पण भारतात कोठे ?

गोवा !

जगाच्या पर्यटन नकाशावरचं नाव.

पर्यटकांना बोलवणारे समुद्र किनारे, भव्य चर्चेस, जुनी मंदिरे, डोंगर, दाट जंगले, अभयारण्ये, रस्त्याकडेला दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं, मराठी आणि गोवन कोंकणी भाषेत बोलणारी तिथली शांत स्वभावाची माणसं …

शांत इथे पहाटवेळा या पुस्तकाबद्दल लिहिताना मी, भारतातील युद्धांबद्दल माहितीपर साहित्य आणि ललित वाङ्मय अशा दोन्हींची वानवा असल्याची खंत व्यक्त केली होती. ते वाचल्यावर एका दर्दी वाचनवेड्याने मला एक पुस्तक पाठवलं, मयूर हनिमूनसाठी गोव्याला जाण्याची चर्चा सुरु असताना ते मिळालं.

पुस्तकाचं नाव, गोवा मुक्ती संग्रामात कम्युनिस्टांचे योगदान. 

लेखक आहेत प्रा. आनंद मेणसे.

हे पुस्तक वाचलं, आणि लक्षात आलं की, हैद्राबाद आणि गोवा मुक्ती संग्राम, आणि त्याही आधीची सातारा येथील प्रतिसरकारची चळवळ याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. त्या चळवळीत प्रत्यक्ष लढलेले नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सहवासात होतो. त्यांचे आशीर्वाद मिळाले. त्या चळवळीत शहीद झालेल्या बाबूजी पाटणकर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवणारे डॉ. भारत पाटणकर, तीच पार्श्वभूमी असलेले प्रा. डॉ. बाबुराव गुरव सर यांच्या सहवासात होतो. पण गुरव सरांनी साताऱ्यात एका सभेतील भाषणात प्रतिसरकारच्या कार्याबद्दल माहिती दिली होती. तेव्हढं सोडलं तर बाकी माहिती काहीच नाही. 

खरंतर महाभारत कथा लिहून पुन्हा श्रीकृष्ण, भीष्म, भीम, कर्ण, द्रौपदी, कुंती अशी एक एक व्यक्तिरेखा समोर ठेवून त्यावर कादंबरी लिहिता येते, तशीच या, भारताचा स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, बासष्ठचे युद्ध, एक्काहत्तरचे युद्ध, यांबद्दलची एकएक सर्वंकष महाभारत कथा स्वतंत्रपणे लिहून शिवाय गांधीजी, नेहरू, सुभाषबाबू, कॅप्टन लक्ष्मी, भगतसिंह, क्रांतीसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाबूजी पाटणकर, क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड, भाऊराव पाटील, साताऱ्याचे कॉम्रेड शेखकाका, गोवा मुक्ती संग्रामात मोठे योगदान दिलेले बेळगाव येथील कॉम्रेड कृष्णा मेणसे आणि असेच असंख्य लढवय्ये नेते, कार्यकर्ते यांची व्यक्तिरेखा मध्यवर्ती घेऊन एकएक कादंबरी लिहिली जायला हवी. 

त्यापैकी गोवा मुक्ती संग्रामाची महाभारत कथा लिहिण्याचे मोठे काम या पुस्तकाद्वारे प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे. आणि, पुस्तकाचे नाव गोवा मुक्ती संग्रामात कम्युनिस्टांचे योगदान असे असले, तरी ज्यांचे ‘भारत’ देशावर विनाअट प्रेम आहे, फक्त अशाच खऱ्या देशभक्तांनी या संग्रामात भाग घेतला होता. आणि या सर्वांच्याच कामाची, सहभागाची, त्यागाची, मारहाण करून जखमी करताहेत किंवा गोळी घालून ठार मारताहेत असं दिसत असतानाही ठरल्याप्रमाणे पुढेच पाऊल टाकण्याच्या निर्धाराची, धाडसाची कृतज्ञतापूर्वक नोंद प्रा. आनंद मेणसे यांनी यात निःपक्षपातीपणे घेतली आहे. ज्याचे त्याला मोकळेपणाने श्रेय दिलेले आहे.

गोवा मुक्ती संग्राम समजावून घ्यायचा असेल तर आधी स्वातंत्र्याच्या वेळची भारताची भूराजकीय परीस्थिती कशी होती, हे समजावून घेतलं पाहिजे. भारत हे स्वातंत्र्यापूर्वी एकसंध राष्ट्र कधीच नव्हते, हा यातील प्रमुख भाग. इंग्रज देश सोडून गेले तेंव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांसह सातशे बारा संस्थाने स्वतंत्र झाली. त्यापैकी पाचशे पन्नास संस्थाने स्वतंत्र भारत देशाच्या भूभागाशी संलग्न होती, जी भारतात विलीन करून घेणे एकूण सलग राज्यकारभार आणि संरक्षण अशा दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे होते. 

यापैकी हैद्राबाद संस्थान अठ्ठेचाळीस साली लष्करी कारवाई करून सक्तीने विलीन करून घ्यावे लागले. 

पण ब्रिटिशांशिवाय फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्या ताब्यातही भारताच्या संलग्न भूभाग आधीपासूनच होता. 

पॉंडेचरी फ्रेंचांच्या ताब्यात होते. ते छप्पन्न साली भारतात समाविष्ट झाले.

हैदराबादच्या निजामाने आधीपासूनच तेथील जनतेला शिक्षण, रोजगार संधी या साऱ्यापासून वंचित ठेवले होते. त्यामुळे तेथे आधीपासूनच निजामाबद्दल असंतोष होता. पण अतोनात दारिद्र्य आणि मागासलेपणा यामुळे तेथील जनता उठाव करत नव्हती. स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न सुरु होते. पण निजामाच्या रझाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेनेच्या क्रूर अत्याचारांमुळे या प्रयत्नांना बळ मिळत नव्हते. 

भारतीय स्वातंत्र्यानंतर हे अत्याचार अधिक वाढू लागल्यावर स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेते व कार्यकर्ते, सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची चळवळ ज्यांनी जोमाने शेवटपर्यंत चालवली, त्या क्रांतीसिंह नाना पाटील यांचे अनुभवी आणि खंबीर सहकारी, काँग्रेस पक्षात राहून स्वातंत्र्ययुद्ध लढलेले आणि पुढे कालांतराने वेगळ्या वाटेने गेलेले सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते हे सगळे हैदराबादच्या मुक्तीसाठी अहिंसक मार्गाने चळवळ करू लागले. अठ्ठेचाळीस साली भारत सरकारने लष्करी कारवाई करून हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करून घेतल्यानंतर भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाने झपाटलेले हे सारे कार्यकर्ते दादरा, नगर हवेली आणि गोवा या, पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशांच्या मुक्तीसाठी दीर्घकाळ चालणारी अहिंसक लढाई लढू लागले. 

दादरा आणि नगर हवेली हे दोन प्रांत तर या सर्व आंदोलकांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केले. पण गोवा हा विषय अडचणीचा होता. कारण त्यावेळी पोर्तुगालवर डॉ. सालाझार यांची फॅसिस्ट हुकूमशाही राजवट होती. त्यामुळे गोव्यातील राजवट अत्यंत क्रूर म्हणून नावाजली गेलेली होती. तेथील पोलीस तर अतिशय निर्दयी होतेच. शिवाय पोर्तुगालच्या अंमलाखालील आफ्रिकी देशांतून बाराशे सैनिक त्यांनी गोव्यात आणले होते. आंदोलकांचा छळ करण्याच्या, आणि मारहाण करून जायबंदी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या होत्या.

तरीही या आंदोलकांची जिद्द कायम होती. त्यांनी गोवा विमोचन साहाय्यक समिती स्थापन केली. त्याचे मुख्य कार्यालय पुण्यात ठेवले. भारतभरातील ज्यांना कोणालाही आंदोलनात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी आधी तेथे नाव नोंदवायचे. नंतर बेळगावला जायचे. तेथे कॉ. कृष्णा मेणसे आणि त्यांचे सहकारी या आंदोलकांची पुढील व्यवस्था करायचे. तेथून हे आंदोलक सावंतवाडीला जात. तेथे गोव्यातील कार्यकर्ते असायचे. गोव्यात कोणत्या मार्गाने जायचे, कोठे जायचे, काय करायचे याचे संपूर्ण तपशिलासह नियोजन तेथे व्हायचे. आणि मग त्यानुसार हे कार्यकर्ते शांततामय सत्याग्रहासाठी गोव्यात जायचे.

तेथे गोव्याचे पोलीस त्यांना पकडून अमानुष मारहाण करायचे. आणि जखमी अवस्थेत गोव्याच्या सारहद्दीच्या बाहेर फेकून द्यायचे. यात पुरुष, महिला असा कोणताही भेदभाव नसायचा. मारहाण करण्यातील वसाहतवादी फॅसिस्ट राजवटीची स्त्रीपुरुष समानता !

काही वेळा या निःशस्त्र आंदोलकांवर समोरून गोळीबार व्हायचा, आणि हे सत्याग्रही आंदोलक गोळी वर्मी लागून शहीद झालेले पाहून त्यांच्या हातातील तिरंगा खाली पडू द्यायचा नाही यासाठी दुसरे आंदोलक पुढे जात … आणखी एका गोळीवर त्यांचे नाव लिहिलेले आहे, हे पाहण्यासाठी ! 

हे संपूर्ण आंदोलन, गोवा मुक्तीचा लढा अतिशय नियोजनबद्धपणे चालवण्यात आला. कोणी कोणत्या दिवशी कोठे जाऊन कशा प्रकारे आंदोलन केले, त्यांना कशी मारहाण झाली, हे सर्व तपशील, प्रत्येक आंदोलकाच्या नावासह उपलब्ध आहेत. 

या लढ्याची पार्श्वभूमी, तयारी, प्रत्यक्ष लढा, तो ज्यांच्या विरोधात होता त्या पोर्तुगालच्या राजवटीचा इतिहास, जगातील एकूण वसाहतवादाचा थोडक्यात परिचय, महत्वाच्या आंदोलकांची पार्श्वभूमी असा सर्व आवश्यक माहितीचा खजिना या पुस्तकात भरला आहे. ते भारतीय लष्कराने अठरा डिसेंबर एकसष्ठ रोजी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली, त्याची पार्श्वभूमी, तयारी, आंतरराष्ट्रीय तणाव, त्यावरील राजनैतिक तोडगे आणि शेवटी एकोणीस डिसेंबर एकसष्ठ या दिवशी पोर्तुगीज लष्करी अधिकाऱ्याने भारताचे ब्रिगेडियर के एल धिल्लन यांच्याकडे शरणपत्र लिहून दिले, तिथपर्यंत. 

यापूर्वी गोव्याला गेलो ते तिथला सर्व प्रकारचा निसर्ग भरभरून अनुभवण्यासाठी. आता मयूर ठरवेल हनिमूनला कुठं आणि कधी जायचं ते. हे पुस्तक वाचल्यावर मी मात्र पुन्हा जाणार ते,  पुस्तकात सांगितलेली बेळगाव आणि खानापूर, सावंतवाडीसह ती सगळी ठिकाणं तिथं जाऊन पाहायला, आणि त्या प्रत्येक महानायक  व्यक्तित्त्वाला मनोमन वंदन करायला !

याआधीचे लेख वाचा…

परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार – श्री.ना.पेंडसे

शांत इथे पहाटवेळा : मन सुन्न करणारी युद्धकथा

Leave a Reply