भैरप्पांची पर्व : महाभारताचा एक निराळा अर्थ उलगडणारी कादंबरी

नितीन साळुंखे

संस्कृतीचा विषय निघाला की आपल्यापैकी अनेकांचा कंठ दाटून येतो. छाती फुगते. बाहू फुरफुरु लागतात, नजर क्षितिजापारच्या अंतराळात जाते. आपली संस्कृती अतिप्राचीन, म्हणून थोर आहे, जगात सर्वश्रेष्ठ आहे, असं काहीसं ते भरल्या गळ्याने बोलत राहतात.

पण ही संस्कृती म्हणजे नेमकं काय ? कोणत्या एका धर्माची संस्कृती ? पण उपासना पद्धती आणि विवाहासारखे काही मोजके अपवाद वगळता समाजात वावरताना धर्माची पट्टी कपाळावर बांधून त्याप्रमाणे वेगळे आचरण करत राहणे कोणालाच शक्य नाही.

भारतीय संस्कृती ? पण प्रांताप्रांतातील हवामान, पाऊस, त्यावर अवलंबून पिके, अन्नाची उपलब्धता आणि आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत यांनुसार आहार आणि वेशभूषेच्या पद्धती बदलत्या राहतात. प्रत्येक प्रदेशात लोकांच्या धारणा वेगवेगळ्या असतात. आणि त्यातही कालानुरूप सावकाशपणे, पण निरंतर बदल होताना दिसतो.

मग लोकसंस्कृती ? जी स्थानिक पातळीवर तिथल्या हवामान आणि पीक पद्धतीनुसार वेगवेगळी असते. आणि संपूर्ण भारतात काही धारणा सर्वत्र साधारण समान आढळतात. काळानुसार बदल होताना त्या बदलांचा वेग प्रत्येक प्रदेशात कमीजास्त असेल, पण बदलाची दिशा एकच असते. 

प्रत्येक देशात, प्रदेशात त्या त्या देशप्रदेशाची सांस्कृतिक, ऐतिहासिक ठेव मानलं जाणारं साहित्य असतं. भारतात रामायण आणि महाभारत ही अशी दोन प्राचीन सांस्कृतिक साहित्यिक संचिते आहेत.

पैकी रामायण प्रत्यक्षात घडलं, याला कोणताही आधार, पुरावा नाही. त्यामुळं ते काल्पनिक महाकाव्य आहे, असा निष्कर्ष अनेक मानववंश शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यासाअंती पुराव्याने मांडला आहे. त्याचे खंडन करणारा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळं असा स्पष्ट पुरावा मिळत नाही, तोपर्यंत रामायण ही संपूर्णपणे काल्पनिक रचना आहे, असे या क्षेत्रातील संशोधक विचारवंत मानतात.

महाभारत मात्र उत्तर भारताच्या हिमालायलगतच्या प्रदेशात प्रत्यक्ष घडलेल्या एका मुळात कौटुंबिक, पण नंतर व्यापक संदर्भ मिळालेल्या संघर्षाची कहाणी आहे, असं हे संशोधक मानतात. ही जय नावाच्या इतिहासाची कथा मुळाबरहुकूम लिहिली गेली असली, तरी काळाच्या ओघात समाजाच्या धारणा बदलतात, त्यानुसार अशा कथेमध्ये पण तत्कालीन लोकांकडून बदल केले जात राहतात. 

अशा बदलांच्या, प्रक्षिप्त भागांच्या पलीकडे जाऊन मूळ कथा काय असेल ? त्या काळातील समाजरचना कशी असेल ? लोकांच्या धारणा काय असतील ? चालीरीती रिवाज रूढी परंपरा या सगळ्यांचं ओझं त्यांच्या खांद्यावर असेल का ? कोणत्या स्वरूपात ? हे मानववंश शास्त्राच्या अभ्यासक विचारवंतांना पडणारे प्रश्न कन्नड भाषेतील लेखक डॉ. एस एल भैरप्पा यांनाही पडले. त्यांनी त्या प्रदेशात स्वतः जाऊन तेथील भौगोलिक परीस्थिती, लोकजीवन, आताच्या चालीरीती या सगळ्याचा अभ्यास केला. आणि महाभारताचा मानववंश शास्त्रज्ञांनी सांगितलेला कालखंड, अंदाजे तीन हजार ते साडेतीन हजार वर्षांपूर्वीचा, त्यावेळी लोकजीवन कसं असेल, याचा एक प्रतिभाशाली लेखक म्हणून अंदाज बांधून महाभारत कथा थोड्या वेगळ्या पद्धतीनं लिहिली. त्यांची सगळीच पुस्तके मराठीत आणणाऱ्या उमा कुळकर्णी यांनीच हे पर्व नावाचे पुस्तकही मराठीत आणले आहे.

महाभारत कथा प्रत्येक भारतीयाला माहित असते. त्यामुळं पुन्हा तीच कथा सांगण्याऐवजी त्यांनी, तत्कालीन परीस्थिती, त्या काळातील वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या धारणा, त्यामागील कारणपरंपरा, त्यानुसार असलेल्या चालीरीती यांचा प्राधान्याने वेध घेतला आहे. 

त्यात एक मुद्दा आहे आहाराचा. त्या काळात शेतीचा शोध लागला असला तरी शेती उत्पादनांवरील प्रक्रिया परिपूर्ण अवस्थेला गेलेली नसावी. त्यामुळं गाय, हेच त्या काळात सर्वांचेच मुख्य अन्न होते. म्हणून गायी, ही मुख्य संपत्ती होती, हे त्यांनी कथेच्या ओघात काही प्रसंगांत मांडलं आहे. घरी आलेल्या विशेष पाहुण्याला कोवळ्या गायीचं रुचकर मांस खायला देता यावं, ही यजमान गृहस्थाची आंतरिक इच्छा त्यांनी त्या प्रसंगांमध्ये रंगवली आहे.

महात्मा बुद्धांचा काळ अडीच हजार वर्षांपूर्वीचा. म्हणजे महाभारत काळानंतर अंदाजे पाचशे ते हजार वर्षांनंतरचा. बुद्धांना त्या काळातील लोकांना आवाहन करावं लागलं की, गाय आणि बैल हे आता शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरणारी जनावरं आहेत, त्यामुळं आता गोमांस खाण्यावरचा भर जरा कमी करा. त्यापूर्वी पाचशे ते एक हजार वर्षे तर प्रत्येकाचेच गोमांस हेच प्रमुख आणि एकमेव अन्न असेल, हे अगदीच स्वाभाविक म्हणावे लागेल. म्हणून तर दुर्योधनाच्या गायी गंधर्वांनी पळवून नेल्या. आणि ऋषी मुनींना त्या काळातील राजे हजारांच्या संख्येने गायी दान करायचे. 

भैरप्पांनी पर्व मध्ये माद्रीच्या निमित्ताने तत्कालीन समाजातील आणखी एका प्रथेचा वेध घेतला आहे. मुलगी वयात आल्यावर, म्हणजे रजस्वला झाल्यावर एकही आवर्तन वाया न घालवता पुरुषाकडून गर्भधारणा करून घ्यावी. यांत्रिक अवजारे नसताना, प्रत्येक कामासाठी केवळ मनुष्यबळच उपयोगी पडेल अशा त्या काळात मनुष्यबळ वाढविणे, त्यासाठी प्रत्येक स्त्रीने जास्तीत जास्त अपत्यांना जन्म देणे ही बाब महत्त्वाची असणार. म्हणून तर विवाहाचे वेळी त्या स्त्रीला आधीपासून असलेल्या तिच्या सर्व अपत्यांसह तिचा स्वीकार तिचा पती करीत असे.

याच विचारातून आणखी दोन प्रथा आलेल्या दिसतात. विवाहाच्या वेळी त्या स्त्री बरोबर तिच्या दासीही मोठ्या संख्येने जात असत. पत्नीप्रमाणे पत्नीबरोबर आलेल्या दासींनाही त्या पतीकडून गर्भधारणा केली जाई. आणि ती दासींची मुलेही त्याची मुले म्हणूनच समाजात वावरत. विदुर हे याचे एक उदाहरण आहे. गांधारीला स्वतःला दु:शला ही मुलगी, आणि दुर्योधन आणि दु:शासन हे दोन मुलगे अशी तीन अपत्ये होती. शंभर कौरवांपैकी उरलेले सगळे कौरव, हे धृतराष्ट्राला गांधारीबरोबर आलेल्या दासींपासून झालेले आहेत.

पती जर मुलांना जन्म देण्यास अक्षम असेल तर पत्नीने अन्य पुरुषापासून त्याच्या सहवासात राहून अपत्यप्राप्ती करून घ्यावी. ही नियोग प्रथा. कुंती आणि माद्री यांची मुले, म्हणजे पांडव ही अशी, नियोगातून या दोघींना झालेली अपत्ये आहेत. त्या आधी धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर हे तिघेही सक्तीच्या नियोगातून जन्माला घातले गेलेले होते.

म्हणजे, आज अतोनात पगडा असलेली योनिशुचितेची कल्पना त्या काळात समाजाच्या, मुख्य म्हणजे स्त्रियांच्या मानगुटीवर बसलेली नव्हती.

त्या काळातल्या परिस्थितीचा, जमिनीवरच्या वास्तवाचा, प्रथा आणि चालीरीती यांचा वेध घेण्याच्या प्रयत्नात डॉ.भैरप्पा आणखी एका प्रसंगाकडे येतात. द्रौपदीला पाच पती असण्याचा प्रसंग. ही प्रथा आजही हिमालयाच्या पायथ्याशी काही समाजांत टिकून आहे, असं भैरप्पांना आढळलं. विवाह करण्याचा अधिकार फक्त थोरल्या भावाला असतो. आणि त्याची पत्नी हीच सर्व भावंडांची पत्नी असते. धाकटे भाऊ स्वतंत्रपणे स्त्री शोधू शकतात. पण ते तिला घरी आणू शकत नव्हते. हिडिंबेशी भीमाचे नाते हे याचे एक उदाहरण दिसते.

अशा प्रकारे महाभारतातील घटना अथवा केवळ कथेपेक्षा, त्या काळातील समाजमनाचा, प्रथांचा, धारणांचा त्या मागील कारणांसह शोध आणि वेध घेत त्या काळातील परीस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न डॉ. भैरप्पा यांनी पर्व या कादंबरीत केला आहे.

आपले आजचे समज, धारणा, आग्रह, अपेक्षा वेगळ्या असल्या, तरीही ते त्या काळातील आपल्या पूर्वजांचे वास्तव आहे. त्या काळातील त्यांच्या भवतालाला अनुरूप असेच ते वास्तव आहे, हे लक्षात घेऊन ते स्वीकारले पाहिजे. आपल्या आताच्या धारणांचे ओझे तीन साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांच्या पाठीवर लादण्याचा आपल्याला अधिकार नाही, याचे भान ठेवले पाहिजे. म्हणजे मग पर्व वाचताना एका चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेण्याचा आनंदही मिळेल. आणि आपल्याला आपल्याच इतिहासाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळेल. ती दृष्टी घ्यायची, का गांधारीची पट्टी डोळ्यांवर आपल्या हाताने बांधून अंधतेत आयुष्य घालवायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न !


परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत आहेत.

सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित होते आहे.

णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, जॉर्ज ऑरवेल या व अन्य देशविदेशातील लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय ते या सदरातून करून देत आहेत..

या सदरातील याआधीचे लेख ..

परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार – श्री.ना.पेंडसे

नरहर कुरुंदकर – विचार करायला शिकविणारा विचारवंत

शांत इथे पहाटवेळा : मन सुन्न करणारी युद्धकथा


त्या व्यक्तीने पॅपिलॉन वाचलं असतं तर …!

Leave a Reply