त्या व्यक्तीने पॅपिलॉन वाचलं असतं तर …!

नितीन साळुंखे

परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत आहेत.

सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित होते आहे.

णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, जॉर्ज ऑरवेल या व अन्य देशविदेशातील लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय ते या सदरातून करून देणार आहेत.

फेसबुकवरील माझ्या मित्रयादीतील एक व्यक्तिमत्व काही दिवसांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलं. केवळ नाव नव्हे, व्यक्तिमत्व. तशी शांतपणे आपण लिहू ते वाचणारी, कधी लाईक किंवा एखादी कमेंट त्यावर देणारी कित्येक नावं प्रत्येकाच्या मित्रयादीत असतात. 

जिच्याबद्दल वा ज्याच्याबद्दल मी बोलतो आहे तिला मी कधी भेटलो नाही. तिच्याशी समक्ष, फोनवर अथवा मॅसेंजरद्वारे संवाद झाला नाही. तिला कधी लांबून सुद्धा पाहिलं नाही. फक्त फेसबुकवरच्या तिच्या पोस्ट्स वाचल्यात. एखाद्या व्यक्तीच्या पोस्ट्स नियमितपणे वाचत राहिलं की एक व्यक्तिमत्व आपोआप आकार घेऊ लागतं. या व्यक्तिमत्वाला चेहरा, रंग रूप यापैकी कशाचीच गरज नसते. काही संबंधच नाही. ते व्यक्तिमत्व आकाराला येतं नजरेसमोर, ते भाषेतून, पोस्टमध्ये मांडलेल्या विचारांतून, ते विचार ज्यातून येतात, त्या विचारधारेतून. तेव्हढं पुरेसं असतं.

किचकट, क्लिष्ट अशा आंतरराष्ट्रीय राजकारणाची अभ्यासक आणि जाणकार. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांवर विलक्षण प्रभुत्व. लोकशाहीवादी. कोणत्याही स्वरूपातील एकाधिकारशाही अथवा हुकूमशाहीची प्रखर विरोधक. ट्रम्प आणि तत्समांचं मोजक्या, शेलक्या शब्दांत योग्य मूल्यमापन करण्याची क्षमता. तीव्र बुद्धिमत्ता. संवेदनशील मन.

एकेदिवशी फेसबुकवरच कुलकर्णी नामक आणखी दुसऱ्या एका व्यक्तिमत्वाच्या पोस्टवरून समजलं की ही विशीतली, लेखिका, आंतरराष्ट्रीय राजकारणाची अभ्यासक अशी जी एक व्यक्ती माझ्या फेसबुक मित्रयादीत होती.. तिनं आत्महत्या केली.

मला खात्री आहे, अनेकांना धक्का बसला असणार. मलाही बसला. आपलं अगदी जवळचं असं कोणीतरी अचानक आपल्यातून निघून गेलं आहे, अशी काही भावना आत्ता हे लिहितानाही मनात आहे. 

असं काही समजलं की प्रत्येकाच्या मनात हा पहिला प्रश्न येतो, असं काय घडलं म्हणून या व्यक्तीने हा टोकाचा निर्णय घेतला असेल ? पण खरंतर या प्रश्नाला उत्तर नसतं. काही अर्थही नसतो. प्रत्येक वळणावर आयुष्य प्रत्येकाला नवीन काही देत असतं. ते पुढचं वळण कधी येणार आहे, आणि त्या वळणावर आयुष्य आपल्याला काय देणार आहे, हे कधीच सांगता येत नाही. पाय जमिनीवर, आणि डोकं शांत ठेवून ते स्वीकारता आलं पाहिजे. ते स्वीकारता आलं नाही, आणि असा काही टोकाचा निर्णय घेतला गेला, तर दोन गोष्टींची आपण खात्री बाळगू शकतो. एक, ती व्यक्ती संवेदनशील मनाची आहे. दोन, त्या व्यक्तीने पॅपिलॉन हे पुस्तक वाचलेलं नाही.

पॅपिलॉन !

नाकासमोर बघत शांतपणे जीवन जगू पाहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेसारखीच प्रवृत्ती असलेल्या फ्रेंच कुटुंबातला पंचवीशीतला तरुण मुलगा. काही काळ नेव्हीत नोकरी केली आहे. थोडा बहकलेला. गुन्हेगारी जगाच्या काठावर विसावलेला. त्या जगात त्याचं नाव पॅपिलॉन. म्हणजे फुलपाखरू. बागेत शांतपणे बसलेला असताना फ्रेंच पोलिसांनी त्याला उचललं. दुसऱ्या अशाच एका छोट्या गुन्हेगाराच्या खुनाच्या खोट्या आरोपावरून. खटला झाला, आणि त्याला दोषी ठरवून, त्याबद्दल फ्रान्सपासून दूरवर असलेल्या बेटांवरील तुरुंगात आयुष्यभर राहण्याची सजा सुनावून संपवला गेला.

न केलेल्या खुनाबद्दल शिक्षा झाल्यानं पॅपिलॉनला सात्विक संताप आला आहे. शिक्षा झाल्यावर पहिल्याच रात्री तो स्वतःशीच प्रतिज्ञा करतो. तुरुंगातून सुटका करून घेण्याची. आणि संबंधित पोलीस, सरकारी वकील, खोटी साक्ष देणारा आणि जज यांचा सूड उगवण्याची. 

पॅपिलॉन, म्हणजे हेन्री शॅरियर यांनी स्वतःच, पॅपिलॉन याच नावाने हे पुस्तक लिहिले आहे. त्या तरुण मुलाची त्या वेळची मनःस्थिती, मनातले सूडाचे विचार, तुरुंगातले दुसरे कैदी म्हणजे गुन्हेगारच, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे वॉर्डन्स, जेलर, त्या सगळ्यांची वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये आणि त्यांचं वागणं. मानसशास्त्राच्या अभ्यासकांना निरनिराळ्या व्यक्तींचे जे मानसशास्त्रीय विश्लेषण हेन्री शॅरियर यांनी केले आहे, त्याचा आस्वाद घेण्याच्या दृष्टीनेही हे पुस्तक अभ्यासता येईल.

या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे रवीन्द्र गुर्जर यांनी. रशियाच्या रादुगा प्रकाशनासाठी उत्तमोत्तम रशियन पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणारे अनील हवालदार आणि पॅपिलॉन, बँको, गॉडफादर आणि अशी अनेक पुस्तके मराठीत आणणारे रवीन्द्र गुर्जर या दोघांचा समावेश माझ्या मते जगातील सर्वोत्तम अनुवादकांत करावा लागेल. 

प्रबळ इच्छाशक्ती, कधीच न संपणारा आत्मविश्वास आणि जीवाच्या आकांताने केलेले प्रयत्न असतील तर कितीही प्रतिकूल परीस्थिती असेल तरी ती बदलता येऊच शकते हे वास्तव हेन्री शॅरियर यांनी विलक्षण ताकदीनं मांडलंय आणि ते तितक्याच प्रतिभाशालीपणे रवीन्द्र गुर्जर यांनी मराठी वाचकांपर्यंत पोचवलंय. 

इंग्रजांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अक्षरशः हजारो भारतीयांना भारताच्या मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर दूर समुद्रातील अंदमान बेटांवर पाठवलं. एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके लोक सोडले तर इतर कोणालाच निदान स्वातंत्र्य मिळेपर्यंत तरी परत येता आलं नाही. शेकडो जणांना तेथे असतानाच देशासाठी अमर होण्याचे सद्भाग्य मिळाले. 

फ्रान्स अशाच रीतीने, पण त्यांच्याच देशातील शिक्षा झालेल्या लोकांना फ्रान्सच्या मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या बेटांवरील तुरुंगांत पाठवीत असे. कायमसाठी. सुटका नाहीच. पळून जाण्याचा विचारही कोणी करू धजत नसे. अनेक कारणांसाठी. कडेकोट बंदोबस्त. त्यातून कोणी पळाला तर बेटांवरून जाणार कोठे ? समुद्रात ! पळून जाताना अथवा पळाल्यावर पकडले जाण्याची शक्यता शंभर टक्के. म्हणजे खात्रीच. पकडलं गेल्यावर त्यासाठी पुन्हा शिक्षा. अंधारकोठडीची. तिथं काही महिने राहिलेले एकांतवासामुळे वेड लागून आत्महत्या करीत. आणि या सगळ्याच्या आधी, कोणी पळून जाणार आहे अशी चाहूल जरी लागली, तरी तिथल्या कैद्यांपैकी कोणीतरी रात्री झोपेत असतानाच त्याचा गळा चिरणार. आरपार. 

कारण कोणी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर काही काळ तरी नियमानुसार काम. त्यामुळं तिथल्या कैद्यांचं रूटीन, म्हणजे मुख्यत्वे जुगार, बंद पडायचा. आणि कशीही असली तरी एक दैनंदिन चाकोरी निश्चित झालेली असते, त्यात बदल होतोय म्हटलं की लोकांना असुरक्षित वाटायला लागतं. त्यामुळं बदल सहसा कोणालाच आवडत नाहीत. म्हणून अशा बदलाच्या शक्यतेचाच गळा आरपार चिरायचा.

तिथल्या कैद्यांची मानसिकता, व्यक्तिमत्व, व्यक्तीगत आणि सामूहिक सवयी, राग द्वेष हेवेदावे आणि मैत्री, जेलर्स आणि वॉर्डन्स, हा कैदी आहे ही त्याची ओळख बाजूला ठेवून माणूस म्हणून पॅपिलॉनला बरोबरीची वागणूक देणारे जेलर्स आणि त्यांच्या पत्नीसुद्धा, असं सगळ्या माणसांचं वर्णन कथेच्या ओघात पॅपिलॉन करत जातो. ते वातावरण, ते लोक आणि तो दिनक्रम त्याने निवडलेला नाही. त्यामुळं एका अलिप्त तटस्थतेनं तो हे सगळं वर्णन करतो. आणि तंतोतंत त्याच पद्धतीनं ते अनुवादातूनही आपल्यापर्यंत पोचतं. 

तुरुंगात गेल्यावर तिथली बारकाईनं पाहणी करून, कमकुवत जागा शोधून तिथून पळून जाण्याचे मार्ग शोधणे, त्यासाठीची पूर्वतयारी करणे आणि प्रत्यक्ष पलायन, याबद्दल बोलताना मात्र तो रंगून जातो. पकडलं गेल्यावर दुःखी होतो. आणि परत पुन्हा तुरुंगात दाखल. काही वेळा एकांतवासाच्या अंधारकोठडीची शिक्षा. तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा पुढच्या पलायनाची योजना आखण्याचं काम सुरू.

पॅपिलॉन संवेदनशील माणूस आहे. त्यामुळं तो हसतो, काही किस्से सांगताना त्याच्या शैलीने आपल्यालाही हसवतो, गंभीर होतो, पकडला गेल्यावर दुःखी होतो. पण तो कधीच हताश होत नाही. हताश होऊन त्याचे जे ध्येय आहे, पलायनाचे, सुटका करून घेण्याचे, त्याबद्दलचे विचार तो एका क्षणासाठीही थांबवत नाही. त्याला हे माहित आहे की, पलायनाच्या प्रयत्नात तो पकडला जाण्याच्या शक्यता खूपच जास्त आहेत. आणि त्यानंतर आत्ता नरकासमान असलेलं आयुष्य आणखी वाईट होणार आहे. पण ती भीतीही त्याला कधीच थांबवू शकत नाही. त्याच्या योजना आणि प्रयत्न, सतत चालू राहतात. वर्षानुवर्षे. अखंडपणे. न थकता.

थोडक्यात, महाकवी पाश यांच्या पद्धतीनं सांगायचं तर, 

प्रयत्नांत अपयशी ठरणं भयानक नसतं

अपयशाच्या भीतीनं प्रयत्न सोडून देणं भयानक असतं …

या अशाच प्रयत्नांत एकदा पॅपिलॉन कोलंबियातील एका आदिवासी वस्तीत जाऊन पडतो. समुद्रात बुड्या मारून शिंपले पाण्याबाहेर काढून त्यातून मोती गोळा करणे, हा त्या जमातीचा व्यवसाय. हे मोती एकच ठराविक माणूस घेऊन जातो, आणि तोच त्या बदल्यात त्यांना हव्या त्या इतर गोष्टी पुरवतो. मुळातच निसर्गाशी तादात्म्य पावलेलं जगणं असल्यानं तिथल्या लोकांच्या गरजाही अगदी कमी आहेत. गोंदण्याच्या कलेतील कौशल्यामुळं पॅपिलॉनला त्या जमातीत स्थान मिळतं. एक तरुण मुलगी त्याची रीतसर पत्नी होते. त्याला तिच्यासह तेथे घर मिळतं. तिच्या धाकट्या बहिणीचीसुद्धा त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्यानं त्याची तयारी नसतानाही त्याची पत्नी त्याला तिच्या धाकट्या बहिणीशी लग्न करायला तयार करते. दरम्यान, पहिल्या पत्नीला बाळ होणार असल्याची शुभवार्ता येते.

आणि मग, या आदिवासी जमातीची प्रजा वाढवण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. मला माझ्या सुसंस्कृत जगात परत जायचं आहे या जाणीवेतून, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, त्याला खुष ठेवण्यासाठी सतत धडपडणाऱ्या त्या दोघींना सोडून, त्याला आपल्यात सामावून घेऊन समाजात स्थान, लग्नासाठी दोन मुली आणि घर देणाऱ्या, स्वार्थी भांडवलदारी विचारांचा वारा न लागल्याने साधी, सरळ, निष्कपट राहिलेल्या त्या चांगल्या माणसांना सोडून पॅपिलॉन तेथून बाहेर पडतो. आणि दुसऱ्याच दिवशी कोलंबियाच्या पोलिसांकडून पकडला जातो. तिथं काही काळ सडल्यावर त्याला पुन्हा फ्रान्स सरकारच्या वतीनं तुरुंगाधिकारी ताब्यात घेतात. आणि आता, चारी बाजूंनी समुद्राने वेढलेल्या, पण किल्ल्यासारख्या उंच बेटांवर त्याची रवानगी होते.

या सगळ्या जगापासून दूर, दोन बायका आणि प्रेमळ माणसांच्या सहवासात राहणं नाकारून पॅपिलॉन बाहेर पडतो, आणि कोलंबिया पोलिसांच्या कैदेत पडतो, या प्रसंगाशी हे पुस्तक वाचताना मी आजपर्यंत प्रत्येक वेळी थांबलो आहे. 

मी सर्वांत पहिल्यांदा पॅपिलॉन वाचलं, ते माझ्या पंचविशीत. त्यानंतर दर काही वर्षांच्या अंतराने, आणि जेंव्हा जेंव्हा आयुष्याकडून ठोकर बसली, त्या त्या प्रत्येक वेळी मी आवर्जून पॅपिलॉन वाचत आलोय. कसलंही घाणेरडं काहीतरी आपल्याच आयुष्यानं आपल्याला दिलं असलं, तरी अथक प्रयत्नांनी ते बदलता येतं. दिवस बदलतात. बदलवता येतात, हा ठाम विश्वास मला या पुस्तकाने प्रत्येक वेळी दिला आहे. आणि येऊ पाहत असलेली निराशा झटकून पुन्हा आयुष्याशी ताठ मानेने दोन हात करण्याची उमेद मिळवून दिली आहे. 

पण इथं, या प्रसंगापाशी मात्र मी प्रत्येक वेळी थांबतो. आणि विचार करतो की, स्वतःच्या किरकोळ स्वार्थासाठी दुसऱ्याला आयुष्यभर सडत ठेवण्यात धन्यता मानणाऱ्या या समाजाकडे, त्या बेटावरचा तो प्रेमळ समाज सोडून पॅपिलॉन का पळत सुटला असेल ? मी त्याच्या जागी असतो, तर माझ्यावर निरतिशय, निरपेक्ष प्रेम करणाऱ्या दोन सहचरी, आणि ज्यांनी प्रेम, विश्वास, आधार, संरक्षण भरभरून दिलंय, असे तिथले लोक सोडून, ते स्थिर, शांत आयुष्य लाथाडून, आयुष्याकडून कमी जोरात लाथा मिळाव्यात यासाठी संघर्ष करण्यासाठी मी परत आलो असतो काय ? येऊन काय साधलं असतं ?

पण पॅपिलॉनला याच समाजात पुन्हा येऊन स्वतःचं निर्दोषित्व सिद्ध करायचं असावं. त्यामुळं तो पुन्हा नव्या तुरुंगात गेला. पुन्हा पलायनाच्या नव्या उमेदीने. पण इथं खूप उंच कडा आहे. समुद्र खूप लांब खाली आहे. त्यामुळं होडी पैदा करून पळण्याची सोय नाही. 

सततचा ध्यास, अनुभव आणि तीव्र बुद्धिमत्ता याच्या जोरावर पॅपिलॉनने यातूनही मार्ग शोधला. आणि यावेळी तो समुद्रातून लागला ते व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर. तिथल्या प्रेमळ लोकांनी आणि विशेष म्हणजे तिथल्या पोलिसांनी आणि सरकारनेही त्याला स्वीकारलं. फ्रान्सच्या ताब्यात परत देण्याऐवजी त्याला व्हेनेझुएलाचं नागरिकत्व दिलं.

आयुष्याचा मोठा काळ कैदी म्हणून अट्टल गुन्हेगार आणि वॉर्डन्ससारख्या लोकांच्या सहवासात आणि त्यापासून लांब पळून जाण्याच्या प्रयत्नांत गेल्यानंतर पॅपिलॉनचा एक ध्यास पूर्ण झाला. सुटका ! आता तो फ्रान्समध्ये जात नाही तोपर्यंत फ्रान्स सरकार त्याला हात लावू शकत नाही. तो आता एका देशाचा स्वतंत्र नागरिक आहे ! अथक ध्यासातून त्याने ही ओळख परत मिळवली आहे. 

आता ही ओळख टिकवायची आहे. या देशाने त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरायचं आहे. ही जबाबदारी मोठी आहे. पण जगण्यासाठी पैसा लागतो. आणि तो कायदेशीर मार्गाने मिळवण्यासाठी जे कौशल्य अंगात लागतं, त्यातलं काहीच जवळ नाही. पण तरी कायदेशीर मार्गानेच पैसे आणि प्रतिष्ठित व्यक्ती अशी ओळख मिळवायची. आता हा नवा ध्यास. त्यासाठी अथक प्रयत्न सुरु. त्याची पण एक मोठी गोष्ट आहे. हेन्री शॅरियर यांनी ती सांगितली आहे, बँको नावाच्या पुस्तकातून. 

हे पुस्तक वाचल्यावर, काहीही मिळवायचं असेल तर संधींची वाट न बघता आपली आपण संधी निर्माण करण्यासाठी जीवतोड मेहनत केली तर ती मिळतेच, ही उमेद मिळते. ही उमेद महत्वाची. त्या आधारावर आपण जग खांद्यावर तोलू शकतो. ही उमेद मिळवण्यासाठी मी पॅपिलॉन आणि बँको आठवत राहतो.

संवेदनशील मनाच्या त्या व्यक्तीने ही दोन पुस्तकं वाचली नसणार नक्की. कारण ती वाचली असती, तर तिनं पंधरा ऑक्टोबरला कदाचित पोस्ट लिहिली असती की, माझ्या आयुष्यात एक वादळ घोंघावत आलं. त्यानं माझं स्वतःचंच दान मागितलं. पण त्याच्यापुढे मी हरले नाही. हरणारही नाही. कारण मला याच समाजात राहून अजून खूप काही करायचं आहे, खूप काही घडवायचं आहे, खूप काही बदलायचं आहे. आणि मी त्यासाठी प्रयत्न करत राहीन …

संपादकीय नोट : पोर्टलवर सकाळी प्रकाशित झालेला लेख व्यक्तीच्या नावांचे संदर्भ गाळून अपडेट करण्यात आला आहे.

काही मित्रांच्या भावना दुखावल्या आहेत असे त्यांनी टेलिफोन करून आम्हाला कळविले त्यांचे आम्ही आभारी आहोत.

त्यांच्या विनंतीवरून बदल करण्यात आलेला आहे.

शांत इथे पहाटवेळा : मन सुन्न करणारी युद्धकथा – नितीन साळुंखे

सकल इस्लामवाद, समाजवाद आणि भारतीय राष्ट्रवादातील संपर्कबिंदू – क्रांतिकारी मौलाना बरकतुल्ला – देवकुमार अहिरे

One comment

  1. बेष्टच !

    बॕंकोवर लिहून हे चांगले लिखाण पूर्ण केले तर फारच छान होइल .
    तुर्तास हा लेखाचा पहिला भाग समजतो .

Leave a Reply