शांत इथे पहाटवेळा : मन सुन्न करणारी युद्धकथा

परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि लेखक या सदराच्या माध्यमातून कथालेखक आणि अनुवादक नितीन साळुंखे असंतोष वेब पोर्टलवर दर आठवड्याच्या दर शनिवारी लिहीत आहेत.

सातारा येथे वास्तव्यास असलेले नितीन साळुंखे यांनी आयन रँड यांच्या अँथम या कादंबरीचे मराठी रूपांतर केले असून पुणेस्थित मैत्री पब्लिकेशन या संस्थेकडून ते नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित होते आहे.

णगुगी वा थ्योंगो,आयन रँड,श्री.ना.पेंडसे, जॉर्ज ऑरवेल या व अन्य देशविदेशातील लेखकांचा व त्यांच्या कलाकृतीचा परिचय ते या सदरातून करून देणार आहेत.

भारताने एक स्वातंत्र्यलढा आणि सहा युद्ध, लढाया बघितल्या आहेत. यातला स्वातंत्र्यलढा दीर्घकाळ चालू होता. आर्थिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अशा अनेक आघाड्यांवर चालू होता. तेंव्हाच्या ब्रिटीश अंमलाखालील भारतातील जवळपास प्रत्येक गावखेड्यात पोचला होता. आणि सत्तेसाठी धर्माचा आधार घेणाऱ्या राजकीय संघटनांचे हिंदू आणि मुस्लीम नेते आणि त्यांचे अनुयायी सोडले तर जातधर्मपंथवंशलिंगभेद विसरून, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय उंची निरपेक्षपणे प्रत्येक लहानथोर स्त्रीपुरुष भारतीय या लढ्यात आपल्या परीनं सहभागी होता, आणि प्रसंगी मरायलाही आनंदाने तयार होता.

स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज निघून गेले. भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात साडेपाचशेपेक्षा जास्त संस्थाने होती, जी ब्रिटीश साम्राज्याचा भाग नव्हती. स्वतंत्रच होती. त्यांना भारतात विलीन करून घेण्याचे काम सुरू होते. शक्यतो समजावून. नाही ऐकलं तर सक्ती करून. याची दोन मोठी उदाहरणे म्हणजे निजामाच्या अंमलाखालील हैद्राबाद संस्थान आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातलं गोवा. हे दोन प्रदेश नंतर पोलीस कारवाई करून बळाचा वापर करूनच ताब्यात घ्यावे लागले. 

देशाची फाळणी धार्मिक आधारावर झाली होती. मुस्लीमबहुल भूप्रदेश पाकिस्तानात गेले होते. पण भारत आणि पाकिस्तानच्या मधेच असलेल्या मुस्लिमबहुल काश्मीरचा राजा हरीसिंग याची, त्या निकषाने पाकिस्तानात जाण्याची तयारी नव्हती. त्याला भारतातही यायचं नव्हतं. त्याला काश्मीर स्वतंत्र हवा होता. पण काश्मिरातील मुस्लीम नागरिकांचा भारतात सामील व्हावे यासाठीचा दबाव वाढत होता. आणि ते पाहून काश्मीरवर कब्जा करण्यासाठी पाकिस्तानने काही टोळीवाले पाठवले.

भारत किंवा पाकिस्तान, स्वतःचे असे सैन्य कोणाकडेच नव्हते. भारतातून सैन्यात भरती झाले होते ते ब्रिटीश सैन्यदलाच्या विविध विभागांत होते. त्यातही खूपसे सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेबरोबर गेले. पण ते दीर्घकाळपर्यंत ब्रह्मदेशात अडकून पडलेले होते. शस्त्रे जवळपास नव्हतीच. होती ती दुसऱ्या महायुद्धात वापरून मोडकळीला आलेली. त्यासाठी दारुगोळा नव्हता. शस्त्र आणि दारूगोळ्याच्या निर्मितीचे कारखाने नव्हते. सैन्यच नसल्याने संपूर्ण सीमा उघडीच होती. 

ही स्थिती बदलून समर्थ सैन्यदले उभारणीचे आणि त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र, अस्त्रे देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम पुढे काँग्रेस सरकारांच्या काळात, त्यातही विशेषतः नेहरु आणि इंदिराजींच्या कारकीर्दीत केले गेले. पण तो स्वतंत्र विषय आहे.

भारतात सामील होण्यासाठीचा अंतर्गत दबाव, आणि पाकिस्तानची घुसखोरी, यातून राजा हरी सिंगाने नाईलाजाने भारतात समिलीकरणाच्या करारावर सह्या केल्यानंतर भारताला काश्मिरात ‘सैन्य’ पाठवता आले. 

त्यानंतरचे १९६२ मधील चीनचे आक्रमण हे अरुणाचल प्रदेश, त्यावेळी नॉर्थ ईस्ट फ्रंटियर अलायन्स, नेफा बॉर्डर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या काही भागापुरते मर्यादित होते. हिमालयातील हा अतिउंच टेकड्यांचा प्रदेश आहे. रस्त्याने जाताना एका बाजूला वर पाहिले तर नजर जाईल तोवर त्या पर्वताची सरळसोट उंच उभी भिंत. दुसऱ्या बाजूला अंतहीन खोल दरी. धबधबा गोठून बर्फाचा होतो, इतकी अतिथंडी. ईशान्येकडील टोकाचे गाव तवांग. त्याच्या अलीकडे उंच खिंडीला सिला पास म्हणतात. 

बासष्ठच्या युद्धाच्या वेळी तेथे काही भारतीय सैनिक होते. लढत होते. त्यांना शिधा देण्याची काहीच व्यवस्था नव्हती. समोरून चिनी सैन्याचा अखंड गोळीबार चालू होता. सिला ही सोळा वर्षांची मुलगी त्या भारतीय सैनिकांसाठी खिंड ओलांडून जेवण घेऊन गेली. तिकडे जाऊन बघते तर एकच भारतीय सैनिक जिवंत होता. या बराकीतून त्या बराकीत उड्या मारत वेगवेगळ्या मशिन गन्स एकटाच चालवत होता. समोरची चिनी सैन्याची संपूर्ण फौजेची आगेकूच त्याने एकट्याने थांबवली होती. पण हे चिन्यांना माहित नव्हते. 

सिला आणि तो अखेरचा एकटा सैनिक, दोघेही तेथे देशासाठी अमर झाले. पण चिनी सैन्य पुढे न येता तेथेच थांबले, आणि तेथूनच परत गेले. त्या बराकी तेथे अजून आहेत. लोकांच्या मनात आठवणीही आहेत. लोक त्याबद्दल अतीव प्रेमाने बोलतातही. पण त्या आठवणींना शब्दरूप देऊन युद्धसाहित्य लिहिलं गेलेलं नाहीय, असा माझा समज आहे.

१९६५ मध्ये पाकिस्तानने आणखी एक दुःसाहस करण्याचा प्रयत्न केला होता.

खरे मोठे युद्ध भारताने १९७१ च्या डिसेंबरमध्ये लढले. कूटनीती, शत्रूच्या गोटात दुफळी निर्माण करून त्याला अंतर्गत शत्रू निर्माण करून आधीच जेरीला आणण्याची आक्रमक युद्धनीती, सक्षम, समर्थ आणि सर्वार्थाने सुसज्ज असलेली सैन्य दले, आंतरराष्ट्रीय दबाव उघडपणे धुडकावण्याची धमक आणि खंबीर इच्छाशक्ती, आंतरराष्ट्रीय राजकारणाची अचूक समज आणि राष्ट्राराष्ट्रांमधील परस्परसंबंध निश्चित करणाऱ्या घटकांबद्दलचे नेमके भान असणाऱ्या इंदिरा गांधींनी योग्य वेळ साधून पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध जाहीर केले आणि केवळ चौदा दिवसांत पाकिस्तानचे दोन तुकडे करून त्याला पूर्ण नामोहरम केले. 

त्यानंतरचे कारगील प्रकरण आणि आता सध्याचे लडाखच्या पलीकडील पँगोन्ग सरोवराच्या आसपासचा, आकाराने खूप मोठा प्रदेश चीनने बळकावलेला असल्याचे प्रकरण. 

स्वातंत्र्य लढा सोडला तर बाकीची युद्धे, लढाया, चकमकी यातील काहीच, भारताच्या मुख्य भूमीवर, नागरी आणि ग्रामीण लोकवस्तीत लढले गेलेले नाहीय. त्यामुळं युद्ध म्हणजे नेमकं काय असतं, याची बहुसंख्य भारतीयांना माहितीच नाही. त्यामुळेच तर, चोवीस तासांसाठी सैन्य माझ्या हातात द्या, मी पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नाहीसे करतो, किंवा, आदेश दिल्यानंतर तीन दिवसांत आमचे कार्यकर्ते भारतीय सीमांच्या रक्षणासाठी हजर असतील, असली वक्तव्ये अत्यंत आत्मविश्वासाने केली जातात, आणि त्यांचं त्यांबद्दल जाहीर हसं होत नाही. आणि ज्याचं कोणीही सैन्यात नाही, असा मध्यमवर्गीय सामान्य पांढरपेशा माणूस उठता बसता पाकिस्तान आणि चीनशी युद्ध करून त्यांना धडा शिकवण्याच्या गप्पा मारत असतो.

१९३९ ते १९४५ असं सहा सात वर्षांच्या दीर्घकाळपर्यंत दुसरं महायुद्ध चाललं होतं. तेंव्हाच्या ब्रिटीश अंमलाखालील भारताच्या सीमेच्या जवळ, ब्रह्मदेशात, तेंव्हाच्या सिलोनमध्ये ते आलं. पण प्राधान्याने त्याने व्यापलेला भूभाग होता तो मध्य आशिया, यूरोप खंड आणि रशियाचा बहुतांश भूभाग. 

या युध्दाबद्दल खूप पुस्तके लिहिली गेली आहेत. युद्ध आणि इतरांमधील संघर्ष, याबद्दल ऐकणं, वाचणं, बोलणं मानवी मनाला कायमच मोहवत आलंय. त्यामुळं. आणि एकेका छोट्या चकमकीचेही मानवी आयुष्यांवर होणारे परिणाम दीर्घकालीन असू शकतात, त्यामुळेही छोटी चकमक ही सुद्धा एखाद्या मोठ्या कादंबरीचा विषय ठरू शकते. आणि यातील एकएक व्यक्तिरेखा कादंबरीची महानायक ठरू शकते. यामुळेही याबाबत, आणि यावर पुष्कळ लिहिलं गेलं आहे.

जर्मन पान्झर रणगाडा दलाचा प्रमुख जनरल रोमेल हा असाच एक महानायक. रणगाडा दलाच्या गतिमान हालचाली करून त्याने मध्य आशियातील वाळवंटी प्रदेशावर एकहाती वर्चस्व मिळवलं होतं. त्याला डेझर्ट फॉक्स, असंच म्हटलं जायचं. या रोमेलच्या लढायांबद्दल, उमद्या स्वभावाबद्दल, रणनीतीबद्दल आणि त्याने अत्यंत कमी वेळेत अति जलद गतीने लांब पल्ल्यांचे अंतर काटणाऱ्या ज्या झेपा घेतल्या आहेत, ते वाचताना सुद्धा आपल्याला एक थरार अनुभवता येतो. त्या युद्धात त्याच्या चिलखती जीपमध्ये आपण त्याच्या बरोबर असायला हवे होतो, असं वाटत राहतं. आणि हिटलरवर नितांत श्रद्धा असणाऱ्या या बेडर योध्याचा हिटलरनेच ज्या पद्धतीने अंत घडवून आणला, ते वाचताना हेलावून त्याच्याबद्दल मन ओलावतं.

माझ्या बहिणीच्या खट्याळ मुलाला मी रोमेल, अशीच हाक मारतो, इतका हा शूर, दिलदार सेनानायक मला आवडतो. हिटलरचा सेनानायक असूनही !

पण या युद्धाचा मानवी वस्त्यांवर, मानवी जीवनावर, समाजावर, कुटुंबांवर, माणसांवर, माणसामाणसांमधील परस्पर संबंध आणि नात्यांवर काय परिणाम झाला, असं मानवी बाजूने पाहायचं असेल तर रशियन युद्धसाहित्यच वाचावं लागतं. टॉल्स्टॉय, चेखोव्ह, पुश्किन, माक्झिम गोर्की यांच्यासारख्या अनेक जगविख्यात रशियन साहित्यकारांचं साहित्य तर आहेच, पण युद्ध साहित्यही मोठ्या प्रमाणावर इंग्रजी आणि अगदी मराठीत सुद्धा उपलब्ध आहे.

शांत इथे पहाटवेळा, या नावाने मराठीत उपलब्ध असणारं पुस्तक हे या युद्धसाहित्यापैकीच एक पुस्तक. यातलं वर्णन इतकं जिवंत आणि प्रत्ययकारी आहे की, आपल्या नजरेसमोर ते कथानक घडतंय, असं वाचताना जाणवत राहतं.

रशियावरील जर्मन आक्रमणाला तोंड देण्यासाठी वयाला सोळा वर्षे पूर्ण झालेला प्रत्येक पुरुष सैन्यात भरती करून घेण्यात आला आहे. तरीही अतिविस्तीर्ण भूप्रदेशामुळे आणि युद्ध दीर्घकाळ लांबल्यामुळे सैन्यात महिलांची, तरुण मुलींची भरती करावी लागली आहे. जीवनोत्सुक वयातल्या या तरुण मुली सैनिक म्हणून लढण्यासाठी अप्रशिक्षित आहेत. म्हणून त्यांना त्यातल्या त्यात कमी धोका असलेल्या, प्रत्यक्ष युध्दापासून लांब असलेल्या ठाण्यावर पोस्टिंग दिलं गेलंय. या उत्साही, खेळकर, खोडकर तरुण सैनिक मुलींवर कमांडर म्हणून पस्तिशीतला म्हातारा. तो सतत या मुलींवर खेकसतो, ओरडतो, त्यांना शिस्त लावण्याचे फोल प्रयत्न करत हताश होतो.

यातली एक तरुणी रोज संध्याकाळी जंगल ओलांडून पलीकडच्या गावात जाते, आणि तिच्या बाळाला भेटून रोज पहाटे परत येते. अर्थात, हे कमांडरला माहित नाही. एका पहाटे असंच परत येताना जंगलात तिची दोन जर्मन सैनिकांशी टक्कर होता होता वाचते. तिची कसलीही चाहूल सुद्धा न लागता ते जर्मन सैनिक दबकत दबकत पुढे जातात.

जर्मन सैनिक ! इथे !

ती धावत जाते आणि परिणामांचा विचार न करता कमांडरला रिपोर्ट करते. कमांडर तिला ओरडतो, पण बघता बघता एरव्ही थकलेला, उदास, म्हातारा दिसणारा कमांडर एकदम ताठ होतो. चपळ आणि कार्यक्षम होतो. तो पाच मुलींची निवड करतो, कॅम्पची व्यवस्था लावतो, हेड क्वार्टरला निरोप देण्याची व्यवस्था करतो, आणि दोन जर्मन सैनिकांचा बंदोबस्त करण्यासाठी ते सहा जण निघतात. ते जर्मन सैनिक पुढे कोठे जाणार असतील, याचा तो अंदाज बांधतो. शत्रूच्या प्रदेशात असल्याने स्वतःचे अस्तित्व उघड होऊ नये म्हणून ते दबकत जाणार हे लक्षात घेऊन, मध्ये गेलेल्या वेळेचं गणित करून कमांडर नकाशावर त्या मुलींना, त्या सैनिकांना कोठे गाठण्याचा त्याचा इरादा आहे, हे दाखवतो. त्यांच्या आधी तेथे पोचून त्यांच्या स्वागतासाठी तयार राहण्यासाठीचा जवळचा रस्ता आहे. दलदलीतून. 

नियोजनाप्रमाणे ते मध्यरात्रीनंतर त्यांनी ठरवलेल्या जागेवर पोचतात. मोठ्या दगडांच्या आडोशाला लपून, दबा धरून, कमांडरच्या अंदाजानुसार ते जर्मन सैनिक जेथे जंगलातला रस्ता ओलांडतील, त्या ठिकाणावर नजरा रोखून निश्चल पडून राहतात. 

हळूहळू पहाट उजळायला सुरुवात होते. पक्षांचे आवाज सुरु होतात. समोरच्या जंगलातल्या त्या रस्त्याकडेला असलेल्या झाडाची एक फांदी हळूच हलते. काही वेळाने एक जर्मन सैनिक खरंच बाहेर डोकावतो, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नीट न्याहाळून पटकन रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जातो. झाडीत नाहीसा होतो. 

काही वेळाने पुन्हा तेथेच फांदी हलते. पुन्हा एक सैनिक हळूच डोकावतो. रस्त्यावर दोन्ही बाजूंना कोणी नाही याची खात्री करून झपकन रस्ता ओलांडून समोरच्या झाडीत नाहीसा होतो. 

दोन्ही सैनिक दिसल्यामुळं उत्तेजित झालेली त्या पाच मुलींपैकी एक मुलगी हळूच काही हालचाल करू पाहते. पण कमांडर वेळीच तिला इशारा देतो. ते सगळे पुन्हा निश्चल पडून तेथेच बघत राहतात. थोड्या वेळाने पुन्हा फांदी हलते. तिसरा … चार … पाच … वीस … एकवीस … बावीस …

बावीस जर्मन सैनिक समोरच जंगलात आहेत. त्यांना रोखण्याची जबाबदारी पाच तरुण मुली आणि तो प्रशिक्षित रशियन सैनिक यांच्यावर काळानेच आणून टाकली आहे. काय करावं त्या सहा जणांनी ? काय करतील ते ? काय केलं त्यांनी ???

पुढची कथा इथं सांगू नये. सांगणारही नाहीय. प्रत्येकानं ती स्वतःच वाचावी. एखादा चित्रपट पाहावा, तसं ते नजरेसमोर येत राहतं वाचताना. इतकं की, या कथेवर आयुष्यात कधीतरी चित्रपट काढायचाच, असा मी स्वतःशीच ठराव केला होता. माझ्याकडे या पुस्तकाच्या दोन प्रती कितीतरी काळ मित्रांपासून लपवून ठेवलेल्या होत्या. एक, मी सतत वाचून कडा झिजलेली, आणि दुसरी एकदाही न उघडलेली, चित्रपट सुरु करतेवेळी दिग्दर्शकाला देण्यासाठी !

पण या कथेचा पूर्ण चुथडा केलेला, हिंदी डब तामिळी चित्रपट एकदा बघावा लागला, आणि मग मी त्या दोन्ही प्रती मित्रांसाठी ताबडतोब खुल्या करून टाकल्या. 

कारण ती स्तब्ध, दबत्या पावलांची, नीरव पहाट. त्यातला तो, सैन्यात आहे तोवर कोणतंच आयुष्य नसलेला केवळ पूर्णवेळ सैनिक, कोणाला बाळ आहे, कोणाचा प्रियकर लढाईत कोणत्या आघाडीवर आहे याचा पत्ताच नाही, कोणाच्या डोळ्यांत स्वप्ने अजून पूर्ण उमललीच नाहीयेत अशा, एरव्ही त्या गतायुष्यात रमलेल्या पण आता आपल्या देशात आलेल्या त्या बावीस जर्मन सैनिकांना थोपवणे या एका ध्येयासाठी आयुष्य पणाला लावण्याची तयारी असलेल्या त्या गोड खोडकर उत्साही खट्याळ मुली, त्यांची त्या कमांडरशी त्या एका पहाटे जुळलेली भावनिक नाळ हे सारं चित्रपटात दाखवताच येणार नाही. 

तो चित्रपट आपल्या नजरेसमोर सरकत राहतो आणि एका क्षणी नकळत आपण अंग चोरून, श्वास रोखून हळूच झुडुपाआड लपून पाहायला लागतो ते, ते पुस्तक वाचताना. शांत इथे पहाटवेळा …

शांत इथे पहाटवेळा

वासिल्येव्र बरीस (अनुवाद : अनील हवालदार )

रादुगा प्रकाशन सोविएत रशिया

Leave a Reply