बंधने अनेक आहेत, त्यातीलच एक “वस्त्र”

शितल पाटील

अनेक धर्मग्रंथात स्त्रियांच्या बाबतीत कपड्यावर सक्ती दिसते. जसे कुराण मध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘एका स्त्रीचे अंग केवळ तिच्या शोहर ने च बघायचे, इतरांनी बघितल्यास पाप लागते’ म्हणून अगदी डोक्याच्या केसापासून ते तळपायापर्यत त्यांना बुरख्यात बंदीस्त केलं. हिंदू धर्मात चारित्र्य सपन्न स्त्री म्हणजे 6 मीटर च्या साडीत डोक्यावरून पदर घेऊन संस्कृती जोपासणारी कर्तृत्ववान स्त्री. परंतु या बंदीस्त कपड्यात मात्र स्त्रियांना कुठेतरी समाजात मुक्तपणे वावरतांना मर्यादा येतात.
नाही म्हणजे कर्तृत्ववान स्त्रीया यांच्या कर्तृत्वात आणि जिद्द-चिकाटी समोर साडी हे बंधन नाम मात्र शेष आहे. याचेही अनेक ज्वलंत उदाहरणे आहेत. सामाजिक राजकिय, साहित्यिक, कला, शैक्षणिक, भारतीय स्वतंत्र आशा एक ना अनेक पटलावर आपल्याला स्त्री क्रांतीचा हुंकार बघायला मिळतो. परंतु तरीही कुठेतरी संस्कृती, धर्म, मर्यादा, लिंग, फॅशन इत्यादी घटकांच्या आड स्त्री स्वतंत्र बांधील होऊन जाते आहे का? असेही अनेक प्रश्न उपस्थित होतात.साडी ही स्त्रीच्या चारित्र्यावर चढवलेली आबाडधोबड चादर आहे. तिच्या मनाला आणि शरीराला गुंढाळून ठेवणारे साडी हे वस्त्र म्हणजे दाव्याने खुंट्याला बांधलेल्या गायीप्रमाणे आहे. बाईच्या सभोवताली खुंटा आणि दावे दिसत नसले तरी ती त्या गोलगोल साडीत बंदीस्त होते, हे मात्र खरे आहे. त्यामुळे साडी हे वस्त्र स्त्रीला मोठ्या प्रमाणात बंधनात अडकविणार आहे. पूर्वी स्त्रिया नव्वारी साडी वापरायच्या. त्या साडीला पातळ, लुगडे असेही म्हटले जायचे. आजही ग्रामीण भागात काही महिला अशी साडी वापरता. ती साडी नेसतांना दोन पायाच्या मधून काष्टा असायचा आणि या काष्ट्यामूळे त्या मुक्तपणे वावरू शकत होत्या. घोड्यावर बसून लढाई करणे सुध्दा स्त्रियांना त्याकाळी शक्य होते. मात्र कालानुरूप साडीचे आणि ती नेसण्याचे स्वरूप बदलत गेले. मातृसत्ताक व्यवस्थेचे विच्छेदन होऊन पुरुषसत्ताकता निर्माण होऊ लागली तसे साडी हे वस्त्र स्त्रीसाठी बंधनात्मक बनू लागले. नव्याने साडी परिधान करण्यात आखीवरेखीवपणा आला. मात्र त्यामुळे स्त्रियांची मोकळेपणाने वावरण्यावर याच साडीमुळे बंधने आली.

पुरुषांना जास्तीची कामे करावी लागतात, हे कारण पुढे करून त्यांना कपडे वापरण्यात सूट देण्यात आली. ओढणी, शेला, पदर या गोष्टी पुरुषांना अंगावर घेण्याचे बंधन नाही. मात्र स्त्रियांच्या अवयवांना सांस्कृतिक अस्मिता जोपासण्याचा नवा भार देण्यात आला आणि त्यांच्या अंगाचा एकूण एक भाग नीट झाकून ठेवण्याची बंधने लादण्यात आली. छातीवर ओढणी अथवा साडीचा पदर असावा. जेणेकरून स्त्रीची अब्रू उघड्यावर पडणार नाही, असे कारण देण्यात आले. मात्र एक खरे की यातून नव्या पारतंत्र्याचा आगडोंब उसळला. औद्योगिकीकरण होत असताना भांडवलशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न झाले. विशेषत: स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनाची निर्मिती करण्यात आली. मग त्यात साडी हे भारतीय संस्कृतीमधले अत्यंत महत्वाचे वस्त्र वेगवेगळ्या डिझाईन आणि कलाकुसरी करून स्त्रियांच्या माथी मारण्यात आले. पुरुषांनी आपली वैयक्तिक स्वार्थी प्रगती व पुरुषत्व जोपासण्यासाठी प्राचीन काळापासून स्त्रियांचा उपयोग वस्तू म्हणून केलेला आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे साडी हेच देता येईल. या साडीचे महत्व एका विशिष्ट टप्प्यात जास्त वाढले आहे. महाभारताचा संदर्भ बघितला तर त्यात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना, श्रीकृष्ण स्वतःला द्रौपदीचा भाऊ म्हणवून घेतो. तो द्रौपदीला साड्या पुरवतो. याचा अर्थ स्त्रीची अब्रू साडीने अंग झाकल्यावरच वाचू शकते, हे यातून दर्शविण्यात आले आहे. या घटनेतील सत्यासत्यता काय अथवा ते काल्पनिक असले तरी ते ज्या पद्धतीने समोर आणले, त्यामुळे पुढील वर्षानुवर्षे लोकांच्या मनात साडी आणि बाईची अब्रू इतकेच संकुचित चित्र आहे.

औद्योगिक क्रांतीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची निर्मिती करण्यात आली. साडीबरोबरच त्यावर मॅचिंग ब्लाऊज, परकर मॅचिंग, ज्वेलरीही आली. इतकेच नव्हे तर साडीला मैचिंग अंतर्वस्त्रही तयार करण्यात आली. स्त्रीने नसलेल्या साडीचा विचार करता स्त्रियांसाठी स्कुटी ही दुचाकी डिझाईन करण्यात आली. साडीसारख्या सोईस्कर नसलेल्या वस्त्रातही स्त्रियांना प्रवासासाठी हे नवे साधन उपलब्ध करून दिले. मात्र स्कुटी सारख्या दुचाकी निर्माण करताना स्त्रियांच्या हिताचा विचार करण्यापेक्षा भांडवली विचार अधिक होता.

साडीसारख्या वस्त्रात स्त्रीला बंदिस्त ठेवून आजच्या काळातही पुरुषांचे वर्चस्व जपले गेले आहे. साडीच्या माध्यमातून स्त्रियांवर अधिक बंधने लादण्यात आली. साडी न घालणाऱ्या स्त्रिया ह्या अनेक पुरुषांच्या दृष्टीने आजही चारित्रहीन ठरत आहेत. तिच्या चरित्र्यावर उचललेले असंख्य प्रश्न आणि कलंकित केलेले स्त्रीत्व तिच्या वाट्याला आले आहे.

औद्योगिक क्रांतीची रचना पुरुषसत्ताक साचेबद्ध चौकटीतली आहे. भांडवली उत्क्रांतीचा पाया हा पुरुषी सांस्कृतिक वारसा चालवण्यासाठी स्त्रियांना स्त्री म्हणून घडवावे, असा आहे. नव्याने अनेक चाली-रीती, रूढी परंपरांची रचना करण्यात आली. त्यात कान, नाक टोचणे, कपाळावर-टिकली, गळ्यात-माळा, हातात-बांगडी, पायात-पैंजण या सारखे दागिने बनविण्यात आले. स्त्रियांसाठी बनवण्यात आलेल्या या सर्व गोष्टी स्त्री सौंदर्याचा भाग म्हणून तिच्यावर बिंबविण्यात आला. स्त्रियांना भुलविण्यात आले. या माध्यमातून स्त्रिया पुरुषसत्तेच्या साखळदंडामध्ये कैद झाल्या. स्त्रियांनी सुद्धा हे सर्व सहज स्वीकारून, यातच आपले सुख आहे हे मान्य केले. आणि त्याही पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या वाहक बनल्या.

₹ 150 / Contact – 8369666057

2 comments

Leave a Reply