नरहर कुरुंदकर – विचार करायला शिकविणारा विचारवंत

नितीन साळुंखे

कॉलेजला निघालो होतो. चालत चालत बोलत बोलत.

मित्र म्हणाला, तू म्हणतोस तस्संच करायला हितं काय मोगलाई लागून गेली काय रे ?

हे तो खरंतर अहेतुक म्हणाला होता. आपल्या भोवतालच्या वातावरणाचं आपल्या बोलण्यात नकळत प्रतिबिंब पडतं, तसं.

मग मी म्हणालो, मोगलाई नाय. पण तू म्हणतोस तस्संच करायला आता काय पेशवाई पण नाय रे !

मग आम्ही दोघं हसलो. आणि कॉलेजच्या दोन घट्ट मित्रांमध्ये होतं तसं ते बोलणं निरनिराळ्या विषयांवर उड्या घेत पुढं सरकत राहिलं. ते वाक्य माझ्या मनातून निघूनही गेलं.

पण प्रत्येक वेळी असं होईल, असं नव्हतं.

काही वेळा तो शाहू महाराजांच्या बद्दलचे जोक्स सांगायचा. कधी गांधींजींबद्दलची गाणी म्हणायचा. नेहरु, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल संबंध असो नसो, शेरेबाजी करायचा.

या नेत्यांबद्दल त्याच्या मनात आदर, प्रेम नव्हतं, हे तर निश्चितच. पण अनादर, द्वेष आहे असंही जाणवायचं नाही. त्याला त्यांच्याबद्दल कोणत्याच भावना नव्हत्या. ते जोक्स, गाणी, शेरेबाजी हे सगळं अहेतुक. वातावरणात लागलेल्या सवयींचा भाग म्हणून. 

पण त्याला वातावरण होतं तसं मलाही माझं माझं वातावरण होतंच की. या माझ्या वातावरणात गांधीजी, नेहरु, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, शाहू महाराज, शिवाजी राजे, संभाजी राजे, फुले, आंबेडकर, सुभाषबाबू, भगतसिंह या सगळ्यांबाबत, घरातल्या वडीलधाऱ्यांबद्दल असतो तसा प्रेमादर, जिव्हाळा होता.

त्यामुळं यांपैकी कोणाबद्दल कोणी टिंगलीच्या सुरात बोलायला लागलं की मला त्रास व्हायचा. आणि मी त्याचा प्रतिवाद करू शकत नसल्यानं चिडचिड व्हायची.

एकदा मी अप्पांना हे सगळं सांगितलं. तर त्यांनी कपाटातून दोन पुस्तकं काढून दिली. जागर आणि शिवरात्र. नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली.

ती पुस्तकं वाचताना मेंदूतला आतापर्यंत मला अज्ञात असलेला आणि म्हणून बंद असलेला एक दरवाजा हळूच किलकिला झाला. चिकित्सेचा दरवाजा. या लोकांबद्दल आत्मीयता, आपलेपणा आहेच. ते मोठे आहेतच. पण ते मोठे का ठरतात, ते स्वतःचं स्वतः शोधण्याची गरज निर्माण करणारा दरवाजा. तो मोठेपणा मोजत असताना त्यांनी केलेल्या कामाबरोबरच, ते काम कोणत्या परीस्थितीत केलं, हे विचारात घ्यायला लावणारा दरवाजा. ती माणसंच होती. आजही आपल्याला दिसत नाही, ते त्या काळात पाहण्याइतकी उंच होती. पण त्यांना काही त्यांच्या माणूस असण्याच्या, काही त्यांच्या काळाच्या, काही त्या काळातल्या परिस्थितीच्या, काही त्यांच्या भोवतालच्या सहकाऱ्यांच्या आणि खूपशा, या व्यक्ती आणि त्यांचं काम याबद्दलच्या आपल्याच आकलनाच्या मर्यादा असतात. आजच्या काळातल्या, आजच्या परिस्थितीतल्या आपल्या अपुऱ्या आकलनाचं ओझं अकारण त्यांच्या पाठीवर लादायचं नाही, हे बजावणारा दरवाजा. 

तीव्र धारदार बुद्धिमत्ता, त्याला प्रचंड अभ्यासाची, चिंतनाची, राष्ट्र सेवा दलातल्या अभ्यासू चिंतनशील वातावरणाची जोड, कोणतीही तडजोड न करता, कसलीही आणि कोणाचीही भीड न बाळगता थेट स्पष्टपणे पण साध्या सोप्या, कोणालाही समजेल अशा भाषेत, जणू आपल्या समोर बसून ते सांगताहेत आणि आपण ऐकतोहोत असा भास देणारी त्यांची लेखनशैली. 

लेखनशैलीच कशाला, त्यांची बोलण्याची शैलीही मोहवून टाकणारी होती. आणीबाणीच्या काळात जेंव्हा बोलायला बंदीच होती, त्या काळात त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली. साताऱ्यात नगर वाचनालयात त्यांचं व्याख्यान झालं होतं. अप्पांनी मला मुद्दाम तिथे नेलं होतं. उपस्थित लोकांमध्ये एक थरार होता. आता हे काय बोलणार आणि त्यानंतर काय होणार, याबद्दल भयमिश्रित कुतूहल होतं. कारण साध्या वेषातले आणि रीतसर पोशाखातलेही पोलीस लोकांमध्ये पसरलेले होते. सरकारच्या विरोधात जाहीरपणे, बेडरपणे बोलणारा माणूस पाहण्याची लोकांना उत्सुकता होती. 

अतिशय साधेपणाने ते आले. आपण फार मोठं काही शौर्यकृत्य करतोहोत वगैरे असला काही अभिनिवेश न दाखवता लिहितात तितक्याच सहजपणानं बोलले. इसापाच्या गोष्टी सांगत, प्रतिकांच्या, रुपकांच्या भाषेत बोलले. त्यांना जे सांगायचं होतं ते तिथल्या प्रत्येकाला नीट कळत होतं. आणि तरी पोलीस काही करू शकत नव्हते, अशा पद्धतीनं बोलले.

ज्या सहजतेनं ते बोलायचे, एखादा मुद्दा मांडायचे, त्याच सहजतेनं, एखाद्या व्यक्तीमत्वाभोवती असलेलं खऱ्या खोट्या समज अपसमजांचं वलय भेदून थेट वास्तवाच्या गाभ्याला भिडणारी त्यांची शैली. प्रत्येक मुद्याचा आतून बाहेरून आरपार शोध घेणारी, ते निष्कर्ष तथ्यांवर तोलून मगच स्वीकारणारी त्यांची साक्षेपी बुद्धी.

जागर आणि शिवरात्र ही पुस्तकं वाचताना या पुस्तकांत त्यांनी कोणाबद्दल काय म्हटलंय यापेक्षा त्या व्यक्तीचं, त्या व्यक्तींच्या कामाचं मोजमाप करण्यासाठी, त्यांची उंची खोली रुंदी मोजण्यासाठी कोणते निकष ते लावतात, हे समजणं मला जास्त महत्वाचं वाटलं. हे मूल्यमापन नरहर कुरुंदकर किंवा त्यांचे समानधर्मी विचारवंत करतात, ते वेगळं असतं. तुम्ही आम्ही करतो ते वेगळं असतं. आणि विरोधी राजकीय विचारांची मंडळी करतात, तेंव्हा आणखी वेगळं असतं, हे सुद्धा यातूनच सुरु झालेल्या विचार प्रक्रियेत वेळोवेळी जाणवत, लक्षात येत गेलं. 

या लोकोत्तर व्यक्तींनी केलेल्या त्यागाची, कामाची कृतज्ञ जाणीव न ठेवता ही विरोधी मंडळी सतत त्यांच्यावर खोट्या मुद्यांच्या आधारे टीका का करतात, हे मात्र मला लवकर कळत नव्हतं. 

हळूहळू मला, लिलीपुटच्या गोष्टी आणि बिरबलाची काठीची प्रतिकात्मक गोष्ट, या दोन्ही तत्वांचं इथं तंतोतंत लागू पडणं लक्षात आलं. विरोधी मंडळींचे तत्वज्ञान, विचार, साध्य, त्यासाठीचे मार्ग हे सगळं कालबाह्य, खुजं, कोतं आहे. यांची विचारांची कुवतच कमी आहे, त्यामुळं यांच्याकडं कोणत्याच क्षेत्रात समाजाला दाखवण्यासाठी उंच, मोठं व्यक्तिमत्व एकही नाही. सगळेच लिलीपुट ! त्यामुळं या मोठ्या माणसांच्या तुलनेत स्वतःची उंची जास्त आहे असं दाखवायचं असेल तर त्यासाठी आधी या व्यक्तिमत्वांची उंची कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. स्वतःची उंची वाढणं शक्य नसल्यानं इतरांची उंची कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, एव्हढंच अशा मंडळींच्या कुवतीत बसतं, हे आकलन सावकाशपणे येत गेलं.

कुरुंदकर या मंडळींना लिलीपुट म्हणाले नाहीत कधी. पण त्यांनी मला स्वतंत्रपणे विचार करायला, निष्कर्षांवर यायला, ते निष्कर्ष पुन्हा तपासायला आणि ते तटस्थपणे स्वीकारायला शिकवलं. 

त्यामुळेच आता कोणी स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उच्च स्वरात इतरांबद्दल, विशेषतः देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, देशाच्या निर्मिती आणि उभारणीत मोलाचं योगदान देणाऱ्या या नेत्यांपैकी कोणाबद्दल बोलायला लागतो, तेंव्हा मी हल्ली पूर्वीप्रमाणे स्तंभित होत नाही. 

कुरुंदकर गुरुजींची आठवण करतो. गुरुजी, हा बघा आणखी एक लिलीपुट. किंवा हा लिलीपुट बघा आणखी आणखी लहान, खुजा, कोता होत चालला आहे, असं म्हणतो. त्या लिलीपुटच्या आणखी आणखी लहान, खुजा, कोता होण्याच्या प्रवासासाठी त्याला शुभेच्छा देतो, आणि आपल्या रस्त्यानं पुढं सरकतो ! आज कुरुंदकर असते तर ते काय आणि कसं म्हणाले असते, याचा विचार करत …

Leave a Reply