नितीन साळुंखे..
दापोलीला जायचं ठरलं तेंव्हा तिकडून कदम वकिलांचा फोन आला. म्हणाले, गारंबीचा बापू आता पुन्हा वाचा, आणि शिवाय येताना ते पुस्तक घेऊनच या. म्हणजे एखादा संदर्भ पाहावा वाटला तर पुस्तक हाताशी असावं, यासाठी.
दापोलीला गेल्यावर प्रमुख आणि एकमेव कार्यक्रम गारंबीचा बापू मध्ये उल्लेख असलेले प्रत्येक स्थळ पाहणे, हाच. मग जाताना रस्त्यापलीकडे माडांच्या, नारळांच्या झावळ्या दिसायला लागल्या, तेंव्हा म्हणाले, पाट बघायचा आहे ना ? आणि गाडी थांबवून आम्ही खाली उतरलो. रस्ता ओलांडून पलीकडे गेलो.
कुठे आहे पाट ? मी गोंधळून विचारलं.
अहो, हा काय ! तुमच्या पायाशीच तर पसरला आहेन लेकाचा !
पाट ? हा ???
ज्याच्या आधारानं गारंबी बहरली, फुलली, पिढ्यान पिढ्या जगली, भांडली, कोर्ट कज्जात आहे नाही ते सगळं घालवून बसली तो. व्याघ्रेश्वरानंतर ज्याच्या भोवती गारंबीचं अवघं वास्तव जीवन फिरतं तो. ज्याचं वर्णन करताना श्री ना पेंडसेंसारखा प्रतिभाशाली लेखक थकत नाही, तो हा पाट ! हा !!!
माझ्या सातारी नजरेला सवय पाट म्हटलं की तीनेक फूट रुंद आणि साधारण तितकाच खोल पाण्याचा खळाळ वाहता प्रवाहो पाहण्याची. इथे तो, पिढ्यानपिढ्या गारंबीकरांच्या आयुष्यातली सगळी स्वप्नं पूर्ण करणारा पाट म्हणजे फारतर तीन इंच रुंदीचा, दोनेक इंच उंचीचा, शांतपणे वाहत असलेला पाण्याचा छोटासा प्रवाह होता.
बापू हा त्या कादंबरीचा लौकिक अर्थानं खरा नायक. पण पेंडशांनी बापूच्या बरोबरीनं, नायकाचा दर्जा देऊन या पाटाला त्या गोष्टीत गुंफलंय. हे त्यांचं वैशिष्ट्यच. गोष्ट, मग ती कोणतीही असूदे, कोणाचीही असूदे, त्यात फक्त सुट्या सुट्या व्यक्तिरेखा कधीच असत नाहीत. त्या लोकांची, त्यांच्या आयुष्याची, जगण्याची, जगण्याशी संबंधित व्यवहारांची, स्वप्नांची, इर्ष्येची, सूड द्वेष मत्सराची, कोंडात जाऊन लपून छपून घेतलेल्या भोगाची, समाजाला अंगावर घेऊन बेदरकारपणे केलेल्या प्रेमाची एक एक स्वतंत्र कथा असते, ती उलगडत, त्यातून समाजपुरुषाच्या धारणा आणि व्यक्तिव्यक्तीच्या प्रेरणा यांतील समंजस साहचर्य, तर कधी टोकाचा संघर्ष दाखवत त्यांची कादंबरी अलगद पुढे सरकत राहते.
गारंबीचा बापू रंगवताना त्यांनी, बापूच्या बेफाम वागणुकीला कारणीभूत असलेले त्याच्या जन्माबाबतचे प्रवाद, त्या निमित्ताने गारंबीची त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक घडण, मानसिकता, धारणा या सगळ्याला गोष्टीतच गुंफून ते वाचकांपर्यंत पोचवलं आहे.
विठोबाच्या निमित्तानं त्या काळातील अर्थरचना, त्या लोकांची मानसिकता, त्या मानसिकतेने त्या अर्थरचनेत गरीबांची निश्चित केली गेलेली जागा याची जाणीव आपल्याला करून देता देताच, त्याच विठोबाचा लौकिक अर्थानं मुलगा असलेल्या बापूने आक्रमक बेदरकारपणाने गारंबीला आणि खोतालाही झुकवलं, तेंव्हा परिस्थितीने गरीब असल्याने नव्हे, तर स्वभावाने गरीब असल्याने विठोबाच्या आयुष्याशी असा क्रूर खेळ करण्याची गारंबीकरांची हिम्मत झाली, हे वास्तव आपल्याला, आपल्या जीवन विषयक धारणांचा फेरविचार करायला लावण्यापर्यंत घेऊन येतं.
पाटाभोवती फिरणारं, तेथेच अडकलेलं गारंबीकरांचं आयुष्य आणि मुसाबरोबर काम करणाऱ्या बापूच्या प्रगतीचा डोळे दिपवणारा वेग हे एकमेकांत गुंफलेलं असतं, आणि त्यातून त्या काळातील त्या प्रदेशातलं अर्थचक्र कसं फिरतं, हे आपल्याला पेंडसे सांगत असतात.
लव्हाळी आणि इतर पुस्तकांमध्येही त्यांनी, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील मुंबई, तिथल्या मध्यमवर्गीयांचं चाळीतलं जगणं, सुभाषबाबू, काँग्रेस आणि युद्ध यांबाबतची त्या काळातील लोकांची जिवंत मतं आणि प्रतिक्रिया, नोकरीच्या निमित्तानं पहिल्यांदाच बाहेर पडायला मिळालेल्या मुली, त्या काळातल्या कारकून म्हणून नोकरी मिळवणाऱ्या तरुणांची स्वप्ने, आकांक्षा, तगमग इतकी सगळी भावनांची आंदोलने त्या गोष्टीत गुंफून, नायकत्वाचा दर्जा देऊन रेखाटली आहेत.
तिथं यशोदा किंवा ताई ही नायिका किंवा एक प्रमुख व्यक्तिरेखा असते, तशीच तिथली चाळ सुद्धा तितकीच महत्वाची व्यक्तिरेखाच असते.
माणसांच्या बरोबरीनं परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या, दापोली ते हर्णे बंदर या प्रदेशातच जीव अडकलेल्या, या भौगोलिक प्रदेशाचं वर्णन वाचताना आपल्यालाही त्या प्रदेशात नेऊन उभं करणाऱ्या या लेखकानं त्या मातीतल्या माणसांच्या धारणांची, बदलत गेलेल्या जीवन शैलीची पण न बदललेल्या मानसिकता आणि संघर्षाची तीन पिढ्यांची कहाणी मांडली आहे तुंबाडचे खोत या द्विखंडात्मक महा कादंबरीमध्ये.
साधारण शंभर वर्षांपूर्वीचं कोकण, कोकणी माणूस, तेंव्हाची भौगोलिक स्थिती, घरं, नारळा पोफळीच्या बागा, त्यांवर आधारलेली कौटुंबिक आर्थिक गणितं, स्त्रियांची अवस्था, आशा आकांक्षा, सुख दुःखाच्या सीमित कल्पना, कुटुंबरचना, गाव पातळीवरची सामाजिक रचना, जगण्यासाठीचे संघर्ष, संथ, एकसूरी लोकजीवनावर मधूनच होणारे बाह्य आघात या सगळ्यांचं इतकं जिवंत चित्रण पेंडशांनी यात केलं आहे … त्याचा आधार असलेल्या व्यक्तीगत आणि सामाजिक मानसिकता आणि धारणांसह.
आणि या प्रत्येक गोष्टीत काळ पुढे सरकतो तसं त्याला अनुरूप होणारे, केले जाणारे बदल, बदलाचा रेटा वाढला तरीसुद्धा काही बदल न स्वीकारण्याचा हट्ट धरणारी मानसिकता, बदलत गेलेल्या धारणा आणि हट्टाने न बदलू दिलेल्या त्यातल्या काही धारणा, विधवा स्त्रीयांची तेंव्हाची दैन्यावस्था, उत्पन्नाची बदलत गेलेली साधने आणि प्रमाण, एकमेकांतले हेवेदावे, दुसऱ्याच्या प्रगतीबद्दलची असूया, समाजमान्य आणि समाजमान्यताबाह्य प्रेम प्रकरणे, स्त्री पुरुषांतील परस्पर संबंध, वासना, तीव्र भावना या सगळ्यांचं इतकं प्रत्ययकारी जीवंत वर्णन पेंडसे करतात की जणू आपण तिथं आहोत आणि आपल्यासमोर ते सारं चाललं आहे.
एकूणच पेंडशांच्या कादंबऱ्यांमध्ये व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील घडामोडी असतात तसं निसर्गाचा त्या घडामोडींतला सहभागसुद्धा असतो. बदलत्या काळाचा एक विस्तीर्ण पट अलगद उलगडत राहतो. त्या माणसांची सुखदुःख आपलीच सुखदुःख होऊन जातात. एक चांगलं कथानक वाचण्याचा आनंद तर मिळतोच. पण ज्यांना जाणण्यात रस आहे त्यांना त्या काळातली, त्या भौगोलिक प्रदेशातली सगळी माहिती मिळते. लोकजीवन, समज अपसमज, धारणा, मानसिकता, आर्थिक, सामाजिक रचना, आर्थिक उन्नतीच्या त्या त्या काळातील संधी, मर्यादा, कुटुंबव्यवस्था आणि कुटुंबबाह्य शरीरसंबंध, प्रेमसंबंध, ते समाजाकडून स्वीकारलं अथवा नाकारलं जाण्याच्या घटना आणि त्यामागची कारणमीमांसा या सगळ्याची इत्थंभूत आणि थेट माहिती मिळते. तीही अतिशय रंजकतेने.
थोडक्यात सांगायचं तर, पेंडशांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या भोवतालचा परिसर वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. जणू ते आपले पिढ्यापिढ्यांचे शेजारी आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे परीस्थिती हा सुद्धा त्यांच्या कादंबऱ्यांतील महत्वाचा घटक असतो. नायक आणि नायिकांइतकाच महत्वाचा !