गांधी मला भेटला.-अक्षय शिंपी

गांधी मला आरेच्या जंगलात
रात्री कापून काढलेल्या
झाडांच्या खोडांवर मायेने हात फिरवत
बसलेला दिसला.
मला पाहून मास्क नाकातोंडावर ओढत म्हणाला-
“कितीही आणि कशानंही झाका,
सत्य उघडं पडतंच!
व्हायरसचं सत्य वेगळं असेल पण
सत्याला व्हायरस ग्रासू शकत नाही. कधीही.”

गांधी मला अर्णब गोस्वामीच्या
कर्कश्श आरडाओरडीत भेटला.
हातातल्या स्मार्टफोनवर
शांतपणे ‘India wants to know’ ऐकत,
लेज वेफर्सचा बाईट घेत
मधूनच गालातल्या गालात हसत होता.
कंगनाची वाय सिक्युरिटीतली राजभवन भेट पाहून त्याने गदगदून स्प्राईटची बाॅटल फोडली
अन् पुटपुटला-
“राजभवन पावन झालं.”

गांधी मला दिल्ली, हाथरसच्या
पिडीतांमध्ये भेटला.
म्हणाला, “CAA-CAB लागू झाल्यावर असे गैरप्रकार थांबतील का?”
मी अर्थातच यावर निरुत्तर होतो.

गांधी मला PUB-G खेळताना भेटला.
म्हणाला- ‘कुछ बॅनबिन नय होगा, खेलों बिंदास,
कोरोना को मारो गोली।”
खेळाच्या उन्मादात त्यानं सीमा पार केली.
आता तो काश्मीरात नजर कैदेत बसून,
धारा 370 चा अभ्यास करतोय.

गांधी मला लाॅकडाऊनमध्ये
मजूर-कामगारांच्या फरफटीत भेटला.
म्हणाला – ”दांडीयात्रा काढली तेव्हा मीपण लोकांचा डेटा कुठं ठेवला होता? चलता हय.”
“काहींचं रेल्वेमार्गावर रात्री होत्याचं नव्हतं झालं, त्यांचं काय?”- असं मी विचारलं,
तेव्हा मुकाट्याने रूळांची सर्ररिअलिस्टिक रेखाटनं करत राहिला अश्रूंमध्ये ब्रश बुडवून.

गांधी मला मोराला दाणे चारताना भेटला.
म्हणाला, “सुत कातण्यापेक्षा हे बरं! किमान मोरांच्या लिला बघण्यात तेरी वेळ जातो अन् आताशा मी चरख्यावर फक्त फोटोशूटपुरताच बसतो.”

गांधी मला शाॅपर्स स्टाॅपमध्ये अंडरवेअर खरेदी करताना भेटला.
”आता पंचा सोडून हे एवढंच नेसणार का?”-
असं विचारलं तर हसला,
म्हणाला, ”नाही नाही, पंचावर हे नेसणार!
आतलं बाहेर दाखवत फॅशनिस्टा
होण्याचा काळ आहे हा;”
असं म्हणत अंडरवेअरसोबत सेल्फी
काढून ऑफिशिअल इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केलासुद्धा !
वर बोलला, “आता फाॅलोअर्स कसे
झपाट्यानं वाढतात ते बघत रहा फक्त.”

गांधी मला कंपन्यांचा सौदा करताना भेटला.
तोवर त्याने माॅलमधून चिक्कार खरेदी केली होती.
जीन्स-टिशर्ट मध्ये होता.
म्हणाला, “क्या करने का इनका? फोकटकी मगजमारी, बेच दिया साला… वैसेभी मैं फकीर आदमी हूँ ।”

गांधींना मी खोलीवर घेऊन गेलो,
काॅफी पाजवून म्हटलं,
“मौनव्रताला सोडचिठ्ठी दिली काय?
इतकी बडबड केव्हापासून?”
त्यावर म्हणाला,
“बोलने का ईच जमाना हय,
बोलते रहने का, लगातार… मैं नय बोलता था तो
सबने मेरी मारी, ”मजबुरी का नाम गांधी” बोले,
अब मैं सबका उट्टा निकालूँगा…।

बोलता बोलता अवचित थांबला,
दीर्घ श्वास घेत माझ्या खांद्यावर हात टाकत बोलला,
“उस साले गुर्जर की बड़ी याद आ रैली है। अच्छा था बुढा। कहां है आजकल?”

मी अवाक्.
तुटक्या मणक्याने अन्
कापल्या जीभेनं शतखंडीत झालेला,
गांधीसमोर, गांधीसाक्षीनंच.

  • अक्षय शिंपी
₹80/Contact -8369666057

Leave a Reply