गांधींचा पुतळा(दहा कथा)

असगर वजाहततो गांधींचा पुतळा आहे , हा गांधी खरा गांधी नाही असं समजूनच गांधींच्या पुतळ्याला गोळी घातली जात होती , पण प्रत्यक्षात गोळी गांधींना लागली. पुतळ्यातून गांधी पुढे आले .
गोळ्या घालणाऱ्यांना आनंद झाला . म्हणाले – ‘हे तर छानच झालं , खऱ्या गांधींला गोळ्या लागल्या . पण पुढच्या वर्षी आम्ही पुतळ्याला गोळ्या घालू तेव्हा पुतळ्यातून गांधी कसा बाहेर पडणार ? ‘

’ तुम्ही काळजी करू नका , दर वर्षी तुम्ही गोळ्या घाला , दर वर्षी पुतळ्यातून गांधी बाहेर पडेल . ‘ – गांधी उत्तरले .


गांधींच्या पुतळ्याला गोळी घातली आणि पुतळ्यातून रक्त येऊ लागलं . तेंव्हा अचानक कर्नल डायर ( colonel Rsginald Edward Harry Dyer 1864-1927 ) तिथे आला . गोळी घालणाऱ्यांना तो इंग्लिशमध्ये म्हणू लागला ,’ वेल डन ,…. जे काम आमचं हे भल मोठं महान साम्राज्य करू शकल नाही ते काम तुम्ही लोकांनी ‘ करून दाखवलं ‘ ! आम्ही तुमचे आभारी आहोत . काही काम असेल , मदत हवी असेल तर जरूर सांगा ….. ‘

डायरच्या मागून उधमसिंगही आला होता पण त्याला कोणी पाहिलंच नाही .


गांधींच्या पुतळ्याला गोळया घालणाऱ्यांना अधिक वास्तववादी दृष्य हवं होतं . इतिहासात लिहिलंय की गोळी लागल्यावर गांधीं ‘ हे राम ‘ म्हणाले होते . म्हणून गोळया घालणाऱ्यांनी आपल्याच एका साथीदाराला ‘हे राम ‘ म्हणायला सांगितलं . तोही तयार झाला .

पुतळ्याला गोळी घातली , रक्त वाहू लागलं पण हे राम म्हणणारा फक्त हे हे करत बसला , तो ‘ हे राम ‘ म्हणू शकला नाही .


गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या .
गोळीबारानं पुतळा पडला .
पडलेल्या पुतळ्यामागं प्रेतं पडली होती .

प्रेतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा कळलं की ती चम्पारण्यातल्या शेतकऱ्यांची प्रेतं आहेत.


गांधींच्या पुतळ्याला जेंव्हा गोळ्या घातल्या , तेंव्हा आकाशवाणी झाली .
‘ अरे मूर्खांनो , गांधीला मारायचं तर त्या पुतळ्याला कशाला गोळी घालत्ताय , मारायचाच असेल तर गांधीचा आत्मा मारा .’ – आकाशातून आवाज आला ,
‘ आत्मा म्हणजे काय तेच आम्हाला माहिती नाहीय ‘ – गोळ्या घालणाऱ्यांनी उत्तर दिलं .
‘ आत्मा सगळ्यांच्या आत असतो , तुम्हीही आत्म्याला शोधून पहा . ‘ – आकाशवाणी .
‘नाही हो सापडत , आम्ही कित्येक शतकं शोधतोय . ‘ – गोळ्या घालणारे .


‘हे असं पुतळ्याला किती वर्ष गोळ्या घालत बसणार ?
बदल म्हणून सिनेमा नाटकात गांधी झालेल्या कलाकारांनाच आता गोळ्या घालू .’ – गांधींना गोळ्या घालणाऱ्यांनी विचार केला .
डोक्यात कल्पना आली आणि गांधींची भूमिका करणाऱ्या सगळ्यांना गोळा करून पकडून आणलं .
‘ तुम्हाला गोळ्या घालणार आहोत कारण तुम्ही गांधी झाला होतात . ‘ – गोळ्या घालणाऱ्यांनी कलाकारांना सांगितलं .

‘ ठीक आहे , पण गोळ्या घालणाऱ्या नथुराम गोडसेला कोण फाशीवर टांगणार ? ‘ कलाकार म्हणाले .

मुळात या वादात पडायची मीडियाची हिम्मतच होत नव्हती . पण एका पत्रकारानं चॅनल मालकाशी यामागच्या बातमीची चर्चा करायचा प्रयत्न केला. चर्चा सुरु होताच मालकाची खुर्चीच फाटली, म्हणजे खुर्चीला खाली एक मोठं भोक पडलं .
‘ या भोकात पहा , तुला तुझं भवितव्य दिसेल … ‘ मालकानं पत्रकाराला सांगितलं .
खरोखरच पत्रकाराला भोकात भवितव्य दिसू लागलं .
तुला या बातमीमागे लागायचं असेल तर स्वर्गात जा आणि गांधींचा इंटरव्ह्यू घे.
पत्रकार स्वर्गात गेला . गांधी चरख्यावर सुत कातत बसले होते .
‘ तुमच्या पुतळ्याला गोळ्या घातल्यात हे पाहून कसं वाटतंय तुम्हाला ? ‘ – पत्रकारानं विचारलं .
-‘ छान वाटतंय मला ‘

  • ‘ तुम्हाला छान का वाटतंय ? ‘
– ‘ कारण त्यांनी आधी एका निहत्या माणसाला गोळ्या घातल्या , आता या वेळी त्यांनी एका पुतळ्याला गोळ्या घातल्या . या वरून हे सिद्ध होतंय की हत्यार असलेल्या माणसावर ते कधीच गोळ्या चालवणार नाहीत .’

‘ तुम्हाला गोळ्या घालणारे तुम्हाला शत्रू मानतात ‘ – स्वर्गात एका पत्रकारानं गांधींना सांगितलं .
-‘ यात कांही आश्चर्य नाहीय . ‘ – गांधी म्हणाले .
-‘ तुम्हाला कसं वाटलं ? ‘
-‘ छान वाटलं . ‘

  • ‘ का छान वाटलं ? ‘
  • ‘ कारण इंग्रज सुद्धा मला शत्रू मानायचे …. माझ्या शत्रूंना एक मित्र मिळालाय . ‘- गांधींनी उत्तर दिलं .

‘ या पुतळ्याला का गोळ्या घालताय ? गांधींचा तर मागेच खून झालाय .’ – गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालणाऱ्यांना विचारलं .
-‘ सगळ्यांना असंच वाटतंय .’
-‘ मग खरं काय आहे ?’
-‘ गांधीला गोळ्या घातल्या गेल्या हे खरंच आहे पण म्हातारा मेलाच नाही . ‘
-‘ हे काय सांगताय ? ‘

  • ‘खरंच सांगतोय, म्हातारा मेलाच नाही.’
    -‘ मग ?’
    -‘ आम्ही दरवर्षी मारतो , पुढच्या वर्षीही मारू पण गांधी मरतच नाही . ‘

१०

मोठ्या निगुतीन , कष्टानं त्यानं गांधींचा पुतळा बनवला .
पुतळा तयार झाल्यावर त्याला चष्मा घातला .
‘ डोळ्यांवरून हा चष्मा काढा . ‘ – गोळ्या घालणारे तावातावानं म्हणू लागले .
‘ गांधीला हा चष्मा घालायचा नाही ‘ – गोळ्या घालणारे तावातावानं म्हणू लागले .
‘ पण गांधींच्या डोळ्यांवर नेहमी चष्मा असायचा . ‘ – पुतळा बनवणाऱ्यानं सांगितलं .
‘ गांधी चष्मा घालायचा , हीच तर मोठी गोची होती . पुतळ्यानं समोर चाललेलं सगळं स्वच्छ पाहायला नको ; हा चष्मा इकडेआणा , हा चष्मा आमच्या फार कामाचा आहे ‘ – गोळ्या घालणाऱ्यांनी सांगितलं .
-‘ काय कामाचा आहे ? ‘

-‘ या चष्म्याच्या दोन्ही काचा घासायच्यात .’
अनुवाद – श्रीधर चैतन्य

( मैत्री पब्लिकेशन पुणे प्रकाशित “असगर वजाहत यांच्या लघुकथा” या आगामी पुस्तकातून )

₹ 80 / Contact -8369666057

Leave a Reply