मार्क्सवादी चिंतक, समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य – नरेंद्र देव !

व्यक्ती,विचार आणि विश्व

देवकुमार अहिरे ..

      वासाहतिक काळामध्ये एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ चालू होती तर दुसरीकडे आधुनिक भारताची वैचारिक जडणघडण आणि बांधणी चालू होती. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या विचारांची मंडळी काँग्रेसच्या छत्राखाली जशी एकत्र होती तशीच काँग्रेसच्या वर्तुळाबाहेरही कार्यरत होती. वेगवेगळ्या कल्पना आणि अनेक प्रकारची स्वप्ने घेऊन आधुनिक भारताच्या निर्मितीचा प्रकल्प चालू होता. या प्रकल्पाच्या पायाभरणीचे काम करणाऱ्या द्रष्ट्या नेत्यांमध्ये आचार्य नरेंद्र देव यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. कारण, स्वातंत्र्योत्तर भारतात सत्ताधारी काँग्रेस सरकारला जनतेच्या प्रश्नांवरून कोंडीत पकडणाऱ्या  विरोधकांमधील समाजवादी पक्षांची सैद्धांतिक आचार्य देवांनी विकसित केली होती. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांना स्वातंत्र्योत्तर काळात जशी प्रसिद्धी आणि ओळख मिळाली तशी त्यांचे पूर्वसुरी आणि मार्गदर्शक असलेल्या आचार्य देवांना मिळालेली दिसत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना जास्त आयुष्य लाभले नाही हे त्यातील एक कारण आहे. परंतु,  सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आचार्य नरेंद्र देव यांचा विविधांगी आणि बौद्धिक वारसा चालवणारे लोक पुढील काळात नाहिसे झाले. एकाचवेळी मार्क्सवादी चिंतक, समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य असलेल्या नरेंद्र  देवांचा वैचारिक वारसा चालवणे नंतरच्या लोकांना थोडेसे कठीण झालेले दिसते.  

बालपण आणि शिक्षण :
उत्तरप्रदेशातील सीतापूरमध्ये आचार्य नरेंद्र देवांचा जन्म दिनांक ३१ ऑक्टोबर १८८९ रोजी झाला. त्यांचे वडील बलदेव प्रसाद हे पेशाने वकील होते. तसेच, काँग्रेसचे सदस्य सुद्धा होते. फैजाबादमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अलाहाबादमधील मीर सेन्ट्रल कॉलेजमध्ये पदवी शिक्षण (१९०८-११) आणि बनारसमधील क्वीन्स कॉलेजमध्ये पुरातत्त्वशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण (१९११-१९१३) घेतले. पुरातत्त्वशास्त्रामध्ये रुची निर्माण झाल्यावर त्यांना त्यातच काम करायचे होते परंतु जागा नसल्यामुळे त्यांना पुढे कायद्याची पदवी घेऊन १९२१ पर्यंत वकिली व्यवसाय करावा लागला. १९२१ मध्ये काशी विद्यापीठाची स्थापना झाल्यावर नरेंद्र देव तिथे इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. काशी विद्यापीठात इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृती अभ्यासाठी प्रसिद्ध असतानाच ते भाषातज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध झाले कारण त्यांना पाली, फ्रेंच, संस्कृत, पर्शियन, जर्मन, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमध्ये गती आणि रस होता. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य नरेंद्र देव अनुक्रमे लखनऊ विद्यापीठ (१९४७-१९५१) आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे (१९५२-५४) कुलगुरू होते.
स्वातंत्र्य चळवळ, समाजवाद आणि आचार्य देव :
आचार्य नरेंद्र देवांचे वडील काँग्रेसचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या घरी काँग्रेसी नेत्यांची उठबस होती. पंडित मदनमोहन मालवीय हे त्यांच्या घरी येत असत. १८९९ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी नरेंद्र देवांनी काँग्रेसचे लखनऊ अधिवेशनात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल आणि गोपालकृष्ण गोखले यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांना ऐकता आले. १९१५ मधील गदर आंदोलनातील क्रांतिकारी नेते लाला हरदयाळ यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला होता. आर्य समाजाची पार्श्वभूमी असलेल्या लाला हरदयाळ यांनी बौद्ध तत्त्वज्ञानात पीएचडी केली होती. तसेच, त्यांच्यावर मार्क्सवादाचाही प्रभाव होता. हरदयाळांनी ‘महर्षी कार्ल मार्क्स’ नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. बौद्ध धर्म अभ्यासाचा आणि मार्क्सवाद प्रभावाचा वैचारिक वारसा आचार्य नरेंद्र देवांना लाला हरदयाळ यांच्याकडून मिळालेला असू शकतो. कारण, देवांवर त्यांचा प्रभाव होता आणि आचार्य नरेंद्र देव स्वतःला मार्क्सवादी म्हणवून घेत होते, शिवाय ते बौद्ध धर्माचे अभ्यासक होतेच.
रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाल्यावर त्यांनी मार्क्स, एंगल्स, लेनिन आणि तत्कालीन महत्त्वाच्या मार्क्सवादी लोकांच्या साहित्याचा अभ्यास केला. ते पक्के मार्क्सवादी झाले होते पण तरीही त्यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी’त सहभाग घेतलेला नव्हता. १९२६ मध्ये स्वामी संपूर्णानंद यांच्यासमवेत तयार केलेला आचार्य नरेंद्र देवांचा ‘समाजवादी शेती कार्यक्रम’ १९२९ च्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मान्य केला. १९३१ च्या कराची अधिवेशनात पंडित नेहरूंनी समाजवादी पद्धतीचा विकासाचा आराखडा हे काँग्रेसचे ध्येय आहे असे मांडले आणि त्याचे मूळही १९२९ च्या समाजवादी शेती कार्यक्रमात आहे असे म्हटले. काँग्रेसचा कल डावीकडे म्हणजे समाजवादाकडे झुकतो आहे असे दिसताच काँग्रेसमधील जमीनदार, भांडवलदार आणि सनातनी मंडळींनी आपली मोर्चेबांधणी केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये वैचारिक वाद आणि प्रश्न उद्भवू लागले. १९३३ मध्ये काँग्रेस अंतर्गत टिळकवादी मंडळींनी महाराष्ट्रात ‘लोकशाही स्वराज्य पक्ष’ स्थापन केला आणि १९३४ मध्ये उत्तरप्रदेश आणि सयुंक्त प्रांतात मालवीय, अणे यांनी काँग्रेसअंतर्गतच ‘काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष’ स्थापन केला.
काँग्रेसमधील उजवी आणि जमीनदार-भांडवलदार समर्थक मंडळी संघटीत होऊन काँग्रेसवर वर्चस्व निर्माण करू पाहत होती आणि समाजवादी व मार्क्सवादी मंडळींना वेगळे पाडू पाहत होती. म्हणून काँग्रेसमधील वेगवेगळ्या प्रकारची समाजवादी मंडळी सुद्धा एकत्रित झाली आणि त्यातून १९३४ मध्ये पटना शहरात काँग्रेसअंतर्गत ‘काँग्रेस समाजवादी पक्षा’ची स्थापना करण्यात आली. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापना अधिवेशनाचे अध्यक्ष आचार्य नरेंद्र देव होते आणि सभासदांमध्ये देशभरातील लोकांचा सहभाग होता. उदा. जयप्रकाश नारायण, रामविरकश बेनिपुरी, मिनू मसानी, कमलादेवी चटोपाद्धाय,राममनोहर लोहिया, युसुफ मेहेरअली, ई. एम. एस. नम्बुद्रीपाद, अच्युत पटवर्धन. काँग्रेस समाजवादी पक्षामध्ये जयप्रकाश नारायण, ई. एम. एस. नम्बुद्रीपाद यांच्यासारखे मार्क्सवादी समाजवादी, मिनू मसानी आणि अशोक मेहता सारखे फेबियन समाजवादी आणि अच्युत पटवर्धन आणि राम मनोहर लोहिया यांच्यासारखे गांधीवादी, समाजवादी आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यासारखे क्रांतिकारी लोक होते. या सगळ्यांमध्ये काही वैचारिक मतभेद होते पण या सगळ्या प्रवाहांना काँग्रेस समाजवादी पक्षात बांधून ठेवण्याची बौद्धिक कसरत आणि वैचारिक ताकत आचार्य नरेंद्र देव करत होते कारण, त्यांच्याकडे वरील सगळ्या वैचारिक गटांमध्ये सन्मानाने पाहिले जात होते.
१९३० च्या दशकात जर्मनी आणि इटली या देशांमध्ये फासीवाद फोफावत होता. तसेच, १९३७ मध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात लष्कराने उठाव केला होता. त्यामुळे जगभरातील तरुण स्पेनमधील गृहयुद्धात सहभागी होत होते. अशावेळी भारतात फासीवाद विरोधी काँग्रेस समाजवादी पक्ष (CSP) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) यांची संयुक्त आघाडी घडवण्यामध्येही आचार्य नरेंद्र देव यांची महत्त्वाची भूमिका होती. १९३६ मध्ये आचार्य उत्तरप्रदेश काँग्रेस अध्यक्ष झाले. १९३७ च्या प्रांतिक निवडणुकीमध्ये उत्तरप्रदेशात काँग्रेसला यश मिळाले. त्यामध्ये आचार्य देवांचा मोठा वाटा होता असे म्हटले जाते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात आचार्य नरेंद्र देवांना अटक करण्यात आली. त्यांना अहमदनगर जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी पंडित नेहरू, मौलाना आझादही तेथेच होते. अहमदनगरमध्येच नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, आझादांनी ‘गुबर-ए-खातीर’ लिहिले आणि आचार्य नरेंद्र देवांनी बौद्ध दार्शनिक वसुबंधूच्या अभिधर्म कोश या ग्रंथाच्या १० फ्रेंच खंडांचे हिंदीत भाषांतर पूर्ण केले. त्यामुळेच श्रीप्रकाश म्हणतात की, ‘ भारतीय राजकारणात बौद्ध धर्माला आणण्याचे आणि नेहरूंवर बौद्ध विचारांचा प्रभाव पाडण्याचे श्रेय आचार्य नरेंद्र देवांना जाते.’

आचार्य नरेंद्र देवांच्या राजकारणाचा व जीवनाचा शेवट :
१९४६ च्या घटना समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे देशभरात केंद्रात आणि प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली. सामाजिक, आर्थिक, राजकीय मुद्द्यांवरून काँग्रेसमध्ये मतभेद उत्पन्न होऊ लागले. स्वातंत्र्यपूर्व काळातील वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांची चळवळ असलेला काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष झाला होता. सत्तेचे अतिरेकी केंद्रीकरण होत होते. तसेच, सरकारच्या धोरणांवर वचक ठेवण्यासाठी आणि लोकशाही शासनव्यवस्थेच्या यशस्वितेसाठी विरोधी पक्षांची गरज होती. अशा काळात सरकारी धोरणांच्या मतभेदांवरून काँग्रेस समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला आणि १९४८ साली ‘समाजवादी पक्षा’ची स्थापना केली. तत्पूर्वी आचार्य नरेंद्र देव हे १९४६ च्या निवडणुकींमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी कोणी मागितला नसताना मूल्यांसाठी आमदारकीचा राजिनामा दिला. पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाकडून आचार्य देव उमेदवार असताना काँग्रेसने बाबा राघव दास नामक एका संन्याशी व्यक्तीला तिकीट दिले. निवडणूक प्रचारात बाबाने आणि काँग्रेसने आचार्य देवांना ‘नास्तिक’, ‘कम्युनिस्ट’ आणि अभिव्यक्ती व स्वातंत्र्याचा शत्रू म्हणून रंगविले. त्यामुळे आचार्य नरेंद्र देवांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला. लोकशाही व्यवस्थेत सरकारइतकाच विरोधीपक्ष महत्त्वाचा असतो कारण, सत्ताधारी पक्षावर जर विरोधी पक्षाचा वचक नसला तर सत्ताधारी लोक हुकूमशहा होऊ शकतात ही जाणीव असल्यामुळे काँग्रेसला प्रबळ विरोधी पक्ष असावा यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे ठरविले. त्यातून १९५२ मध्ये समाजवादी पक्ष व कृषक मजदूर प्रजा पक्ष यांचे एकीकरण झाले आणि त्यातून प्रजा समाजवादी पक्षाची निर्मिती झाली. याकाळात आचार्य नरेंद्र देव शैक्षणिक चळवळीमध्ये कुलगुरू म्हणून महत्त्वाची कामे करत होते. तसेच, प्रजा समाजवादी पक्षाचे नेते म्हणूनही काम करत होते.
१९ फेब्रुवारी १९५६ रोजी आचार्य नरेंद्र देव यांचे आजारपणामुळे निधन झाले. १९५६ हे आधुनिक बौद्ध चळवळीच्या निमित्ताने महत्त्वाचे वर्ष आहे. प्रधानमंत्री नेहरू यांनी सरकारी पाठिंब्याने बौद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली होती. कारण, यावर्षी तथागत सिद्धार्थ बुद्धाच्या धर्मचक्र परिवर्तनाला अडीच हजार वर्ष पूर्ण झाली होती. याचवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. आचार्य देव काही महिने अजून जगले असते तर त्यांनी दोन्ही कार्यक्रम पाहिले असते. दोन्ही कार्यक्रमांमुळे त्यांच्यातील बौद्ध अभ्यासकाला निश्चितच आनंद झाला असता. कारण, सक्रीय राजकारण करत असतानाही त्यांनी कधीच बौद्धधर्म आणि तत्त्वज्ञान अभ्यासात कधीच खंड पडू दिला नाही. त्यांचा ‘बौद्धधर्मदर्शन’ नामक ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे एवढा महत्त्वाचा आहे.
आचार्य नरेंद्र देव आणि आजची समकालीन स्थिती :
आजच्या काळात आचार्य देवांच्या वैचारिक वारश्याची आणि बौद्धिक परंपरेची अत्यंत गरज आहे. तसेच, त्यांची सामाजिक, राजकीय आणि नैतिक दृष्टीही आजच्या काळात आपणास मार्गदर्शक ठरू शकते. वेगवेगळ्या विचार परंपरेचशी नेहमी संवाद ठेवणे आणि सामाजिक, आर्थिक समतेसाठी आणि कष्टकरी, शेतकरी लोकांसाठी सातत्याने संघर्ष व अभ्यास करत राहणे हाच धडा आपणास त्यांच्या जीवनातून मिळतो. त्यासाठी लोकशाही शासनव्यवस्थेत विरोधी पक्ष आणि चळवळ मजबूत असली तरच लोकशाही मजबूत आणि शाबूत असू शकते म्हणून विरोधी पक्ष आणि चळवळ सशक्त आणि प्रबळ केली पाहिजे. आचार्य नरेद्र देव म्हणतात, ‘आर्थिक समतावाद आणि लोकशाही व्यक्तिवाद यांच्या एकत्रित येण्यानेच जातीव्यवस्था आधारित सामाजिक रचना नष्ट होईल.’ आजही आचार्य नरेंद्र देव यांचा हा विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे.

2 comments

Leave a Reply