शांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.

डॉ. दीपक बोरगावे

गांधी हा विषय आज खूप महत्त्वाचा झाला आहे/झाला पाहिजे. यावर सतत काही चिंतन सुरू राहिले पाहिजे; असा आग्रह धरायला हवा, गांधीच आपले प्रश्न सोडवू शकतील, गांधींना आपण कालबाह्य करू शकत नाही, गांधी हाच भारतीयांचा खरा आवाज आहे, असा एक प्रवाह कार्यरत दिसतो आहे. असे काहीसे आजचे चित्र आहे.

गेल्या सत्तर वर्षात जगभरचा गांधी-साहित्याचा आवाका आणि गांधी या घटीताचा प्रभाव पाहिला तर, एकाच भारतीयावर एवढे प्रचंड साहित्य लिहिले जाणे ही एकमेवाद्वितीय घटना आहे. भारतीय भाषांत (हिंदी; प्रेमचंद, बंगाली, कन्नड; राजा राव, पंजाबी; मुल्क राज आनंद) गांधींवर विपुल साहित्य लिहिले गेले, पण त्याहून अधिक इंग्रजीत लिहिले गेले आहे. कोलंबिया, केम्ब्रीज किंवा आॅक्सफड॔ अशा परदेशातील महत्त्वाच्या विद्यापीठांनी; पेंग्विन, राऊटेज सारख्या जगप्रसिद्ध प्रकाशकांनी गांधीजींच्यावर अनेक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत; अलिकडच्या काळातही हे काम सुरूच आहे. गांधींवर जवळपास पाच पन्नास चरित्रे ही इंग्रजीत लिहिली गेली आहेत. गांधींवरील एक यशस्वी चित्रपटही हा पाश्र्चात्यांनीच (Richad Attenborough) काढला.

शांतीचे महत्त्व हे त्यानाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात. दोन महायुद्धाची प्रचंड झळ त्यांनी सोसली होती. महाराष्ट्राला साधी फाळणीचीही झळ परिचित नव्हती.

आता साऱ्या देशातच गेल्या पाच-सहा वर्षांत अहिंसेला बावळटपणा म्हणून त्याची टिंगलटवाळी करण्याचे, आणि एकूणच गांधींबद्दल अपप्रचाराची शस्त्रे पाजळली जात आहेत.

तुलनात्मक विचार करता आणि काही सन्माननीय अपवाद वगळता, मराठीत गांधींवर फारसे साहित्य नाही. कसे असणार ? आरएसएसची जन्मभूमीच महाराष्ट्र (नागपूर), सावरकरवादी आणि जीनावाद्यांनी आणि इतर जमातवादी शक्तींनी फुटीरतेचे वातावरण इथेच विकसित केले, जमातीय दंगली घडवून आणल्या. गांधींना सगळ्यात जास्त विरोध हा महाराष्ट्रातूनच झाला. शेवटी मराठी माणसानेच गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना महाराष्ट्राने संपवले. गांधी विचारवंत, लेखक चळवळी महाराष्ट्राबाहेर अधिक झाल्या. जेपी, लोहिया हे अ-महाराष्ट्रायीन होते.

मराठीत गांधी-साहित्य फारसे नाहीच. शंकरराव जावडेकर, भागवत, नलिनी पंडित यांचे “गांधी” आणि अलिकडचे, ग. प्र. प्रधान, द्वादशीवार वगैरे अभ्यासकांनी गांधींवर मराठीत लिहिले आहे. रामचंद्र गुहा, निरद चौधरी, या अभ्यासकांनीही गांधींवर विपुल लिहिले आहे. रामचंद्र गुहा यांचे अलिकडचे गांधींवर एक पुस्तक आले आहे, India After Gandhi: The History of the World’s Largest Democracy (PAN BOOKS).

अलिकडच्या काळात, गांधींवर
हिंदी भाषेत अनेक नाटके गाजली. असगर वजाहत यांचे “गोडसे@गांधी.काॅम”, सुशीलकुमार सिन्हांचे, “बापू की हत्या हजारवीं बार”, सर्वेश्वरदयाल सक्सेनांचे, “बकरी” , राजेशकुमार यांचे, “गांधी ने कहा था” आणि सेठ गोविंददास यांचे, “भूदान यज्ञ” अशी हिंदीत जवळपास तीस नाटके गांधींवर आहेत आणि मराठीत, प्रेमानंद गज्वी यांचे “गांधी विरुद्ध आंबेडकर”, प्रदीप दळवींचे “गांधी विरुद्ध गांधी”, आणि त्यांचेच “मी नथूराम गोडसे बोलतोय”. आता बोला…

आमचे मित्र, डॉ. चंद्रकांत लंगरे गांधी या विषयावर एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संशोधनात्मक पुस्तक संपादित करत आहेत. त्यांनी मला गांधींवर लेख लिहायला निमंत्रण दिले होते (अर्थात इंग्रजीतून), पण मला वेळ नसल्याने, ते जमले नाही. पण या निमित्ताने मराठीत हा लेख लिहावा ही उर्जा मात्र, मला मिळाली.

गांधींवर आता अधिक लक्ष दिले पाहिजे, त्यांच्यावर होणारा अपप्रचार थांबवला गेला पाहिजे म्हणून, डॉ. रावसाहेब कसबे यांनी “गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा” या शीर्षकाचे पुस्तक लिहायला घेतले आहे. दोन प्रकरणे झाली आहेत; ती मी इंग्रजीत अनुवादित करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. काम सुरू केले आहे; पण हे काम वेळेत आणि नीट करता आले पाहिजे, असे वाटते.

बली॔न विद्यापीठात Rural Craft Education for a New Village-Minded Social Order हे Dissertation अलिकडेच सादर केले होते. यात शिक्षण हा केंद्रबिंदू ठेवून, शिक्षण ही एक लोकचळवळ कशी करता येईल आणि गांधीना विशेषत प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न, जो अत्यंत महत्त्वाचा वाटत होता, त्याबद्दलचे विवेचन या शोधसंहितेत आहे. आज “नयी तालीम” या (New Educational Policy) संदर्भात आपल्या राष्ट्रीय शिक्षणाचे चित्र काय असणार आहे, असा एक प्रश्न उपस्थित करून या संशोधनावर चर्चा सुरू आहे. ग्रामीण भारतातील शिक्षण संपवण्याचे राजकारण या नव्या शैक्षणिक धोरणात दडलेले आहे आणि या दृष्टीने बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे परत एकदा बंद कसे करता येतील, याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

गांधी म्हटले की, अहिंसा, सत्याग्रह, ट्रस्टशीप, रामराज्य, ग्राम-अर्थशास्त्र, स्वदेशी, सत्याचे प्रयोग, असहकार, आतला आवाज, अशा गोष्टी आपल्या समोर येतात. अलिकडेच, एका परिसंवादात “आतला आवाज” या संकल्पनेची खिल्ली उडवण्यात आली. ते म्हणाले “आतला आवाज” वगैरे काही नसतो आणि हे सारे भंपक आहे.

गांधीजीना ब्रिटीश सरकारविरूद्ध आम जनतेला उठवायचे होते. त्यांचे संघटन करायचे होते. त्यासाठी आवश्यक अशा साधनांचा ते शोध घेत होते. “आतला आवाज” हे असेच एक शस्त्र होते आणि यात गांधीजी यशस्वी झाले. त्यांनी लोकांना स्वेच्छेने सत्याग्रहात सामील करुन घेतले. भारताच्या इतिहासात प्रथमच स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या, ही गोष्टही या आंदोलनात अभूतपूर्व होती.

अलिकडेच, साधना साप्ताहिकाचा ४२ पानांचा अख्खा अंक (१७ आॅगस्ट २०१९) डॉ. रावसाहेब कसबे यांच्या गांधी या विषयावरील जवळपास अडीच तासाच्या मुलाखतीस वाहिलेला आहे. ही मुलाखत, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रकांत भोंजाळ आणि भारत सासणे यांनी घेतली आहे.

या मुलाखतीत गांधी नावाचा जो एक गुंता आहे त्याची बरीच समाधानकारक उत्तरे आपणांस मिळतात. खरं तर, ही मुलाखत गांधी समर्थकांनी आणि विशेषतः गांधी विरोधकांनीही मुळातून अवश्य वाचली पाहिजे अशी आहे. त्याबद्दल काही नवे मुद्देही किंवा फारकतीही असू शकतील. ही एक खूप महत्वाची संहिता आहे असे वाटते.

या मुलाखतीतील गांधी बाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे:

आजची परिस्थिती भयावह आहे. गांधी संबंधी नुसतेच गैरसमज नव्हे तर त्यांची टिंगलटवाळी सुरू आहे. नेहरू, आंबेडकर यांची नावे इतिहासातून पुसली जातील, अशी भयावह परिस्थिती निर्माण केली जात आहे.

ज्याला आपण गांधीवाद असे म्हणतो, अशी कुठलीही “गांधीवाद” नावाची गोष्ट नाही. गांधींनी केवळ दोनच पुस्तके लिहिली आहेत: एक “हिंद स्वराज” (१९०९) आणि “Satyagrah in South Africa”. बाकी लिखाण पत्रव्यवहार, वृत्तपत्रीय लेखन, भाषणे, “हरिजन” आणि “Young India” मधील अग्रलेख यातून झाले आहे. गांधींचे नव्यान्नव खंड प्रकाशीत झाले आहेत.

नेहरू आणि आंबेडकर यांच्या आणि गांधीजींच्या कार्यपद्धतीत मोठा फरक होता. आंबेडकर हे सुरुवातीला प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करायचे, अगोदर वैचारिक तयारी करायचे, व्यवहारात ते कसे बसतील, हे पाहायचे. नेहरूंचंही तसंच होतं. पण गांधीकडे हा दृष्टिकोन नव्हता. त्यांना एखादी गोष्ट करावीशी वाटली की ते स्वतःला त्यात झोकून देत आणि मग त्याचे बरे-वाईट परिणामांना सामोरे जायला ते सक्षमपणे उभे राहत. ही ताकद त्यांच्याकडे होती.

या मुलाखतीत “पुणे कराराबद्दल” सविस्तर चर्चा आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्याविषयी हा करार घेऊन अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत, याचे वस्तुनिष्ठ विवेचन कसबे सरांनी केले आहे.

गांधीजी सर्वसामान्य लोकांची भाषा वापरत असत. ते काय बोलतात हे सर्वसामान्य लोकांना कळत असे. म्हणून गांधी हे असे एकमेव नेते होते की जे साऱ्या भारत देशात एकमेवाद्वितीय असे म्हणता येतील. सुरुवातीला, दक्षिणेतील लोकांनी गांधीजीना स्वीकारले नव्हते, पण गांधीजीनी आपली चळवळ ही साऱ्या भारतभर नेली.

देशभक्त होणे किंवा राष्ट्रभक्त होणे ही गोष्ट खूप सोपी करून गांधीजींनी लोकांना सांगितली. ते म्हणत, तुमच्या गावाच्या चौकात उभे राहून “जय हिंद” म्हणा, जोरात म्हणा. मग पोलिस येतील, पकडतील, मारतील, तुम्हाला तुरूंगात टाकतील, मग सोडून देतील. मग परत “जय हिंद” म्हणा. एकदा-दोनदा तिसऱ्यांदा. मग पोलीस तुम्हाला सोडून देतील. शेवटी पोलिस हाही माणूसच आहे ना? देशभक्तीचा हा सगळ्यात सोपा मार्ग गांधीजींनी सांगितल्यामुळे, खेड्यातल्या स्त्रियासुद्धा आणि खालच्या जातीचे लोकसुद्धा स्वातंत्र्यसैनिक बनू शकले.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि गांधीजी असा एक मुद्दा आहे. गांधीजीनी यंत्राला विरोध केला. एवढेच काय त्यांनी वकील, डॉक्टर, रेल्वे यांनाही विरोध केला होता. पण गांधीजींनी रेल्वेनीच सारा देश धुंडाळून काढला. त्यांच्या कंबरेला एक घड्याळ कायम अडकवलेले होते. हा एक अंतर्विरोध आपणास गांधीजींमध्ये दिसतो

गांधीजींनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या विषयांचा पद्धतशीरपणे अभ्यास केला नव्हता. त्यांनी धार्मिक पुस्तके वाचली होती.

गांधीजींचे इकॉनॉमिक्स हे युटोपियन किंवा आदर्शवादी होते. म्हणजे खेडी स्वयंपूर्ण व्हावीत वगैरे. पण ब्रिटिशांनी अगोदरच खेडी उध्वस्त करून टाकली होती. त्यांनी यंत्राच्या साहाय्याने उत्पादन व्यवस्था निर्माण केली होती. सर्वसामान्य भारतीयाला ब्रिटिश उत्पादन अधिक स्वस्त व चांगले वाटत होते. पण गांधीजी म्हणत तुम्ही खादी वापरा. स्वतः गांधीजी साधे रहात, खादी वापरत, साधं अन्न खात. पण सरोजनी नायडू यांनी गांधीजीवर एक कॉमेंट केली आहे: गांधीजीना पोषणं हे श्रीमंतानाही कठीण आहे म्हणून.

यंत्र पिळवणूक करतात, लोकांच्या हातातील काम काढून घेतात, बेकारी वाढवतात. म्हणून, गांधीजींनी यंत्राला विरोध केला होता. पण ब्रिटिशांच्या बरोबर आपल्याकडे औद्योगिकरण आले आणि हे अटळच होते.

आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले; नेहरू सरकारमध्ये कायदामंत्री झाले, यामागे गांधीजींचा हात होता. गांधीजीना आंबेडकरांची विद्वता, अभ्यास याचा देशाला फायदा कसा होईल याचा ते विचार करत होते.

आंबेडकरांच्यामुळे गांधीजींच्या विचारात अनेक बदल होत गेले. अस्पृश्यतेबद्दल, धर्माबद्दल, वर्णव्यवस्थेबद्दल गांधीजींच्या विचारात बदल होत गेले असे कसबे यांनी म्हटले आहे.

आज गांधीजींचा विचार आणि त्यातून जी महत्त्वाची दोन तत्त्वे आली आहेत ती म्हणजे शांती आणि अहिंसा ही तत्त्वे. जगाला कल्याणाचा मार्ग दाखवणारी ही तत्त्वे आहेत. जगात, मनात आणि सर्वत्र भवताली शांती असल्याशिवाय माणूस कुठल्याही प्रकारची प्रगती आणि विकास करूच शकत नाही. आज मनुष्यजातीला वाचवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे शांतता हीच गोष्ट आहे.

दुसरी गोष्ट आहे स्वाभिमान. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असणारी आपली जाण म्हणजे स्वाभिमान. कोणत्याही गुलामीत न राहणे, स्वतंत्र राहणे, ही स्वाभिमानाचीच गोष्ट आहे. यातूनच निर्भयता ही जन्माला येत असते. अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे, त्यासाठी सत्याग्रहाचा वापर केला पाहिजे. माणसांमधली भीती घालवणे किंवा किमान कमी करणे, हे खूप मोठे काम गांधीजींच्या कार्यातून दिसते.

गांधीजी हे तसे कोणत्याच धर्माचे नव्हते. दुर्दैवाने लोकांनी त्यांना हिंदू मानल्यामुळे आणि त्यांची भाषा ही काही प्रमाणात त्याला जबाबदार असल्यामुळे, गांधीजी नीटसे उलगडत नाहीत. गांधी हा माणूस धार्मिक होता ही गोष्ट खरी आहे, पण तो धर्मनिरपेक्षही होता. आज गांधीशिवाय पर्याय नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही असे ठाम मत कसबे यांनी या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

[ लेखक भाषांतर अभ्यासक असून मराठी-इंग्रजी द्विभाषिक कवी आहेत. गुजरात फाईल्स,झोत,ब-बळीचा अशा महत्वाचे पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत ]

मूल्य – ₹ 80
मैत्री पब्लिकेशन, पुुणे
संपर्क – 8369666057

Leave a Reply