आणि कदाचित भविष्यातल्या पिढीला गांधी कोण होता असा प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही.


अनिकेत लखपती

गांधी …….

आज तुला एक मित्र म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण आदरयुक्त आपुलकीनं ज्या गोष्टी सहज लपवल्या जातात त्या मित्रत्वाच्या नात्यानं लपविल्या जात, नाही. आणि कोणतीही शंका मनात राहू न देता बोलण्याचीच माझी आज इच्छा आहे. लहानपणीपासूनच तुला राष्ट्रपिता म्हणत असलो तरीही तुला देवत्व बहाल करून मंदिराच्या गाभाऱ्यात बसवत त्याला केवळ स्वतःच्या सोयीसाठी प्रदक्षिणा मारण्याचं कर्मकांड मला जमणार नाही. तुला समजून घेण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात शिरण्याचा शहाणपणा मला करावाच लागेल. अर्थात मी राहत असलेल्या वातावरणातील विचारांच्या विसंगतीमुळे मला कितपत तुझ्यापर्यंत पोहचता येईल हा एक प्रश्नच आहे. पण अश्या अनेक प्रश्नांमध्येच मी गुंतून पडलो तर मीही त्या वैचारीक विसंगतीचाच भाग होऊन जाईल अस वाटतं. मला तुझ्या विचारांपर्यंत पोहचण्याची गरज वाटते पण दुसऱ्या विचारांचा तिरस्कार करण्यासाठी मला ते नको आहे. तुझ्या विचारांचा नवीन वैचारिक ” वाद ” निर्माण करून तो केवळ समाजातल्या विशिष्ट ” वादी ” वर्गासाठीच आहे असंही आज मला वाटत नाही. त्यामुळं तुझ्या शुद्ध विचारांपर्यंत पोहचण्याची आज मला जास्त आवश्यकता वाटते. कारण ते संपूर्ण समाजाला सोबत घेऊन चालणारे आहेत , अखंड मानवजातीला खऱ्या विकासाकडे नेणारे आहेत आणि प्रत्येक माणसाचं स्वतःच्या जीवनावरच नियंत्रण अधिकाकाधिक वाढेल अस नैतिक बळ देणारे आहेत असं मला वाटतं.
प्राचीन भारतीय संस्कृतीत बुद्ध – महावीरांनी अहिंसेच्या ज्या नविन विचाराला जन्म दिला. त्याचा व्यावहारिक जीवनातील वापर प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचं महानपण तुलाच द्यावं लागतं. तुझी अहिंसा ही केवळ पशुहत्येला प्रतिबंध घालण्यापूर्ती मर्यादित नव्हती तर शक्तीचा सर्वोच्च विकास साधत निर्माण झालेल्या संयमातून निशस्त्र प्रतिकार करण्याचा तो एक नैतिक मार्ग होता. त्यामूळ विसाव्या शतकातल्या भारतीय संस्कृतीचं सर्वश्रेष्ठ रूपच मला तुझ्यामध्ये दिसत. पण आजच्या काळात तुझ्या अहिंसा तत्वाला दुर्बलतेच प्रतीक मानलं जातं. अर्थात त्याला अहिंसेचा खरा अर्थ समजून न घेता स्वतःला अहिंसावादी म्हणवून घेणारे कारणीभूत आहेत. कारण ते दुसऱ्याचा प्रतिकार करू शकत नाही म्हणून अहिंसेच्या तत्वाचा बुरखा चढवतात. दुसऱ्याचा शक्तीने प्रतिकार करण्यास ते सक्षम नाहीत तर ते स्वतःच्याच न्यूनतम शक्तीपूढे अगतिक झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मग अश्या घाबरत आणि डरपोक अहिंसेचा पुरस्कार तरी आम्ही का करावा..?
अहिंसा म्हणजे दुसऱ्याचा मनानेही तिरस्कार करू नये. नव्हे तर त्याच्यावर प्रेमच करा.अशी मूळ भावना या तुझ्या तत्वामागे होती हे आम्ही कधी समजून घेणार..? या अर्थाने गेल्यास दुसर्याबद्दल मनानेही वाईट चिंतन करणारा अहिंसेचा पुजारी होऊ शकणार नाही. माणसाचं एकमेकांबद्दल असणारं प्रेम हेच मानवी सुखाचं अधिष्ठान असू शकतं या विचाराने तू सांगितलेल्या अहिंसा तत्वाची महती मला समजून येते.
लहानपणापासुन आम्हाला राजा हरिश्चंद्राच्या सत्यवादी गोष्टी सांगितल्या असल्या तरीही तो राजा हरिश्चंद्र केवळ गोष्टींपुरताच मर्यादित राहतो. तो जस सत्यवादी जीवन जगला तस जीवन जगण्याची अभिलाषा आमच्या मनात निर्माण केली जात नाही. आपला फायदा करून घेण्यासाठी प्रसंगी खोटं बोलण्याचं तत्वज्ञानच आमच्या पथ्यावर पाडलं जात. वास्तविक जीवनात जगताना खरं बोलल्यामुळं होणारं नुकसानही आम्हाला नकोच असतं. मी खरं बोललो तरीही समोरचा त्या प्रमाणे वागणार नाही असं म्हणून आमच्या खोटेपणालाच अधिक उत्तेजन देण्याचं काम आम्ही करत आलो आहोत. निदान आमच्या पिढीला खोट बोलणं हे चुकीचं आहे एवढी तरी जाणं आहे. येणाऱ्या पिढीच्या सवयीचाच भाग तर तो होणार नाही ना.! याचीच अधिक काळजी वाटते. आमच्या बाजूला असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये सत्याचा अंश फार कमी टिकला आहे. त्यामुळं तुझी सत्याग्रहाची कृती आम्हाला कितपत पटणार..? सत्य जीवनात आणल्याशिवाय त्याचा आग्रह धरण्याची ईच्छाशक्ती आमच्यात कशी निर्माण होणार..? मी मान्य करतो की तुझा सत्याप्रतिचा आग्रह हा मुख्यतः वैयक्तिक नसून सामाजिक होता. तरीही जे स्व आचरणात नाही त्याला सामाजिक शक्तीच्या रुपानं कस उभं करता येणार..?
सत्याग्रहामधून जी आत्मिक शक्ती तू स्वातंत्र्य लढ्यासाठी निर्माण केली ती खरोखरच असामान्य होती. मी चुकीचा नाही नव्हे मी बरोबरच आहे हा आत्मविश्वासच त्या सामान्य माणसाला साम्राज्यशाही शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी प्रभावित करीत होता. सत्याग्रहाच्या मार्गाने लाखो सामान्य भारतीयांना एकत्र जोडण्याचा आणि त्यांचं एका अर्थाने अध्यात्मिक परिवर्तन करण्याचं कार्य जगाच्या इतिहासात दुसरीकडं झालेलं नाही.
आत्मिक शुद्धीसाठी तू उपोषणाचा मार्ग वापरला. अर्थात प्रत्येक उपोषणामागे तुझा काहीतरी आग्रह होताच.अनेकदा याच उपोषणाच्या मार्गाने तू इंग्रजांच अन्याय करणार धोरण त्यांना बदलवण्यास भाग पाडलं. उपोषणाचा मार्ग त्यांच्याच विरुद्ध उपयोगी पडतो ज्यांना तुमची काळजी वाटत असते. उपोषणाद्वारे सुद्धा शत्रूशी प्रतिकारच करायचा असतो मात्र यामध्ये शत्रूबद्दल कोणतीही वाईट इच्छा मनात ठेवून तो प्रतिकार करायचा नसतो तर शत्रूपक्षाच मन वळवण्याचा मुख्य प्रयत्न यामधून केला जातो.तुझा उपोषणाचा मार्ग यशस्वी होऊ शकला कारण लाखो सामान्य भारतीयांचा तुला पाठिंबा होता. त्यांनी तुझं नेतृत्वही मान्य केलं होतं. त्यामुळंच तू उपोषण सुरू केलं की त्यांना तुझी जास्त काळजी वाटत असे. उपोषणाचे दिवस जसजसे वाढत जात तसतसे लोकांमधील चिंता वाढत होती या चिंतेमधूनच मग असंतोष निर्माण होत होता. हाच लोकांचा असंतोष तीव्र होऊन त्याच रूपांतर क्रांतिकारी चळवळीत होऊ नये याची इंग्रजांना भीती वाटत असे.त्यामुळं त्यांना तुझ्या मागण्या मान्यच कराव्या लागत.
माणसाच्या पोटात काहीच नसल्यावर त्याला ईश्वराची आठवण होते. त्याला झालेल्या त्रासामुळे ईश्वरावरची श्रद्धा अधिक दृढ होते. त्यामधूनच आपल्या तत्वाला धरून राहण्याचं सामर्थ्य त्याच्यात निर्माण होत. अशीही उपोषणामागील तुझी भूमिका असावी असं मला वाटत. आज आमच्यामध्येही उपोषण करणारे काही अण्णा हजारे निर्माण होत असले तरी त्यांना दीर्घकाळ आपल्या मार्गाला पकडून ठेवणे जमलेले नाही. आमच्या नेहमीच्या आयुष्यातही आम्ही अनेकदा उपवास करतो मात्र त्या दिवशी आम्ही फक्त जरा वेगळं अन्न ग्रहण करत असतो आणि बहुदा ते इतर दिवसांपेक्षा जास्तच असतं. आमच्यातल्या आत्मिक शक्तीचा त्यानं काहीच विकास होत नाही.
गांधी आजच्या काळात तुला समजून घेण्याची जास्त आवश्यकता वाटते. मानवी जीवनामध्ये परिवर्तन आवश्यक असले तरी ते परिवर्तन तलवारीच्या जोरावर होण्यापेक्षा तत्वांच्या जोरावर झालं तर ते अधिक यथार्थ ठरेल. दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चाललेल्या समाजाला अहिंसेचा मार्ग दिशादर्शक ठरू शकतो. कारण आक्रमकतेमधून उद्भवणारा विध्वंस माणसाच्या समस्या अजूनच वाढवून ठेवतो. याउलट अहिंसेच्या मार्गाने मानवी समस्या हळूहळू कमीच होणार आहेत. आणि परस्पर प्रेमभाव वाढण्यासाठी त्याने मदतच होईल. सत्याग्रहामधून सामाजिक, आर्थिक, राजकीय या सगळ्याच पातळीवर पारदर्शकता निर्माण होईल. या तुझ्या सत्याग्रहाची राजकीय जीवनात आज फार आवश्यकता वाटते. सार्वजनिक उपोषणाची जरी आज गरज भासत नसली तरी वैयक्तिक जीवनात उपवासाने निर्माण होणारी आंतरिक शक्ती आज उपयोगी पडू शकेन.
तू शस्त्र विरहित प्रतिकार करण्यासाठी आणि आपला विरोध दर्शवण्यासाठी असहकार आणि सविनय कायदेभंग यांसारखे विधायक शस्त्र जगाला दिले. यांसारख्या चळवळी मधून प्रत्येक सामान्य माणसालाही आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं शक्य झालं. आजच्या काळात मात्र कोणत्या गोष्टीला सहकार करावा आणि कोणत्या गोष्टीला असहकार करावा हेच बऱ्याचदा कळत नाही. असे असले तरीही मानवी हक्क टिकवण्यासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकानेच विचार आणि कृतीतून आपला सहकार दाखवण्याची गरज आहे. ज्यावेळी एखादी सोळा वर्षाची ग्रिटा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागतिक व्यासपीठावरून आम्हाला आवाहन करते तेव्हा आम्ही तिच्यासोबत ठामपणे उभं राहून तिला सहकार करायलाच हवा. मात्र प्रत्येक गोष्टीला आमचा हा सहकार योग्य ठरणार नाही. समाजात घडणाऱ्या असंख्य चुकीच्या गोष्टीला आमचा असहकार आळा घालू शकेल. अशावेळी केवळ घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन न करणं ही असहकाराची भूमिका न ठरता त्या गोष्टीला ठामपणे विरोध करून ती संपवण्यासाठी प्रयत्न करणं हाच खरा असहकार ठरणार आहे. आज राजकीय क्षेत्रातसुद्धा ज्यावेळी कश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला पाहून आमचा केरळमधील सर्वोच्च अधिकारी कन्नन गोपीनाथन सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आपला राजीनामा देतो त्यावेळी तुमच्या असहकार चळवळीत अनेकांनी आपला वकिली व्यवसाय सोडल्याची सहजच आठवण होते. यावरून तुमच्याकडून काहीतरी आम्ही नक्कीच शिकलो आहोत ही गोष्ट समाधानकारक वाटत राहते.
तुमचा सविनय कायदेभंगाचा मार्गही आजच्या परिस्थितीत लाभदायक ठरू शकतो. आज समाजात लोकांना कायदे पाळणं शिकवण्याची जास्त आवश्यकता असली तरीही प्रत्येकवेळीच ते कायदे पालन योग्य ठरणारं नाही. आज अनेकदा कायद्याचा गैरवापर करून काळ्या गोष्टी पांढऱ्या करून घेतल्या जातात. त्याच कायद्याने वैचारिक आणि राजकीय विरोधकांना संपवण्याचं काम केलं जातं .सत्ताधारी स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तसे कायदे करून समाजाची एकता तोडणार असतील किंवा अश्या कायद्यांनी समाजात विषमता निर्माण होणार असेल तर ते कायदे पाळण्याचं आमच्यावर बंधन असणार नाही. अशावेळी मग सविनय कायदेभंगाचा मार्ग आम्ही स्वीकारायला हवा.
तुमच्या वेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे अनेकजण होते. काही सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाणारे होते तर काहींना समाजवादाचा मार्ग अधिक योग्य वाटत होता. तुमच्या विचारांहून यांचे विचार भिन्न असले तरीही तुम्ही त्यांचा कधी तिरस्कार केला नाही. कारण तेही देशासाठीच लढणारे आहेत याची जाणीव तुम्हाला होती. खरतरं तुम्ही म्हणजे या सगळ्या भिन्न विचारांना एका जागी पकडून ठेवणारे केंद्रबिंदूच होता. कारण तुमच्या मृत्यूनंतर ते एकत्र राहू शकलेले नाही. या तुमच्या भूमिकेतला गांधी आम्ही आमच्यामध्ये उतरवण्याची आज सर्वाधिक जास्त जरूरी आहे. कदाचित सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा गांधी आमच्यामध्ये थोडा जरी उतरला तरी केवळ वैचारिक मतभिन्नता आहे म्हणून अनेक दाभोळकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांना आपला जीव गमवावा लागणार नाही.
जागतिकीकरणाच्या या काळात मानवाने विज्ञानाच्या मदतीने बरीच प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाचा विकास साधत त्याने स्वतःचे कष्ट अजूनच कमी केले आहेत. मात्र दिवसेंदिवस मशिणीकरण होत चाललेल्या या जगात माणसाच्या भावना मारल्या जात आहेत. भौतिक गोष्टी जरी त्याने मिळवल्या असल्या तरी मानसिक शांतता तो गमावून बसला आहे. अशावेळी कदाचित तुझी प्रार्थना त्याला शांतता प्रदान करू शकेल. शहरीकरणाच्या विकासाबरोबर तुझी ग्रामोद्योगाची संकल्पनाही आम्ही लक्षात घ्यायला हवी. तुझ्या चरखा- खादीसारख्या उद्योगातून स्वावलंबनाचे धडे आम्ही घ्यायला हवे. समाजामधील उपेक्षित व शोषित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुझा सर्वोदयाचा मार्ग समजून घेणे गरजेचा आहे. या तुझ्या अनेक गोष्टीमधूनच जगात आर्थिक- सामाजिक संतुलन साधले जाऊ शकेल. आज आम्ही पूर्णपणे चुकीचे नसुही कदाचित पण आम्हाला अधिक बरोबर होण्यासाठी तुझा विचार करायलाच हवा. तुझ्यासारखा दुसरा गांधी जन्माला यावा अशी इच्छा मी करणार नाही. कारण त्याचा आज जन्म घेतल्यानं तो आजच्या काळात कितपत योग्य ठरू शकेल ते मला माहित नाही. पण खऱ्या गांधीला आम्ही आमच्या प्रत्येकामध्ये आजच्या काळाला अनुसरून एक नवीन जन्म देऊ शकलो तर आमचंच भविष्य अधिक प्रकाशमय होईल यात शंका नाही. आणि कदाचित भविष्यातल्या पिढीला गांधी कोण होता असा प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही.

अनिकेत लखपती

[ लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए.(प्रथम).वर्षाचे विद्यार्थी आहेत ]

मूल्य ₹ 80
मैत्री पब्लिकेशन, पुुणे
संपर्क : 8369666057

One comment

Leave a Reply