३७० लागू करताना किंवा ते हटविताना काश्मीरी जनतेचा विश्वासघातच करण्यात आला आहे

काश्मीर ही एक राजकीय समस्या आहे.काश्मीर भारताचा “अविभाज्य” भाग हा काश्मिरी लोकांची फसवणूक करून निर्माण केला आहे. काश्मीरमधील आजचा सुशिक्षित तरूणांना याची चांगलीच समज आहे आणि त्याचमूळे काश्मीर मधील 20-22 वर्षांचे तरूण देखील हातात बंदुक घेत, स्वतःच्या शरीराला स्फोटके बांधून आपला जीव देत आहेत व इतरांचाही घेत आहेत. कश्मिरच्या या जमिनीचा तुकड्यासाठी आजपर्यंत लाखो निष्पाप मारले गेले आहेत.यासाठी जेवढा भारत देश जबाबदार आहे तेवढाच पाकिस्तानही आहे.
काश्मीर हा ना भारताचा अविभाज्य भाग होता ना पाकिस्तानचा,काश्मिरी लोकांची संस्कृती ही पाकिस्तानी मुस्लिम व भारतीय हिंदू या दोघांपेक्षा वेगळी होती व आहे. आज भारत पाकिस्तान दोन्ही देश काश्मीरवरती आपला हक्क सांगत आहेत.काश्मीर हा मुस्लिम बहुसंख्य असल्याने फाळणीचा वेळेपासूनच पाकिस्तान त्यावर आपला हक्क सांगत आला आहे. 1971 चा युद्धातील आपल्या नामुष्कीनंतर पाकिस्तानने पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद देखील पोसला होता. त्याचप्रमाणे आज काश्मीरी फुटिरवाद्यांना नी दहशदवाद्यांना देखील पाकिस्तान मदत करत आहे.भारत देखील काश्मीर हा हाजारों वर्षांपासून भारत भुमीचाच भाग आहे हा युक्तिवाद देत काश्मीरवरील आपला हक्क दाखवत आहे.

भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश आज काश्मीर वरील हक्क सोडण्यास तयार नाहीत.
पण काश्मीरचा राजकीय इतिहास अभ्यासला तर काश्मिरी लोकांचा स्वातंत्र्यची मागणी फार जुनीच आहे. काश्मीर “स्वातंत्र्याची ” मागणी ही भारत व पाकिस्तान हे दोन देश जन्माला येण्याचा आधी पासुनच होत आली आहे. त्याकाळी सत्तेत असणारा हिंदू राजा गुलाब सिंग याने काश्मिरचा हा भूभाग ब्रिटिशांकडून विकत घेतला होता. या गुलाब सिंगने तेथील मुस्लीमांवर अतिरेकी कर लावले, त्यांना गुलाम देखील त्याने बनवल होत,राजाला भेटण्यासाठी 1 रुपयांचा कर देखील द्यावा लागत.या क्रूर राजाचा विरोधात सगळ्यात पहिला जनाक्रोश काश्मीरमधे 1931 मधेच निर्माण झाला होता. तो चिरडून टाकण्यासाठी गुलाब सिंगने त्याचा सैन्याचा वापर करत 21 मुस्लिम प्रदर्शनकारींच्या कत्तली केल्या. पुढे स्वातंत्र्यनंतर हरीसिंग काश्मीरला घेऊन भारतात सामिल होईल या भितीने कश्मिरीमधील लोकांनी त्याचा विरोधात हिंसक बंड केले. तो चिरडून टाकत असताना 2 लाख काश्मीरी लोक मारले गेले. 
पुढे पंडित नेहरूंनी लोकशाही मार्गाने निवडुण दिलेले त्याकाळचे काश्मीरचे पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांना देखील देशद्रोही ठरवत तरूंगात डांबून काश्मिरी जनतेला दिलेला “जनमताचा” आपला शब्द न पाळता, सर्वसामान्य जनतेचा विचार लक्षात न घेताच 1950 मध्ये Article 370 संविधानात घुसवून काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग करून घेतले.”नेहरूंमूळेच काश्मीर भारतात आहे” या फसवणूकीला आजही देशात अभिमानाने मिरवल जात.


1987 चा निवडणुकांमध्ये भारतीय स्टेटकडून करण्यात आलेल्या काश्मिरी जनतेचा फसवणूकीचा विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर देखिल अमानुष गोळीबार करून शेकडोंची हत्या भारतीय स्टेटने केली आहे.काश्मिरी लोकांचा Right to Self Determination नाकारणे, दिल्लीतील राज्यकर्त्यांनी कलम 370 हळूहळू कमजोर करत जाणे, भारतीय स्टेटने आपल्या सैनिकी शक्तीचा अतिरेकी वापर करणे याचमुळे काश्मिरी सुशिक्षित तरूणांचा मनात भारतीय स्टेटच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे.खरतर 1987 याच गोळीबाराचा घटने नंतर भारतीय स्टेट विरोधात लढण्यासाठी काश्मिरी तरुणांनी हातात बंदुक घेत दहशदवादाचा मार्ग स्विकारला. भारतीय स्टेटसाठी हे बंदूकधारी तरूण दहशतवादी आहेत तर काश्मीरी लोकांसाठी स्वातंत्र्य सैनिक. बंदूकधारी फुटीरवादी बुहारन वानीची भारतीय सेनेने केलेल्या हत्येनंतर त्याचा अंत्यविधीतसाठी जमलेली काश्मीरी लोकांची गर्दी नी काश्मीरी जनतेचा आ क्रोश जगाच्या समोर येउ नये म्हणून अफजल गुरूचा मृतदेह त्याचा कुटुंबाला भारत सरकारने न देणे या दोन्ही घटना हेच स्पष्ट करत आहेत कि या बंदूकधारी फुटिरवाद्यांनाही काश्मीरी जनतेकडून प्रचंड समर्थन मिळत आहे. 
काश्मीरमधील जनतेचा मनात भारतीय स्टेट विरोधात खुप संताप आक्रोश आहे. असंतोष घुमत असलेल्या काश्मीर खोर्यात 1996 चा निवडणुकांमध्ये 10% चा आसपास तर 2004-09 चा लोकसभा निवडणुकांमध्ये 30% चाच आसपास मतदानाच प्रमाण राहिल आहे. हे प्रमाण 68% वरून कमी कमी होत 2018 चा स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांमध्ये आज फक्त 3% तर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये मधे 7% च राहिल आहे. या आकड्यावरूनही कश्मीरी जनतेचा मनातील भारतीय स्टेटविरोधात असलेला संताप तूमचा लक्षात येईल. 


भारताप्रमाणेच पाकिस्तानव्याप्त काश्मीर मधील कश्मीरी देखील आपल्या स्वातंत्र्यची मागणी आजही करत आहेत हे कसे विसरता येईल? पाकव्याप्त काश्मीरमधील फुटीरतावाद पाकिस्तान आपल्या सैन्याचा वापर करुन अमानुषपणे चिरडवूण टाकत आहे. बलूचिस्तानात हजारो फुटीरवादी कश्मीरी लोकांचा कब्री पाकिस्तानी सैन्याने खोदल्या असल्याच बलोच नेते बोलत असतात.भारतातही कमी अधिक प्रमाणात तेच घडत आहे.पण हे सत्य वास्तव स्विकारण्याची हिंमत आज भारतात कुणीही दाखवत नाही. 
काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आजपर्यंत लाखो निष्पाप मारले गेले आणि याला जबाबदार भारतीय स्टेट सुद्धा आहे अस परखड सत्य मांडणारे विचारवंत भारतात सापडणे हे विरळच आहे.भारतात देशभक्तीपुढे सगळेच लाचार दिसतात.पश्चिमेकडचे विचारवंत सत्यासाठी, व्यक्तिस्वातंत्र्यसाठी स्टेटचा अनैतिक कुकृत्यां विरोधात बोलत लिहीत स्वतःफाशीवरती गेले आहेत.त्यामुळेच पश्चिमेकडे आज कुठ शांती व समृद्धी नांदते आहे.भारतात मात्र स्वतःला पुरोगामी लिबरल फ्री थिंकर समजणारे विचारवंत देखील देशभक्तीपुढे पंगु दिसतात म्हणूनच राज्यकर्त्यांनी केलेल्या अनैतिक कुकृत्यांच देखील देशभक्तीचा नावाखाली समर्थन केल जात.स्टेट विरोधात लिहण्या बोलण्याची,स्टेट विरोधात पंगा घेण्याची हिंमत भारतीय विचारवंतांचात नाही.उलट भारताने काश्मीरी जनतेला दिलेला जनमताचा शब्द का पाळला नाही याला अतार्किक कारण देत भारतीय स्टेटकडून करण्यात आलेल्या काश्मिरी जनतेचा फसवणुकी समर्थनच ते करत असतात. उदाहरणार्थ शेषराव मोरेंसारखे नावजलेले मराठी विचारवंतही “नेहररूंनी काश्मीरमध्ये जनमत घेण्यास नकार दिला कारण जर काश्मीर भारतात राहिला नसता तर त्याचे दुष्परिणाम म्हणून भारतीय मुख्य भूमीतील मुस्लीमांविरोधात दंगली भडकण्यात झाला असता” असा अतार्किक युक्तिवाद जेंव्हा ते देत असतात तेंव्हा भारतीय स्टेटने कश्मीरी जनतेचा केलेल्या फसवणुकीच एकप्रकारे ते समर्थनच करत असतात.स्टेट विरोधात लिहण्या बोलण्याची, सत्य स्पष्टपणे मांडण्याची भारतीय विचारवंताचात हिंमत नाही.हिंदू मुस्लीम दंगली आजही देशभरात होतच आहेत. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांविरूद्ध देखील झाली आहेत. एकूण आज काश्मिरीमध्ये होणार आर्थिक नी मानवी संसाधनांचे नुकसान याचा विचार करता काश्मिरी लोकांना आपण दिलेले जनमत चाचणीचे शब्द पाळणे हेच भारत देशाचा जास्त हिताच ठरेल! नाहीतर हिंसा ही कायम होतच राहणार,राजकारणी सोडले तर फायदा कुणाचाही नाही. 
अमेरिकन पॉलिटिकल थिरीस्ट मूरे रूथबार्ड आपल्या Anatomy of State पुस्तकात म्हणतात “स्टेटला आपला प्रपोगंडा रेटत ठेवण्यासाठी स्टेटच समर्थन करणार्‍या विचारवंतांची गरज ही स्टेटचा बाजूने जनमत तयार करण्यासाठी असते.” भारतीय विचारवंतांसाठी राज्यकर्ते त्यांनी घेतलेले निर्णय,सैन्य,एकुणच शासनयंत्रणा म्हणजेच “देश व देशभक्ती” आहे.मग राज्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय कितीही अतार्किक,अनैतिक,मानवी समजाला कंलक फासणारे देखील का नाही असोत त्याच समर्थन करणारे या देशात सगळेच दिसतील.
भाजप सरकारने हुकुमशाही पद्धतीने कश्मीरी जनतेला विश्वासात न घेताच व भारतीय संविधान डावलून कलम 370 हटविण्याचा घेतलेल्या निर्णयाच देखील स्वागत स्वतःला लिबरल पुरोगामी समजणारे भारतीय विचारवंत करत आहेत.गांधी स्वतःला अराजकतावादी म्हणवून घेत.आज देशात गांधींजींच नाव घेणारे विचारवंतही गांधींचा विचारांशी अप्रामाणिक तर स्टेटचाप्रपोगंडाला नावाजणारे स्टेटशी प्रामाणिक असणारे तर जनतेशी अप्रामाणिक दिसत आहेत. 

  • सागर वाघमारे
  • लेखक हे युवा अभ्यासक आणि राजकीय घडामोडीचे विश्लेषक आहेत

Leave a Reply