रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देताना पुरस्कार समिती म्हणते…

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात गेल्या काही वर्षात स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचा अवकाश आक्रसत असल्याचे आपल्याला दिसत आहे.नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावाने बदलत चाललेले माध्यमांचे स्वरुप, माहिती आणि मते यांचे वाढते बाजारीकरण,सरकारची वाढती बंधने आणि सर्वात चिंताजनक म्हणजे लोकसंमत एकाधिकारशाही तसेच धार्मिक,वांशिक,आणि मूलतत्त्ववादी राष्ट्रवाद यामुळे विभाजनवाद,असहिष्णुता आणि हिंसा यांना आलेला भर असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. टेलिव्हिजन पत्रकार रविशकुमार हे या साऱ्या धोक्यांविरुद्धचा एक लक्षणीय आवाज बनले आहेत. पूर्वोत्तर भारतातील हिंदीभाषिक बिहारच्या जितवारपूर नावाच्या खेड्यात ते लहानाचे मोठे झाले.दिल्ली विद्यापीठातून इतिहास आणि पब्लिक अफेअर्स या आपल्या त्यावेळच्या आवडीच्या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.1996 मध्ये ते न्यू दिल्ली टेलिव्हिजन नेटवर्क (NDTV) या त्यावेळच्या अग्रेसर टी व्ही चॅनेलमध्ये रुजू झाले. अगदी सामान्य वार्ताहर म्हणून सुरुवात करुन ते प्रगती करत राहिले.देशातील बेचाळीस कोटींहून अधिक हिंदी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी NDTV ने आपले स्वतंत्र चॅनेल सुरु केले तेव्हा रविशकुमार यांना Prime Time नावाचा आपला स्वतःचा स्वतंत्र कार्यक्रम मिळाला.आज NDTV चे वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून काम करणारे रविशकुमार देशातील सर्वात प्रभावी पत्रकारांपैकी एक बनले आहेत. ज्या प्रकारच्या पत्रकारितेचे रविशकुमार प्रतिनिधी बनले आहेत त्यातूनच त्यांचे वेगळेपण प्रामुख्याने दिसून येते. माध्यमातील वातावरण राज्यसंस्थेच्या अवाजवी हस्तक्षेपाने धोक्यात आलेले आहे.पक्षपाती अंध राष्ट्राभिमानी, ट्रोल्स आणि तद्दन खोट्या बातम्यांचे प्रसारक यांच्यामुळे विखारी झालेले आहे. बाजारातील मानांकनाच्या स्पर्धेमुळे माध्यमात झळकते व्यक्तित्व, लोकांची आवड आणि लोकांच्या भावना कुरवाळणारा सनसनाटीपणा यांनाच सर्वाधिक महत्त्व प्राप्त होत आहे. अशा वेळी रविश मात्र सौम्य,समतोल आणि वस्तुनिष्ठ वार्तांकनाच्या व्यावसायिक मूल्यांनाच प्रत्यक्षात अग्रस्थान मिळाले पाहिजे असा जोरदार आग्रह धरत राहिले आहेत.त्यांचा NDTV वरील प्राईम टाईम हा कार्यक्रम समाजातील ज्वलंत प्रश्न घेतो,त्यावर गांभीर्याने संशोधन करतो आणि या समस्या वीसवीस कार्यक्रम होतील इतक्या सांगोपांग पद्धतीने चर्चेला घेतो.हा कार्यक्रम सामान्य माणसाच्या प्रत्यक्ष जीवनातील नीट उघडकीस न आलेल्या समस्या हाताळतो. मैलावाहू कामगारांच्या ,हाताने रिक्षा ओढणाऱ्या मजुरांच्या,सरकारी नोकरांच्या दुरावस्थेच्या, देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या ,अपुरे अर्थसहाय्य मिळणाऱ्या सरकारी शिक्षणसंस्थांच्या,रेल्वेच्या अकार्यक्षम कारभाराच्या या समस्या असतात. रविश गरीबांशी सहज संवाद साधतात,सर्वदूर प्रवास करतात आणि समाज माध्यमांद्वाराही आपल्या प्रेक्षकांशी संपर्क राखत त्याचा वापर त्यांच्याकडून आपल्या कार्यक्रमाला विषय मिळवण्यासाठी करतात. जनाधिष्ठित पत्रकारितेचा वसा घेतला असल्याने आपल्या वार्ताकक्षाला ते लोकांचा वार्ताकक्ष म्हणतात. एखादी नाट्यपूर्ण क्लृप्ती अधिक परिणामकारक ठरेल असे वाटले तर ती करणे रविश टाळत नाहीत. टीव्ही वरील चर्चा किती खालच्या दर्जाची होत आहे हे नाट्यपूर्ण रीत्या दाखवण्यासाठी 2016 साली असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी केला.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रविशकुमार आताचे टी व्ही कार्यक्रम म्हणजे नुसत्या कर्कश ,कठोर आरडाओरडीने भरलेले अंधारविश्व बनले आहे हे प्रेक्षकांना सांगताना दिसतात.आणि मग पडदा पूर्ण अंधारा होतो.त्या अंधारात तासभर विविध टीव्ही कार्यक्रमाचे,त्यातील छोट्या मुलाखती,चर्चा यांचे एकावर एक कुरघोडी करणारे,कर्कश आवाज कानावर पडत राहतात. विखारी धमक्या,उन्मादी गोंगाट, शत्रूच्या नरडीचा घोट घेऊ पाहणाऱ्या जमावाचे चित्कार असे वेगवेगळे आवाज नुसते ऐकत राहतात प्रेक्षक. स्वत:चे भावनाविकार मध्ये न येऊ देता आपले म्हणणे नीट पोहोचवण्यावर रविशकुमार यांचा नेहमीच भर असतो.

चर्चेचे संचालन करताना रविश शांत परंतु भेदक असतात.संबंधित विषयाची सांगोपांग माहिती त्यांच्यापाशी असते. ते पाहुण्यांवर कुरघोडी करायला जात नाहीत.आपले म्हणणे नीट मांडण्याची पुरेशी संधी ते त्यांना देतात.मात्र अत्युच्च अधिकाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव करुन द्यायला, माध्यमांवर आणि देशातील सार्वजनिक चर्चेच्या स्तरावर टीका करायला ते कचरत नाहीत. यामुळेच या किंवा त्या बाजूच्या माथेफिरु पक्षपाती लोकांकडून त्यांना त्रास आणि धमक्या दिल्या जातात.या साऱ्या संकटांना आणि संतापाला तोंड देत दोषदर्शी आणि सामाजिक दृष्ट्या जबाबदार अशा माध्यमाचा अवकाश सुरक्षित राखून त्याचा विस्तार करण्याचे आपले काम रविश सातत्याने करत आहेत.लोकांची सेवा हीच केंद्रस्थानी असलेल्या पत्रकारितेवर त्यांची दृढ श्रद्धा आहे म्हणून रविशनी पत्रकार कुणाला म्हणावे हे अगदी सोप्या शब्दात थोडक्यात सांगितलंय,
” तुम्ही लोकांचा आवाज बनला असाल तरच तुम्ही पत्रकार आहात.”

2019 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी रविश कुमार यांची निवड करुन विश्वस्त निधीचे संचालक अत्युच्च दर्जाच्या व्यावसायिक, नीतिमान पत्रकारितेशी असलेल्या त्यांच्या अविचल निष्ठेचा; सत्य, स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा यांच्या बाजूने सतत उभे राहताना त्यांनी दाखवलेल्या नैतिक धैर्याचा आणि ज्यांना आवाज नाही त्यांना सन्मानपूर्ण आणि खणखणीत आवाज देण्याने, धैर्याने पण सौम्यपणे सत्तेला सत्य सुनावण्यानेच लोकशाही व्यवस्था प्रगतीपथावर नेण्याच्या आपल्या उदात्त ध्येयाची पूर्ती पत्रकारिता करते यावरील त्यांच्या विवेकी विश्वासाचा सन्मान करत आहे.

(A quick traslation by Anant Ghotgalkar)

Leave a Reply