आत्महत्याग्रस्त समाज आणि आपण

शेतकरी आत्महत्या होत असतांना आता कार्पोरेट क्षेत्रातील उद्योजक देखील आत्महत्या करायला लागले सुप्रसिद्ध कॅफे कॉफी डे CCD चे प्रवर्तक व्ही जी सिद्धार्थ यांनी केलेल्या आत्महत्येमुळे आत्महत्या हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. या आत्महत्येची माध्यमातून चर्चा सुरु आहे. संबंधित तपास यंत्रणा आपला तपास करतीलच प्रत्येक आत्महत्येनंतर ती तांत्रिक बाब सुरु होते.आत्महत्या कुणाची का असेना ती दुखद घटना असते. समाजात काही काळ चर्चा होते आणि परत शांतता दुसरी अशीच आत्महत्या होईपर्यंत. व्यक्ती जेवढा प्रसिद्ध तेवढाच चर्चेची व्याप्ती जास्त एवढेच.

विविध स्तरांतील लोकांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे आत्महत्याग्रस्त समाज अशी आपली सामाजिक ओळख ठळक होत आहे हे चिंताजनक वाटते. 2012 मधे भारत सरकारने आत्महत्या संदर्भातील IPC मधील आत्महत्या हा गुन्हा ठरवणारे कलम रद्द केले ही मोठी दिलासादायक बाब होती. आत्महत्येचा प्रयत्न करणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता त्या व्यक्ती च्या मानसिक सक्षमीकरणाचे प्रयत्न व्हावेत असा उद्देश त्या बदलामागे होता. आरोग्य मंत्रालयाने हा मुद्दा ऐरणीवर घेतला होता.

समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर आत्महत्या सामाजिक तथ्य आहे. आत्महत्या ही सामाजिक एकीकरणाच्या अभावाचा परिणाम आहे असे मानले जाते. संघटीत शक्तीशाली समाज आणि व्यवस्था व्यक्ती वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे व्यवस्थात्मक दबाव व्यक्ती ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो असे दिसते.
याचाच अर्थ व्यक्ती आणि समाजाचे संतुलन बिघडले की व्यक्ती संपत जातो. सामाजिक व्यवस्थांचा दबाव तर व्यक्ती च्या आत्महत्येमागे असल्याने आज आपण समाज म्हणून कुठल्या पातळीवर जगत आहोत हे वाढत्या आत्महत्यांवरून लक्षात येते.

आत्महत्यांचा मागे वरवर वैयक्तिक कारणे दिसत असली तरीही व्यवस्थात्मक दबावाचाच व्यक्ती बळी ठरतो आहे हे विविध स्तरांमधील आत्महत्यांमधून सिद्ध होते.

रजिस्ट्रार जनरल आँफ इंडिया च्या पुढाकाराने भारतातील आत्महत्यांचा शास्त्रीय अभ्यास लँन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकाने करून आँगस्ट 2012 ला प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारतात दरवर्षी 2 लाख लोकांच्या आत्महत्या होतात असा निष्कर्ष होता आता 2019 ला आपण जर नँशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो चा अहवाल पाहिला तर ही संख्या निश्चितच वाढलेली दिसेल. अशी सामाजिक परिस्थिती गंभीर आहे असे लँन्सेट च्या अहवालानुसार दिसते.
लँन्सेट च्या अहवालानुसार आत्महत्यांमुळे होणार्या म्रुत्युची संख्या एचआयव्ही ने होणाऱ्या म्रुत्यु पेक्षा दुप्पट आहे.

लँन्सेट या वैद्यकीय क्षेत्रातील जगविख्यात नियकालीचे शास्त्रीय अध्ययन वाचले तर आत्महत्या ही बाब खूपच चिंताजनक आहे.

आत्महत्येच्या शास्त्रीय अभ्यासानुसार जैव- मनो- सामाजिक अशा तीन प्रकारच्या कारणांच्या एकत्रीकरणाच्या परीणामांमुळे एखाद्या व्यक्ती च्या मनात आत्महत्येचा विचार येतो.
मेंदू मधील सिरोटीन या जैव घटकाची कमतरता आत्महत्येचा विचार करणार्या माणसाच्या मनात असते. काही प्रमाणात आनुवंशिकता देखील कारणीभूत असते हे शास्त्रीय सत्य आहे.

मानसिक अस्वस्थता, नैराश्य, एकाकीपण, अस्थिर स्वप्रतीमा, अशी अनेक कारणे आणि त्यामागील आणखी जगण्याच्या संघर्षातील अनेक कारणे आत्महत्येमागे असतात.

भारतीय समाजात तथाकथित प्रतिष्ठेपायी किंवा अज्ञानामुळे किंवा गैरसमजामुळे मानसिक अस्वस्थता लपविण्यासाठी लोक आटापिटा करतांना दिसतात. साधा ताप आला खरचटले तरी दवाखान्यात पळणारे लोक मानसिक अस्वस्थता लपवतात. आपण समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञाकडे गेलो तर लोक आपल्याला पागल समजतील ही भीती लोकांच्या मनात असल्याने तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावाखाली एकाकीपणे कुढत बसतात. तथाकथित प्रतिष्ठेपायी व्यक्त होणे टाळतात. व्यक्त न होऊ शकल्याने व्यक्ती च्या मनावरील दडपण वाढत जाते.
असा माणूस एकाकी पडून नैराश्याने घेरला जातो अशा परिस्थितीत जास्त काळ राहिल्यास आत्महत्येची शक्यता वाढत जाते.
एकंदरीतच आत्महत्ये संदर्भात मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय जैवशास्रीय संशोधन खूप आहेत. तरीही आपण कुटुंब म्हणून समाज म्हणून शासन म्हणून व्यक्ती च्या मानसिक अस्वस्थतेची सुयोग्य दखल घेण्यात कमी पडतो.

आत्महत्येमुळे केवळ एक माणूस संपत नाही तर त्याचे कुटुंब आप्त संकटात सापडतात त्यांचे जगणे अस्थिर होते त्याचे कौटुंबिक सामाजिक परीणाम आपण पाहातच आहोत
आत्महत्या हा गंभीर बाब असतांना देखील जवळपास बहुसंख्य आत्महत्या प्रकरणात व्यक्ती ची अस्वस्थता लक्षात येऊनही स्वकियांनी दाखवलेली अनास्था दुर्लक्ष देखील व्यक्ती च्या आत्महत्येला अप्रत्यक्षपणे हातभार लावणारे ठरते. आपल्याला सर्व असूनही आपल्या अस्वस्थतेची कुणीही दखल घेत नाही आपण जगण्यासाठी अपात्र आहोत ही भावना व्यक्ती च्या मनात घर करून व्यक्ती आत्महत्येस कारणीभूत ठरते.

वाढत्या आत्महत्या ह्या मानसिक आणि समाजिक अस्वस्थतेच्या निर्देशांक आहेत. म्हणूनच समाज म्हणून आपण सजग आणि संवेदनशील राहणे गरजेचे आहे.
माणस हल्ली स्वतंत्र नाही तर एकाकी व्हायला लागली आहेत. ही आपली सामाजिक शोकांतिका आहे.

अशी आधारहिन एकाकी माणसे अविवेकी आणि नकारात्मक आधारात मोठ्या प्रमाणात अडकत आहेत नव्हे तसे भरपूर सापळे लागलेले दिसतात. मनस्वास्थ्यासाठी समुपदेशन व शास्त्रीय मार्गदर्शन न घेता नको त्या आभासी मार्गाने जात आहेत. हे सामाजिक दूरावस्थेचे लक्षण आहे.

माणसाला जगायला आधार हा लागतोच . एकाकी माणूस जगणे कठीणच असते. माणसे आपापल्या परीने आपापले आधार शोधत असतात अशा वेळेस आधाराच्या अनेक निसरड्या वाटा लागतात आणि माणसे फसतात. शास्त्रीय आणि विवेकी आधार निवडणे केव्हाही हितकारक पण अविवेकी आधारात फसून नंतर समुपदेशनासाठी येतात तेव्हा उशीर झालेला असतो तरीही शास्त्रीय समुपदेशनातून माणसे सक्षम होऊ शकतात हा माझा समुपदेशनातील अनुभव आहे.

आपण निवडलेला आधार जर अविवेकी, सदोष, फसवा असेल तर आपण सक्षम होण्याऐवजी आणखी कमकुवत आणि अस्वस्थ होत जातो आणि मूळ प्रश्न तसाच राहतो.
आपल्या कौटुंबिक ,सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक या संघटीत व्यवस्था जर व्यक्ती वर दबाव निर्माण करत असतील तर आत्महत्या ग्रस्त समाज ही आपली ओळख कायमच राहील. या सर्वच संघटीत व्यवस्थांनी व्यक्ती चे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती चे स्वातंत्र्य आणि जगण्यासाठी लागणारा स्वस्थ मुक्त अवकाश मान्य केला पाहिजे या व्यवस्था आणि व्यक्ती मधील संतुलन असणे अतिशय महत्त्वाचे आहे. आजची गरज आहे.
शेवटी जगण्याची तत्त्वज्ञान कितीही उदात्त असलीत तरीही त्यांचा कालसुसंगत व्यावहारीक जीवनाशी ताळमेळ जमलाच पाहिजे. व्यक्ती आणि समाजाचे ताळमेळ ठेवणारे मार्ग प्रशस्त करीत आनंददायी शाश्वत सम्रुद्ध समाजासाठी एकत्र येऊयात… संवेदनशील आणि संवादी राहुयात.

लोकमित्र संजय का. सोनटक्के


Leave a Reply