वचन साहित्य हि अशी काव्यात्मक अभिव्यक्ती आहे जी जात आणि लिंगभावाची समीक्षा करते -किशोर मोरे

युरोपियन इतिहासात मध्ययुगीन कालखंड ‘अंधारयुग’ म्हणून गणला गेला व अशीच शक्यता सर्वत्र असण्याची समज तयार झाली परंतु आशियातील सामाजिक आणि धार्मिक संरचनेमध्ये वेगवेगळे प्रयोग, बंड, वैचारिक घुसळण, जातीविरोधी समतेचा विचार प्रबोधनपूर्व काळातच आपल्याकडे झालेला दिसतो. आपल्याकडील इसवीसनापूर्वी पासून वेगवेगळ्या विचारधारा, धर्ममतं तेव्हाच्या वर्चस्वशाली असलेल्या वैदिक संस्कृती आणि त्यावर आधारीत सामाजिक संरचनेला आव्हान देत आली आहेत. त्यात बौद्ध, जैन, चार्वाक  इ. सोबत इतर विचार परंपराहि आहेतच. या प्राचीन इतिहासातील ब्राह्मणेतर परंपरांचा वारसा मध्ययुगीन काळातही विविध पंथ, संप्रदाय, संत वाङमय, शरण साहित्य, सुफ़ी तत्वज्ञान, वारकरी आणि महानुभाव परंपरा इ. नी जोमाने चालवला.

१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याने त्या सामाजिक संरचनेची म्हणजेच तेव्हाच्या जातिव्यवस्थेची कठोर समीक्षा केली. वचन साहित्य शिवशरणांनी अंगिकारल्यानंतर शरण साहित्य म्हणून ओळखले गेले. महात्मा बसवण्णा  मध्ययुगीन काळातील मोठे सामाजिक क्रांतिकारक ठरतात, त्यांनी मांडलेला ‘कायक वे कैलास ‘ हा सिद्धांत असोत व ‘दासोह’ असो त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांनी इतर शरणांना घेऊन ‘अनुभव मंडपा’च्या रूपाने केली आणि नवीन सामाजिक उन्नतीचे तत्वज्ञान वचन साहित्याचे रूपाने शरणांना दिले.

वचन साहित्याचा प्रभाव आजही जाणवतो तो त्यातील क्रांतिकारक आशयामुळे. वचन साहित्य हि अशी काव्यात्मक अभिव्यक्ती आहे जी जात आणि लिंगभावाची समीक्षा करते.  वचन साहित्याची निर्मिती तसेच लिंगायत तत्वज्ञानाची पायाभरणी अनुभव मंडपातील वैचारिक घुसळणीतून झाली. त्यामुळे पहिल्यांदा अनुभव मंडप लोकशाही मूल्यांची अंमलबजावणी करणारा वैचारिक आधार ठरला. अनुभव मंडपामध्ये सर्वांना सामान स्थान तर होतेच परंतु कुणालाही आपले मत मोकळेपणाने मांडण्याचा अधिकार होता. स्वयं बसवेश्वरांना अनुभव मंडपात झालेल्या  चर्चेमधून  आपल्या विचारांत बदल करावा लागला यावरुन अनुभव मंडपातील लोकशाही मूल्यांची प्रचिती आपल्याला येते. अनुभव मंडपात सहभागी होण्याच्या सर्वसाधारण अटी जरी आपण पहिल्या तरी या चर्चांचे ध्येयं उद्दिष्ट अगदी स्पष्टपणे उजागर होते. उदा. प्रत्येक व्यक्तीने आपल्या उपजीविकेसाठी काम, उद्योग, व्यवसाय म्हणजेच ‘कायक’ केलेच पाहिजे, प्रत्येक कायक हे पवित्र आणि समान दर्जाचे असते त्यामुळे त्यांत भेद करू नये, मंडपात शामिल होणाऱ्याने आपली जात तसेच स्री-पुरुष हा भेद करू नये , सर्व जाती आणि लिंगाचे लोक समान आहेत हि दृढ धारणा असली पाहिजे, कायकाद्वारे कमावलेलं धन आवश्यक गरजेपुरते ठेवून अतिरिक्त धन समाजासाठी  ‘दासोह’ रूपात दान करावे, संपूर्ण समाधान होईपर्यंत शरणाने कोणतेही मत मान्य करू नये इ.  हे सारे नियम अनुभव मंडपाच्या सभासदाने पाळलेच पाहिजे. या काही ठळक नियमावरून आपल्याला महात्मा बसवेश्वरांच्या लोकसहभागातील वैचारिक क्रांतीतून त्यांना नेमके काय अभिप्रेत होते याचा उलगडा होतो.      

अनुभव मंडपातील जे लिंगायत तत्वज्ञान आकाराला आले त्यातील महत्वाचे विवाद आणि वचनांचे संकलन प्रसादी महादेवय्या यांनी केले, जे ‘शून्य संपादने’ या ग्रंथनामाने ओळखले जाते. यात अल्लमप्रभु, बसवण्णा, चन्नबसवन्ना , अक्कमहादेवी आणि सिद्धरामेश्वर यांच्यातील प्रमुख चर्चा तसेच कल्याणनगरीचे माहात्म्य, परंपरा विरोध, माडीवाळ-माचीदेव आणि अल्लमप्रभूचा संवाद, ज्ञानाचा मार्ग, निशून्य: अवस्था, शरणाची उन्नत अवस्था इ. चा संदर्भ येतो . या व्यवस्थाविरोधी सामूहिक ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत सर्व जाती-धर्म-वर्ग-स्त्रियांचा सहभाग होता म्हणून बसवविचार आजच्या दृष्टिकोनातही तेवढाच सर्वसमावेशक आणि क्रांतिकारक आहे.

वचनकारांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार जरी केलेला असला असला तरी वचनांमध्ये त्यासाठी वेगवेगळ्या नाममुद्रा योजिल्या,  जसे. बसवण्णांनी ‘कुडलसंगमदेव’ , अल्लमप्रभूंनी ‘गुहेश्वरा’, अक्कमहादेवींनी ‘चन्नमल्लिकार्जुनदेवा’, अक्क नागम्मानीं ‘बसवण्णा प्रिय चन्नसंगमनाथ’, सिद्धरामेश्वरांनी ‘कपिलसिद्धमल्लय्या’ आणि चन्नबसवेश्वरांनी ‘कूडचन्नसंगमनाथ’ इ.     

अनुभव  मंडपातील आणि वचन साहित्य निर्मितीतील स्त्रियांचा सहभाग हा बसवविचारातील स्त्री-पुरुष समानतेचा कृतीशील कार्यक्रमाचा भाग म्हणूनच पाहता येतो. यात अक्कमहादेवी, नागम्मा, बोन्तेदेवी, काळव्व, मुक्तयाक्का , मोळीगे महादेवी, लिंगम्मा , नागलांबिके, गंगाम्बिका, कादिरे रामवा, अमुगे रायम्मा, अक्कमा  इ . वेगवेगळ्या जातीआधारित व्यवसायातील स्त्रियांचा सहभाग उल्लेखनीय आहे.  

महात्मा बसवण्णाच्या लिंगायत तत्वज्ञानाने मध्ययुगीन दक्खनमध्ये जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था विरोधी समतेची मांडणी केली. लिंगायत तत्वज्ञान नंतरच्या काळात सर्वदूर पसरल्याचे आणि तत्कालीन भक्ती परंपरेमध्ये क्रांतिकारी आशय पेरल्याचे दिसते. जे अब्राह्मणी समतेच्या अन्य परंपरांचा वारसा म्हणूनहि बघता येतो जो गौतम बुद्धापर्यंत मागे जातो ज्याचा उल्लेख या पुस्तिकेतील काही लेखात आला आहेच.  समतासूर्य बसवण्णा या पुस्तकांचे महत्व ऐतिहासिक दृष्टीने तर आहेच परंतु वर्तमानातील लिंगायत चळवळी संदर्भातहि महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाची ओळख सामान्य लिंगायत समाज तसेच लिंगायतेतर समतेची अभिलाशा आणि गरज जाणंनाऱ्या सर्वसामान्य समुदायास, कार्यकर्त्यास, उपयुक्त आहे.

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची, कार्याची ओळख होण्याच्या दृष्टीने या पुस्तिकेत आठ लेखांचा संग्रह करण्यात आला आहे, ज्यात अंबादास पाचंगेनी बसवेश्वरांची शिकवण आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर भाष्य केले, डॉ. सूर्यकांत घुगरे यांनी बसवेश्वरांचा समग्र समतावाद ज्यात गौतम बुद्ध, बसवेश्वर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतील सामान सुत्र मांडत समग्र समतावाद स्पष्ट केला,  बसवेन्द्र यांनी श्रमसंस्कृतीच्या निम्मिताने बसवेश्वरांचा ‘कायक’ सिद्धांत स्पष्ट केला आहे. डॉ. यशवंत मनोहर सरांनी बौद्ध आणि लिंगायत तत्वज्ञानातील साम्यस्थळे मांडली.  डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी बसव क्रांती समाजास पेलली का अशी प्रश्नार्थक सुरुवात करून अंतर्मुख करत कार्यप्रवण होण्याची अपेक्षा केली . प्रा. काशिनाथ उलगडे यांनी बसवेश्वरांचा ज्ञानाचा सिद्धांत स्पष्ट केला तर सुनंदा भद्रशेट्टे यांनी अनुभव मंडपातील आणि वचन साहित्यातील शिवशरणींच्या कार्याची ओळख करून दिली आणि अभिषेक देशमाने यांनी विस्तृतपणे महात्मा बसवेश्वर आणि लिंगायत तत्वज्ञाची ओळख करून दिली.  

या पुस्तिकेत  छापलेल्या एका पत्रकानुसार २०११ पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या समतावादी पंथ, संप्रदायानी वर्तमान ज्वलंत पर्यावरणाच्या प्रश्नावर, विषमतेवर, जात ,वर्ग, स्त्री-दास्य विरहित समाजाच्या निर्मितीसाठी संतांनी भूमिका घ्यावी या हेतूने विविध ठिकाणी सर्वधर्मीय-सर्वपंथीय सामाजिक परिषदांचे आयोजन करण्यात आले. ज्यात महानुभाव, वारकरी आणि लिंगायत या पंथ-संप्रदायांनी प्रत्यक्ष परिषदेचे आयोजन केले. समतासूर्य महात्मा बसवण्णा या पुस्तिकेच्या निमित्ताने सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक भूमिकेतून समतेची उर्मी जागृत व्हावी या अपेक्षेसह.

लेखक युवा अभ्यासक किशोर मोरे हे मुंबई विद्यापीठात इतिहास विषयाचे संशोधन विद्यार्धी आहेत.

किशोर मोरे ,मुंबई

(मैत्री पब्लिकेशन द्वारा प्रकाशित समतासूर्य महात्मा बसवण्णा ह्या पुस्तिकेची प्रस्तावना )

पुस्तिकेकरीता संपर्क -9284617081

Leave a Reply