लेखक असावेत असे ! माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे

गिरीश कर्नाड हे प्रथमतः मी ‘निशांत’ या चित्रपटात पाहिले होते.
सहज अभिनय आणि संवादफेक यातून हे गारुड निर्माण झाले ते कायम राहिले.
यांचे अभ्यासक्रमात लावलेले ‘हयवदन’ हे नाटक शिकवले.
‘मंथन’ या चित्रपटातून एक वेगळीच भूमिका त्यांनी साकारली होती.

त्यांचे आत्मचरित्र ‘खेळताखेळता आयुष्य’ हे काळजीपूर्वक वाचून काढले.

शाम बेनेगल, शबाना आझमी, नासिरुद्दीन शहा, ओम पुरी, स्मिता पाटील, मोहन आगासे हे त्या काळातले एक विलक्षण असे रसायन होते. समांतर सिनेमाने त्या काळात (१९८०’s) एक सांस्कृतिक क्रांतीच केली होती. अभिजन वर्गात एक सळसळ निर्माण केली होती.

नंतर हे कलाकार आपापल्या दिशेने काम करत राहिले. पण कर्नाड यांनी आपली वैचारिक बांधिलकी आणि त्यानुसार नाटक, सिनेमा आणि साहित्य या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान यात विसंगती नाही.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशात फोफावत चाललेल्या फासीवादाने ते त्रस्त झाले होते.
मनोहर ओक म्हणतात तसे:

लेखक कसे सापासारखे असतात
माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे

प्रागतिक चळवळीत व एकूणच मानवतावादाच्या बाजूने काम करणारे लेखक, कवी, कलाकार चित्रपट निर्माते, पत्रकार, राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे युवा कार्यकर्ते, वकील या सर्वांना “अब॔न नक्सल” नावाचे लेबल लावून त्यांना अटक करणे, त्यांच्यावर नाही नाही त्या केसीस घालून अडकवने हे सुरू झाले.

‘गुजरात फाईल्स’ या पुस्तकात तर अशा अनेक भयानक केसीसच्या व्यथा मांडल्या गेल्या आहेत.

गौरी लंकेश यांच्या पहिल्या स्मृतीदिनी

बंगलोर येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा कर्नाड यांची प्रकृती बरी नव्हती, तरीही ते या कार्यक्रमाला हजर होते. नाकातोंडातून त्यांच्या tubes होत्या; ते सरळ hospital मधूनच आले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या गळ्याभोवती एक विस्तव अडकवला होता आणि त्यावर लिहिले होते, “Yes I’m Urban Naxsal”

आज कर्नाड आपल्यात राहिले नाहीत पण हा विस्तव त्यांनी आपणांस दिलेला आहे.

आजचे सांस्कृतिक वातावरण अत्यंत भयाण आहे. आज पुर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. या तंत्रयुगात युवा पिढीला योग्य दिशा देणे आणि लोकशाही वाचवणे आवश्यक आहे. लोकशाही समाजवादासमोर म्हणून अनेक आव्हाने आहेत.
या कोंडलेपणाला वाट करुन द्यावे लागणार आहे. निराश होऊन चालणार नाही.
या लाटा आहेत सुप्त युवकांच्या मनात, देहात, रंध्रारंध्रात…

कोंडलेल्या वादळाच्या ह्या पाहा अनिवार लाटा
माणसासाठी उद्याच्या येथूनी निघतील वाटा
पांगळ्याच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू
नांगरु स्वप्ने उद्याची गर्द ही फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे येथुनी उठतील नेते
(बाबा आमटे)

गिरीश कर्नाड यांना भावपुर्ण श्रद्धांजली

-दीपक बोरगावे

Leave a Reply