मार्क्स अजून जीवंत आहे… आनंद विंगकर यांची कविता

नुमान जसा अजरामर
वारे जसे अविनाशी अवकाशात
तसा मार्क्स जीवंत भूमीवर
खरेच ही सांगीवांगीची नाही वार्ता
परवाच म्हणे बेगुसराईतील बारा तासांच्या मोर्चात
एका सुखवस्तू तहाणलेल्या अभिनेत्रीला पाणी देतांना म्हणाला
घामाचा वास कोणत्याही उग्र सेंटपेक्षा धुंद करतो
निरखून पाहिल्यास लक्षात येईल उन्हात रापलेला मुखचंद्रमा अधिक आकर्षित असतो
मनमोकळं हसून म्हणाली ती
इंन्कलाब जिंदाबाद.

आशा जशी मरत नसते
मरत नसातात मानवी स्वप्नं
मार्क्स सांजेच्या सूर्यासारखा मजूरीहून घरी परतणाऱ्या
रुपेरी बटांना हळूवार वार्यांने कुरवाळीत राहतो
सांगतो कानांत दिस येतील दिस जातील
भोग सरलं सुख येईल
भविष्याची स्वप्नं साकारीत
मार्क्स पाटीवर दप्तर टाकून उशीरा घरी पोहचणार्या
पोरासारखा.

मार्क्स जीवंत आहे
बंगालमधील
तपाहून जास्त काळातील वनवासा सारखा
शतकांच्या अज्ञातवासातील
आदीवाश्यांसारखा
दिवसाला दगडं मारीत जगणाऱ्या
अथेंस शहरातील मध्यमवर्गींया सारखा
नुकत्याच बेकार झालेल्या हवाईसुंदरीच्या
गालावरील अश्रूंच्या थेंबांसारखा
पराभूत वालस्ट्रीटच्या चौकात
शेपूट जड झाल्या वानरासारखा
निचेष्ट कलेवारच तो
आजवर
ज्याची फरफट अवघ्या गावातून शहरातून
जंगलांतून गर्दीच्या रेल्वेतून
नद्यांतून
कुठेच त्याला कोणी उगवू नाही दिले
एकदाचा पराभूत
जगभरातील चॕनलवरुन उठवलेल्या वावड्या
तो क्षिणपणे म्हणाला
जमीनीला मुळं फुटलेलं तेवढं माझं केसाळ शेपूट उचला
मग आयागमणी होईन मी कायमचा.
मारुतासारखा
मार्क्स अजून जीवंतच आहे.
तुम्ही टाळा अथवा वाट पहा
एक ना एक दिवस भेटेल तुम्हाला
जिवलग दोस्ता सारखा.

आनंद विंगकर

Leave a Reply