रेड्डीच्या म्हैशीची ” नाळ ” कबीराच्या “आंधळ्या गायशी” जुळलीच नाही..!

‘नाळ’ सिनेमात म्हैस आणि तिच्या मेलेलं रेडकूची फिजिकल कन्सेप्ट (संकल्पना) वापरून, सुधाकर रेड्डीने जेवढं दुःख आमच्या ताटात वाढलं त्याच्याहून कमीच दुसऱ्या कुणाच्या वाट्याला ते गेले असेल. पण त्यासाठी हा रिव्यु लिहावा हे काही निमित्त बनत नव्हते. ते योजिले त्याला कारण आणि हेतु हा की, सोळाव्या शतकात संत कबिराने रचलेल्या “ कबीरा कहे ये जग अँधा ” ह्या दोह्यातिल गाय आणि बछड़ा (अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया) या संकल्पनेची नाळ मध्ये झालेली पुनरावृत्ती (?). पण सिनेमात ती ‘गाय आणि बछड़ा’ जशी कबिराला अभिप्रेत आहे तशी न येता ‘म्हैस आणि रेड्कू’ अशी अवतरते. ह्या संकल्पनेच्या वापरा मागील कबिराची भूमिका आणि त्याच संकल्पनेच्या बदला बद्दल रेड्डीची मनोभूमिका. ही विसंगती बघणे आणि त्याच बरोबर, एखाद्या कलाकृति निर्मितीत जाणते किंवा अजाणतेपणी संबधित लेखकाची जाणीव-नेणिव कसे आपले काम बजवाते. आणि ती त्याच्या जाती व्यवस्थेतील स्थान कोणते याने कशी निर्धारित होत असते, ते बघणेही. जशी ती जातीय असते तशी पुरुषी आणि जर निख्खळ मार्क्सवादी असाल तर वर्गीयपण. हा शरद पाटीलांचा अब्राम्हणी दुष्टिकोन मला महत्वाचा वाटतो. आणि त्या दुष्टिकोनातुनच हा खटाटोप.

२०१२ साली, मुरबाड येथे आयोजित सांकृतिक शिबिरात रतना पाठक-शाह, आम्हाला लोकांना अभिनयाची शिकवण देण्यासाठी आली असता म्हणाल्या होत्या की; “सद्याच्या सिनेमे म्हणजे रामायण महा-भारताच मॉडिफिकेशन शिवाय दुसर काही नाही”. त्यांचे हे म्हणने एकंदरीत सिनेक्षेत्रातील महिलांना ऑपर केल्या गेलेल्या अथवा होणार्या भुमिकांना धरून होते. म्हंणजेच आजही महिलांच्या वाट्याला ; कधी उर्वशी, सीता, द्रोपदी, मिरा आणि राधा सारख्या भूमिका येतात तर कधी यशोदा व देवकी सारख्या. आणि त्या आम्हाला तशाच पद्धतीने वटविणे ही अभिप्रेत असते. स्वतः मार्क्सवादी परंपरा जोपासत असल्याकारणाने त्यांनाही “मानवी मनातील नेणीवेच्या अज्ञान भांडारातुन इतिहासपूर्व पुराणकथांच्या साठवलेल्या संस्काराचे जे अविष्कार कलाकृतित होतात” (ASS-८६ ). त्याची उकल करणे तेव्हाच्या चर्चेत तरी जमले नव्हते. कारण त्यांच्या मनातही “पाया आणि इमला” हे एतिहासिक भौतिकवादाचे वर्गीय (रशियन) मॉडल असल्याकारणाने ते पण त्यांच्या इतर मार्क्सवादी सवंगडी सारखे लंगड़ी घोड़ी खेळुन अजुनही तेथेच थांबले आहेत. आणि मानून घेतले आहे की, ज्यांची उत्पादन साधनांवर मालखी आहे त्यांच्याच संस्कृतीच प्रतिबिंब सिनेमात पडणार. ही त्यांची नाही तर जागतिक मार्क्सवाद्यांची (प्रतिबिंबवादी प्रमाणशास्त्राची) धारणा आहे. शरद पाटीलांच्या मते हा मार्क्सवादाचा प्रतिबिंबवादी दुष्टिकोन एक प्रकारची बाह्यार्थवादी धारणा आहे. ,

येथे लक्षात घेण्यासारखे हे आहे की ,दोघेही व्यावहारिक पातळीवर तात्विक भूमिका एकामेंकाविरोधी घेत असले तरी त्याचे प्रमाणशास्त्र (epistemology) बाह्यार्थवादी/ प्रतिबिंबवादी असल्याकारणाने सैद्धांतिक भूमिका एकच आहे. दोघेही दलितांचे जगण्याचे यथार्थ मांडणी कोण एक्यूरेटली करेल याला घेउन भिड़त आहे. या लिव्डइन एक्सपेरियंसला (जो एक प्रकारचा प्रतिबिंबवादी दुष्टिकोण आहे ) अतिम सत्य म्हणून अंगिकारले तर शरद पाटीलांच्या मते ते थेअरोटिकलीच ( सौंदर्यशास्त्रीयदुष्टया ) प्रोब्लोमटिक बनतात. ते असे…

बाह्यार्थवादी दुष्टिकोनातून पाहता; कुठल्याही विचारतत्वाप्रमाणे कलेची निर्मिती निव्वळ आपल्या मनातल्या कल्पनेतून साकार होत नाही असे मानतो. निकोलाई दोब्रोल्युबोव, क्रांतिपूर्वीचा रुसी विचारक ( म्हणजेच मार्क्सवादी ) याला पुढील प्रमाणे अधोरेखित (थेओराईझ) करतो. ते असे, “ जीवन साहित्याच्या तत्वांचे अनुसरण नाही करत, तर सहित्याचे तत्वे जीवन व्यवहाराचे अनुसरण करतात ” (DSA). जसे की , कबिराने ‘गाय आणि बछड़ा’ ही संकल्पना आपल्या दोह्यात वापरुन तत्कालीन समाजाच्या दांभिकतेवर ताशोरे ओढले. तर रेड्डी ने “ ‘म्हैस आणि रेड्कू’ ची संकल्पना वापरून नाळची कथा लिहली. ते हे करू शकले कारण त्या संकल्पना जीवन व्यवहारत होत्या किंवा आहेत. या संकल्पना त्यांनी दोह्यात अथवा सिनेमात वापरल्या म्हणून व्यवहारात आल्या असे होत नाही. म्हणजेच जे समाजात घडत आहे त्याचेच प्रतिबिंब लेखकाच्या मनात पड़ते तेच कलाकृति रूपांतरित होऊंन बाहेर पड़ते. पण जीवन व्यवहाराची ही तत्वे साहित्यात कोण आणतं? हे पण तितकेच महत्वाचे आहे. यासाठीॲकेडेमिक डिस्कोर्समधील गोपाळ गुरु आणि सुंदर सरुक्कई यांचे म्हणने बघुया.लिव्डइन एक्सपेरियंसच्या थेअरी नुसार गोपाळ गुरु ला वाटते की दलितच त्याच्या जगण्याचे ( अस्पृशता अणि दलितत्वाचे ) अनुभव बरोबर मांडू शकतात. या उलट सुंदर सरुक्कई म्हणतो की ते तेवढ्याच ताकदीने दुसरेही ( upper caste ) मांडू शकतात.

“ अभ्यासाधीन समाजाचा भौतिकवादी धारणेने व अनित्यतावादि दृष्टीने केलेला अभ्यासच त्या समाजाचे धर्म, राजकारण, तत्वज्ञान, कला हे आर्थिक रचनेचे प्रतिबिंब आहेत की, की प्रतिक , की सर्व मिळूण आणखी काही हे ठरवू शकेल. मार्क्सचे ज्ञानशास्त्र (epistemology) म्हणजे ‘प्रतिबिंबवाद या समजुतीला खुद पुर्वाचार्य व् लेनिनही जबाबदार असले, तरी इंद्रियानुभवातुन मानवी मेंदूत संकल्पना निर्मितीची जे प्रक्रिया घडते ती प्रतिबिंबाची निश्चितच नसते. संकल्पना बनवण्यात जाणीव काय नेणिव ही भाग घेत असते हे फ़्राईडच्या मनोविश्लेषण व् फ्रेझरच्या आदिबंधवादने सिद्ध झाले आहे.” ass७७.

वरिल उतारा वरुन एक नजर फिरवली तरि हे स्पष्ट होते की, लिव्डइन एक्सपेरियंसच्या थेअरीचा डंका किती त्रास दायक आहे. उदाहरणार्थ “नाळ” ची कथा लिहातांना वरती म्हंटल्या प्रमाणे सुधाकर रेड्डीने ‘म्हैस आणि मेलेलं रेड्कू’ या संकल्पनेचा आधार घेतला. अपरिहार्य आहे की ती त्याच्या लीवुडइन एक्सपेरियंस भाग राहिली असेल. निकोलाई दोब्रोल्युबोवच्या मताप्रमाणे तिचे अनुसरण त्याने जीवन व्यवहारातुन केलेले असेल. इथ पर्यन्त सार ठीक आहे. कारण भारतीय समाजाचा व्यवहार जाती अधिष्ठित आहे आणि रेड्डीही त्या समाजातुनच असल्याकारणाने म्हैस आणि मेलेलं रेड्कू’ ह्या संकल्पना निर्मितीतेतच नाही तर एकंदरित नाळच्या निर्मितीत त्यांच्या जात जाणीव-नेणिवचे पार्टिसिपेशन ( भाग ) फ़्राईडच्या मनोविश्लेषण व् फ्रेझरच्या आदिबंधवादा प्रमाणे राहिली आहे. आणि ते तसे राहते हे ना गोपाल गुरु मान्य करतील ना सुंदर सरुक्कई कारण “नाळ” मधील सुधाकर रेड्डीची जात जाणीव- नेणिव ना गोपाल गुरुना एक्यूरेट ठरवते ना सुंदर सरुक्कई यांना.

नाळ काय आहे ?

नाळ गर्भाअवस्थे पासूनच अर्भकाची त्याच्या आई-शी जुळलेली असते. जेव्हा अर्भक जन्माला येते तशी ती तोडले जाते. पण ती तोडल्यावर ही तिचे अंश मायेचा/ भावनेचा एक वेगळा गोतावळा निर्माण करतात. हा गोतावळा ‘नाळ’ मद्ये रंगवन्यात सुधाकर रेड्डी कमालीचा यशस्वी झाला आहे.

नाळ कशी कुठे जूळली आहे..!

कथेचा केंद्रबिंदु आहे “आई लेकराचे प्रेम” ते सिनेमात चैत्याच आपल्या जन्मदेत्या आईच्या भेटीच्या अतुरतेत आहे, सुमीची आपल्या दत्तक मुलाला दूर न जाऊ देण्यात आहे. तर सावकाराच्या आईचे आपल्या मुलापासून दूर जाण्यापेक्षा मरण पसंत करण्यात आहे. बच्चन हा मुलगा वाईट संगतीला असून सुद्धा तो वाईट मुलगा नाही असे इतराना सांगणार्या आईच्या मायाळु पणात आहे, तर दूसरी कड़े आपल्या ५-६ वर्षाच्या मुलीला चैत्या पासून दूर ठेऊ पाहणाऱ्या आईच्या चिंतेत आहे. आणि सर्वात महत्वाच म्हणजे आपल रेडकू मेल्यानंतर त्यासाठी पाना चोरनार्या म्हशीच्या मायेत आहे.

चैत्याचं अंतरद्वंद्व

चैत्याची “नाळ” त्याच्या जन्मदेत्या आईशी जूळली आहे,याची ‘जाणीव’ त्याला त्याचा गावाहून आलेला मामा करुन देतो. “तुझी जन्म देणारी आई ही नसून दूसरी आहे. हिने तुला दत्तक घेतले आहे” दाराला बांधलेल्या म्हशीला रेड्कू होतांना चैत्याने बघितलेले आहे. म्हणून रेड्कू सारखे आपण आपल्या सग्या आईकड़े नाही आहोत म्हणजेच रेड्कू सारख आपल नातं शुद्ध नाही आहे. आपली जन्मदेती आई ही नसून दूसरी आहे याची जाणीव त्याला येथून होते . आणि तेव्हा पासून त्याच्यात अतंरद्वंद्व सुरु होते. मंग तो आपल्या जन्मदेत्या आईकड़े जाण्यासाठी सारी धडपड़ करतो.

ब्राम्हणी व्यवस्था जशी उच्च-नीचता मानते तशी ती शुद्ध- अशुद्ध पणाचा संस्कार पण करत असते. सीतेला जसे तत्कालीन द्वंद्व ( पति पत्नी मधील नात्याच बहीद्वंद्व – तेहि रामाच्या मनातही दुसरयाच्या सांगण्यावरुन अतंद्वंद्वित निर्माण होते) मिटवण्यासाठी अग्निपरीक्षा देऊन स्वताला शुद्ध सिद्ध करावे लागते. नाळ मध्ये आई-लेकराचं नात्याचं बहीद्वंद्व वृंदीगत करण्यासाठी सुधाकर रेड्डी; चैत्याचा मनात ‘आपण म्हशीच्या रेड़कु सारखे आपण शुद्ध नाही हे दाखवून जे अतंद्वंद्व निर्मितो ते करीत असतांना तो ब्राम्हणी नेणीवेचा नकळत पणे शिकार झाला आहे. ती राहून राहून त्याला पुराण कथाकडे ओढित आहे. अख्या सिनेमाभर ते रेड्डीवर हावी झाली आहे. म्हणून चैत्यामध्ये आपल्याला आधुनिक कृष्णा दिसतो. जेथे तो राहत आहे ते गाव यमुने सारख्या नदीच्या काठी एक नदीच्या काठी बसलेल आहे. हा काही योगायोग नाही आहे जरी ती कथेची गरज असली तरी. त्या नदीत रास-लीला करण्यासाठी जशी एक राधा (नदी काठी राहणारी मुलगी) आहे अगदी तसाच गरीब सुदामा (बच्चन) पण आहे. सावकार हा नंदा सारखाच गावचा प्रमुख आहे अणि सुमी ही यशोधरा सारखी प्रेमळ. शेवटी कसंची जागा चैत्याचा मामाने ( हा पण कंस सारखा सखा भाऊ आहे तोही जन्मदेत्या आईचा ) भरून काढली आहे.

रेड्डीचे उच्च-जात संबंध, भारतीय सौंदर्यशास्त्र आणि अब्राम्हणी पर्सपेक्टिव

सध्या चैतन्यवादी सौंदर्याची चलती आहे. नाळ सारखे सिनेमे त्या पर्सपेक्टिव पाहणारे त्याची वाह-वाही करता थांबत नाही आहे. कुणाला चैत्याचा अभिनय भावतो आहे तर कुणाला सिनेमॅटोग्राफी. काहीजन तर त्यातील realistic पणा पाहून हैराण आहेत. हे सौन्दर्य पाहणारे, कोवळया वयात सावकाराच्या शेतात राबणारा बच्चन पाहत नाही. जन्माने पारधी असल्यामुळे त्याला होणारा पोलिसांचा नाहक त्रास यांना चैताच्या दुखापेक्षा दांडगा वाटत नाही. आणि सर्वात महत्वाचे पिढिजात काम करणाऱ्या चांभाराचे दुःख कुणालाही दुःख वाटत नाही कारण ते त्यांच्यासाठी त्याच्या जाती सारखेच हिन आहे. आणि हे रेड्डी ने हे सार गृहीत धरुनच पात्र रंगवली आहेत. त्याचा हा स्टैंड पण इतिहासाची पुनरावृत्ती करणारा कसा आहे. याची प्रचिती खालील संदर्भावरुन येइल.

भारतीय सौंदर्यशास्त्राचा उगम जातिसमाजात भरताच्या नाट्यशास्त्रापासून होतो.. व्यासाने महाभारताला ‘ जयो नाम इतिहासोsयम’ म्हंटले आहे. हा पाचवा इतिहासवेद त्याने शुद्रांसाठी लिहला असे परंपरा सांगते. भरतानेही प्रथम अध्यायात शुद्रांना वेद संभाव्य नसल्यामुळे नाट्य हा इतिहासासह पाचवा वेद आपण सवर्णीकांसाठी रचित असल्याचे म्हंटले आहे. शरद पाटिलाच्या मते “व्यासाचे जे उच्चवर्णीय हितसंबंध इतिहास वेदात होते, तेच उच्चजातीय हितसंबंध भरताचे इतिहास नाट्यशास्त्रात होते”. आणि अब्राम्हणी पर्सपेक्टिव ने पाहिल्यास, तेच उच्चजातीय हितसंबंध रेड्डीने नाळच्या निर्मितीत जोपासली आहेत.

शरद पाटिलांचा मते, “ नाटकातिल पात्रांची प्रतिमा अभिनयाद्वारे उभी करायचे असल्यामुळे त्याचे (भरताचे) सौंदर्यशास्त्र बाह्यार्थीवादी (realistic) प्रतिबिंबवादाचे अपरिहार्य होते.” बाह्यार्थीवादिंची व्याख्या धर्मेन्द्रनाथ शास्त्री खालीलप्रमाणे करतात. बाह्यार्थीवादीची धारणा आहे …की, मन बाह्य अर्थाचे ( वस्तुचे ) इंद्रियग्रहण करते आणि तो (अर्थ) इंद्रियग्रहणा पासून स्वतंत्र पणे अस्तित्वात असतो. मना कडून ना तो निर्मिला जातो ना इंद्रियग्रहणातुन त्याच्यात काही बदल होऊ शकतो. इंद्रियबोधाच्या प्रक्रियेचे नामकरण प्रतिबिंबवाद असेच होऊ शकते ( मार्क्सवादी तत्वज्ञानाचे प्रमाणशास्त्र ही प्रतिबिंबवादीच आहे ). कारण बाह्यार्थाचे ( बाह्य-वस्तुचे ) मनात प्रतिबिंब भारतीय तत्वज्ञानाच्या परिभाषेत अर्थक्रियासामर्थ्यविहीन असते. म्हणजे ते प्रतिबिंब त्याच्यावर बदलाची क्रिया करायचे सामर्थ्य बाळगत नाही.

रेड्डीची म्हैस आणि कबीराची आंधळी गाय

रेड्डी ने म्हैस आणि रेड्कुचं प्रतिक वापरून ‘नाळ’ ची कथा लिहली. मेनस्ट्रीम रिव्यु एक्सपर्ट त्याला आई- मुलांच्या संबंधावर भाष्य करणारी उत्तम कलाकृति म्हणून संबोधित आहेत. आणि त्यांना वाटते म्हणून ती तशी आहे ही. सिनेमात नविन जन्मलेले रेडकु चैत्याच्या एका चुकी मुळे मरते त्याच्या नंतर म्हैस पाना ( दूध काढू देत नाही) चोरते. सावकाराला याची चिंता आहे की हे असेच चालू राहिले तर म्हैस आटणार. म्हणून तो चांभाराकडे मेलेल्या रेड्कुला घेउन जातो आणि चामड्या पासून जिवंत भासेल असे रेडकू बनवायच सांगतो. आणि चांभार ते बनवतो. मेलेल रेड्कूचं धड ( ज्याला कलात्मक पद्धतिने बनवले आहे ) सावकार घेउन, त्याला म्हैशी जवळ ठेवतो ती त्याला चाटते आणि दूध द्यायला सुरवात करते ते दूध सुमी चैत्याला प्यायला देते आणि एरवी तिला सुमी म्हणनारा चैत्या आई म्हणतो. सिनेमाचा शेवट याच्यानेच करण्यात आला आहे.

कबीरने याच प्रतिकाचा वापर आपल्या दोह्या मध्ये केला तो जातवर्णव्यवस्थेच्या तत्कालीन दांभिकतेवर भाष्य ( टिका ) करण्यासाठी. तो असा …
कबीरा कहे ये जग अँधा …
अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया
जूठी जाम चटाये…!

ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयी म्हणतात कि, “धर्म, कर्मकांड, मौलवी, पंडित अशा विविध विषयांवर कबीरांनी परखड विचार मांडले. सोळाव्या शतकात असे विचार मांडण्याची हिम्मत त्यांनी दाखवली. ती सद्यःस्थितीत दाखवता येणार नाही. सर्व धर्म आक्रमक झाले आहेत. ( शरद पाटिल रेफरेंस / तेव्हाचा जातीय द्वंद्व )

जनतळ आज हि कबीराची आपुलकीने आठवण काढतात, म्हणन्यापेक्षा कबीर आजही जन सामान्याची मनाची पकड़ सहजरित्या घेतो,१५ व्या शतकातील सामाजिक वास्तवावर भाष्य करणार्या एखाद्या गेय कलाकृती बाबत असे होणे, काही जादुई करिश्माचा भाग नाही, त्यालाही कारणं आहेत. एकतर सत्याशी नात जोडणारा कबीर जनतेशी कधीच नाड तोडत नाही, जनतेच्या संबंधित असलेल्या प्रत्येक गरजू आणि महत्वाच्या गोष्टीशी पण नाही. गाय आणि बछडा हे व्यावहारिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत. त्याचा बेस जात व्यवहार आहे. कबीर हिंदू आणि मुस्लीम धर्माच्या ढोंगी पणावर बोट ठेवताना ही जातीची क्रूरता पण समोर ठेवतोय. जब्बार पटेलला तेच गाणं का घ्याव लागल ( डॉ बाबासाहेब आंबेडकर ) आणि चित्रीकरणात बाबासाहेबाला स्वतःहून ते गाणं चालत असताना का दाखवावं? जनता काय विचार करते आणि ते काय प्रतिक देतंय? वस्तुनिष्ठ मूल्यमापन केल तरच याचं उत्तर भेटते. त्या गाण्याचे सामर्थ्य आणि उगमस्थान प्रामुख्याने धर्माच्या जडण घडण आणि पोथी निष्ठतेवर सवाल करते. ते नुसते अपयश आणि दुबळेपणा वर बोट नाही ठेवत आहे तर आत्मभान किती गरजेचे आहे ते पण दाखवते.

पण आणि रेड्डीचे ‘नाळ’ बाह्यार्थीवादी प्रतिबिंबवादाच्या सौंदर्यशास्त्राशी जूळली असल्याकाणाने भरतासारखेच त्याचीही उच्चजातीय हितसंबंध ‘नाळ’च्या निर्मिते मध्ये दिसतात. तो कबीरा प्रमाणे म्हैस आणि रेड्कूचं प्रतिक घेउन कला क्षेत्रात उतरतो तर खरा; पण तो कबीरा सारखा या प्रतिकाचा वापर जातीय द्वंद्व चित्रित करण्यासाठी वापरू शकत नाही. उलट त्या संघर्षाचा मागमूसही कसा दिसणार नाही याची तो दक्षता घेतो. अगदी सिनेमा संपेपर्यंत सर्व मनुच्या ( कोड ऑफ़ मनु ) हिशोबाने चालू राहते. आणि आपण या आधुनिक भरताच्या आधुनिक कृष्णाच्या (पात्र) अभिनयाचे (सौंदर्याचे) कौतुक करता करीत थांबत नाही. थोडक्यात रेड्डीच्या जात जाणीव आणि नेणिव त्याच्या म्हशींची ” नाळ ” कबीराच्या आंधळ्या गायशी जुळू देत नाही !

निसार झाल्टे

(लेखक Tata Institute of social sciences, Mumbai येथील विद्यार्थी आहेत. )

Leave a Reply