स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक : ज्योतिबा फुले

महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली पुणे येथील गंजपेठेत झाला. आताचा फुलेवाडा म्हणून ओळखले जाते. महात्मा फुले ज्या व्यवस्थेविरोधात लढले, त्याचा विचार करत त्यांच्या घराला “वाडा” हे सरंजामी नाव देणे उचित वाटत नाही. सन १८३४ ते १८३८ या काळात त्याचे शिक्षण पंतोजींच्या शाळेत झाले. १८४० रोजी त्यांचा विवाह साताराच्या सावित्रीबाईं यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी १८४१ ते १८४७ या काळात त्यांनी स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजीत इंग्रजी शिक्षण घेतले. त्याचबरोबर लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून दांडपट्टा व शारीरिक शिक्षण घेतले.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. १८४८ साली पुण्यातील भिडेंच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन खरी मुहुर्तमेढ रोवली. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेल्या भारतातील पहिली महिला ह्या सावित्रीबाई होत्या. तळागाळातील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे ज्योतीबांचे ध्येय होते. शिक्षणाचे महत्व पटवून देणार्‍या त्यांच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.
“विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।”
फुल्यांनी समजले होते, स्रियांच्या प्रगतीविना सामाजिक सुधारणा अशक्य आहे. पण आज स्री शिक्षणाच्या प्रवाहात आहे, परंतु आजही तिला दुय्यम म्हणून पाहिले जाते. ही लाजीरवाणी बाब आहे. आजही बालविवाह होत आहेत, फक्त ते समोर येत नाहीत. हे थांबविणे गरजेचे आहे.
स्रियांप्रमाणे अस्पृश्यांनाही शिक्षणाची दारे बंद होती. पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ साली अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. १६ नोहेंबर १८५२ रोजी ब्रिटिश सरकारने महात्मा फुले यांनी शैक्षणिक कार्यासाठी केलेल्या कामाबद्दल मेजर कँन्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. १८५६ साली ज्योतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला. परंतु त्यांचे पण मन वळविण्यात ज्योतीबा यशस्वी झाले. शिक्षणाबरोबर स्रियांची उन्नती टाळायची असेल तर पुनर्विवाह करणे गरजेचे होते. त्यासाठी ज्योतीबांनी विधवा पुनर्विवाहास साहाय्य केले. एवढेच करून ज्योतीबा थांबले नाही, तर त्यांनी भ्रूणहत्या होऊ नये आणि स्रियांना सुरक्षित प्रस्तुती व्हावी यासाठी १८६३ साली पुणे येथेे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. ज्योतीबांना भ्रूणहत्या वाईट असल्याचे त्या काळात समजले होते. समाज सुशिक्षित झाला असतानाही स्री भ्रूणहत्या वाढत आहेत. वंशाला दिवा हवा यासाठी कोवळ्या कळ्या कुस्करण्याचे सैतानी काम छुप्या पध्दतीने चालू आहे.
त्याकाळातील ब्राम्हणांमध्ये स्रियांचा पुनर्विवाह केला जात नसल्यामुळे त्यांना आपले आयुष्य एक अर्थहीन अवस्थेत जगावे लागत असे. विधवा स्रियांचे केशवपन करून विद्रूपीकरण केले जात असे. या प्रथेविरोधात न्हाव्यांनी काम नाकरण्यासाठी फुल्यांनी प्रयत्न सुरू केले आणि १४ एप्रिल १८६५ ला विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. स्रियांना सन्मानाचा दर्जा मिळवून दिला. तोच दर्जा खालावत चालला आहे.
माणसांना माणूस म्हणून वागविले जात नव्हते, दुष्काळाने जनता हवालदिल झाली होती, अस्पृश्यांना पाण्याचा अधिकार नव्हता. अशा वेळी १८६८ च्या दुष्काळात ज्योतीबांनी राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. निश्चितपणे फुलांचा मानवतेचा विचार आत्मसाद करण्यात माणूस कमी पडला आहे. आजही हीन, तुच्छतेची वागणून दिली जात आहे, माणूस म्हणून माणसाकडे पाहिले जात नाही. याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
ज्योतीबांनी समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली, त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली गेली. ती परंपरा सुरूच आहे.
शिक्षणाचे महत्व ज्योतीबांनी ओळखले होते, त्यांंनी १८८२ ला विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी करणारे निवेदन केली. परंतु आज शिक्षणापासून हजारो मुले वंचित राहत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण आणि खाजगीकरण नव्या पिढीची राखरांगोळी करत आहेत. गरीबाला शिक्षण परवडेना झाले आहे. ज्योतीबांचा तो दूरदृष्टीकोण देशात अंमलात आणण्याची गरज आहे.
कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही, चातुर्वण्य व जातिभेद ही मानवाचीच निर्मिती आहे’ असे ज्योतीबा रोखठोकपणे बोलत असत. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद करणारे त्यांचे शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक. आज शेतकऱ्यांची आवस्था पाहताना पुन्हा तेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते… गुलामी. शेतकऱ्याचा आसूड पुन्हा उगारण्याची जाणीव होते. ज्योतीबांनी केलेल्या कार्याची दखल घेत बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी केलेल्या सुचनेप्रमाणे १८८८ ला मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली. ज्योतीबा क्रांतिकारी समाजसुधारक होते, परंतु थोर विचारवंत होते. २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे ज्योतीबांंची प्राणज्योत मावळली. व्यक्ती मरते, विचार मत नाही, त्याचप्रमाणे ज्योतीबांंनी दाखविलेल्या मार्गाची देशाला गरज आहे. आजही तिच व्यवस्था पहावयास मिळत आहे, फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे. जातीयवादाचा उन्माद वाढला आहे. दलित, अल्पसंख्याक यांना लक्ष्य केले जात आहे. हिंदू राष्ट्राच्या वल्गना केल्या जात आहेत. स्रियांना पुन्हा गुलामीकडे घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण करून बहुजनांना शिक्षण नाकारले जात आहे. या गुलामीकडे घेऊन जाणाऱ्या एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी ज्योतीबांचा विचार घराघरात पोहोचवूया…

नवनाथ मोरे
लेखक विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Leave a Reply