डॉ.आनंदीबाई जोशी : भारतीय पितृसत्तेच्या बळी.

समीर विद्वांस दिग्दर्शित व ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद अभिनित आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर (त्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर) आधारित चित्रपट नुकताच येवून गेला. हा चित्रपट पाहताना १९ व्या शतकातील अभिजन स्त्रियांच्या जीवनाचा दैनंदिन जगण्यातील संघर्ष आणि अभिजन चळवळीतील स्त्री शिक्षणाचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. चित्रपटात आनंदीबाईला त्यांच्या शिक्षणासाठी व डॉक्टर होण्यासाठी त्यांना व त्यांचे पती गोपाळराव यांना कराव्या लागलेल्या सामाजिक-आर्थिक संघर्षाची कथा आहे. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे व्याभिचार, चरित्रहीन व समाजाला कलंक असे मानले जात होते. अशा सामाजिक वातावरणातून आनंदीबाईंनी आपल्या पतीच्या साथीने वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास अनेक अडथळ्यांवर मात करत डॉक्टरीची डीग्री पूर्ण करुन अमेरिकेतून भारतात परत येईपर्यंतचा त्यांचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून रेखाटलेला आहे.

चित्रपटाच्या प्रारंभी बाल आनंदी हिचा विवाह गोपाळरावांची दुसरी पत्नी म्हणून होतो. गोपाळराव त्या काळातील ब्राह्मण कुटुुंबातील आचार विचारांनी वाढलेले परंतु इंग्रजी शिक्षित सरकारी नोकरीवर असलेले व सुधारकी
विचारांचे ब्राह्मण ग्रहस्थ होते. त्या काळातील अनिष्टा सामाजिक चालीरिती व निर्बंध झुगारुन लावणारे, स्त्री शिक्षणाच्या प्रश्नांची आस असणारे व पत्नीच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारे असे गोपाळरावांचे चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे. आनंदीशी लग्न करताना तिला लग्नानंतर शिक्षण घ्यावे लागेल अशी पती म्हणून अट घालणाऱ्या या गोपाळरावांची भूमिका आजच्या लग्नानंतर मुलींचे शिक्षण थांबवणार्या पतीपेक्षा निश्चितच धाडसी म्हणावी लागेल.
१९ व्या शतकातील आनंदीबाई जोशी व गोपाळराव यांच्या संघर्षाचा हा काळ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेरणादायी चरित्र म्हणून आपल्यासमोर उभे करण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. परंतु काशिबाई कानिटकर यांनी लिहिलेल्या
आनंदीबाईच्या चरित्रातून व चित्रपटाच्या माध्यमातून आनंदीबाईच्या जीवनातील अनेक असाह्य गोष्टी माझ्या स्त्री मनाला अस्वस्थ व्हायला भाग पाडतात. या शतकातील अभिजन स्त्रीविश्वाचा विचार केला तर स्त्री एकीकडे
पतीच्या साह्याने शिक्षणाच्या माध्यमातून काही प्रमाणात नवविचार अंगीकारण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे ब्राह्मण कुटूंबातील प्रथा-परंपरा, आचार-विचारांशी चिकटूनच आपल्या जगण्याचा आकृतीबंध निश्चित करते.

चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गोपाळराव आपली पत्नी आनंदीबाईना शिक्षणासाठी सतत प्रेरणा देणारे, तिला घडवणारें सुधारकी विचारांचे शिक्षित पती म्हणून भूमिका साकारतात. पत्नीच्या यशासाठी अहोरात्र धडपड करणारे गोपाळराव काही बाबतीत मात्र अतिटोकाचे आणि पती
म्हणून पत्नीवर अनुनय व प्रसंगी बळाद्वारे वर्चस्व प्रस्थापित करणारे पती वाटतात. बाल आनंदीला शिक्षणासाठी धडे देत असताना ते पाल्याची भूमिका निभावतात. पालक हा आपल्या पाल्यांना नेहमी शिकविणारा, आदर्श सांगणारा व
आपल्या इच्छेप्रमाणे वळण देण्यासाठी प्रसंगी साम-दंडभेदाचाही वापर करणारा अशा वेगवेगळ्या भूमिकेत असतो. चित्रपटातही आनंदीबाईला घडवणारा ‘आदर्श
पती’ म्हणून गोपाळरावाचं अतिमहत्त्व वा गौरवीकरण करुन त्यांना महानत्व बहाल करणे हा पितृसत्तेच्या अनुनयाचा भाग आहे.
आनंदीबाई जोशी आधुनिक व्यावसायिक शिक्षण घेत असताना स्वत:ची हिंदू स्त्रीची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या आचार-विचारांना कुठेही डळमळू देत नाहीत. या त्यांच्या विचारनिष्ठतेचा केसरी सारखे वृत्तपत्रही दखल घेत त्यांची ही वृत्ती सुशील आणि नम्र आहे असे गौरवोद्गार त्यांच्याप्रती केसरीकार काढतात. याउलट खिश्चन धर्म
स्वीकारणार्या आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या पंडीता रमाबाईंना हट्टी, उद्धट आणि चंचल समजून त्यांना गौण ठरवले जाते. आंनदीबाई धर्मांतराबाबतीतला निर्णय असो कींवा अमेरिकेत असताना हिंदू धर्माची
शूद्धता शाबूत ठेवण्यासाठी मांसाहाराचे आचरण न करण्याचे कटाक्षाने पाळतात. तेथील वातावरणाला पोषक असणाऱ्या या वस्त्रांचा वापर व अन्नाचे सेवन
करण्याचे देखील धर्माच्या आचारणापुढे वैद्यक शिक्षण घेणाऱ्या या आनंदीबाई मान्य करत नाहीत. हिंदू स्त्रीच्या आचरणाला शोभेल असेच कपडे त्यांना हवे असल्यामुळे स्वत:चे कपडेही त्या स्वत:च शिऊन घेतात. अमेरिकेत शरीराला थंडीपासून बचाव करण्यासाठी पाश्चात्य कपडे अनूकूल असतानाही त्या तेथे भारतीय स्त्रीपोषाखाचा हट्ट धरतात. त्यामुळे त्यांचे शरीर स्वास्थ्य बिघडण्याचे कारण ठरते. हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार समुद्रगमण करणे हे
त्या काळात वज्र्य असतानाही व्यावसायिक शिक्षणाकरिता समुद्रगमण करुन अमेरिकेत जाणाऱ्या या आनंदीबाई हिंदू धर्माच्या शूद्ध आचरणासाठी स्वत:च्या शरीरस्वास्थ्याकडे मात्र दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना लवकर मृत्यूला सामोरे जावे लागले तर नाही? असा प्रश्न चटकन मनात उभा राहतो.
भारतीय समाजव्यवस्थेतील पती-पत्नीमध्ये असलेला नातेसबंध हा पितृसतेच्या सत्तासंबंधात उभा राहतो. आनंदीबाई व गोपाळराव यांच्यातील पती-पत्नी म्हणून असलेला नातेसंबंध हा पितृसत्तेच्याच सत्तासबंधात घडत राहिलेला आहे. त्यांच्या सबंध चरित्रातून आनंदीबाई पतीच्या अनुनयातून स्वत:ला घडवतात असे निदर्शनास येते. जेव्हा आनंदीबाई अमेरीकेत शिक्षण घेतात तेव्हा गोपाळरांवाना पती म्हणुन कोणते आचरण आवडेल याकडे नेहमीच बारकाईने लक्ष देतात. म्हणूनच खाण्यापिण्या बद्दलचे आचरण कटाक्षाणे त्या पाळतात. आंनदीबाई जेव्हा आपला अमेरीकेतील फोटो गोपाळरावांना पाठवतात तेव्हा
बाजुला गेलेला साडीचा पदर ही छोटीशी गोष्टही गोपाळरांवाना आवडले नाही,म्हणून फोटो काढतांना त्यांना पदर बाजूला सरकल्याचे त्यांना लक्षात आले नव्हते हे जुुजबी स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागले. एकदंरीत हिंदू स्त्रीच्या स्त्रीत्वाच्या गौरवशाली भुमिकेमुळे आनंदीबाई जोशी स्त:च्या
शरीरस्वास्थाला इजा पोचवितात हे निश्चतच अस्वस्थ करणारी गोष्ट चित्रपटात दिसते. हिंदू धर्म आणि स्त्रीत्वाला महत्त्व दिल्यामुळे त्यांना वयाच्या २२ व्या वर्षी मृत्यू जवळ करावा लागला. म्हणून त्या पितृसत्तेच्या बळी ठरतात. परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा खडतर प्रवास पूर्ण करुन
आनंदीबाईंनी इतिहासात पहिली डॉक्टर होण्याचा मान तर मिळविला; परंतु भारतात येऊन भगिनिंची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

स्वर्णमाला मस्के

लेखिका इतिहास विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे संशोधन विद्यार्थी आहेत.

Leave a Reply