काॅम्रेड कन्हैया आणि त्याची भूमिहार जात – श्रीकांत ढेरंगे

भूमिहार किंवा बाभण ही एक भारतीय जात. उत्तर प्रदेश,बिहार आणि झारखंड आणि अन्य प्रदेशांमध्ये थोड्या प्रमाणात राहते. भूमिहारचा अर्थ होतो भूपति, जमीनमालक किंवा जमीनदार. भूमिहार स्वतःला परशुरामाचे शिष्य मानतात. उत्तर प्रदेशच्या गाजीपूर आणि आझमगढ जिल्ह्यात यांची लोकसंख्या अधिक असून बिहारमध्ये भूमिहारांची सर्वाधिक लोकसंख्या आहे.

तिवारी, त्रिपाठी, मिश्र, शुक्ल, उपाध्याय, शर्मा,पाठक,दुबे,द्विवेदी या भूमिहार समाजाला दिल्या गेलेल्या उपाध्या आहेत. शासन आणि जमीनदारीमुळे राय, साही, सिन्हा, सिंह, आणि ठाकूर ही त्यांना मिळालेली उपनावे आहेत. भूमिहार आपण ब्राह्मण असण्याचा दावा करतात. परंतु ब्राह्मणांमधील एक मोठा समुदाय त्यांना ब्राह्मण मानत नाही. कारण, भूमिहार हे परंपरागत पूजाअर्चना/कर्मकांड सोडून जमीनदारी करतात. तर काही भूमिहार स्वतः शेती कसतात. तसेच काही भूमिहार अल्पभूधारक तसेच भूमिहीनही आहेत. तसेच काही भूमिहार शेतमजूरही अहेत. आता बहुतांश भूमिहीन,शेतमजूर भूमिहार हे जवान म्हणून मिलिट्रीत भरती आहेत. जवान म्हणूनचे भूमिहारांचे प्रमाण बरेच आहे. मुघल आणि इंग्रजकाळातही त्यांचा शिपाई म्हणून सहभाग राहिलेला आहे.

दिल्लीच्या आसपास राहणारे त्यागी आडनावाचे लोकही स्वतःला परशुरामाचे शिष्य समजतात. यामुळे भूमिहार त्यागींना आपल्याच जातीचे मानतात. या त्यागी आडनावाचे बहुतांश लोक जमीनदार होते. काही ठिकाणी अजून थोड्याफार जमिनी असाव्यात त्यांच्याकडे. आणि ते बाकी ब्राह्मणांसारखं दान स्वीकारत नाहीत. यामुळे यांना ‘अयाचक’ ब्राह्मण म्हटलं गेलं.

१८८५ साली वाराणसीमध्ये काशीनरेश यांच्या प्रयत्नांमुळे ‘अयाचक’ ब्राह्मणांच्या महासभेची स्थापना केली गेली. या महासभेत पूर्वांचलचे भूमिहार, मगधचे बाभण, मिथिलांचलचे पश्चिमा, प्रयागचे जमीनदार ब्राह्मण आणि पंडा, मेरठचे तगा ब्राह्मण आणि भूइंहार ब्राह्मणांशी संबंधित अन्य ब्राह्मणांना ‘अयाचक ब्राह्मण संघटन’ यात समाविष्ट केलं गेलं. तेव्हा काशीनरेश यांनी एक समिती स्थापन केली. या समितीच्या सात वर्षांच्या प्रयत्नांनंतर ‘भूमिहार ब्राह्मण’ या शब्दावर सर्वसहमती दिली गेली. आणि भूमिहार ब्राह्मण सभा अस्तित्वात आली.

‘अखिल भारतीय किसान सभे’ ची स्थापनाही यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली. गांधीजींना चंपारण्यला बोलविणारे राजकुमार शुक्ला, रामानंद मिश्रा, गणेश दत्त हे याच समुदायातील आहेत.

वर उल्लेख केलेल्या ‘अयाचक’ भूमिहारांनी हिंदी साहित्यात महत्त्वाचं योगदानही दिलं आहे. राष्ट्रकवी रामधारीसिंह ‘दिनकर’, राम बेनीपुरी, गोपालसिंह नेपाली, राहुल सांकृत्यायन,मगही कोकिल, जयरामन सिंह, बिहार कोकिळ शारदा सिन्हा, बिहारचे पहिले मुख्यमंत्री कृष्ण सिंह हे सर्व याच भूमिहार समाजातील आहेत.

ही वरील माहिती इथे सांगण्याचे निमित्त म्हणजे कन्हैया कुमार आणि त्याची जात होय. इथे बरेच दिवसांपासून कन्हैया कुमारच्या जातीची अत्यंत उथळ,सवंग आणि घाणेरडी चर्चा सुरू आहे. विश्लेषणाच्या वा सामाजिक तत्त्वमीमांसेच्या पातळीवर त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीची चर्चा करायला काहीच हरकत नाही. किंबहुना ती व्हायलाही हवीये. त्याच्या जातीचा जो काही वर्चस्वशाली जुनाट इतिहास किंवा अलीकडचाही काही जातीय पार्श्वभूमी असलेला लेखाजोखा असेल तर तो तुम्ही मांडू शकता. त्याच्या जातजाणिवनेणिवेबाबतही मांडणी करू शकता.पण त्याच्या एखाद्या वाक्याला,शब्दाला पुढे करत जी त्याच्या जातीला घेऊन ‘शेरेबाजी’ सुरू होते. तेव्हा या शेरेबाजांचीही जातींकडे पाहण्याची मानसिकता उघड होते. आणि कुठल्याही सामाजिक/जातीय अर्थाने केल्या गेलेल्या शेरेबाजीला तात्त्विक अर्थ असण्याचे काही कारणही उरत नाही. म्हणून मग जी त्या शेरेबाजीला सावरण्यासाठीची धडपड उरते त्यातून आपल्या जातीयतेला सोयीस्करपणे बचावाच्या पावित्र्यात उभे करण्याचे प्रयत्न होतात. मला वाटतं जातीच्या (मग ती कुठलीही जात असो) मक्तेदारीच्या/वर्चस्वाच्या अहंगंडातून जातीची बाधा तयार होत जाते. आणि मग त्या त्या अनुषंगाने प्रत्येक जातीतील ब्राह्मण्याची बाधा झालेले जातीय स्वरूपाचे चित्कार आपसूक बाहेर पडतात. कन्हैयाची भूमिका त्याच्या भाषणांतून आपल्या समोर सातत्याने येत आहे. ती समकालीन राजकीय दृष्टीकोनातून किती महत्त्वाची आहे. हे वेगळे सांगायला नको आहे. ती प्रामाणिक तर आहेच, पण त्यातून काही नव्या गोष्टीही घडताहेत. विनाकारण ‘ध चा मा’ करून त्याला जातीय आणि बोलबच्चन वगैरे अशी काही लेबलं लावण्यात काहीच हशील नाहीये. इतकेच.
तुमची तो मार्क्सवादी असण्याबद्दलची काही पूर्वग्रहदूषित मतं असतील तर मग त्यावर काही काही इलाज असू शकत नाही. कारण आता अलीकडे मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून येणारी जी कुणी तरुण काॅम्रेड मंडळी आहेत ती जात,लिंग आणि वर्ग या तीनही मुद्यांना घेऊन गंभीर विचार करताहेत,तो मांडताहेत. असं माझं तरी निरीक्षण आहे. काॅ.शरद् पाटील यांच्या प्रभावातून पुढे आलेली काही मित्रमंडळी तर ‘माफुआ’ या तत्त्वज्ञानाला घेऊन किती चांगली चर्चा करतात. याचा मी साक्षीदार आहे. आणि त्या तत्त्वज्ञानाचा एक छोटा अभ्यासकही. बाकी नेता म्हणून मी ही कन्हैयाचा पंखा आहे. तो निवडून यावा अशी इच्छा असणं मग साहजिक आहे. तेवढे नेतृत्वगुण,अभ्यास,बिनतोड युक्तिवाद,त्याची राजकीय भूमिका म्हणून त्याच्याकडे आहेत. म्हणून याकडे जरा व्यापक दृष्टीने पाहणे अधिक चांगले होईल. बाकी कन्हैयाला या निवडणुकीसाठी खूप शुभेच्छा!
आमचा काॅम्रेड जिंको अथवा पराभूत होवो! तो ज्या क्षणी आखाड्यात उतरला त्याच क्षणी तो आमच्यासाठी जिंकलाय!

श्रीकांत सावळेराम ढेरंगे मु.आंबी दुमाला ता.संगमनेर.

लेखक समकालीन महत्त्वाचे कवी आहेत.

Leave a Reply