भारतीय रेल्वेच्या विकासावर पैसा खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन चा पांढरा हत्ती पोसणे हे देशविरोधी

भारतीय रेल्वेच्या विकासावर पैसा खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन चा पांढरा हत्ती पोसणे हे देशविरोधी असल्याचे मत शशी सोनवणे यांनी व्यक्त केले. युवा भारत संघटना आयोजित ” बुलेट ट्रेन : प्रतीक विकासाचे कि विनाशाचे ” या विषयावरील चर्चेत त्यांनी हे मत व्यक्त केले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन विरोधी संघर्षातील नेते राजू पांढरा व शशी सोनवणे यांच्याशी एस. एम जोशी सभागृह,नवी पेठ पुणे एका चर्चेचे आयोजन युवा भारत संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.


शशी सोनवणे

बुलेट ट्रेन ही आपल्या देशाच्या मर्यादित संसाधनांच्या दुरुपयोगाचा उत्तम नमुना आहे. ताशी २५० ते ३५० कि.मी वेगाने चालणारी बुलेट ट्रेन काही दशकांपुर्वी जगभर आकर्षणाचा केंद्रबिंदू होती परंतु हवार्इ वाहतुक अधिक जलद, किफायतशीर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षित होत गेल्यामुळे बुलेट ट्रेन ही जपान, फ्रांस, जर्मनी अशा काही मुठभर देशांपुरतीच मर्यादित राहीली. आता चीन हा देश सोडला तर जगात कुठेच नवीन बुलेट ट्रेनसाठी आग्रह होताना दिसत नाही. जपान भारताला बुलेट ट्रेन फार उदार होऊन देत आहे असं जे चित्र पसरवलं जातंय ते फसवे आहे. शिंकानसेन या जपानमधे बुलेट ट्रेन बनवणा-या कंपनीचा व्यवसाय व्हावा आणि जपानची अर्थव्यवस्थेत पडून असलेले भांडवल गुंतले जावे या धंदेवाईक भुमिकेतूनच बुलेट ट्रेन सरकारला हाताशी धरुन ते आपल्यावर ते लादत असल्याचे ते पुढे म्हणाले.

केवळ १०० कोटी खर्च करुन आपल्या भारतीय रेल्वेच्या चेन्नई येथील कोच फॅक्टरीने ताशी १८० ते २०० च्या गतीने वर्तमान रेल्वे रुळांवरुन धाऊ शकेल अशी भारतीय बनावटीची ट्रेन १८ बनवली आहे. तिच्या चाचण्या देखील यशस्वी झाल्या आहेत. एवढी स्वस्त ट्रेन आपल्याच रेल्वे द्वारे आपल्याच लोकांना रोजगार देत बनवता येत असेल तर मग जपानची बुलेट ट्रेन हवीच कशाला असा प्रश्न निर्माण होतो. मुंबई उपनगरीय सेवा आता डहाणू पर्यंत झाली आहे. विरार लोकलमधे चढणे हे एव्हरेस्ट शिखर सर करण्याइतकेच जिकीरीचे आहे ! रोज जीव मुठीत धरुन वसई -विरार, पालघर-सफाळाचे प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. दरवाज्यावर लटकत जाणारे प्रवाशी रोजच्या रोज मरत असतात. अशा स्थितीत बुलेट ट्रेन लादणे हे या प्रवाशांच्या जख्मेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. म्हणूनच ज्या गावांमधून बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे तिथेच नाही तर सर्वसामान्य रेल्वे प्रवासी देखील बुलेट ट्रेनला विरोध करत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी जनतेचा यास विरोध आहेच,सोबतच कोळी,मासेमार शेतकरी हे सर्व बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात एकत्र झाले आहेत. प्रश्न फक्त बुलेट ट्रेन प्रकल्पाचाच नसून वाढवण बंदर,एक्सप्रेस वे या सर्वांचा आहे अशी भूमिका घेऊन गुजरात,महाराष्ट्र,राजस्थान,दादरा नगर हवेली येथील जनतेस या संघर्षात उतरविण्याचे काम आम्ही करीत असल्याचे आदिवासी एकता परिषदेचे निमंत्रक राजू पांढरा यांनी स्पष्ट केले. ह्या प्रकल्पाना ग्रामसभेने विरोध केला आहे. वेळोवेळी सर्व प्रशासनिक अधिकाऱ्याना निवेदने दिली आहेत,राष्ट्रीय हरित प्राधिकरण,अनुसूचित जमाती आयोग ते बुलेट ट्रेन ला कर्जपुरवठा करणाऱ्या जिका कंपनीपर्यंत आम्ही बुलेट ट्रेन नकोच नको ची भूमिका कळविली आहे.

राजू पांढरा

विकास झालाच पाहिजे. विकासाला आमचा विरोध नाही. पण विकास म्हणजे काय हे कधीतरी निश्चित करावेच लागणार आहे. पर्यावरण हानी, अस्वच्छ पाणी- हवा, मातीची आणि जमिनीची धूप, शेतीची नासधूस, जंगल तोड, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या माणसांच्या मुलभूत गरजांना धाब्यावर बसवत शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेणारे, आदिवासींची जंगले नष्ट करणारे, मच्छिमार, आगरी या लोकांचे रोजीरोटी पळवणारे मोठमोठे प्रकल्प, बुलेट ट्रेन, हायवे आणि धरणे म्हणजे विकास असे जर म्हटले जात असेल तर मग आम्ही आहोत विकास विरोधी आणि अशा प्रकारच्या विकासविरोधी काम करण्याचा अधिकार आम्हांस भारतीय राज्यघटनेने दिला आहे. चांगले, सुखी, समृद्ध आणि शांत जीवनाची हमी देणारा विकास असेल तर आम्ही त्याचे समर्थन करू. भारतीय राज्यघटनेने दिलेला ‘जगण्याचा अधिकार (कलम २१) आणि आपली संस्कृती आणि धर्माचा व्यवहार आणि प्रचार करण्याचा अधिकारच जर बुलेट ट्रेनमुळे मारला जात असेल तर आपण सर्वांनी बुलेट ट्रेनला विरोध करण्याची गरज आहे . दोन-अडीच वर्षांपासून एक टक्काही जमीन संपादित न होऊ देण्यात आंदोलनाने यश मिळविले असून हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत सरकारला मागे घेण्यास भाग पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बुलेट ट्रेन च्या ऐवजी भारतीय रेल्वेचा विकास व्हावा अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply