वंचित बहुजन आघाडी बी टीम कशी – दीनानाथ मनोहर


गेल्या काही दिवसांपासून, वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातून मिळणारा प्रतिसाद वाढतोय, असं दिसायला लागल्याबरोबर एका बाजूला वंचित बहुजन आघाडी ही भाजपा-शिवसेनेची बी टीम आहे,अशी टीका सुरू झालीय आणि दुसऱ्या बाजूला मोदी भाजपा परत सत्तेत येऊ नये ह्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं कॉंग्रेस -राष्ट्रवादी बरोबर (गरज असल्यास थोडं फार नमतं घेऊन) आघाडी करावी,असा महाराष्ट्रातील राजकीय ( की निवडणूक) तद्न्य कधी एकेकटे तर कधी चारचौघांची टोळी करून सल्ला देऊ लागलेत, किंवा आवाहनं करू लागलेत.
आता हे वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणताहेत, तर कुठेतरी ए टीम असायला हवी, ही ए टीम कोणती असावी? असा प्रश्न पडणं अटळचं होतं. पण ह्या ए टीमबद्दल कुणी काही बोलतचं नाहीयेत असं लक्षात आलं. तेव्हा मुळात हे बी टीम प्रकरण काय आहे, ह्याचा शोध घेण्याची गरज वाटल्यान जरा शोध घेतला.
खेळाच्या प्रांतात ए टीम हीच खरी मैदानात लढणारी असते. बी टीमचं अस्तित्व दोन हेतूंकरता असतं. एक तर बी टीममधून ए ग्रेडचे खेळाडू तयार करून ते ए टीममध्ये पाठवून, ए टीम मजबूत राखणे, दुसरा हेतू म्हणजे अगदी अशी आणिबाणीची स्थिती निर्माण झाली की, ए टीम मैदानात उतरूच शकत नाही, तेव्हा बी टीमने ए टीमची जागा घ्यायला सज्ज असणे.
आता लष्कराच्या प्रांतात ए टीम म्हणजे अशी सैनिकांची टोळी जी प्रथम शत्रूला दुबळं करण्यासाठी, हरविण्यासाठी मैदानात पुढे होते. अर्थातच ही ए टीम अत्यंत कार्यक्षम असायला हवी हे अभिप्रेतचं आहे. परंतु त्याचबरोबर बी टीमदेखील आणिबाणीच्या परिस्थितीत ए टीमचं काम आपल्या खांद्यावर घेऊन पुरं पाडण्यापुरती सक्षम असावी लागते.
थोडक्यात खेळाचं मैदान असो, वा लढण्याचं रणांगण असो, ए टीम आणि बी टीम ह्यांच्यात आपलेपणाचं नातं असतं, त्यांच्यात संवाद असतो, देवघेव असते. पण येथे जर वंचित बहुजन आघाडी, भाजपाची बी टीम असेल तर ए टीम कोणती असणार? ए टीम म्हणजे शीवसेना असायला हवी. शिवसेना व वंचित बहुजन आघाडी ह्याचं नातं ए व बी टीमसारखं असल्याचं पूर्वी दिसलेले नाही, आताही दिसत नाहीये. दुसरी शक्यता आहे ..ही ए टीम म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना सत्तेवर विराजमान होण्याआधीच भाजपाला आपला राजकीय पाठींबा व्यक्त केला तो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष.. पण इथं पाहिलं तर ही ए टीम, राष्ट्रवादी पक्ष , बी टीमला बिलकूल प्रतिसाद न देता, हातावर हात ठेवून थंड नजरेने भलतीकडेच बघत दुर्लक्ष करताना दिसतोय. थोडक्यात हे बी टीम प्रकरण काही लक्षात आलं नाही राव.

सौ.सोशल मीडिया

Leave a Reply