कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी पुढे येऊ नये यासाठीच ब्राम्हणाच्या सोयीचा मुस्लीम-द्वेष्टा गो-ब्राम्हण प्रतिपालक शिवाजी रंगवला गेला

कॉ. विलास सोनवणे

Google Image

महात्मा फुल्यांनी कुणबी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन शोधल्यानंतर महाराष्ट्रातल्या ब्राम्हण मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांची उपयुक्तता कळली आणि त्यांच्या लक्षात आल की कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी पुढे सरकला तर त्यांच्या राजकारणाला धोकादायक ठरेल त्यामुळे त्यांनी ब्राम्हणाच्या सोयीचा मुस्लीम द्वेष्टा गो-ब्राम्हण प्रतिपालक शिवाजी रंगवायला सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाल्यानंतर कम्युनिष्ट ब्राम्हण आणि समाजवादी ब्राम्हणांनी सेक्युलर शिवाजी जन्माला घातला. आता महाराष्ट्रात तीन शिवाजी आहेत. ब्राम्हणी शिवाजी तो भाजप – आर एस एस शिवसेनेचा आहे. कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांचा सेक्युलर शिवाजी आहे. तिसरा शिवाजी फुल्यांनी शोधलेला कुळवाडी भूषण शिवाजी तो खरा आहे. महाराष्ट्रात शिवाजींच्या पूर्वी चारशे वर्षे जी सामजिक घुसळण होती, त्याचा अभ्यास केल्यानंतर शिवाजी कोण होता याच उत्तर मिळेल. त्यामुळे शिवाजी पूर्वी चारशे वर्षे महाराष्ट्रात जे सांस्कृतीक राजकारण आकाराला आला त्याचा अभ्यास करावा लागेल. 

पुष्यमित्र शृंग याने हिंसेच्या मार्गांने बुद्धिजम संपवल्यानंतर समतावादी तत्त्वज्ञानाची पोकळी निर्माण झाली. ती पोकळी इस्लाम आणि सुफिंनी सातव्या शतकापासून भरायला सुरुवात केली. बाराव्या शतकात आधी तुर्क नंतर अरब आणि मोगल यांनी इस्लामला अभिप्रेत नसलेल्या वर्गवाद आणला. त्यामुळे इथल्या बहुजनांनी आणि समतावाद्यांनी आपले पर्याय शोधायला सुरुवात केली. त्याच्यातून दक्षिण भारतात महानुभाव, लिंगायत व वारकरी संप्रदाय निर्माण झाले. या तिन्ही पंथांनी सुफिंचा समतावाद कायम ठेऊन आपली नाळ बुद्धाशी आणि जैनांशी जोडली. हे जोडताना आपोआप भाषेचा प्रश्न आला. तो पर्यंत महाराष्ट्रातला अभिजन वर्गाने संस्कृतला फारसी भाषेची जोड द्यायला सुरुवात केली होती. . त्याच्या विरोधातला असंतोष भारतीय उपखंडात भाषिक राष्ट्रवादाचा पाया घालून गेला. महानुभावांनी ‘लीळाचरित्र’ हा मराठीतला पहिला ग्रंथ तेराव्या शतकात लिहिला. लीन्गायातांनी कानडीचा आधार घेत कानडी राष्ट्रवादाचा पाया घातला. तेराव्या शतकात महानुभाव पंथाच्या नंतर नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. त्यांना संन्याशाचा पोरगा म्हणून हिणवल्या गेलेल्या ज्ञानेश्वरांनी साथ दिली. ज्ञानेश्वरांनी मराठीत ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली, आणि ‘ज्ञानेश्वरी’ लिहून त्यांनी मराठी राष्ट्रवादाचा पाया घातला. मुक्ताबाई, जनाबाई आणि माद्सा यांनी स्त्री वादाचा पाया घातला. या घटनांनी महानुभाव आणि वारकरी यांनी सुरु केलेल्या मराठी राष्ट्रवादाचा प्रश्न अधिक अधिक प्रखर होत गेला.

भारतात उदयाला आलेल्या भाषिक राष्ट्रवादात त्यांचे संबंध सलोख्याचे होते. नामदेवांनी महाराष्ट्रात काम केले. तसेच त्यांनी तीस वर्षे पंजाबात घालवली. त्यांच्याशिवाय शिखांचा धर्मग्रंथसाहिब’ पूर्णच होत नाही. असे म्हटलं जात कि चोखोबांना घेवून नामदेव पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेले. त्यामुळे पंढरपुरचे ब्राम्हण चिडले. त्यांनी नामदेवाला मारेकरी धाडले. जीव वाचवण्यासाठी नामदेवाला परागंदा व्हावे लागले. तिस वर्षे नामदेवांनी पंजाबात घालवली. त्याकाळात त्यांच्या संबंध गुरुनानाकांशी आला. रहीम, बुल्लेशहा इत्यादी सुफी संतांशी आला. महाराष्ट्रात चोपन्न मुस्लीम संत मराठीत लिहितात हा अपघात नाही. अलीकडे विसाव्या शतकात सातारा जिल्ह्यातील पाचशे गावात ‘ज्ञानेश्वरी’ चे पारायण अकबर बाबांनी सुरु केले. ह. भ. प. डॉ. फडतरे महाराज त्यांचे शिष्य आहेत. हि जी घुसळण झाली त्याचा सर्वोच बुरुज संत तुकाराम महाराज आहेत. त्यांच्या शिष्या बहिणाबाई अस लिहितात, “कलियुगी बुद्धरूप धरि हरी, तुकोबा शरिरी प्रवेशला.” तुकोबांनी मराठी प्रमाणेच दख्खनी मध्ये अभंग लिहिले. छत्रपती शिवाजी महाराज हे नामदेव, एकनाथ, आणि तुकाराम पर्यंत जी सांस्कृतीक घुसळण झाली त्याचा राजकीय अविष्कार आहेत.

खर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शंभर वर्षी पूर्वीच विजापूरच्या आदिलशहाने त्याच्या राज्याची राज्यभाषा म्हणून मराठीला मान्यता दिली होती. आदिलशाही आणि नगरची निजामशाही हि सरंजामी होती. त्यांच्यापुढे तोच जाऊ शकतो जो सरंजामशाही नाकारेल. म्हणून शिवाजी महाराजांचे राज्य रयतेचे राज्य होते. छत्रपती शिवाजींनी त्यांना विरोध करणारे वतनदार संपवले. जे वतनदार त्यांच्या बरोबर होते त्यांचे अधिकार कमी केले. पुणे बसवताना जिजाऊ मातांनी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, जमिनिसोबत औत, नांगर, बैलाच्या जोड्या अशी उत्पादनाची साधने दिली. यातून एक नवीन व्यवस्था निर्माण झाली. या नव्या व्यवस्थेत राजा कल्याणकारी झाला. लोकशाहीमध्ये जी कल्याणकारी राज्याची संकल्पना असते त्याचा पाया शिवाजी महाराजांनी घातला होता. इस्लाम आपल्याकडे सातव्या शतकात आला. इस्लामने लोकांना निर्णय कसे घायचे हे शिकवले. बहुमत म्हणेल ते निर्णय, अल्पमताने त्याला शरण जायचे. विसाव्या शतकात लेनिननी लोकशाही केंद्रीकरणाची संकल्पना आणली. . त्याचा पाया इस्लामने सातव्या शतकात घातला होता. तुर्क, अरब आणि मोगल यांनी आणलेली संकल्पना याच्या विरोधात होती. ती वर्गवादी होती, बादशाही होती. त्या इस्लामच्या मूळ संकल्पनांच्या विरोधी होत्या. त्यामुळे भारतात इस्लाम आणि मुस्लीम राज्यकर्ते विरोधाभास होता. शिवाजीच्या पूर्वी हि अवस्था होती. त्यामुळे इस्लामला मानणारे मराठी मुसलमान शिवाजी महाराजांच्या सपोर्ट मध्ये होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात तीस मुस्लीम सरदार होते. शिवाजी महाराज मुस्लीम द्वेष्टे नव्हते यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे.

भारतात बुद्धकाळापासून भाषा, भाषेच केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरन हे महत्वाचे मुद्दे राहिले आहेत. भारतातली ब्राह्मण परंपरा नेहमीच केंद्रीकारानाच्या बाजूने राहीली आहे. सर्व सामान्य जनता विकेंद्रीकरणाच्या बाजूने आहे. शिवाजींच्या काळात औरंगाजेब केंद्रीकरणाचा प्रतिक होता. तर शिवाजी महाराज विकेंद्रीकरणाचे प्रतिक होते. सुफी, वारकरी, महानुभाव, लिंगायत सगळी भक्तीची चळवळ विकेंद्रीकरणाच्या बाजूने आहे. त्यामुळे औरंगजेब आणि शिवाजींचा लढा केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण असा लढा आहे. बाराव्या शतकापासून अनेक भाषा समृद्धपणे पुढे आल्या. तेव्हांपासून केंद्रीकरण विरुध्द विकेंद्रीकरण या लढ्याला भाषेच्या सांस्कृतिक राजकारणाचे स्वरूप आले. ते आजपर्यंत चालू आहे. सध्या बीजेपी केंद्रिकरणाच्या बाजूने आहे पण उदारमतवादी आहे. कलकत्याला जी ममता बनर्जी यांची ब्रिगेड ग्राऊंड मुद्दा होता.
बुद्धकाळापासून वर्तमानकाळापर्यंत केंद्रीकरण व विकेंद्रीकरण हा संघर्षाचा मुद्दा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेब केंद्रीकरणाचे व शिवाजी महाराज विकेंद्रीकरणाचे प्रतिक होते. ब्रिटीश केंद्रीकारणाच्या बाजूने तर गांधी विकेंद्रीकरणाच्या बाजूने होते.

http://www.aasantosh.com

एक मुद्द्याची चर्चा केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. शिवाजी महाराजांच्या शंभर वर्षे पूर्वी इंग्रज भारतात आले होते. पश्चिम किनाऱ्यावर इंग्रज येवून शंभर वर्षे झाली होती. त्यामुळे इंग्रजाच्या रूपाने युरोपातील भांडवलशाही भारतात आली होती. त्यामुळे औरंगजेब सनातनी सरंजामदाराचा प्रतिक होता, तर शिवाजी महाराज मराठी राष्ट्रवादाचे प्रतिक होते आणि ब्रिटीश युरोपियन भांडवलशाहीचे प्रतिक होते. मोगलांच्या काळातील जातीय उत्पादन युरोप सारखे नव्हते. भारतात व्यवसायानुसार जाती विभक्त होत्या. उत्पादनाची साधन, जमीन सोडून जातीच्या मालकीची होती. जे कास्तकार शेतकरी होते जमीन त्यांच्या मालकीची नव्हती. पुणे वसवताना जिजाऊ मातांनी राजा म्हणून जमीन वाटली. आणि जमीन कसण्यासाठी साधने दिली. जमिनीच्या उत्पादनावर प्रोसेसिंग करण्यासाठी ज्या जाती प्रोसेसिंग करत होत्या त्यांना उत्पादनाची साधने वाटली असा उल्लेख नाही. म्हणजे पिंजारी, विटकर, कुंभार, लोहार, मांग, सुतार, गवंडी, चांभार, यांना साधने वाटल्याच उल्लेख नाही. याचा अर्थ ती उत्पादानाची साधने जातीच्या मालकीची होती. यातून निर्माण होणारे जे वरकड होते त्यांच्यावर व्यापारी म्हणून आणि राजा म्हणून त्यांचा अधिकार होता. आकाबारापुर्वी पर्शियन भाषेतला कारखाना हा शब्द इथल्या भाषांमध्ये प्रचलित होता. कारखाना म्हणजे एक विशिष्ठ उत्पादन करणार ठिकाण. कारखान्यात कपड्यापासून बंदूक तोफांपर्यंत उत्पादन होत असत असे उल्लेख आहे.

अकबराच्या काळात भारताचा जागतिक व्यापारात चोवीस टक्के वाटा होता. म्हणून युरोपियन इथे आले. उत्पादनाची साधन जातीच्या मालकीची व वरकड व्यापाऱ्याच्या व राज्याच्या मालकीची हि व्यवस्था युरोप पेक्षा वेगळी होती. हे यासाठी समजून घ्याव लागत. इथल्या उत्पादक जाती सापेक्षपणे त्याच उत्पादन करताना स्वतंत्र होत्या. अशी परिस्थिती युरोपात नव्हती. यामुळे भारतात उत्पादनाच्या संबंधात सापेक्ष विकेंद्रीकरण होत. प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांच्या मताप्रमाणे भारतीय भांडवलशाहीची सुरुवात मोगल काळापासून झाली होती. त्यानुषंगाने इथे विकेंद्रकारणाचा अर्थ युरोप पेक्षा वेगळा होता हे समजून घ्याव लागत. त्याशिवाय इथले संघर्ष कळत नाहीत. जातीय विकेंद्रीकरण आणि सुफी भक्ती चळवळीचे संबंध समजायला याची मदत होते. उत्पादक जाती सापेक्ष पणे स्वतंत्र होत्या, त्यामुळे जे मत पटेल ते स्वीकारण्यास त्या मोकळ्या होत्या. या परिस्थितीचा फायदा शिवाजी महाराजांना मिळाला. बुद्धापासून भक्ती व सुफी चळवळी पर्यंत ओबीसींनी त्यांचे उत्पादनातील स्थान याचा राजकीय मतासाठी उपयोग करून घेतला. औरंगजेबाचे केंद्रीकरण डोईजड झाल. जनता राष्ट्रवादी झाली. नेता मिळाल्यानंतर त्यांनी राज्य निर्माण केल. त्याच्यामध्ये धर्माचा संबंध नव्हता. त्याचा फायदा शिवाजी महाराज यांना झाला. अशाप्रकारे शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद पुढे सरकला.

भांडवलशाहीत माणूस आणि उत्पादन यांच्यात परात्मभाव असतो. भारतातल्या सगळ्या उत्पादन पध्दती परत्माभावाच्या विरोधात विकसित झाल्या. जैनांचे व बुद्धाचे सगळे तत्त्वज्ञान हे परत्माभावाच्या विरोधात आहे. माणसाने जेव्हांपासून निसर्गावरच अवलंबित्व कमी करायला सुरुवात केली, त्यासाठी गतीचे नियम शोधले, तेव्हा पासून परात्मभावाचा प्रश्न निर्माण झाला. जीन म्हणजे शरीर. जैनांनी दोन नियम शोधले. एक म्हणजे निसर्गापासून वेगळ होता कामा नये. दुसरा नियम, निसर्ग अनेकांतवादी असतो. पहिल्या नियमानुसार शरीर निसर्गापासून वेगळे न करण्याच्या नादात जैनांनी विज्ञान नाकारलं. त्याचवेळेला निसर्गात अनेकांतवादी म्हणून विज्ञान स्वीकारल. या विरोधाभासामुळे समाजात गोंधळ निर्माण झाला. तो गोंधळ सोडवण्यासाठी बुद्धाला विज्ञानवादी व्हाव लागल. बुद्धाच्या काळात तंत्रज्ञान एवढे विकसित झाल नव्हते. बुद्धामुळे तंत्रज्ञानाच्या विकासात भर पडली. तंत्रज्ञान आणि श्रम व विज्ञान आणि श्रम अशी व्यवस्था भारतात उदयास आली. ती म्हणजे जात व्यवस्था. जात हा शब्द अरबी आहे. कास्ट हा शब्द पोर्तुगीज आहे. जाती व्यवस्थेपासून कास्ट सिस्टम पर्यंतचा प्रवास इंट्रेस्टिंग आहे. आज तो विषय नसल्यामुळे त्याची चर्चा करत नाही.

भारतात युरोपमधून पहिले पोर्तुगीज आले. त्यांना इथे जी समाज व्यवस्था दिसली त्या समाजव्यवस्थेला त्यांनी कास्ट सिस्टम म्हटल. कास्ट अपरिवर्तनीय आहे. तुम्ही ज्या जातीत जन्माला शतकात पुष्यमित्र शृंगाने हिंसेच्या मार्गाने बुद्धीजम संपवले आणि ब्राम्हणांच प्रभुत्व निर्माण केल. आधी सुफी, त्यांच्यापासून प्रेरणा घेत तेराव्या शतकापासून कास्ट सिस्टमच्या विरोधात संघर्ष सुरु झाले. शिवाजी महाराजांच्या काळात हे संघर्ष शिगेला पोहोचले होते. रयत हा शब्द जातीव्यवस्थेला पर्यायी आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात जैनांपासून सुरु झालेला विषमतेच्या विरोधातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. त्याच राजकीय प्रतिक शिवाजी महाराज झाले. त्यानंतर संभाजी महाराज झाले म्हणून संभाजी महाराजानंतर सत्तावीस वर्ष रयतेचे राज्य टिकवण्यासाठी रयत स्वत: लढली. राजाराम यांनी जातिव्यवस्थेशी कॉम्प्रमाईज केल. त्यामुळे मराठी राज्य साम्राज्य झाल पण त्याचा विषमतेच्या विरोधातला आशय संपला.

लेखक जेष्ठ विचारवंत असून मुस्लिम ओबीसी चळवळ व मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे एक संस्थापक आहेत. लढता लढता केलेल्या चिंतनातील काही,बहुजन स्त्रीवादाच्या दिशेने,मुस्लिम प्रश्नाची गुंतागुंत हि पुस्तकसंपदा त्यांचे नावावर आहे.

(मराठा संस्कृती साहित्य मंडळ,लातूर द्वारा प्रकाशित भिमराव गडेराव,अभिजीत गणापुरे संपादित “मराठी राष्ट्रवादाचा प्रणेता कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज ” या आगामी लेखसंग्रहातून साभार)


Leave a Reply