राजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू

डॉ. सोपान शेंडे, 

Image Courtesy: Pinterest

जातिविरहीत समाजनिर्मितीच्या प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्विकारलेल्या सामाजिक ऐक्याच्या धोरणाचा ऐतिहासिक मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे.

भारत हा प्राचीन संस्कृती असलेला एक महत्वपूर्ण असा पौर्वात्य देश आहे. या देशाची प्राचीन संस्कृती जशी देशाचे भूषण आहे. तसेच  निरनिराळया कालखंडात या संस्कृतीला विविध कारणांनी विकृत स्वरूप  प्राप्त  झाले होते,  हे ऐतिहासिक सत्य नजरेआड करता येत नाही. त्यामध्ये हिंसेचे वाढते प्रमाण, धर्म, पंथ, व्यवसाय इत्यादींमधून निर्माण झालेली सामाजिक विषमता, जातियता, लिंगभेद व स्वार्थावर आधारलेली पुरुषप्रधान संस्कृती. त्याचे फलीत म्हणून समाजात उदयाला आलेला आणि धर्म व संस्कृती यांच्या नावाखाली दृढ केलेला स्त्री- पुरूष भेद, इत्यादींचा समावेश करता येतो. त्याचे दुष्परिणाम सामाजिक ऐक्य, सौहार्द, परस्परातील प्रेमभाव इत्यादींवर होऊन समाजात विविध वैगुण्ये निर्माण झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी व संस्कृतीच्या शुद्धीसाठी अनेक महामानवांनी निरनिराळया मार्गांनी प्रयत्न केले. मानवता व विश्वव्यापकत्व यांसारख्या संकल्पनांच्या रक्षण व संवर्धनासाठी निरनिराळया कालखंडात ज्यांनी प्रयत्न केले,  त्यामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमबुद्ध, वर्धमान महावीर, उत्तरेतील संत रामानंद आणि त्यांचा शिष्यसंप्रदाय, महात्मा बसवेष्वर आणि त्यांचा वीरषैव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि त्यातील स्त्री- पुरूष संत; (संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत तुकाराम, श्रीगोंदयाचे संत शेख महंमद,) इत्यादींसारख्या संत-महात्म्यांचा समावेश करता येतो. एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,  महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींसारख्या समाजसुधारकांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी आपल्या विचारांच्या, साहित्याच्या व आचरणाच्या माध्यमातून मानवताधर्माचा जागर केला. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामाजिक ऐक्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील (मराठी भाषिक  प्रदेशातील) माणूस उभा करण्याचे महत्वपूर्ण कार्य करून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रांती केली.

प्रस्तुत विषयाची मांडणी करताना शिवकालीन समाज व संस्कृतीवर भाष्य करणारे अभ्यासक डॉ. शं. दा. पेंडसे यांनी केलेल्या चिंतनाचा आढावा घेणे विषय मांडणीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. शिवाजी निबंधावली मध्ये डॉ. शं. दा. पेंडसे यांनी  ‘शिवकालीन संस्कृती आणि धर्म’ असा मथळा असलेला लेख लिहिला. त्यामध्ये , एखादया राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास शोधावयाचा असेल तर त्या राष्ट्राच्या भौतिक इतिहासाबरोबरच आत्मिक किंवा मानसिक इतिहासाचा छडा लावला पाहिजे. राष्ट्राच्या कर्त्या पुरुषांच्या  कृत्यांनी राष्ट्राचा भौतिक इतिहास बनतो व त्या कृत्यामागे जे प्रेरक हेतू असतात त्या हेतूंच्या योगाने राष्ट्राचा आत्मिक अथवा मानसिक इतिहास तयार होत असतो. ज्या हेतूंनी आणि भावनांनी प्रेरित होऊन राष्ट्रातील कर्ते पुरुष आपले व्यवहार करीत असतात, त्या हेतूंच्या आणि भावनांच्या श्रेष्ठ कनिशष्ठतेवरून त्या राष्ट्राची संस्कृति श्रेष्ठ की कनिष्ठ ठरत असते. नुसत्या भौतिक इतिहासाने राष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. नुसत्या भौतिक इतिहासावरून काढलेली अनुमाने पुष्कळ वेळा चुकीची असतात.  कारण राष्ट्रीय कृत्याचा बरेवाइर्टपणा त्यांच्या केवळ बाहय स्वरूपावरून ठरत नसून त्याच्या मागे असलेल्या हेतूवरून ठरत असतो. हे हेतू कितपत सुसंस्कृत होते हे जोपर्यंत पाहीले जात नाही तोपर्यंत भौतिक इतिहासाची विचिकित्सा नीट करिता येत नाही. (शिवाजी निबंधावली-१, शिवचरित्र कार्यालय पुणे, १९३०, पृ. २५ – २६) प्रो. पेंडसे यांनी या लेखात संस्कृतीचा अर्थ स्पष्ट करताना असे लिहिले आहे की, ‘… मनुष्याच्या अंतःकरणावर सुसंस्कार करून, त्याला हळूहळू देवत्वाकडे नेणारे जे आचारविचार (असतात), त्यांना संस्कृती असे म्हणता येईल…’ एखादा मनुष्य कितपत सुसंस्कृत किंवा सभ्य आहे हे जसे त्याच्या आचारविचारांवरून समजते, त्याप्रमाणे राष्ट्रीय आचारविचारांवरून राष्ट्रीय संस्कृति कळून येते. शिवकालीन संस्कृतीचे स्वरूप पाहण्यासाठी शिवकालीन महाराष्ट्रातील पुढा-यांनी जनतेसमोर ठेविलेली अधिभौतिक व आध्यात्मिक ध्येये काय होती व त्यांना अनुसरून त्यांचे व जनतेचे आचरण होते किंवा नाही या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. शिवकाली उदात्त ध्येये, उच्च भावना, स्वार्थत्याग वगैरे शब्दावडंबर नसेल पण त्या शब्दांनी व्यक्त होणा-या भावना जागृत झाल्या होत्या. आज आमच्यात हे शब्द मात्र आहेत व भावनांचा पूर्ण अभाव आहे. तेजस्वी कृतीत पर्यवसित होणा-या जाज्वल्य भावनांचा पूर्ण अभाव झाला असून आम्ही सर्व पोटाळ बनलो आहे. शिवकालीन महाराष्ट्रापुढे काही उच्च ध्येये होती. मराठयांच्या पोटाची भूक त्याकाळी चांगल्या रितीने शमत होती. मराठयांना शिवकाली जी भूक, जी तळमळ लागली होती ती पोटाची नव्हती, मनाची होती आणि ही भूक, ही तळमळ शमविण्याकरिताच हजारो तरूणांनी, सुखाचे जीव दुखाःत घातले. शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी हे सर्व सुखवस्तु लोक होते. त्यांच्या समोर श्रेष्ठ ध्येय होते. स्वधर्माचा राजा सिंहासनावार पाहण्याची त्यांच्या मनाला भूक लागली होती. स्वधर्माच्या दैन्यावस्थेमुळे त्यांची मने तळमळत होती आणि स्वधर्मस्थापनेचे ध्येय त्यांच्या समोर होते. याबाबत सप्तप्रकरणात्मक चरित्रात महाराजांचा हेतू पुढील प्रमाणे दिला आहे.-, ‘‘वडिलांनी मिळविले ते खाऊन राहणे योग्य नाही. आपण हिंदु, दक्षिणदेश म्लेच्छांनी ग्रासिला. देव, क्षेत्रे, गाई यांस बहुत पिडा झाली. धर्म अगदी बुडाला. तेंव्हा धर्मरक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षावा..’’ हा उल्लेख मोठा बोलका व शिवाजीराजांचा हेतू स्पष्ट करणारा आहे.’(पेंडसे पृ.२६-२७) याच लेखात प्रो.पेंडसे यांनी शिवकालीन समाजाचे धुरीन म्हणून क्षत्रिय मराठे, विद्वान ब्राह्मण, संत व सत्पुरूष यांचे विचार, कार्य व कर्तृत्व यांचा मागोवा घेतला आहे. त्यातून त्यांची भूमिका व हेतू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्व बाबी छत्रपती शिवाजी महाराज व तत्कालीन समाजधुरीण यांची भूमिका व कार्य स्पष्ट करण्यास उपयुक्त ठरू शकतील.

शिवकालीन सामाजिक स्थिती:-

छत्रपतींच्या काळातील समाज हा वतनदार, मिरासदार, बलुतेदार आणि उपरी यांचा मिळून बनलेला होता. सतराव्या शतकात आणि तत्पूर्वी खेडे हे सामाजिक व अर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू होते. गावात चार प्रकारच्या सत्ता रूढ होत्या. गावच्या लोकसंखेत प्रामुख्याने मिरासदारांचा भरणा होता. तसेच गावाचा विकास आणि स्थैर्यात बलुतेदारांची भूमीका महत्वाची होती. त्यात प्रामुख्याने कारागिर, सेवकवर्ग व धार्मिक सेवा करणारे- जोशी, गुरव, ठाकूर, मुलाणा, जंगम, यांचा समावेश होता. गावात बलुतेदारांखेरीज इतरही व्यावसायिक राहात असत. त्यांना अलुतेदार म्हणत. त्यात – घडशी, डवर गोसावी, गोंधळी, शिंपी, माळी, तेली, तांबोळी इत्यादिंचा समावेश होता. कवी परमानंदाच्या ‘शिवभारत’ या ग्रंथात, सतराव्या शतकातील व्यवसाय व व्यवसायीकांचे नामोल्लेख येतात. समाजात ब्राह्मणाला विशेष महत्व होते. धार्मिक व सामाजिक जीवनात त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते, असे दासबोधातील उल्लेखांवरून दिसते. इटालियन प्रवासी पीटर डेला व्हेला याने आपल्या प्रवासवर्णनात, ‘ ब्राह्मण हे दुस-या कोणत्याही जातीच्या घरी जेवत नाहीत.’ असा उल्लेख केलेला आहे, असे असले तरी मुस्लीम राजवटीत ब्राह्मणांनी आपले आचार विचार, स्नान – संध्यादि कर्मे सोडून मुस्लीमांची सेवा करण्यात धन्यता मानल्यामुळे अधर्म होऊन पाप वाढले, असे संत रामदास व संत तुकाराम यांनी तत्कालीन समाजस्थितीच्या केलेल्या वर्णनात म्हटले आहे. ‘शिवाजीवर ब्राह्मणांचा प्रभाव आहे.’ असे जॉन फ्रायरने प्रवास वर्णनात नमूद केले आहे. तसेच शिवाजीच्या सामान्य प्रजेविषयी तो असे लिहितो की, ‘ प्रजाजनांचा धर्म हिंदू असून, त्यांच्यात थोडे मुसलमानही आहेत.’  समाजात विटाळाची कल्पना प्रभावी होती. कनिष्ठ जातीचा स्पर्श होणे, त्यांचे अन्न खाणे, दुस-या जातिधर्माच्या व्यक्तिच्या घरी राहिल्यास किंवा त्याला घरी ठेवल्यास ती व्यक्ति व कुटुंब भ्रष्ट झाले, असे मानीत असत. संत रामदासांनी आपल्या वाङमयातून समाजातील विटाळवेडाच्या कल्पनेवर आघात केलेला आढळतो. ब्राह्मणांव्यतिरीक्त इतर समाजातील लोकांनी अध्ययन, अध्यापन करावे व ब्राह्मण वर्गातील लोकांनी त्यांना गुरू मानावे हे ब्राह्मणांना मान्य नव्हते. तत्कालीन समाजात धर्माच्या व देवाच्या नावाने भिक्षा मागणारे, तसेच अध्यात्मापेक्षा लोकांना फसवून स्वतःचे पोट भरण्याकडे कल असलेले, बाह्यांगी टिळे, माळा, मुद्रादि वेष  धारण करणा-या सौरी, वाघ्या-मुरळी, वासुदेव, बाळसंतोष, पांगूळ, दिवटा, डवरी, कानफाटया, बैरागी, पिंगळा, बहुरूपी, सरवदे, कैकई, मुंडा, डोइफोडा, मैंद इत्यादी लाकांचे उल्लेख येतात. त्यांच्या ढोंगीपणावर संत रामदास व संत तुकाराम यांनी टिका केल्याचे आढळून येते. लोक आपल्या जातीतच लग्न करीत असत. तत्कालीन समाजात कन्या विक्रय केला जात असावा. समाजात एकच लग्न करण्याची प्रथा होती. परंतु बायको मेल्यावर दुसरी बायको करीत असत. राजे, सरदार, जहागिरदार व वतनदार लोक मात्र अनेक बायका करीत असत. पुरूष दुसरे लग्न करीत परंतु स्त्रियांना तशी परवानगी नव्हती. अर्थात याला समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांचा अपवाद होता. पतीच्या निधनानंतर स्त्रिया दुसरा विवाह करू शकत असत. त्यास पाट लावणे, गंधर्व लावणे असे म्हणत असत. समाजात सतीची प्रथा रूढ होती. प्रामुख्याने वरिष्ठ वर्गातील, राजा व सरदारयांच्या स्त्रिया सती जात असत. पीटर डेला व्हॅला याच्या प्रवास वर्णनात, जयकामा नावाची स्त्री सती जाताना त्याने पाहिली. तसेच सतीचे पावि़त्र्य सर्व जातीत सारखेच होते,  असा उल्लेख येतो. धार्मिक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग होता. समाजात वेठबिगारीची पद्धती होती. धार्मिक स्थळे व वतनदार, यांच्या घरी गावातील सेवकांना वेठबिगारी करावी लागे.

शिवकालीन समाजजीवनाचा ऐतिहासिक मागोवा घेताना  प्रो. शं. दा. पेंडसे यांनी आपल्या ‘शिवकालीन संसकृती आणि धर्म’ या लेखात वि. का. राजवाडे यांनी सतांच्या कार्याविषयी मांडलेल्या व काळाच्या ओघात बदलत गेलेल्या मतांचा मागोवा घेतला आहे. त्याबाबत पेंडसे असे लिहितात की, ‘…ग्यानबा-तुकारामांनी महाराष्ट्राला पंगू बनविले असा अक्षेप संतांचे वाड;मय वाचून राजवाडयांनी संतावर घेतला होता व नुसते वाड;मय वाचून तसाच ग्रह पुष्कळांचा होईल असे वाटते. पण एकांगी ज्ञान हे पुष्कळ वेळा सदोष असते. संतांनी जो उपदेश केला तो देशाच्या कोणत्या परिस्थितीत केला? यापेक्षा निराळा उपदेश त्यावेळेस करणे शक्य होते की नाही, लोकांची त्यावेळची मनःस्थिती कशी होती? याचा संपूर्ण इतिहास ज्या वेळेस राजवाडयांनी पाहिला तेंव्हा संतांनी केले हेच पुष्कळ केले असे त्यांना वाटले व त्यांनी आपले मत बदलले. १९०० साली लिहिलेल्या चौथ्या खंडाच्या प्रस्तावनेत, संताळयावर त्यांनी प्रखर टिका केली होती; पुढे १९०३ साली प्रसिद्ध झालेल्या सहाव्या खंडाच्या प्रस्तावनेत त्यांचे मतांतर होत आहे असे दिसले. व १९१० साली पुण्याच्या शिवराज्याभिषेकोत्सवांत वाचलेल्या ‘शिवकालीन समाजरचना’ या निबंधात त्यांचे पूर्ण मतांतर झाल्याचे आढळून आले. राजवाडयांनी उत्पन्न केलेल्या पूर्वपक्षाचा उत्तरपक्षही त्यांनीच केलेला असल्यामुळे त्यांच्या निबंधातील उताराच येथे देतो. ‘‘अठरापगड जातीचे ब्राम्हण, क्षत्रिय वैश्य व शूद्र स्वधर्मभ्रष्ट झाले असता ते बहुतेक मुसलमान बनल्याससारखे झाले. इतकेच की, त्यांनी सुंतेची दीक्षा मात्र घेतली नाही, तीहि त्या काळी घेतली असती. परंतु त्यांच्या आड एक मोठी धोंड आली. ती धोंड म्हणजे राष्ट्रातील साधुसंत होत. भांडणे, तंटे, अपेयपान, अभक्षाभक्षण यांचे साम्राज्य सर्वत्र मातलेले पाहून ही बजबजपुरी ताळयावर यावी या श्रद्धेतून, साधूसंतांनी सर्वांना सहजगम्य व सुलभ असा भक्तिमार्ग सुरू केला. अशा सद्हेतूने की, कसेही करून हे लोक हिंदुत्वात रहावे आणि अशा सदाशेने की, पुढेमागे लोकोत्तर अवतारी पुरूष निपजलाच तर त्याच्या द्वारा हे लोक पुनः धर्म व कर्मनिष्ठ बनण्याचा संभवा रहावा. असा प्रकार साधूसंतांनी केला. स्नान, संध्या, जपजाप्य, प्रायश्चित, धर्माधर्म यांच द्वेष अज्ञ लोकांच्या ठायी होता. त्या द्वेषाला साधूसंतांनी गुणांचे स्वरूप दिले. ‘स्नानसंध्या टिळेमाळा’ या ढोंगांची आमच्या या भक्तिमार्गात जरूरी नाही असा पुकारा त्यांनी केला आणि भगवत नामस्मरणाचा साधा मंत्र जो भेटेल त्याला देण्याचा सपाटा चालविला. मुमुक्षु, नामस्मरणाने आकृष्ट झाला म्हणजे, त्याला नवविधा भक्तिची माहिती देत. त्यात शुचिीर्भूतपणे कसे रहावे, सत्य, अहिंसा इत्यादी धर्म कसे पाळावे वगैरे हिंदुधर्मातील विधिनिषेधाची ओळख करून दिली जाई. वर्णाश्रमधर्माचे  फारसे नाव काढीत नसत. फक्त कुलधर्म, जातिधर्म, पितृधर्म पाळण्यात पुण्य आहे एवढेच सांगितले जाई. अशारीतीने, साधूसंतांनी, या भक्तीमार्गाद्वारा, वर्णाश्रमधर्मलोपप्रधान अशी ही महाराष्ट्रातील दुर्दैवी प्रजा, दोन अडीचषे वर्षे आर्यसमाजात मोठया शिताफीने थोपवून धरिली आणि आर्यसंसकृतीचे संरक्षण केले. तेंव्हा आपल्या देशावर त्यांचे उपकार बिनमोल झाले हयात काडीचाही संशय नाही. जर भारतखंडांत व महाराष्ट्रात त्या काली भक्तिमार्ग नसता तर अफगाणिस्थान, इराण वगैरे झाल्याप्रमाणे हया देशातील सर्व प्रजा एकवर्णी मुसलमान झाली असती; आणि आर्यसंस्क्रुती , आर्यसारस्वत, आर्यसमाज, आर्यांचातुर्वर्ण्य , आर्यशील हया जगातून समुळ उच्छिन्न झाले असते.’’  साधूसंतांच्या कामगिरीचे राजवाडयांनी केलेले हे वर्णन, यापेक्षा सुंदर रीतीने क्वचितच करिता येईल.’ (पेंडसे,पृ.४८-४९)राजवाडे यांनी संतांच्या कार्याचे केलेले हे वर्णन शिवकालीन समाजाचे धुरीन या नात्याने संतांनी केलेल्या कार्याची महती स्पष्ठ करणारे आहे.

छत्रपतीकालीन धार्मिक जीवन:-

छत्रपतीकालीन महाराष्ट्रातील धार्मिक जीवनात, छत्रपतीपूर्व काळातील हिंदुधर्म व त्याचे विविध पंथ – उपपंथ, तसेच जैन, इस्लाम, ख्रिश्चन,सुफी इत्यादी धर्म- संप्रदाय या काळात अस्तित्वात होते. या सर्व धर्म – संप्रदायांचे स्वरूप, त्यांचा राज्यकर्ते व समाजावरील प्रभाव इत्यादिंबाबत तत्कालीन साधनांतून उल्लेख येतात.

शिवकालीन धार्मिक जीवनात धार्मिक स्थळे, तिर्थस्थाने, साधू – संत, पिर-फकीर, विद्वान इत्यादींना महत्व दिले जात असे. त्यांचे  महत्व विचारात घेऊन शिवाजीराजाने धार्मिक स्थळांना इनाम, वर्षासने व देणगीच्या स्वरूपात मदत केल्याचे उल्लेख तत्कालीन साधनांमधून येतात. त्यामध्ये हिंदूंची देव-देवळे, साधू-संत, तसेच मुस्लीमांची दर्गे, मशिदी, पीर – फकीर यांचाही समावेश होता. अशा साधू संत व फकीरांमध्ये केळशीचे बाबा याकुत, देहूचे संत तुकाराम, पाटगावचे मौनीबाबा, रामदास स्वामी व रामदासी संप्रदाईक  इत्यादींचा समावेश होता. तसेच स्वतः शिवाजी महाराजांनी साधूसंत, फकीर यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले होते. साधू-संतांचा आदर करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केल्याचे आढळत नाही. शिवजीराजांच्या या धार्मिकवृत्ती व कृतिचा सकारात्मक परिणाम राज्यातील प्रजेवर झाला असावा. साधू-संतांचा आदर करणारा, देव-देवळे यांची दखल घेणारा शिवाजीराजा निश्चितपणे आपले जीवीत व मालमत्तेचे व देव धर्माचे रक्षण करील हा सामान्यांचा विश्वास वाढीस लागून शिवाजी लोकराजा झाला.

http://www.aasantosh.com

शिवाजीराजांनी आपल्या राज्यातील लोकांच्या श्रद्धेनुसार आपल्या प्रत्येक किल्ल्यावर देव – देवतांची मंदिरे उभारली व त्याची व्यवस्था  लाऊन दिली होती. त्यापैकी महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवरील मंदिरांमध्ये ३२ देवीची, १३ महादेवाची, ६ हनुमानाची, तर इतर देवतांची २६ मंदिरे होती. ही उदाहरणे  शिवाजीराजांच्या प्रजेविषयीच्या प्रेमाची, त्यांच्या धार्मिक भावनांची जोपासना करण्याच्या वृत्तीचे साक्षीदार मानावे लागतील.

मराठा राज्याची उभारणी करीत असताना शिवाजी महाराजांनी तत्कालीन सामाजिक व धार्मिक जीवनात मोठी क्रांती केली होती. वैदिक काळातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेला काळाच्या ओघात विकृत स्वरूप   प्राप्त होऊन  गुणाऐवजी जन्मावरून, वर्ण व कर्मावरून जात ठरविली जात होती. त्यामुळे चवथा व पाचवा वर्ण  गुण व पराक्रम अंगी असूनही त्रैवर्णिकांची सेवा करण्यासाठी बंदिस्त केला गेला. त्यात परशुरामाच्या निःक्षत्रियत्वाच्या कथेच्या प्रभावामुळे पृथ्वीवर क्षत्रिय अस्तित्वात नसून फक्त ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक राहिले आहेत.  अशी भावना समाजात रूढ झाली होती. त्यामुळेच अंगी पराक्रम असूनही स्वतःचे (मराठयांचे) राज्य स्थापन करावे असे महाराष्ट्रातील कर्तबगार मराठे सरदारांना वाटले नाही. मुस्लीम राज्यकर्त्यांची सेवा चाकरी करण्यातच त्यांनी धन्यता मानली होती. अशा परिस्थितीत शिवाजीराजांनी शूद्र , अस्पृष्य, समजल्या जाणा-या मावळे, मराठे, रामोशी, बेरड , कोळी, भंडारी, ठाकर,  दलदी, गावीत, इत्यादी जातींच्या लोकांच्या हाती शस्त्र देऊन, त्यांच्या अंगी असणारा पराक्रम व विविध कौशल्ये यांचा उपयोग करून त्यांना गुण व कर्माने क्षत्रिय बनविले आणि त्यांची मदत व पराक्रमाच्या सहाय्याने मराठा राज्य उभे केले. तत्कालीन समाजात राजकीय क्षेत्रात जातपात विरहीत ऐक्य करण्याचे काम शिवाजीराजांनी केले. ही बाब विशेषत्वाने लक्षात घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासातील स्थान किती वरच्या पातळीचे होते हे स्पष्टपणे जाणवते. राज्याभिषेकाची कल्पना पुढे योताच ज्या अडचणी शिवाजीराजांच्या समोर उभ्या राहिल्या त्या अडचणीं महाराजांनी गागाभट्टाच्या मदतीने मोठया कौशल्याने सोडविल्या आणि ज्याच्या हाती शस्त्र तो क्षत्रिय हे गुण कर्माचे सूत्र शिवाजीराजाने कृतीने सिद्ध केले. जून १६७४ मध्ये मराठयांच्या राजास राज्याभिषेक होऊन तो सिंहासनावर विराजमान झाला. 

बहूजन समाजाच्या कर्तृत्वाचे इतिहासातील स्थान व त्याचे महत्व :- ‘‘ … मानवी जीवनाच्या वाटचालीत राजकरणा खेरीज आचार , विद्या, व्यापार इतर अनेक प्रकारच्या व्यवहारांचा समावेश होत असतो. अनेक व्यावहारिक   घडामोडी समाजात होत असतात; आणि त्यांचा समावे समाजपुरुषाच्या चरित्रात करणे अत्यावश्यक असते. केवळ राजकारणाचाच तेवढा विचार करून इतिहासाला थांबता येत नाही. … सबब इतिहास म्हणजे राष्ट्राचे सर्व त-हेचे व सर्व प्रकारचे गतकालीन चरित्र. सर्व प्रकारचे वर्तमान चरित्र म्हणजे वर्तमान इतिहास, असे लक्षण स्वीकारणे अपरिहार्य आहे.  ……” असा उल्लेख वि. का. राजवाडे ऐतिहासिक प्रस्तावना खंडात येतो. बदलत्या काळानुसार इतिहास लेखनाचे संदर्भ बदलत असल्याचे आपणास दिसून येते. त्यातून इतिहास लेखनात अनेक नवीन प्रवाह पुढे आले आहेत. त्यात ‘पददलितांचा किंवा अंकित, वंचित व शोषितांचा इतिहास’ (सबाल्टर्न स्टडीज) या इतिहास लेखन विषयक विचारसरणीत समाजाच्या सर्वागिण जडणघडणीत शोषिता – वंचित समाजाचे स्थान कोणते होते? त्यांचे कार्य व कर्तृत्वाचे त्यात  काय महत्व  होते ? त्यांचे जीवन कसे होते ? इत्यादी प्रश्नांची उकल करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. इतिहास लेखनाचा हा दृष्टीकोन विचारात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य उभारणीत, त्याच्या दृढीकरणाच्या व विस्ताराच्या प्रक्रियेत समाजाच्या विविध स्तरातील लोकांचा कोणता सहभाग होता?  हे तत्कालीन व उपलब्ध साधनांच्या आधारे जाणून घेणे आवश्यक आहे.   महात्मा ज्योतिबा फुले आपल्या शिवाजीराजे भोसले यांच्यावरील पोवाडयात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘ कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती ’ असा करतात, या बाबीचा अवर्जून उल्लेख करावा लागतो.

मुसलमानी राजसत्ता महाराष्ट्रात स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रातील मानवी समाजाचे नियंत्रण मनु, याज्ञवल्क्य,पराषर, इत्यादी स्मृतीग्रंथात  सांगितलेल्या धर्मास अनुसरून होत असे, ही गोष्ट निर्विवादपणे सिद्ध होते. छत्रपतींच्या काळातील समाजात मुस्लीमांच्या पदरी लष्करी चाकरी करणारे सरदार, जमिन महसुलाशी संबंधित असलेले निरनिराळया पातळीवरील वतनदार आणि शेतकरी, कुणबी, बलुतेदार व धार्मिक क्षेत्राशी संबंधित असलेले विविध व्यवसाईक , अलुतेदार – बलुतेदार  इत्यादींचा समावेश होता.   सरदार, जहागिरदार व वतनदारांचा वर्ग मुस्लीम राज्यकर्त्यांशी इमान राखून त्यांच्यासाठी लढाया करीत असे , तर कधी स्वार्थासाठी आपसात लढात असे. महसूलवसूलाच्या व आपल्या ‘हकलाजिम्यां’ च्या वसुलासाठी सामान्य जनतेवर अन्याय – अत्याचार करीत असत. गढया – वाडे बांधून, सैन्य व शस्त्र बाळगून आपल्या वतन – जहागिरीत राजाप्रमाणे वागत  असत. त्यात मुस्लीम राज्यकर्त्यांनीही काही मराठे सरदारांना ‘राजे ’, चंद्रराव, सर्जेराव, इत्यादींसारखे  निरनिराळे किताब दिल्याने त्यांचा अहंकार आणखीच बळावला होता.

स्वराज्य स्थापनेच्या प्रक्रियेत छत्रपती शिवाजीराजांनी, या जुलमी वतनदारांच्या शोषणाच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले. ज्यांनी शिवाजीराजांच्या राज्यउभारणीच्या कार्याला योग्य प्रतिसाद दिला नाही , त्यांना बळाच्या व शस्त्राच्या जोरावर नमविले. त्यांचे वाडे, गढया उध्वस्त करून त्यांच्या छोटया साम्राज्याला सुरूंग लावला; आणि सामान्य जणांची शोषणातून मुक्तता  करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे समाजातील विविध स्तरातील लोक शिवाजीराजाच्या भोवती गोळा झाले होते. शिवाजीराजाने राज्य उभारणीच्या कामात व राज्य उभारणीनंतरही सर्वांना गुणानुरूप आपल्या राज्यकारभारात संधी देऊन सहभागी करून घेतले होते. त्यामुळे ब्राह्यण, मराठे, कुणबी, मावळे, रामोशी, धनगर, न्हावी, महार, चांभार, मांग, गारूडी, कोळी, गावीत, भिल्ल, रामोशी, ठाकर,प्रभू इत्यादी गरीब व मध्यम वर्गातील लोक शिवाजी भोवती गोळा झाले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभात एका धार्मिक विधीच्या प्रसंगी प्रत्येक जातीला महाराजांना अभिषेक करण्याची  घालण्याची संधी देण्यात आली होती. सामाजिक स्तरानुसार वेगळया धातूंची भांडी असतील किंवा त्यातील द्रव पदार्थ वेगळा असेल परंतु प्रत्येकाला प्रातिनिधिक स्वरूपात महाराजांना अभिषेक घालण्याची संधी देण्यात आली होती. राज्याभिषेकातील हा विधी एका विशिष्ट विचाराचा प्रतीक होता. तो विचार म्हणजे, राजापुढे चारही वर्ण न्यायाच्या दृष्टीने सारखे असून राजाने प्रत्येक जातीला तत्कालीन सामाजिक संकेतानुसार तिच्या व्यवसायीक क्षेत्रात स्वतःची उन्नती साधण्याची संधी दिली पाहिजे. महाराजांनी प्रत्येक जातीला तिच्या विशिष्ट व्यवसाय क्षेत्रात कर्तृत्व गाजऊन पुढे येण्यास पुरेपुर संधी दिली. त्यामुळे सर्वच जाती- जमातींना स्वराज्याबद्दल प्रेम निर्माण होऊन त्यांनी महाराजांना मनापासून सहकार्य केले.

शिवकालीन समाज हा मुस्लीम राजवटीच्या प्रभावाखली होता. मुस्लीम राज्यकर्त्यांचा धर्म व संस्कार यांचा प्रभाव संपूर्ण समाजावर पडलेला होता. त्यामुळे हिंदु समाजात पारंपारिक पद्धतीने ब्राह्यण वर्गास महत्व असले तरी या काळात तो वर्गहि कर्म भ्रष्ट झाला होता आणि मुस्लीम राज्यकर्त्यांची  चाकरी करू लागला होता. त्यामुळे समाजातील इतर वर्गही इस्लामी राज्यव्यवस्थेचे बळी ठरले होते. त्यांचकडून निरनिराळया मार्गांनी समाजाचे शोषण होत असे.

शिवकालात संस्कृत भाषेतून दिले जाणारे उच्च शिक्षण व मराठीतून दिले जाणारे कारकूनी कामाचे, हिशेबाचे व धार्मिक वाड;मयाचे शिक्षण, अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाची परंपरा फक्त ब्राह्मण वर्गातच होती. साहजिकच तत्कालीन मुलकी राज्यकारभारात खालपासून वरपर्यंतच्या पदासाठी लागणारे अधिकारी व कारकून बनविण्याची क्षमता त्याच जातीत होती. याशिवाय धार्मिक कार्यासाठी लागणारे भट- पुरोहित, अध्यापनासाठी लागणारे पंतोजी व ज्ञानप्रसार करणारे लेखक या विशिष्ट जातीतूनच पुढे येत असत. ब्राह्यण वर्गाला दक्षिणेतील मुसलमानी शाहयांच्या राज्यकारभारात मुलकी कारभाराचा व युद्धशास्त्राचा अनुभव मिळाला होता. त्याचा उपयोग शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीच्या कामी झाला. ब्राह्यण वर्गाखालोखाल शिक्षणाच्या बाबतीत ‘सारस्वत व कायस्थ’ या वर्गाचा नंबर होता. या दोन्ही जातीत उच्च संस्कृत शिकण्याची परंपरा नव्हती. पण कारकुनी व हिशेबाच्या कामासाठी लागणारे व्यवहारिक शिक्षण तसेच जुन्या मराठीतून मिळणारे धार्मिक काव्य व साहित्याचे शिक्षण या कुटुंबांना परंपरेने दिले जात असे. त्यामुळे कारकुनी व हिशेबी कामात या दोन्ही जाती पुढे होत्या.

मराठा जातीच्या अंगी असलेली लष्करी व्यवसायाची परंपरा फार जुनी होती. दक्षिणेतील इस्लामी राजवटीत लष्करी सेवा केल्यामुळे अनेक मराठा घराण्यांमधून घोडदळाचे उत्तम सैनिक व अधिकारी तयार झाले होते. सभासद बखरीत असा उल्लेख येतो की, “…  महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर हेतूपूर्वक ब्राह्यण – सबणीस (हिशेब खात्याचा प्रमुख),  मराठा-हवालदार,( किल्लेदार), मराठा – सरनोबत (शिबंदी प्रमुख) प्रभू – कारखाणीस -(भांडार प्रमुख) असे वेगवेगळया जातीचे अधिकारी त्यांच्यातील गुणांनुसार नेमल होते. … कोणतेही काम चौघांच्या माहिती व सहकार्याशिवाय होणे शक्य नव्हते….” . या माध्यमातून शिवाजीराजांनी या तीनही वरिष्ठ जातींमध्ये ऐक्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले होते.

मावळातील डोंगरी मुलखात पिढयानपिढया राहणारे मावळे  व हेटेकरी हे अत्यंत काटक व चपळ असून गिर्यारोहनात व द-याखो-यातून पायी हिंडण्यात तरबेज होते. त्याबाबत चिटणीस बखरीत असा उल्लेख येतो की,”… त्या मुलखातील कजाखीचे लोक व माहितगार… म्हणोन तेच अधिक ठेवून त्यास मावळे – सरदार येसाजी कंक व तानाजी मालुसरे व पासलकर देशपांडे- मुसेखोरे, पौडखोरे, व हिरडसमावळ वगैरे लोकांस किताब, सरदा-या देवून … शिपाई ऐसे ठेविते जाले. … ’’ लढाई व किल्ल्यांचे रक्षण करण्यात मावळयांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे ‘‘… प्रतापगड, उंबरखिंड, सालेरी, उमराणी, नेसरी येथील लढायात मावळयांनी बचावात्मक व आक्रमक अषी दोन्ही प्रकाच्या युद्ध तंत्रात आपले नैपुण्य सिद्ध केले. …” सिंहगडावरील तानाजीचे हौतात्म्य , बाजी पासलकर याचा वीरमृत्यू, सालेरीच्या लढाईत रामाजी पांगेरा  (पांगारे असावे ) कर्नाटकाच्या लढाइ्र्रत येसाजी कंकाची कामगिरी महत्वाची होती. विजापूरचे पादशाहीतून सातशे पठाण तिकडे बदलून चाकरी करावयास आले , त्याबाबत गोमाजी नाईक पानसंबळ यांचा सल्ला  घेऊन चाकरीस ठेवून घेतले. त्यांची सरदारी राघो बल्लाळ अत्रे यांसि सांगितली. रामोशी व महार जातीच्या लोकांना शिवपूर्व काळात गावांच्या सीमा व किल्ल्याभोवतीचे मुलुख(घेरा) रक्षण करण्याचे काम देण्यात येत असे. त्यामुळे बातम्या काढण्यात व पहा-याच्या कामात हे लोक वाक्बगार होते.  हेर व जासुद यांची कामे करण्यास लागणारे गुण त्यांच्यात होते. रामोशी लोकांना रात्री अपरात्री हिंडण्या फिरण्याची सवय असल्यामुळे हेरगिरीच्या कामात हे अधिक कुशल होते. महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावरील कोळी, भंडारी, गावीत या जाति वर्षानूवर्षे मच्छीमारी व होडयातून छोटया प्रमाणावरील व्यापार यावर आपली उपजिवीका करीत असत. त्यामुळे या जातींमध्ये दर्यावर्दीपणाचे गुण होते. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक जातीजमातीचे विशिष्ट गुण हेरून शिवाजी महाराजांनी त्यांच्या गुणानुरूप त्या – त्या जाती- जमातीला तिच्या ठराविक क्षेत्रासाठी निवडून, त्यांना पुढे येण्यास जास्तीतजास्त वाव दिला. विशिष्ट जातीचा माणूस विशिष्ट क्षेत्रासाठी निवडताना मात्र त्याच्या ठिकाणी आवश्यक ती पात्रता आहे की नाही हे पाहण्याची दक्षता महाराज घेत असत. गडांच्या शिबंदीत बहुजन समाजातील लोक असत. सर्वांना मिळून मिसळून वागावे लागे. त्यामुळे पारंपारिक जातीजातीतील उच्चनिचतेच्या भावनेची तिव्रता कमी होण्यास मदत झाली. किल्ल्याप्रमाणेच आपल्या लष्करातही महाराजांनी मुलकी अधिका-यांच्या नेमणूका जातीनुसार केल्या होत्या. शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेल्या ब्राह्मण वर्गाने… राज्यकारभारातील तळाच्या पातळीवरील खेडेगावच्या कारभरापासून अष्टप्रधान मंडळाच्या सर्वोच्च पातळीवरील कारभारात ब्राह्यणवर्ग होता. कार्यक्षम मंत्री, मुलकी अधिकारी, हिशेबनीस, लढवय्ये, सेनाधिकारी, राजदूत, न्यायाधिश, वकील, हेर , राजकीय सल्लागार, धर्माधिकारी आणि लेखक म्हणून ब्राह्यणांनी योगदान दिले होते. त्यात , मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक, निळो सोनदेव, निराजी राऊजी, सोनोपंत व त्यांचा मुलगा त्रिंबक डबीर, रघुनाथ पंडित, व्यंकोजी दत्तो, त्रिंबक भास्कर, पंताजी गोपिनाथ इत्यादिंचा समावेश करता येईल. महाराजांचे बहुतेक सर्व सुभेदार, सरसुभेदार, कारकून, सरकारकून, खेडेगावातील कुलकर्णी – देशपांडे आणि प्रत्येक किल्ल्यावरील सबणीस ब्राह्यण होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो व दत्तजी त्रिंबक हे महाराजांच्या पूर्ण विश्वासातील होते. महाराज आग्-याला गेले तेंव्हा आणि  कर्नाटक दिग्विजयाच्या मोहिमेवर गेले तेंव्हा त्यांनी स्वराज्याची जबाबदारी या तिघांवर सोपविली होती. कर्नाटकाच्या स्वारीवर निघण्यापूर्वी महाराजांनी राहुजी सोमनाथ या ब्राह्यण सरकारकुनास रायगड किल्ल्याचा ‘ राजप्रतिनिधी ’ म्हणून नेमले होते. राजकीय सल्लागार या नात्यानेही ब्राह्यणांची कामगिरी उल्लेखनिय होती. ब्राह्मणवर्गाने महाराजांना रणांगणावरही खूप मदत केली. अष्टप्रधान मंडळातील सात ब्राह्यण मंत्र्यांपैकी पाच जणांना युद्धशास्त्र उत्तम अवगत होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक यांनी अनेक लढायात विजय मिळवून दिले. जावळीच्या मोरे प्रकरणात रघुनाथ बल्लाळ सबणीस याने साहाय्य केले होते.  इ.स. १६६०च्या जुलै महिन्यात पन्हाळयावरून निसटताना महाराजांनी पन्हाळगड त्रिंबक भास्कर याच्या स्वाधीन केला होता. राजनैतिक दूत किंवा वकील या नात्याने ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्यकारभारात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यात पंताजी गोपिनाथ बोकील, रधुनाथ पंडितराव  व प्रल्हाद निराजी यांचा सिंहाचा वाटा होता. शेती व स्थापत्याच्या क्षेत्रात मारोपंत पिंगळे व अण्णाजी दत्तो यांनी मोठी कामगिरी बजावली. साहित्य निर्मिती व विद्वत्तेच्या क्षेत्रातही ब्राह्यण वर्गाने मोलाची कामगिरी बजावली. त्यात, राज्यव्यवहारकोष कर्ता-रघुनाथपंत हणमंते, राजनीती लिहीणारा-रामचंद्रपंत अमात्य, शिवभारताचा कर्ता – कवि परमानंद, पर्णालपर्वतग्रहणाख्यान लिहीणारा – जयराम पिंडे, शिवाजीचे चरित्र लिहीणारा, कृष्णाजी अनंत सभासद, इत्यादी.  

ब्राह्मणांप्रमाणेच ‘प्रभू’ जातीनेही महत्वाची कामगिरी बजावली होती. कायस्थ प्रभू हे लेखणी व तलवार बहाद्दर होते. त्यात लेखन क्षेत्रात, बाळाजी आवजी चिटणीस व नील प्रभू यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, विश्वासराव नानजी दिघे, सुंदरजी प्रभू  – यानी महाराजांचा वकील म्हणून इंग्रजांशी वाटाघाटी केल्या. कुंभारजुव्याचा कायस्थ गोविंद विश्वनाथ प्रभू याने सिंधूदुर्गाच्या बांधणीत मोठा वाटा उचलला होता.  महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावरील सारस्वत जातीचा इंग्रज व पोर्तुगिज या युरोपियनांशी दिर्घकाळ संपर्क आला होता. अशा सारस्वतांना महाराजांनी दुभाषे म्हणून काम करण्याची संधी दिली.

शिवाजी महाराजांनी मराठा जातीतील ढाऊ वृत्तीचा उपयोग आपले लष्कर सामर्थ्यवान व प्रभावी करण्यासाठी करून घेतला. दक्षिणेतील शाही राजवटीत मराठा क्षत्रिय वर्गाला राजकारण, युद्धतंत्र यांचा अनुभव मिळालेला होता. त्यामुळेच हा वर्ग महाराजांच्या घोडदळाचा कणा बनला होता. शिवभारत, जेधे शकावली, सभासद बखर, या साधनांतून शंभराहून अधिक मराठा जातीच्या घोडदळातील अधिका-यांची नावे येतात. सभासद बखरीच्या शेवटी महाराजांच्या घोडदळातील बारगिर व शिलेदार यांची यादी दिलेली आहे. तुकोजी चोर, माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर व हंबीरराव मोहिते हे चारही सेनापती मराठा होते. हिरोजी इंदुलकर,गिरजोजी यादव या मराठयांनी किल्ले बांधणीत कौशल्य दाखविले होते. राजगड बांधणीत हिरोजी, तर पन्हाळगड बांधणीत  गिरजोजी यादव. स्वराज्यातील बरेच जहागिरदार, वतनदार व देशमुख हे मराठा जातीचे होते. महाराजांनी त्यांचा उपयोग जमिनीची मषागत व शेतीचा विकास यासाठी करून घेतला. कुणबी मराठयांपैकी अनेक कुटुंबे पावसाळयातील चार महिने शेतावर राबत तर आठ महिने महाराजांच्या सैन्यात शिपाईगिरी करीत असत.

मागासलेल्या जातींनाही शिवाजी महाराजांनी लष्करी क्षेत्रात सामावून घेऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. शिवपूर्व काळात मावळे, हेटकरी, रामोशी, महार, मांग, ठाकर, कातकरी इत्यादी लोक, मुसलमान राज्यकर्ते व मराठे सरदारांची सेवा करीत होते. परंतु त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळत नव्हता. सामाजिकदृष्ट्या त्यांना हीन लेखले जात असे. रामोशी, बेरड, भिल्ल यांना लुटारू , दरोडेखोर म्हणून संबोधले जाई. महार- मांग, यांना पूर्वापार अस्पृष्य मानले जात असे. कोळी – भंडारी यांसारख्या दर्यावर्दी  जातींचे गुण निष्फळ ठरत होते. लोहार, सुतार, चांभार, न्हावी, यांसारख्या जातीचे लोक खेडयात बलुतेदार म्हणून सामान्य जीवन जगत होते आणि वतनदारांकडून होत असलेला अन्याय निमुटपणे सहन करीत होते. या सर्व जातींमधील विशेष व सुप्त गुण ओळखून शिवाजी महाराजांनी त्यांना योग्य संधी दिली व स्वराज्य स्थापनेच्या कामी त्यांचा योग्य उपयोग  करून घेतला. त्यामुळे त्यांच्या नैतिक व भौतिक प्रगतीचा मार्ग खुला झाला होता..  मावळे तलवारबाजीत, तर हेटकरी नेमबाजीत निष्णात होते. त्यांचे हे गुण हेरून त्यांचे एक स्वतंत्र पायदळ उभे केले. येसाजी कंक हा या  पायदळाचा प्रमुख होता.  शिवाजीराजाचे पायदळ हे दोन प्रकारचे होते. त्यात रणक्षेत्रावरील पायदळ व गडावरील पायदळ (‘शिबंदी’).  या दोन्ही पायदळात मावळयांचा भरणा होता. याच मावळयांमधून महाराजांनी आपले एक खास शरिररक्षक दल (‘हुजरात’)  उभारले होते. भिल्ल व रामोशी या जातीतील पारंपारिक गुण व कौशल्ये यांचा विचार करून शिवाजीने बहिर्जी नाईक या रामोशास हेर खात्याचा प्रमुख म्हणून नेमले. त्याचे आडनाव जाधव असे होते.  महार व डोंगरकोळी  यांनीही स्वराज्याची सेवा केली. किल्ल्याच्या बुरूजांचे रक्षण करण्याचे व तेथून टेहळणी करण्याचे काम महार जातीकडे होते. किल्ल्यावरील शिबंदीत डोंगरकोळयाचे प्रमाण मोठे होते. या डोंगरकोळयांना ‘नाईकवाडी’ असे म्हणत. स्वराज्याच्या उभारणीत न्हावी जातीने महत्वाची भूमिका बजावली. प्रतापगडच्या युद्धात जिऊ महाला या शिवाजी महारजांच्या अंगरक्षकाने महाराजांचे प्राण वाचविले. जिऊस ह्या कामगिरीबद्दल जोर खो-यात – जोर, गोळेगाव, व गुळूब अशी तीन गावे इनाम दिली होती. जिऊ जातीचा न्हावी , त्याचे आडनाव सकपाळ. इ. स. १६६० साली महाराज पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जात असताना महाराजांचा वेश धारण करून शिवबा काशिद याने स्वतःचे प्राण धोक्यात धालून महाराजांना पन्हाळयातून बाहेर जाण्यास मोलाची मदत केली. महाराजांच्या आरमाराच्या स्थापनेच्या प्रक्रियेत कोकण किना-यावरील सोनकोळी, भंडारी , गावीत, हटकर, भोई, खारवी, दलदी वगैरे दर्यावर्दी जातींनी महत्वाची भूमिका बाजावलीहोती.  ताडामाडाच्या झाडावर चढून ताडीमाडी काढण्याचा भंडारी लोकांचा परंपरागत व्यवसाय.  त्यांच्या या कौशल्याचा उपयोग महाराजांनी जहाजावरील चढ उतार करण्यासाठी करून घेतला. ‘दलदी ’ व ‘खारवी’ या बाटून मुसलमान झालेल्या जाती नावीक गोलंदाजीत निश्णात होत्या. या लोकांनी महाराजांचा सागरी व्यापार मध्यपूर्वेतील मस्कतपर्यंत पोहचविला. या दर्यावर्दी लोकांच्या मदतीने महाराजांनी कल्याण व भिवंडी या ठिकाणी मध्यम आकाराची जहाजे बांधणा-या गोदया उभारल्या. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग इत्यादी दुर्गांची आणि खांदेरी या नवीन नाविक केंद्राची उभारणी केली. 

राज्य कारभारात महाराजांनी जात व धर्म यापेक्षा  गुणांना अधिक महत्व दिले होते. शामराव निळकंठ रांझेकर, गंगाजी व मंगाजी वाकणीस, व माणकोजी दहातोंडे  इत्यादी लोकांना दूर करून त्याजागी मोरोपंत पिंगळे, दत्ताजी त्रिंबक, नेताजी पालकर इत्यादींची नेमणूक केली. प्रतापराव गुजर लढाई्रत मारला गेल्यावर आनंतराव उर्फ हंबीरराव मोहिते याचे कर्तुत्व पाहून त्यांना सेनापती पदावर नियुक्त केले. निळो सोनदेव याचा मोठा मुलगा नाकर्ता आहे, हे लक्षात येताच त्यांचा धाकटा भाऊ रामचंद्र निळकंठ यास मुजूमदार केले. शिवभारतकार कवि परमानंद याचा मुलगा देवदत्त याच्याजवळ वडिलांसारखे कवित्व गुण नाहीत, हे आढळून येताच महाराजांनी त्यास दरबारात स्थान दिले नाही. हे खरे असले तरी त्यांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील काही जागा वंशपरंपरेने चालविल्या परंतु त्या करतानाही माणसाची पात्रताच विचारात घेतल्याचे आढळून येते.

                 अशा रितीने शिवाजी महाराजांनी समाजाच्या विविध स्तरातील लोकांच्या अंगी असलेले पारंपारिक कला गुण हेरून त्यांना स्वराज्याच्या कामी लावले. त्यामुळे राजकीय प्रक्रियेत सर्वच घटकांचा निरनिराळया कारणांनी समावेश झाला व त्यामुळे त्यांच्या भौतिक व सामाजिक जीवनात बदल होऊन त्यांना इतिहासात महत्व प्राप्त झाले होते, असे दिसून येते.

राज्यात चोर भयापासून मुक्ती व्हावी ,यासाठी चोरांना पकडून शिक्षा दयावी. बेरड, रामोशी, इत्यादी जमातींना किल्ल्याच्या कामात सामावून घ्यावे, याबाबतचे विचार चिटणीस बखरीत व्यक्त केले आहेत. त्यात,‘‘ …  आपले राज्यात चोरभय अगदी नसावे ऐसे मनात आणून जागा जागा बेरड, चोर, आडेकरी होते त्यास धरून आणून कित्येकांचे शिरच्छेद केले आणि ज्या ज्या देशातील होते त्या त्या प्रांतातील किल्ले, ठाणी, कोट येथे असाम्या नेमून त्यास शेते वगैरे देऊन गडकरी यांत घेरीयाचे चैकीस नेमून त्यांची जीवीका चालेसे करून, यातून चोरी केली असता शिरच्छेद करावा ऐसे केले. प्रति गावास रखवालीस एक बेरड त्या किल्ल्याच्या त्या प्रांतात असावा. चोरी जालिया त्याने भरून द्यावी. नाहीतर पत्ता लावून द्यावा, ऐसे केले. याजमुळे राष्ट्रात कोठेही चोरभय नाही ऐसे जाले. समाजात नैतिकता निर्माण करण्यासाठी, द्युत खेळणे, मद्य सेवन करणे, शिकारीचा बहूत छंद, स्त्रियांचे ठायी आसक्ती, क्रोध इत्यादी, सप्त दुव्र्यसनांचा त्याग करावा.यासाठी प्रयत्न केले. याबाबत सन १६७३ मध्ये शिवाजी राजांनी आपल्या लष्कराला उद्देशुन काढलेला आदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा लोक कल्याणाचा विचार स्पष्टपणे दिसून येतो. पावसाळयासाठी लष्कराची छावणी चिपळूण जवळ पडली होती. छावणीसाठी दानागोटयाची सर्व व्यवस्था महाराजांनी केली होती. पण लष्करातील लोकांनी त्याची उधळमाधळ केली होती. ऐन पावसाळयात उपासमार घडेल याचा इशारा देताना महाराज म्हणतात,‘‘ …  नाहिसे झाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही  ! …  व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास  कोण्ही कुणब्याच्या येथील दाणे आणील, कोण्ही भाकर , कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी  … ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर करून जीवमात्र घेवून राहिले आहेत तिही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की, मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही !  ऐसा तळतळाट होईल.  …  सारी बदनामी तुम्हावरी येईल.  … हे तुम्ही बरे जाणून शिपाई हो … जे गाव राहिले असाल तेथे त्यांनी रयतेस काडीचाही आजार द्यावयास गरज नाही. …’’  शिवपूर्व काळात शेतकरीवर्ग पाटील, देशमुख व जहागिरदार यांच्या वंशपरंपरागत सत्तेखाली भरडून निघत होता. या वर्गाकडे मुसलमानी सत्ताधीशांनी रयतेकडून शेतसारा व इतर संबंधित कर गोळा करण्याचे काम दिलेले असे. हे वतनदार – लोक सरकारने ठरवून दिलेल्या करापेक्षा जास्त कर शेतक-यांकडून वसूल करून त्यांची अक्षरश पिळवणूक करीत असत. ते सारा नियमित तिजोरीत भरीत असल्याने त्यांच्या रयतेबरोबरच्या वागणूकीची चौकशी होत नसे. शेतक-यांकडून  अन्यायाने मिळालेल्या पैशाच्या जोरावर ते उन्मत्त बनले होते.. मोठे वाडे, गढया बांधून व मोठे सैन्य बाळगून ते राजसत्तेला डोईजड होऊ  लागले. या समस्येची सोडवणूक करण्यासाठी महाराजांनी वतनदारांचा शेतीवरील कर वसूल करण्याचा हक्क रद्द केला. कर वसूल करण्यासाठी स्वतःचे मुलकी अधिकारी नेमले, वतनदारांचे वाडे, गढया पाडून टाकल्या व  नवीन गढया बांधण्यास मनाई केली. ‘शिवाजी महाराजांनी रयतेची व सामान्य गोरगरीब लोकांची पिळवणूक थांबविली. …  शिवाजी महाराजांचे वतनदारी विरोधी धोरण हे तत्कालीन समाज जीवनातील क्रांतीकारक पाऊल  होते . , ’  असे मराठयांच्या इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या , ‘ शिवाजीचे स्वराज्य: कशासाठी? कोणासाठी ? ’ या लेखात लिहितात.   प्रामाणिक वतनदारांची वतने चालू ठेवले व त्यांचे हक्क बांधून दिले. अप्रामाणिकांची वतने जप्त केली. काही एकनिष्ठ वतनदारांना शिलेदारी सैन्य बाळगण्याची परवानगी दिली.परंतु त्यांचे प्रमाण बारगीरांपेक्षा कमी ठेवले.  …. शेतक-यांना वतनदारांच्या जोखडातून मुक्त केले, त्यामुळे शेतीची कामे सांभाळून महाराजांच्या सैन्यात भरती होऊन पराक्रमाच्या जोरावर मोठया जागा व द्रव्य मिळविण्याची संधी त्यांना मिळाली….  ’

कडक शिस्त:-  शासकीय कारभार स्वच्छ, शिस्तबद्ध व कार्यक्षम राखण्याच्या बाबतीत महाराज,  जातीचा श्रेष्ठपणा वा सामाजिक प्रतिष्ठा यांची पर्वा करीत नसत. असे तत्कालीन साधनांतील उदाहरणांवरून दिसून येते.  सुपे परगण्याचा कारभारी  संभाजी मोहिते (तुकाबाईचा भाऊ म्हणजेच शिवाजीराजांचा मामा)याने शिवाजी विरोधी भूमिका घेताच त्यास कैद करून  सुपे हस्तगत केले. प्रभानवळीचा सुभेदार जिवाजी विनायक याने जंजि-याच्या सिद्यीविरूद्ध महाराजांचा नाविक अधिकारी दौलतखान यास रसदेचा पुरवठा करण्याबाबत कुचराई केली.  तेंव्हा, ‘ ब्राह्यण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ’ असे उद्गार काढले. चिंचवडकर नारायणदेव गोसावी हे सत्पुरुष म्हणून महाराजांना त्यांच्याबद्दल आदर होता; पण स्वतःचे धार्मिक क्षेत्र सोडून जेंव्हा त्यांनी राजकारणात ढवळाढवळ केली तेंव्हा , ‘‘ तुमची बिरूदे आम्हाला द्या व आमची तुम्ही घ्या. ’’ अशा रोखठोक भाषेत महाराजांनी त्यांना पत्र लिहिलेेहोते.  सरदार वतनदारांचा वर्ग मुस्लीम राज्यकर्त्यांशी इमान राखून त्यांच्यासाठी आपले रक्त सांडीत असत.  तर कधी स्वार्थसाठी आपसात संघर्ष करीत असत. महसूल वसूलाच्या व आपल्या हकला जिम्याच्या वसुलासाठी सामान्य जनतेवर अन्याय – अत्याचार करीत असत. राज्य उभारणीच्या प्रक्रियेत छ. शिवाजी महाराजांनी या वतनदारांच्या शोषणाच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले.  ज्यांनी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला योग्य प्रतिसाद दिला नाही त्यांना बळाच्या व शस्त्राच्या जोरावर नमविले. त्यांचे वाडे – गढया उध्वस्त करून त्यांच्या छोटया साम्राज्याला सुरूंग लावला आणि सामान्य जणांची शोष]णातून मुक्तता केली. प्रति शिवाजी समजल्या जाणा-या नेताजी पालकराकडून इ. स. १६६६ साली पन्हाळयाच्या स्वारीत कुचराई होताच त्याला सेनापती पदावरून दूर केले. खंडोजी खोपडे याने अफझलखान प्रकरणात शत्रुला मिळून महाराजांचा विश्वासघात केला तेंव्हा जेधे , बांदल यांच्या मध्यस्तीला न जुमानता महारजांनी त्याचा एक हात व एक पाय काढण्याची शिक्षा दिली.    गडावर कोणाचे मनी दुर्बद्धी निर्माण झाली, आणि त्याने फितूर केला तर त्वरीत त्याला पत्ता लागू न देता तिथून उचलून आपणापाशी आणावा. योग्य तो न्याय करावा. त्याचा अपराध सिद्ध झाला, तर मग दया क्षमा न करता त्याचा शिरच्छेद करावा आणि त्याचे मस्तक गडोगडी हिंडवावे. रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रात लिहितात, ‘‘…   किल्याची सेवा परम कठीण, शासन न करता किल्ल्याचे काम सर्वसाधारण होऊन जाणार असे सर्वथैव न करावे. …’’   गडोगडी ; ज्योतिशी, वैदिक – वैद्य, जखमा बांधणारे, लोहार, सुतार, पाथरवट, चांभार इत्यादी,  निरनिराळी कामे करणारे कारागीर असावेत. त्यांची कामे संपल्यानंतर त्यांना इतर काम सांगून गुंतून ठेवावे … ‘ मोसे  खो-यातील  कुलकर्णी रंगो त्रिमल कुलकर्णी  याने स्त्रीविषयक बदकर्म केले. त्याला कैद केले.

सारांश:-

वरील सर्व माहितीच्या आधारे  असे आढळून येते की, मुस्लीम राजवटीच्या काळात महाराष्ट्रातील सर्वच समाज निरनिराळया मार्गांनी त्रासला गेला होता.  सरदारी, जहागिरी व वतनदारी यामुळे समाजात शौर्य व पराक्रम निर्माण झाला होता. परंतु त्याचा उपयोग समाजालाच छळण्यासाठी व शोषण करण्यासाठी केला जात असे. समाजाच्या खालच्या स्तरातील लोक पारंपारिक हिंदु समाजव्यवस्थेमुळे विघटीत झालेले होते, दबलेले होते, त्यात मुस्लीम राजवटीची भर पडल्यामुळे शोषणात अधिक भर पडली होती. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केल्यामुळे  ब्राह्मणांपासून ते महार  – मांग, कोळी , बेरड, दलदी, भंडारी इत्यादी जातींच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले. त्यामुळे त्यांचाही विकास झाला.आर्थिक व सामाजिक क्षेत्रात त्यांना महत्व प्राप्त झाले. समाजातील दबलेल्या लोकांच्या अंगी असलेल्या विविध पारंपारिक गुणांमुळे स्वराज्याच्या उभारणीतील दलीत शोषित समाजाचे ऐतिहासिक स्थान स्पष्ट होऊ शकले. कोणताही माणूस जन्माने श्रेष्ठ नसून तो त्याच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ होतो, हे सूत्र शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे स्पष्ट  झाले.

संदर्भ ग्रंथ

केळकर न.चि. व आपटे द.वि.,(संपा.) (भा.इ.सं.मं.) शिवजी निबंधावली -1, शिवचरित्रकार्यालय पुणे , १९३०

कुलकर्णी अ.रा., शिवकालीन महाराष्ट्र, पुणे, १९३०

दिवेकर स.म., (संपा.), परमानंद कृत  शिवभारत, पुणे ,

मेहेंदळे ग. भा. , श्री. राजा शिवछत्रपती, खं.1ला, भाग २ रा , ‘युरोपियनांचे वृत्तांत. ’

 पांगारकर ल.रा.,(संपा.),श्रीदासबोध,

केळकर न.चि., आपटे, (संपा.) , शिवाजी निबंधावली, पुणे, १९३०, पृ. ११

संत तुकाराम, म. शासन (प्रका.), श्री संत तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा, मुंबई, १९७३,

भा. इ. सं. मं., पुणे, शिवचरित्र साहितय, खं. ९

गाडगीळ स.रा., (संपा.), कृ. अ. सभासद कृत, श्री शिवप्रभू चरित्र, सभा. बखर, पुणे, प्रथम आवृ. पुणे, १९६४,

कुलकर्णी श्री. म. , (संपा.), रामचंद्रअमात्य कृत, मराठे शाहीतील राजनिती, ‘आज्ञापत्र ’, पृ.४४-४५,६८-६९. 

डॉ. मा. रा. कंटक , ‘ शिवछत्रपतींनी साधलेला जातीजमातीतील राजकीय समन्वय, ’. रा. षं. वाळिंबे,- संपा.,  भा. इ. आणि सं. पर्यालोचन पुणे. १९८५

गो. नी. दांडेकर,‘ दुर्गाधिराज शिवछत्रपती ’रा. षं. वाळिंबे, – संपा., भा. इ. आणि सं. ,पृ. १५०, पुणे १९८५.

वि. का. राजवाडे, म.इ. सा., खंड ८,

का. ना. साने , प्रका., म.रा. चि. विरचित, श्रीशिवछत्रपती यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र पृ. २०१.

डॉ. जयसिंगराव पवार ., शिवजीचे स्वराज्य: कशासाठी? कोणासाठी?, दै.सकाळ पुणे, दि. ९ मार्च २००४.

पुरंदरे –  आपटे, सं. शिवचरित्र साहित्य खं. ७ पृ. ३९.

डॉ. सोपान शेंडे, मराठेकालीन धार्मिक जीवन ,  अक्षरलेणे प्रकाशन , सोलापूर, २०१२.

लेखक सर परशुरामभाऊ महाविद्यालय ,पुणे येथे इतिहास विषयाचे सहयोगी प्राध्यापक व इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मराठेकालीन धार्मिक जीवन या विषयात त्यांनी पीएचडी संपादन केलेली आहे.

Leave a Reply