|| सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना : पाश || – डॉ. दीपक बोरगावे

‘पाश’ ची कविता बंडखोर, आक्रमक आणि चढा आवाज लावणारी कविता आहे. तिला शोषणकर्त्यांचा संताप आणि चीड आहे. ती आक्रमण करायला अजिबात घाबरत नाही.

‘पाश'(१९५०-१९८८) यांचे नाव अवतारसिंह संधू, जालंधर, (पंजाब) जिल्ह्यातल्या नकोदर या तालुक्यातल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म. ते साम्यवादी विचारांचे होते. त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असताना, म्हणजे साधारणपणे १९६५ ते १९८८ पर्यत ते निम्मा काळ तुरूंगातच होते. लोहकथा (१९७०), उड्डदे बाजाॅ मगर (१९७४), बिच का रास्ता नहीं होता (हिंदी अनु. प्रा. चमनलाल, १९७५), साडे संमियां विच (१९७८), सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना (हिंदी अनु. निलिमा शर्मा, १९८९), याशिवाय, ‘बेदखली के लिये विनयपत्र’ आणि ‘धर्मदिक्षा के लिये विनयपत्र’ (१९८४) या दोन दीर्घ कवितांमुळे ते खलिस्थानवाद्यांच्या हिटलिस्टवर आले आणि २३ मार्च १९८८ रोजी आपल्या गावी विहिरीवर आंघोळ करताना खलिस्थानी अतिरेक्यानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. वयाच्या केवळ ३७साव्या वर्षी चळवळ, गरीब आणि शोषितांच्या बाजूने लढणे आणि कविता यांची किंमत भारताच्या या महान भूमीपुत्राने चुकती केली. पाश हे अल्पशिक्षित होते; शिक्षकी पेशा पत्करायचा म्हणून त्यांनी डिप्लोमा ही पदवी प्राप्त केली होती. पण पाश यांचे वाचन आणि व्यासंग अफाट होते . त्यांचे पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. ते काही काळ आपली पत्नी आणि मुलीबरोबर अमेरिकेतही (१९८६-८७) होते.

प्रा. चमनलाल यांनी प्रथमत: ‘पाश’च्या कविता हिंदीत आणल्या, त्यामुळे त्या अनेक भारतीय भाषांतून अनुवादित झाल्या. चमनलाल यांच्याबरोबर इतरही अनुवादकांनी या कविता अनुवादित केल्या आहेत. निरंजन उजगरे यांनी ‘पाश’च्या निवडक कविता मराठीत अनुवादित केलेल्या आहेत (लोकवाङमयगृह, २०११), पण यातून ‘पाश’च्या कवितांचा समग्र असा वेध येत नाही. ही उणीव श्रीधर चैतन्य यांनी भरुन काढली आहे. त्यांनी ‘पाश’च्या हिंदीतून मराठीत अशा शंभरएक कवितांचा अनुवाद केला आहे. यात, पंजाबसंदर्भातल्या कविता, पत्रिकांमधून आणि इतरत्र सापडलेल्या कविता, लोहकथा, उड्डदे बाजाॅं मगर, आणि साडे समियां विच अशा अनेक स्त्रोतातून निवडलेल्या कविता (“पाशच्या कविता”, हरिती प्रकाशन, २०१७) या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत.


‘पाश’ च्या कविता
अनुवाद – श्रीधर चैतन्य
हरिती प्रकाशन, पुणे २०१७

आज पाश हा हिंदी पट्ट्यातला महत्त्वाचा कवी मानला जातो. त्याने आपल्या मातृभाषेत, म्हणजे पंजाबीत कविता लिहिल्या. १९८०-९०च्या दशकांत पाश हा तरुण वर्गाचा प्रेरणास्त्रोत होता. तरुणांमध्ये, ‘पाश’ च्या कविता या काळात खूप लोकप्रिय होत्या. मुक्तिबोध, धुमिल, नागार्जुन यांच्या कवितांवर पोसलेल्या ह्या पिढीने ‘पाश’ ला त्या काळात अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही परंपरा ‘पाश’ ने विस्तारित केली हे निःसंशयपणे मान्य करावे लागेल. आपल्या देशात शोषितांच्या साहित्य-कवितेचा, कलेचा उजव्या शक्तीनी नेहमीच सामना केला आहे. करुणा, सुधारणा, साहाय्याकाची भूमिका घेत त्यांनी महाराष्ट्रातील दलित साहित्याचा विद्रोह चालाखीने बोथट केला. हे कॉंग्रेसच्या काळात घडले, आता तर ते खूपच विपरीत पध्दतीने सुरू आहे. प्रत्यक्ष रणांगणातील राजकारणातसुध्दा (Real Politics) ही भूमिका घेऊन आजच्या उजव्या शक्तीनी अनेक प्रागतिक शक्ती फोडून काढल्या आहेत. अलिकडचा तर एक अफाट विनोद म्हणजे, सोशल मेडियावर नेहरु हे संघाचे समर्थक होते, अशी पोष्ट व्हायरल झाली होती. राष्ट्र सेवा दलातील नेहरूंची एक प्रतिमा संघाच्या शाखेत घुसवून हास्यास्पद असे उद्योग काही भाडेकरू ट्रोल्सकडून करवून घेतले होते. ही गोष्ट भयंकर आहे की, भगतसिंग यांनाही संघाने पचवले आहे. (अॅन्टोनिओ ग्राम्शी यांच्या शब्दांत याला “सांस्कृतिक राजकारण” असे म्हणता येईल) पण, या शक्तींना ‘पाश’ पचवने कठीणच नव्हे, तर अशक्य आहे. ‘पाश’ ची कविता ही केवळ धार्मिक दहशतवादाविरुद्ध बंड पुकारणारी नाही तर ती व्यवस्थेची भ्रष्ट नैतिकताही उघडी करणारी आहे. या ओळी पाहा :

मी,
त्यांच्या विरोधात विचार केलाय,
त्यांच्या विरोधात लिहित आलोय जन्मभर
जर,
त्यांच्या दु:खात देश सामील असेल,
तर,
या देशातून माझे नाव आधी कमी करा
……
यांचं जे काही नाव आहे
या गुंडांच्या साम्राज्याचं
मी थुंकतोय त्यांच्या नागरिकत्वावर
….
जर त्यांचा स्वत:चा
कुठला खानदानी भारत असेल
तर माझं नाव त्यातून वजा करा.
(पृ. १८-१८)

‘पाश’ ची खलीस्तानी दहशतवाद्यांनी हत्या केली. त्याला आपली हत्या होईल याचा अंदाज आला होता, कारण पाश जे काही कवितांच्या आणि चळवळीच्या माध्यमातून करत होता ते खरोखरच खतरनाक होते, यांची त्याला जाणीव होती; हे व्यवस्थेविरुध्दचे बंड होते.

‘पाश’ ची कविता ही ‘ स्व’ ची कविता नाही, ती ‘इतरत्वाची’ (otherness) कविता आहे, समष्टीची कविता आहे. ती कष्टकऱ्यांची, श्रमिकांची कविता आहे :

मी सलाम करतो
माणसाच्या कष्ट करत राहण्याला
….
या संपणाऱ्या दिवसांचं
माझं हे मातीमोल रक्त
नंतर कधीतरी
जीवनदायी मातीतून, जमिनीतून उचलून
कपाळाला लावलं जाईल.
(पृ. ३०)

‘पाश’ च्या कवितेत सामान्य लोक येतात; शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, कष्टकरी, मेंढपाळ, शिपाई, कर्ज वसूल करणारा बॅंकेचा कर्मचारी, अधिकारी, हे सारे येतात. भांडवली आणि साम्राज्यवादी व्यवस्था ही सामान्य माणसाचे शोषण करण्यासाठी जन्मत असते. तिचा पाया हा शोषणावर उभा असतो. पोलिस यंत्रणा, न्याय व्यवस्था ही साम्राज्याचे संरक्षण करत असते, तरीही सामान्य कष्टकरी या बलाढ्य शक्तीला कधीच घाबरत नसतो, कारण हरवण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते. म्हणून इतिहास आणि काळ हा ‘जगणाऱ्या माणसा’ बरोबर असतो हा आशावाद पुढील ओळींतून व्यक्त झाला आहे :

तू साम्राज्याला का घाबरत नाहीस,
जगणाऱ्या माणसा ?
त्यांनी पोलिस आणि वकिलांवर बराच खर्च केलाय
पण
तरीही प्रत्येक वेळी
हा काळ
तुझ्या बाजूनंच का साथ देतोय ?
(पृ. ३९)

‘पाश’ च्या प्रतिमा ह्या निसर्ग, जंगल, आणि श्रमाशी सहसंबंध सांगणाऱ्या आहेत. ‘पाश’ ला सौंदर्य हे ‘मक्याच्या भाकरीची लज्जत’ वाटते; ‘मी’ ची ओळख ही विविध पध्दतीने होते- ‘मी’ चा प्रवास ‘ शेतकऱ्याच्या साधू बनण्याआधीचा आहे’ ; ‘मी” हा ‘म्हाताऱ्या चांभाराच्या डोळ्यातला कमी होत जाणारा उजेड आहे’; ‘मी” हा ‘काळ्या देहावरच्या चौथ्या शतकातला एक डाग आहे’ (पृ. ५९). ह्या प्रतिमा श्रम, शोषण, दु:ख, इतिहास यांना खोदत जातात. ‘ऊसावरचे तुरे’ शत्रूवर नजर ठेवतात आणि ‘गव्हाच्या लोंब्या’ आपल्याला ‘झाकून ठेवतात’ (पृ.६३-६४) – म्हणून कवी त्यांचे आभार मानतो. एक क्रांतीकारक भूमिगताला निसर्ग हा पाशला असा भावतो.

भय, शांतता आणि युद्ध याबद्द्लची विधाने (पृ. ७६-८०) ही संवेदनशील मनाला ढवळून काढणारी आहेत:

भय- कधी आमच्या माथ्यावर पगडीसारखं संजलं गेलं; कधी आमच्या हातावर वेठबिगारासारखं उगवून आलं. शांतता – गुडघ्यात डोकं खुपसून आयुष्याची स्वप्नं पाहण्याचा प्रयत्न करते; शांतता म्हणजे शेतात जळणारी उभी पिकं बॅंकांच्या फायलीत बंदिस्त झालेली; शांतता – रवंथ करत असलेल्या विद्वानांच्या तोंडातून गळत असलेली लाळ आहे; शांतता म्हणजे- गांधींचा लंगोट आहे / ज्याचे धागे या एकशेवीस कोटी जनतेला /फाशी द्यायला पुरेशे आहेत

‘पाश’ ची कविता बंडखोर, आक्रमक आणि चढा आवाज लावणारी कविता आहे. तिला शोषणकर्त्यांचा संताप आणि चीड आहे. ती आक्रमण करायला अजिबात घाबरत नाही.

कुठल्याशा आकाशात
खोदलीय दरी एक भयानक अंधारी.
प्रत्येक पाऊल आमचं
घसरुन पडतंय त्या दरीत
आणि
आम्ही
रक्ताळलेल्या दिवसांचे तुकडे घेऊन
चालत राहिलोय…
(पृ. ३७)

किंवा

विषारी मधाच्या माशीकडे बोट दाखवू नका,
तुम्ही ज्याला पोवळं समजतात
तिथे
जनतेचे प्रतिनिधी बसतात !
(पृ. ३३)

दहशतीच्या उन्हात उमटणारी एखादी हताश भावनाही ‘पाश’च्या कवितेत व्यक्त होते.
त्यांच्या डोळ्यातलं काजळ/ आमच्या आसवांसाठी कफ्यू॔ बनून राहिलंय ( पृ.८२)

भविष्यातील मानवी संहाराचा आणि सांस्कृतिक अवनती यांचा नेमका वेध ‘तिसरं महायुद्ध’ या कवितेत दिसतो ( पृ.८३-८४)

तिसरं युद्ध-
सदऱ्यावर पडलेले / कधीच धुता न येणारे डाग लढतील
तिसरं युद्ध-
या धरतीला कैद करु पाहणाऱ्या/ चावीच्या जुडग्याविरुध्द लढलं जाईल
तिसरं युद्ध-
कधीच न उघडणाऱ्या मुठीविरुध्द लढलं जाईल
तिसरं युद्ध-
कुठल्याशा फाटक्या खिशात चुरगाळलेल्या / एका दुनियेसाठी
लढलं जाईल

आज फाशीवाद (Facism) हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसतो आहे. भय, दहशत, उद्या काय होईल याचा भरवसा नाही, जीव मुठीत घेऊन जगणारी हताश जनता- या अशा भयंकर सांस्कृतिक कलहाच्या वातावरणात आपण सारे जगत असताना ‘पाश’ च्या कवितेचा अन्वय अधिक महत्त्वाचा होतो.
देशात घडत असलेल्या सांस्कृतिक राजकारणातल्या या अशा पाश्र्वभूमीवर ‘पाश’ ची बऱ्याच अंशी समग्र कविता मराठीत आली आहे; त्याबद्दल श्रीधर चैतन्य यांनी घेतलेल्या श्रमाचे निश्चितच कौतुक आहे.

आपण लढूयात मित्रा,
नांगर अजुनही रेघा ओढतो
कण्हणाऱ्या धरतीवर

आपण लढूयात तोपर्यंत
मेंढ्यांचं मूत पितोय
बिरु धनगर जोपर्यंत

आपण लढूयात
सरकारी आॅफिसातले कारकून
रक्ताची अक्षरे लिहिताहेत तोपर्यंत

आपण लढूयात मित्रा,
कारण लढल्याशिवाय काही मिळत नसतं.
आपण लढूयात,
कारण आपण अजून लढलो नाही,
आपण लढूयात,
लढताना मेलेल्यांच्या,
आठवणी जिवंत ठेवण्यासाठी
आपण लढूयात मित्रा.
(पृ. ११६-१७)
*

'पाश' च्या कविता 
अवतारसिंह संधू 'पाश'
हरिती प्रकाशन, पुणे २०१७
पृष्ठ: १९२


Leave a Reply