जलसंधारणासाठी शिवार एकवटतय ! पाणी परिषद नरेवाडी – नवनाथ मोरे

ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे सधन भाग म्हणून पाहिले जाते, त्याच भागात असंख्य गावे पाण्यासाठी तडफडत आहेत. पाणीदार असलेल्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरी, बोरवेल आटल्या आहेत. प्रदूषण वाढत आहे. हे सगळे प्रश्न निर्माण होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील डोंगरदऱ्यातील गावे जलसंधारणासाठी एकवटली आहेत. दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी पाणी फौंडेशन; महाराष्ट्र , अखिल भारतीय किसान सभा; कोल्हापूर, तुप्पुरवाडी को. ऑप. क्रेडिट सोसायटी; मुंबई यांच्या संयुक्त विद्यामानाने “पाणी परिषद” नरेवाडी येथे पार पडली. या परिषदेसाठी नरेवाडी, तुप्पुरवाडी, सावतवाडी, मुंगुरवाडी, बटकणंगले, कडाल या गावातील शेतकरी, नोकरदार, शिक्षक, राजकारणी जमले होते.

तापमानवाढ जागतिक चिंतेचा विषय बनला असताना येणाऱ्या काही वर्षात जगाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्रासह देश पाणीटंचाईत होरपळणार हे आताच्या धरणातील पाण्याचा साठा पहाता दिसून येते. जवळपास सर्वंच धरणातील ७० टक्के पाणी संपलेले आहे. परंतु प्रश्न फक्त पाण्याचा नसून एकूणच शासनाच्या धोरणांचा आहे. तरीही शासन ज्या पध्दतीने योजना आणत आहे, ते पाहता ती जनतेच्या हिताची नसून भांडवलदारी जगताच्या हिताचीच आहेत. हे लक्षात येते.

या कार्यक्रमासाठी विषेश म्हणजे मुंबईचे नोकरदार एकवटले आहेत. काय गरज पडली असेल या लोकांना? मुंबईकडे आपण आर्थिक राजधानी म्हणून पाहत असताना या लोकांना गावासाठी काहीतरी करावे असे का वाटले असेल? अनेक माणसं सांगत होती. पाण्यामुळे बायका गावाकडे येण्यास मागत नाही. आम्ही तरी कसं येणार ? पाण्यासाठी ही अवस्था असेल तर काय करणार. आज गावागावात पाणी नाही, अशा गावांमध्ये मुलींचं लग्न करायला पालक आणि मुलीही तयार नसतात. नोकरीला मुंबईला आहे म्हणून मुली देत होते, पण मुंबईला नोकरीची काय अवस्था आहे, हे लोकांना माहित आहे. मिळंल ते काम करावे लागते, हा सुर उमटत होता. गाव हेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक माणसं या परिषदेत आपल्या भावना व्यक्त करत होते. परिषदेचे निमंत्रक, कडाल या गावातून इंचलकरंजीत स्थलांतरित झालेले सुभाष निकम सांगत होते, नोकरीसाठी गावातून स्थलांतर झालो. परंतू गावाकडे आलो की आपल्या मातीची आठवण होते. गावात पाण्याची कमतरता असल्यामुळे जास्त दिवस राहू शकत नाही. आम्हाला मेल्यानंतर गावाकडे न्या असे म्हणतो, पण गावात नेण्यासाठी जवळीक असणे गरजेचे आहे. त्यासाठी कडालमधील माणसांची मुंबईमध्ये भेट घेऊन पाण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यातून माणसं तयार होत आहेत. सावतवाडी या गावातून स्थलांतरित झालेले मनोहर ढवळे सांगत होते, आम्ही गाव जरी सोडले असले तरी गावाबद्दलची ओढ आहे. गावातील पाण्याचा विचार करता येणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी गट-तट विसरून एकत्र येण्याची गरज आहे. सावतवाडी जलसंधारणाचे प्रमुख गावचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील सांगत होते, मुंबईला असलो तरी एक आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. इथं आमची माणसं आहेत. पाण्याची कमत रता असल्यामुळे बाटलीबंद पाण्याचे बॉक्स घेऊन गावी यावे लागते. त्यामुळे जलसंधारण होणे गरजेचे आहे. सर्वांना पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकर पुढे येत आहोत. अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर सांगत होते, मुळात हा प्रश्न का निर्माण झाला याचा शासन विचारच करताना दिसत नाही. शासन फक्त योजना आणत आहे, योजनांचा फायदा होतो का नाही याचा आढावा घेतला जात नाही. शासनाने जी काही धोरणे घेतली गेली आहेत; ती हिताची आहेत. परंतु ती सर्वसामान्यांच्या हिताची नाही. ती भांडवलदारांच्या हिताची आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ५० हजार हेक्टर जमीन आहे, त्यातील फक्त १ लाख २८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. कोल्हापूरातील सर्वांत जास्त पाणी ऊसाला जात आहे. गडहिंग्लज मध्ये जास्त पाऊस पडूनही शिरोळचे सिंचन क्षेत्र जास्त आहे. या परिस्थितीला शासनाची भांडवली धोरणाबरोबर जनताही तितकीच कारणीभूत आहे. कारण पाण्याचे नियोजन न केल्यामुळेच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तुप्पुरवाडी को. क्रेडिट सोसायटी, मुंबईचे सचिव गावचे सुपुत्र अँड. सुभाष घाडगे सांगत होते, पाणी हे जीवन आहे, पण पाणी विष बनत आहे. नोकरीनंतर सगळे गावाकडे येणार आहेत. पाणीच नसेल तर कसे होणार? त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन जलसंधारणासाठी प्रयत्न करत आहे. सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. जलसंधारणाचे तांत्रिक प्रशिक्षक मयुर कर्णे सांगत होते, आपण दररोजच्या वापरतून हजारो लिटर पाणी वाया घालवत आहोत. मग ते गटारीमार्गे ओढा, नद्यांतून समुद्राला जाऊन मिळते. सांडपाण्यामुळे दुर्गंधी, आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. सांडपाण्याचा पुर्नवापर बरोबर भुजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीतच कसे मुरवता येईल यावर भर देणे गरजेचे आहे. सामुहिक कृती हा याचा पाया असला पाहिजे. त्यासाठी गावाचे मनसंधारण झाले तरच जलसंधारण शक्य आहे. गावातील माणसं यासाठी पुढे येत आहेत. सावतवाडी गावात १० लाख रूपये लोकवर्गणीतून जमा केले आहेत. अजून त्यात वाढ होईल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत होते. मुंबईकर मात्र सरसावले आहेत. तुफान आल्यासारखे ते कामाला लागले आहेत. जनजागृती करण्यासाठी गल्लोगल्ली फिरू लागलेत. अक्षरशः कार्यक्रमासाठी रजा टाकून माणसं जमलेत. जलसंधारणासाठी आता शिवार एकवटलंय. परंतु शासन ‘जलयुक्त शिवार’, गाळमुक्त धरण आणि शाळयुक्त शिवार यांसारख्या योजना आखत आहेत. सरकारने जनतेचा पैसा वापरला, पण जनतेचा पैसाच पाण्यात वाहून गेला. कारण बांधलेले बंधारे, तलाव यांत पाणीच शिल्लक नाही. गाजावाजा करून आणलेली योजना फोल ठरली आहे. मुळात डोंगरावर पडणाऱ्या पाण्याच्या वेग कमी करून ते पाणी तेथेच कसे मुरेल याचा विचार करून प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे. पैसा खर्च केला जातो, मात्र पाणी साठत नाही, अशी आवस्था झाली आहे. माती वाहून जाऊच नये यासाठी उपाय करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. मात्र शासन यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट झाल्यामुळे विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. गावचा विकास करायचा असेल तर मनसंधारण करण्याची गरज आहे. नक्कीच आपण विकास साधू शकतो. हा ठराव या परिषदेने परित केला. गावागावात रात्रीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. शिवारफेऱ्या निघू लागल्या आहेत. गावच्या विकासासाठी पाच वर्षाचा जो “गावविकास आराखडा” बनवला जातो. तो सुध्दा शिवार फेरी काढून केला जातो. पण ते प्रत्यक्षात आले नव्हते. ते जनतेच्या एकजूटीने साध्य करून दाखवले आहे. बदलाची ही नांदी गावोगावात पसरेल ?

लेखक- कृषी पदवीधर असून एसएफआय ह्या विद्यार्थी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

Leave a Reply